श्‍वानाचे मालक नको, मित्र व्हा!

श्‍वानदंशामुळे मृत्यूच्या घटना वाढीस लागल्याने पिटबुल, रॉटलवियर, बुलडॉग, वुल्फ डॉग इत्यादी हिंस्त्र प्रजातींवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
Dog
Dogsakal

- किशोर बोकडे

श्‍वानदंशामुळे मृत्यूच्या घटना वाढीस लागल्याने पिटबुल, रॉटलवियर, बुलडॉग, वुल्फ डॉग इत्यादी हिंस्त्र प्रजातींवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्यानुसार त्यांना पाळण्यावर आणि त्यांची विक्री किंवा पैदास करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. बंदीचा हेतू काही प्रमाणात योग्य असला तरी श्वानांना एका मालकापेक्षा मित्राची जास्त गरज असते, हे लक्षात घ्यायला हवे.

मानवाच्या अस्तित्वापासून म्हणजे अगदी अश्मयुग, पाषाणयुग ते मध्ययुग व सध्याच्या काळातही श्‍वानाला मानाचे स्थान मिळाले आहे. इतर प्राण्यांच्या तुलनेत त्याला प्रेम, जिव्हाळा अन् आपुलकी अधिकच मिळत आली. सुरक्षारक्षक, प्रतिष्ठा, हौस, शेतीचे रक्षण, भूतदया इत्यादी विविध कारणांसाठी श्‍वान पाळला जातो. पाळीव, भटके आणि जंगली श्‍वान अशी त्यांची वर्गवारी असली तरी प्रसंग आणि काळानुरूप त्यांचे स्वभाव गुणधर्म वेगवेगळे असतात.

श्‍वान मुळातच एक सामाजिक प्राणी. साहजिकच मानवी जीवनात त्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. मानवासोबत हावभावाद्वारे संभाषण करण्याची कला श्‍वानाने अवगत केली आहे. कान-शेपटी हलवणे वा चाटणे अशा क्रियांद्वारे तो मानवाशी संप्रेषण करत असतो. त्यामुळे श्‍वान प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनला आहे. असे असले तरी काही वाईट मानसिक प्रवृत्तीमुळे व मालकाच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे श्‍वान आक्रमक होऊन चावा घेतल्याच्या घटना वाढत आहेत.

त्यांच्या दंशामुळे मृत्यूच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. काही हिंसक श्वान इतके क्रूर ठरू लागले की, केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी आणली. काही नागरिक आणि प्राणी संघटनांनीच तशी मागणी केली होती. श्‍वानांच्या घातक प्रजातींवर निर्बंध घालण्याच्या निर्णयाचे स्वागत करायला हरकत नाही; पण त्यांच्यावर गुलामाप्रमाणे हक्क न गाजवता मित्रासारखी वागणूक दिली तर नक्कीच बदल घडेल.

श्‍वानाच्या बाबतीत कोणत्याही अप्रिय घटनेला अनेक गोष्टी जबाबदार असतात. मात्र, त्याचा सारासार विचार न करता आपण त्यालाच दोष देऊन हात झटकतो. त्याला अज्ञान हे एक महत्त्वाचे कारण. जगभरात श्‍वानाच्या हजारो प्रजाती आहेत. टीव्ही-जाहिरातींच्या माध्यमातून त्यांच्याबद्दलचे आकर्षण आणखी वाढते. भारतीय व्यक्ती नेहमीच अनुकरणप्रिय राहिली आहे.

त्यामुळे देश-विदेशातील अनेक प्रजाती आपल्याकडेही असाव्यात असा अट्टहास असतो. मात्र, त्या त्या श्‍वानांचे गुणधर्म आणि वैशिष्ट्यांची माहिती नसल्यामुळे त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. सध्या श्‍वानांच्या विदेशी घातक प्रजातींवर नाराजीचा सूर येत आहे. त्यांच्या २३ आक्रमक जातींवर बंदी घालण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. ते श्‍वान मानवासाठी कसे घातक आहेत, हे सांगितले जात आहे.

प्रत्येक प्राण्याचे आणि त्याच्या प्रजातींचे वेगळे वैशिष्ट्य असते. अमेरिकन पिटबुल, रॉटलवियर, बुलडॉग, वुल्फ डॉग इत्यादी प्रजाती मुळातच आक्रमक असतात. तो त्यांचा स्वभावधर्मच आहे. म्हणून त्यांना पाळू नये, असा निष्कर्ष काढणे कितपत रास्त आहे? त्यांचा आहार, दैनंदिन सवयी, व्यायाम, औषधोपचार, त्यांना हाताळण्याची योग्य खबरदारी घेतल्यास ते नक्कीच आपलेसे होतील.

कोणताही श्‍वान पाळण्यापूर्वी त्याचा पूर्वअभ्यास गरजेचा असतो. त्याला कोणते हवामान आवडते, त्याच्या आवडीचे खाद्य काय, त्याला राग येऊ नये म्हणून काय करावे हे समजून घ्यायला हवे. भारतातील बऱ्याच श्‍वानपालकांना त्याबद्दलचे अज्ञान असल्याने हल्ल्याच्या, दंशाच्या घटना घडतात.

बुलडॉग, पिटबुल किंवा वुल्फ डॉगसारख्या प्रजातींच्या श्‍वानांना व्यायाम, खेळणे आणि फिरणे आवडते. सतत कामात राहणे त्यांना पसंत असते. एखाद्या कोपऱ्यात पडून राहणे किंवा एकटेपणा त्यांना आवडत नाही. अशा श्‍वानांना कित्येक दिवस एकाच जागी डांबून ठेवल्यास किंवा त्यांना फिरायला बाहेर घेऊन न गेल्यास त्यांच्या वर्तणुकीत बदल होतो. परिणामी ते आक्रमक होतात. अशा प्रजाती बलवान आणि हुशार मानल्या जातात.

संरक्षणासाठीच त्यांचा अधिक वापर केला जातो. असे श्‍वान मोकळे सोडले जात नाहीत. त्यांना नेहमीच पिंजऱ्यात किंवा साखळीने बांधून ठेवले जाते. साहजिकच ते आक्रमक होतात. अशा श्‍वानांना खेळताना, झोपलेल्या अवस्थेत असताना वा स्तनपान करताना हात लावल्यास ते कमालीचे चिडतात. समोरच्या व्यक्तीचा चावा घेऊन जखमी करतात.

बुलडॉग, सेंट्रल एशियन शेफर्ड, डोगो अर्जेंटिनो, तोसा इनू, मॉस्को गार्ड इत्यादी श्‍वानांची शरीरयष्टी मोठी असते. सामान्य श्‍वानांच्या तुलनेत ते कित्येक पटीने मोठे असतात. ३५ ते ५५ किलोपर्यंत त्यांचे वजन असते. त्यामुळे त्यांना आहारही भरपूर लागतो. साहजिकच त्यांना पोटभर खायला मिळाले नाही अथवा कमी मिळाले तर ते हिंसक बनतात.

भूक भागवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. त्यामुळे त्यांच्यात नैसर्गिकच आक्रमकपणा असतो, पण तो घातक ठरत असेल तर त्यावर निर्बंध यायलाच हवेत. त्यासाठीच एक मालक म्हणून आपलेही वागणे बदलण्याची गरज आहे.

बऱ्याच जणांना श्‍वान पाळण्याचा अजिबात पूर्वानुभव नसतो. शेजाऱ्याने पेट डॉग आणला किंवा लहान मुलाने हट्ट केला म्हणून घरी मोठ्या हौसेने त्याला घरी आणले जाते. त्यातील बरेच जण प्रथमच श्‍वान पाळत असतात. जर आपल्याला अनुभव असेल, श्‍वानाला हाताळायचे कौशल्य माहीत असेल तर नक्कीच दंशाच्या किंवा हल्ल्याच्या घटना टाळू शकतो. काही जण श्‍वानाकडे गुलामाच्या नजरेतून पाहतात.

त्याने आपले ऐकलेच पाहिजे, त्याने अमूक एक गोष्ट केलीच पाहिजे यासाठी अट्टहास असतो; मात्र कोणीही त्याच्याकडे मित्रत्वाच्या भावनेतून पाहत नाही. आपल्या अपेक्षा त्याच्यावर लादल्या जातात. तसे न करता प्रेमाने आणि मायेने त्याच्याशी वागल्यास नक्कीच तो मित्र बनतो.

पाळीव आणि भटक्या श्‍वानांची तुलना करणेही चुकीचे आहे. भटक्या श्‍वानांना निसर्गाने काही उपजत शक्ती दिलेल्या असतात, ज्यामुळे ते स्वतःचे रक्षण करू शकतात. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला, गंभीर परिस्थितीला सामावून घेण्याची ताकद त्यांच्यात असते. याउलट हायब्रिड वा विदेशी प्रजातींच्या श्‍वानांकडे मात्र मुद्दामहून लक्ष देण्याची गरज असते.

त्यांच्यातील प्रत्येक बदलाकडे बारकाईने पाहावे लागले. सतत पशूतज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांची देखभाल करावी लागते. त्यांच्या अंगावर रक्तपिपासू कीटक होऊ नये याची खबरदारी घ्यायला हवी. त्याकडे आपले दुर्लक्ष झाल्यास नक्कीच त्यांच्यात हिंस्त्रपणा येतो.

बुलडॉग आणि चिहुआहुआ यांचे क्रॉस ब्रिडिंग करून ‘पग’ नावाचा श्‍वान जन्माला घालण्यात आला. त्याच्या कवटीचा आकार विचित्र असतो. त्यात त्याचा मेंदू मावत नाही. त्यामुळे मेंदूवर दाब येऊन येऊन आयुष्यभर त्यांना फिट्स येत राहतात. त्या श्‍वानांच्या नाकाच्या पडद्याचे हाड नसते. त्यामुळे असे श्‍वान सतत श्‍वसन विकारांनी ग्रस्त असतात. दहा पावले चालले तरी त्यांना लगेच धाप लागते.

त्यांच्या नाका-डोळ्यांना सतत इन्फेक्शन किंवा काहीना काही त्रास होत राहतो. एका टेलिकॉम कंपनीच्या जाहिरातीमधून ‘पग’ श्‍वान मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्याच्या जीवावर श्‍वान ब्रिडिंग करणाऱ्यांनी लाखो रुपये कमावले. नियमानुसार एका मादी श्‍वानाचे ब्रिडिंग दोन वर्षांतून एकदाच केले पाहिजे; परंतु हे कागदपत्रांपुरतेच.

अनेक जण जाहिरातीला भुलून जेव्हा असे श्‍वान खरेदी करतात आणि त्यांना त्यांच्या औषधपाण्याचा खर्च किंवा काळजी घेण्याचे कष्ट झेपत नाहीत, तेव्हा त्यांना सर्रास इंजेक्शन देऊन मारले जाते किंवा मरायला सोडून दिले जाते. स्वतःच्या क्षुल्लक मनोरंजनासाठीचे एक बाहुले म्हणून अख्खीच्या अख्खी पैदास रोगट आणि अपंग बनवणारी मानसिकता बदलायला हवी.

श्‍वान जवळचा मित्र म्हणून त्याचे संगोपन केले जात असले तरी त्याचा अन्य फायद्याच्या गोष्टींसाठी उपयोग करून घेतला जातो. हिंसक पद्धतीने त्यांच्या जीवाशी खेळ करून अनैसर्गिक अत्याचार केले जातात. त्यामुळे त्यांच्यात कमालीचा आक्रमकपणा येतो. शेपूट किंवा कान (क्रॉपिंग) कापण्याचे प्रकार सर्रास आढळतात. मुळातच शेपूट आणि कानासारखे अवयव श्‍वानाला आपल्या भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे.

शेपटीद्वारे व कानाद्वारे ते मालकांशी किंवा समोरील व्यक्तींशी संवाद साधतात. राग, प्रेम अन् भीती व्यक्त करण्यासाठी श्‍वान शेपूट आणि कानांचाच वापर करतात; मात्र त्याचाच गैरफायदा घेत आपल्या फायद्यासाठी काही जण त्यांना कुरूप करतात. घराचे किंवा मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या श्‍वानांच्या शेपट्या किंवा कान विशिष्ट पद्धतीने कापले जातात.

शेपूट हलवणे याचा अर्थ मालकांप्रती प्रेम व्यक्त करणे किंवा समोरील व्यक्ती ओळखीचा आहे असा होतो किंवा शेपूट खाली केल्यास तो घाबरला आहे, असे समजले जाते. त्यामुळे गार्ड म्हणून पाळल्या गेलेल्या श्‍वानांची शेपटी मुद्दाम कापली जाते, ज्यामुळे तो ओळखीच्या व्यक्तीसमोर ती हलवू शकणार नाही. त्यामुळे ओळखीचा किंवा अनोळखी व्यक्ती घाबरून जातो, हा त्यामागचा हेतू. शेपूट कापण्याची पद्धतही अतिशय हिंस्त्र आहे.

अगदी लहान वयातच म्हणजे दीड-महिन्‍याच्या पिल्लाच्या शेपटीच्या सुरुवातीच्या भागाला कमी जाडीच्या दोरीने किंवा तारेने घट्ट बांधले जाते. त्यामुळे काही दिवसांनंतर शेपूट आपोआप तुटून पडते. दरम्यानच्या काळात त्यांना जीवघेण्या वेदना सहन कराव्या लागतात. त्यावेळी वेदना असह्य झाल्यामुळे त्यांच्यासोबत खेळणाऱ्या लहान मुलांवर राग काढला जातो. त्यामुळे घरातील मुलांना वा मालकाला चावायला तो मागेपुढे पाहत नाही.

काही प्रसंगी शेपटीचा भाग चाटता येत नसल्यामुळे त्यावर कीड तयार होऊन संसर्ग होतो. प्रसंगी त्यांचा जीवही जातो. दोन श्‍वानांची लढाई लावून बक्कळ पैसा कमावण्याचा प्रकारही अनेक ठिकाणी आहे. त्यासाठी लाकूड कापण्याच्या करवतीच्या दातांप्रमाणे तसेच एखाद्या झाडाच्या पानाप्रमाणे नक्षीदार आकारात त्यांचे कान विचित्र पद्धतीने कापले जातात. मात्र, अशा प्रकारामुळे कानाच्या नसा बंद झाल्यामुळे ते पूर्णपणे उभे राहतात.

त्यामुळे ते आक्रमक वाटतात. टवकारलेले कान म्हणजे हल्ल्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे भीती निर्माण होते. मात्र, अशा अघोरी प्रकारामुळे श्‍वानांची ऐकण्याची संवेदनाच नाहीशी होते. समोरील आवाज ऐकून घेऊन त्याला प्रतिसाद देण्यात अडथळे येतात. त्यामुळे समोरील व्यक्तीवर ते सहज हल्ला करून चावण्याचा प्रयत्न करतात. अशा गोष्टीला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.

श्‍वानांच्या चांगल्या-वाईट वर्तणुकीला सर्वस्वी मानवच जबाबदार असतो. आपण जसे वागू त्याप्रमाणे त्याच्या वर्तनात बदल होत असतो. तो रागीट, चावरा किंवा हल्लेखोर व्हावा म्हणून क्रूर पद्धतीने त्याला मारले जाते. काठी-बेल्टने मारणे, शेपूट-कान ओढणे, डोळ्यात डोळे घालून रागाने पाहणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. त्यामुळे तो हिंसक बनत जातो. त्याला कोणी प्रेमाने हात लावला तरी आपल्याला मारहाण होणार, अशा भीतीने तो हल्ला करतो किंवा चावतो.

‘माझ्याकडे सर्वांत डेंजर कुत्रा पाहिजे. सर्वांनी त्याच्याकडे बघून पळून गेलं पाहिजे’ अशी मानसिकता बऱ्याच जणांची असते. असा विचार आणि प्रवृत्तीच श्‍वानाला घातक बनण्यासाठी पोषक ठरते. ती मानसिकता बदलायला हवी. श्‍वान प्रेमाचा आणि मैत्रीचा भुकेला असतो. त्याच्यावर दबाव न आणता, त्याचा मालक नव्हे; तर मित्र बनने गरजेचे आहे.

kishorbokade@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com