नैराश्य पळवा, आत्महत्या टाळा...

राज्यात आणि देशात गेल्या काही महिन्यात तरुणांनी आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत. ऐन तारुण्यात असा विचार कसा केला जातो? आत्महत्या कशी टाळता येईल.
Suicide
SuicideSakal

राज्यात आणि देशात गेल्या काही महिन्यात तरुणांनी आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत. ऐन तारुण्यात असा विचार कसा केला जातो? आत्महत्या कशी टाळता येईल. मुळात या अवस्थेपर्यत ती व्यक्ती पोहचली आहे हे कळणेच अवघड असते. हा सगळा मनोव्यवहार समजून घेणे गुंतागुंतीचे असते. या स्थितीवर मात कशी करायची आणि ही परिस्थिती हाताळायाची कशी याविषयी...

तरुण वय हे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे असते. अशा वयात क्षुल्लक कारणाने नैराश्य येऊन तरुण पिढी आत्महत्येसारखे विपरीत पाऊल उचलते. मुळात नैराश्याचे कारण शोधावे. कोणताही न्यूनगंड न बाळगता त्यावर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास त्या गर्तेतून सहज बाहेर पडता येते.

व्यक्ती प्राणावर म्हणजे जिवावर उदार होतो, त्यावेळी निश्चित अशी मानसिक समस्या असते. त्याचे अंतिम पर्यवसन हे आत्महत्येत किंवा आत्महत्येच्या प्रयत्नात होते. त्यामागे अनेक कारणे आहेत. मुळात कोणत्याही वयोगटात ही मानसिक समस्या निर्माण होऊ शकते. ती निर्माण होण्यामागची कारणे आपण पाहूयात. ही कारणे शोधताना त्याचे तीन गटात विभाजन करता येते.

१) नॉट टू बी

जगावे की मरावे म्हणजेच टू बी ऑर नॉट टू बी असा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी मला जगायचेच नाही अशी भावना निर्माण होते. ती निर्माण होते, म्हणजे गंभीर मानसिक आजार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अशा व्यक्तींना जीवनात काहीच अर्थ वाटत नाही. निर्माण झालेल्या परिस्थितीतून ते बाहेर पडत नाहीत, त्याचबरोबर त्यांच्या मनातील भावनाही समजून येत नाहीत. अशा व्यक्ती आपला कोणताही प्रयत्न जाहीर करत नाहीत. त्यांच्या जवळच्या लोकांनाही घटना घडल्यावरच समजते. ते अत्यंत नियोजनपूर्वक कृती करतात. हवे ते साधणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते.

२) टू बी ऑर नॉट टू बी

या परिस्थितीमधील व्यक्ती दोलायमान असते. आत्महत्येची प्रवृत्ती क्षणिक असते. त्यांच्या हातून गंभीर बाब होऊ शकते. भावनेच्या भरात आत्महत्येसारखी घटना घडू शकते. या गटातील व्यक्तींचे आपली योजना जाहीर करण्याचे प्रमाण खूप कमी असते.

३) टू बी

या गटातील लोकांना जगायची इच्छा असते. आत्महत्येचा अनेकदा इशाराच असतो. आत्महत्येचा प्रयत्न ही एक प्रकारची खेळी असते. लक्ष वेधण्याचा यामागे प्रयत्न असतो. या गटात भावनेचे प्रदर्शन करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर दिसते. अर्थात वयानुसार प्रदर्शन करण्याची वृत्ती बदलते. यासाठी वेगवेगळे मार्ग निवडले जातात. आता सोशल मीडिया सहज उपलब्ध असल्याने त्याचा वापर होताना दिसत आहे. यातील आणखी महत्त्वाचा आणि दुसरा मुद्दा असा की, काही व्यक्तींमध्ये भावनिक आणि बौद्धिक परिपक्वता खूपच कमी असते. दोन्ही कमी असल्याने सोशल मीडियाचा वापर करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अशा व्यक्तीला आपल्या वर्तनाचे गांभीर्य ठसवायचे असते. तसे झाले तर आजूबाजूच्या व्यक्ती आपली भावनिक दखल घेतली असा तिचा होरा असतो. परंतु गांभीर्य ठसविण्याच्या प्रयत्नात आत्महत्येच्या प्रयत्नाची तीव्रता वाढविली जाते आणि त्यातून जिवाला धोका निर्माण होतो. या गटालाही आवश्यकता असते ती मानसिक आधाराची.

काय आहेत कारणे?

  • तरुणांमध्ये दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. यामागे विविध कारणे आहेत.

  • आताचा काळ स्पर्धेचा आहे. त्यामध्ये वाढ होत आहे. अशा वेळी स्पर्धेला तोंड देता आले नाही की आत्महत्येचा मार्ग निवडला जातो.

  • गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे शैक्षणिक योजना अडचणीत आल्या आहेत. त्याचाही काही प्रमाणात परिणाम झालेला आहे.

  • सतत घरात राहिल्याने दोन पिढ्यांमधील विचारांचे अंतर पुढे आले आहे. नातेसंबंधांवर त्याचा परिणाम दिसत आहे. समवयस्कांबरोबरही पुरेशा संवादाचा अभावही आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे व्हर्च्युअल स्पेसला या पिढीला सामोरे जावे लागत आहे.

  • तरुणाईचा काळ हा व्यक्तिमत्त्व घडविण्याचा असतो. कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे वर्तन कसे शिकावे याचे प्रशिक्षण तरुणांना मिळणे गरजेचे आहे. काही जणांच्या व्यक्तिमत्त्वात चिंता आणि नैराश्याच्या भावना इतरांपेक्षा जलद आणि तीव्र निर्माण होऊ शकतात म्हणूनच निरोगी व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे.

  • उद्दिष्टांची स्पष्टता नसलेली तरुणाई आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसते. त्याचबरोबर कुटुंबामध्ये विसंवाद असेल तर व्यक्तीच्या एकटेपणात भर पडते. आणि अशा प्रसंगी आत्महत्येसारख्या घटना घडू शकतात.

काय आहेत उपाय?

कोणत्याही वयोगटातील व्यक्ती असली तरी तिला मानसिक आरोग्याचे रक्षण करण्याची आवश्यकता असते. चांगले मानसिक आरोग्य मिळविण्यासाठी योग्य तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला वेळोवेळी घेतला पाहिजे. वर्तनात जराही बदल झाला तरी त्याबद्दल योग्य दखल घेतली पाहिजे. आपल्याकडे अशा परिस्थितीत तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेण्यासाठी कुटुंबासमोर अनेक गैरसमजुती जाणवतात. मदत घ्यायची असते परंतु ती मागायची कशी हा मोठा प्रश्न असतो. अशावेळी फॅमिली डॉक्टरांशी बोलून योग्य तो सल्ला घेण्याची गरज असते.

ओळखायचे कसे?

प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात त्रासदायक भावना असतात. त्याची तीव्रता, वारंवारिता आणि कालावधी किती असतो यावर आपण भावनेची तीव्रता मोजता येते. सर्वसाधारण व्यक्तीला नैराश्य येणे हे चुकीचे नाही. ते कोणत्याही तत्कालिक कारणाने येऊ शकते. मात्र त्याची तीव्रता, वारंवारिता आणि कालावधी किती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. हे ओळखण्याची, तपासण्याची काही परिमाणे आहेत.

  • शारीरिक आरोग्यावर परिणाम

  • संबंधित व्यक्ती आपल्या उद्दिष्टांना पूर्णपणे न्याय देत नाही.

  • संबंधित व्यक्तिची उत्पादकता कमी होत जाते.

  • संबंधित व्यक्ती प्रत्येक काम यांत्रिक पद्धतीने करतो.

  • नात्यांवर होणारा परिणाम.

  • असे कोणत्याही व्यक्तीत दिसत असेल तर त्याला व्यावसायिक समुपदेशकाची आवश्यकता आहे, हे लक्षात घ्यावे.

शालेय अभ्यासक्रमात समावेश

तरुणपणी व्यक्तिमत्त्व विकास हा महत्त्वाचा घटक असतो. तरुणपणी तीव्र नैराश्य आले तर त्याचे प्रतिबंधन कसे करावे म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास. परिस्थितीला सामोरे जाण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. यात केवळ त्रासदायक परिस्थिती असे नाही, चांगल्या परिस्थितीत उत्कर्ष करणे आणि वाईट परिस्थितीत तरून जाणे याचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. आणि याचे शिक्षण दिले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा. कारण जग हे परिवर्तनशील आहे. त्यामध्ये राहताना ताठर विचारधारा घेऊन जगता येणार नाही. त्यासाठी मोकळा दृष्टिकोन ठेवल्यास अनेक समस्यांपासून आपण दूर राहू शकतो.

काय करते कनेक्टिंग इंडिया?

कनेक्टिंग इंडिया आत्महत्या प्रतिबंधाच्या क्षेत्रामध्ये १५ वर्षांपासून काम करीत आहे. हे काम भावनिक आधार देण्याच्या माध्यमातून केले जाते. प्रत्येकामध्ये स्वतःला सावरण्याची आणि संकटातून बाहेर पडण्याची नैसर्गिक क्षमता असते. केवळ मनापासून ऐकून-समजावून घेतल्याने माणसाला स्वतःला सावरण्याचे बळ आणि मार्ग त्यांचा त्यांना मिळू शकतो या तात्त्विक पायावर कनेक्टिंग संस्थेचे काम आधारलेले आहे. परंतु हे ऐकून आणि समजावून घेणे हे सहानुभुतीने, त्या व्यक्तीविषयी कोणतेही मत किंवा धारणा न बनवता करता आले पाहिजे कनेक्टिंग संस्थेच्या मुख्य चार कार्यक्रमांपैकी डिस्ट्रेस हेल्पलाइन ही दररोज दुपारी १२ ते रात्री ८ सुरू असते. या हेल्पलाईनवर तुम्ही तुमच्या कोणत्याही ताणासाठी ९९२२००४३०५/९९२२००११२२ या नंबरवर फोन करून तुम्ही बोलू शकता कनेक्टिंग इंडिया संस्थेचा दुसरा मुख्य कार्यक्रम म्हणजे सुसाईड सर्व्हावर सपोर्ट कार्यक्रम. या कार्यक्रमांतर्गत ज्यांनी स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला आहे किंवा ज्यांनी जवळचे कोणी आत्महत्येमुळे गमावले आहे, त्यांच्याशी त्यांच्या आप्तस्वकीयांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना भावनिक आधार देण्याचा प्रयत्न या संस्थेमार्फत केला जातो.. अशा व्यक्ती ज्यांना या सेवेचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी ८४८४०३३३१२ या नंबरवर एसएमएस करून संपर्क साधावा. ही सेवा दर बुधवार, शुक्रवार आणि शनिवार सुरू असते. एसएमएस मिळाल्यानंतरच्या आठवड्यात संस्थेच्या मार्फत संबंधितांना फोन केला जातो.

कनेक्टिंग इंडिया देते ‘लाइफ लाइन’

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तिचे म्हणणे ऐकले तरी तो या कृतीपासून परावृत्त होऊ शकतो. हे ऐकण्याचे काम कनेक्टिंग इंडिया या स्वयंसेवी संघटनेच्या मार्फत केले जाते. आणि संबंधित व्यक्तीला आत्महत्येपासून परावृत्त करतात.

दीड वर्षात कॉल्सची संख्या वाढली

  • मार्च २०२० पासून, म्हणजे साधारण १५ महिन्यात संस्थेच्या हेल्पलाईनवर ३ हजारांपेक्षा जास्त कॉल्स आणि जवळपास १ हजार इमेल्स आले.

  • हे कॉल्स करणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाण ३० वयोगटापर्यंतच्या तरुणतरुणींचे. (तरुणींपेक्षा तरुणांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले)

  • प्रामुख्याने कौटुंबिक/नातेसंबंधातल्या समस्या, मानसिक समस्या, आर्थिक, बेरोजगारीच्या समस्या आणि अभ्यास-शिक्षणाविषयच्या समस्यांचे प्रमाण अधिक.

आपल्या आर्थिक, शारीरिक, मानसिक गरजा असतात, तशाच भावनिक गरजही असतात. आपण बरेचदा आपल्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करत असतो. कारण आपल्याला त्या फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत किंवा त्या नाही भागल्या तर फारसे काही बिघडत नाही असे आपल्याला वाटत असते. आत्महत्येच्या बाबतीत बरेचदा भावना व्यक्त करता न येणे, किंवा व्यक्त होण्याला तशी सुरक्षित (निरपेक्ष) जागा न मिळणे, वेळेवर भावनिक आधार उपलब्ध न होणे ही तात्कालिक कारणे असतात. निरपेक्ष ठिकाणी भावना व्यक्त करता येणे, भावनिक आधार मिळणे हे आत्महत्या प्रतिबंधाच्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे.

- माधुरी नलावडे, कार्यकारी संचालक, कनेक्टिंग ट्रस्ट, पुणे

(लेखक राज्यातील ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आहेत)

(शब्दांकन : आशिष तागडे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com