आलयं करुणालयम्!

अगदी नेमकं सांगायचं, १९८१ या वर्षातल्या १ जुलैची ही गोष्ट. मनोविकारशास्त्रामध्ये पदव्युत्तर विद्यार्थी म्हणून माझ्या आयुष्यातला पहिला दिवस.
Psychiatry
Psychiatrysakal

अगदी नेमकं सांगायचं, १९८१ या वर्षातल्या १ जुलैची ही गोष्ट. मनोविकारशास्त्रामध्ये पदव्युत्तर विद्यार्थी म्हणून माझ्या आयुष्यातला पहिला दिवस. मध्य-मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयाच्या, पंधरा नंबरच्या ओपीडीची गच्च गर्दी. मी माझ्या सीनियर सहकाऱ्याच्या एप्रनला अगदी पकडून बसलेलो. तो नव्या रुग्णाशी बोलत होता.

‘सगळं कळतंय डॉक्टर... हा अगदी वेड्यासारखा विचार आहे... सूर्याकडं पाहून त्याचं तेज काही माझ्या डोळ्यात उतरणार नाही... तरीही हा विचार आला की पाहावंच लागतं सूर्याकडं... आणि संध्याकाळनंतर दिव्याकडं किंवा ज्योतीकडं...’ समोरचा माणूस सांगत होता. त्याच्याबरोबर होती त्याची केविलवाणी बायको. प्रखर सूर्यकिरणांकडं वारंवार पाहिल्यामुळं त्याला दृष्टिदोष आला होता. म्हणून हे दोघं डोळ्यांच्या ओपीडीत पोहोचले. तिथून आमच्या विभागात.

‘हा नक्की ऑबसेसिव्ह विचार आहे... अवास्तव आहे हे कळत असूनही वारंवार घुसत राहणारा... आणि त्याप्रमाणंच वागण्याची सक्ती करणारा!’ एक सीनियर सहकारी म्हणाला. ‘‘बट् लूक अॅट द बिझारनेस, Bizarre... किती विचित्र आहे हा विचार... हे फक्त ऑबसेशन् नाही... त्या माणसाचं वास्तवाशी असलेलं नातं तुटतंय, ही सायकॉसिस नावाच्या आजाराची सुरुवात असू शकते.’ दुसरा म्हणाला.

इंग्रजी भाषेतून त्यांची ही चर्चा किंवा वादविवाद सुरू होता. पेशंट, त्याची बायको आणि मी सम-प्रमाणात गोंधळलेले... अगदी मुळापासून कन्फ्युजड्! औषधं देऊन त्यांना मानसिक चाचण्यांसाठी बोलवायचं आणि साप्ताहिक, सामूहिक चर्चासत्रासाठी ही केस घ्यायची असं ठरलं. माझे दोन्ही सहकारी बोलता बोलता माझ्याकडं पाहायचे, तेव्हा मी मान डोलावत होतो, माझं अज्ञान लपवण्यासाठी.

दुपारी एकच्या सुमारास ओपीडी संपली. पेशंट्सना बसण्यासाठी बाहेरची बाकं आता रिकामी झाली होती. तिथं तो पेशंट आणि बायको डबा खात बसले होते. बायको त्याला भरवत होती. मी थबकलो. हसलो. ती पण हसली, ‘‘ येता का डॉक्टर जेवायला...!’

मानेनं नाही म्हणत पुढं गेलो. पुन्हा पाठी आलो आणि त्यांच्या शेजारी बसलो. सकाळी ऐकली होती ती आजाराची ‘हिस्ट्री’ होती, लक्षणांची ‘चेक् लिस्ट’ होती... आता मी ऐकत होतो विठ्ठल-रखुमाईची कहाणी. ह्या विचित्र आजारामुळं त्याच्या संसाराची उडालेली परवड.

माझ्या पापण्या ओलावत होत्या. आता माझा पांढरा एप्रन अडसर नव्हता तर आमच्यातल्या नात्याची शुभ्रता बनला होता... अर्ध्या तासानं उठलो तेव्हा उमगलेलं सत्य अजूनही मनाच्या तिजोरीत आणि प्रत्येक दरवाजा-खिडकीत जपून ठेवलंय... Symptoms and script !

आमच्या आय.पी.एच. संस्थेच्या बाह्यरुग्ण विभागात मी किमान आठ-नऊ तास सलगपणानं तीस-पस्तीस कुटुंबांसमवेत असतो. शिकण्यासाठी बसलेले तरुण मनआरोग्यव्यावसायिक कधीकधी अचंबित होतात.

‘आम्हाला शिकवलं जातं, पेशंट सोबत अंतर ठेवून राहायचं... गुंतायचं नाही... तसं करणं प्रोफेशनल नाही होत!’ कधी कधी त्यातली एक धीर धरून विचारते.

‘आपलं प्रोफेशन काय आहे? ... तणावात असलेल्या, भावनिकता अस्ताव्यस्त झालेल्या व्यक्तीला मायेचा आणि मदतीचा हात देणे. तुम्हाला समुपदेशनाची कौशल्यं शिकवताना पुस्तकं आणि प्राध्यापक काय सांगतात? ... Empathy म्हणजे आस्था, आपुलकी महत्त्वाची. समोरच्या व्यक्तीच्या दुःखाबद्दलची कणव, करुणा महत्त्वाची... हो की नाही?’ मी विचारतो.

‘हो... पण ते एक ‘स्किल’ आहे... कौशल्य!’ प्रतिसाद येतो.

‘मान्य करू या ‘कौशल्य’ आहे... पण फक्त समुपदेशनाचं नव्हे तर समृद्ध आयुष्य जगण्याचं. माणुसकीला आपण फक्त ‘साधन’ मानायचं का? ... ते साध्यही आहे आणि साधनही... म्हणूनच आस्था, करुणा ही जीवनमूल्यं आहेत... म्यानात काढायची, घालायची हत्यारे नव्हेत.’’ माझ्या आवाजात ठामपणा येऊ लागतो. मी त्या तरुण मनांचा गोंधळ समजू शकतो. आजकालच्या स्वयंकेंद्रित जगण्याच्या रिवाजामुळं त्यांना माणसाच्या भावनांपर्यंत पोहोचण्याबद्दलच साशंकता असते.

मी त्यांना म्हणतो, ‘माझ्याबरोबर हा प्रवाह फक्त अनुभवा...’ वय वर्षे सात ते नव्वदपर्यंतची मंडळी, त्यांचे नातेवाईक येत राहतात. कुणी माझ्यासाठी यशाची मिठाई आणतात, काही जणांचे अश्रू पुसताना मी हळुवार स्पर्श करतो. मनाच्या तळातल्या गोष्टी बोलल्या जातात. कधी माझा स्वर मार्दवानं भरलेला तर कधी अतिशय ठाम. समोरच्या व्यक्तीचा एकही प्रश्न टाळला जात नाही.

‘सकाळी दहा ते संध्याकाळी सात... तुमची एनर्जी टिकते कशी?’ ते विचारतात.

‘माझ्या मनाला मी सांगतो, की माझ्यासाठी रुग्ण क्रमांक अमुकतमुक आहे पण त्याच्यासाठी मी एकमेव डॉक्टर ना... दुसरं असं की Empathy अर्थात आपुलकी, करुणा अर्थात Compassion या भावना कधीच Draining म्हणजे थकवणाऱ्या नसतात तर Rejuvenating म्हणजे संवर्धक असतात... जर तुम्हाला ‘भावनिक थकवा’ आला तर स्वतःला तपासून पाहा... तुम्ही Empathy ऐवजी Sympathy वर गेलात का? ... आस्था म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावनांबरोबर एकतानता पण त्याच्या समस्येबद्दलची समग्र, सच्ची अशी वैचारिक जाण... दोन्ही एकत्र नांदतात... म्हणून करुणा कधीच लेचीपेची नसते. विश्वाचे आर्त स्वतःच्या मनी उतरवण्याची ज्ञानदेवांची ताकद या भावनेत असते.

ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये, अर्जुनाच्या भावनिक विकलतेचं वर्णन करताना माउली लिहितात, “कर्दमी रूपला राजहंसु.” किती आस्थेनं पाहत आहेत ज्ञानदेव त्या अर्जुनाकडं. माझ्यासमोर मदतीसाठी आलेला प्रत्येक जण वेगळा काय असतो? विचारभावनांच्या चिखलामध्ये अडकलेला, अनारोग्यकारक सवयीच्या अरण्यात वाट चुकलेला ‘स्वत्व’ हरवलेला राजहंस... ज्याला ‘स्वत्वा’चं सत्त्व लाभतं तो स्वतःमधला राजहंस जागृत करतो...

मानसशास्त्र सांगतं, की प्रत्येकामध्ये गुणदोष आहेत. त्यांचा डोळस, विनाअट स्वीकार करू. असं करायलाही स्वतःबद्दलची आणि दुसऱ्याबद्दलची आपुलकी हवीच.

भावनिक आरोग्याच्या क्षेत्रात आणि व्यवसायात ही मूल्यं महत्त्वाची आहेत तशी जगण्याच्या कोणत्या क्षेत्रात नाहीत? ‘सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती दुःखे डोळा पाणी’ असं लिहिणारे बा. भ. बोरकर दुसरं काय सांगतात? करुणेला अहंभावाशी वाकडं आहे, प्रौढीबद्दल नावड आहे आणि प्रसिद्धीशिवायची कृतिशीलता ही तिची वृत्ती आहे. ही गुणवैशिष्ट्यं असणाऱ्या व्यक्तीलाच आपण ‘गुरू’ असं म्हणतो.

त्याचे वर्णन करणाऱ्या एका संस्कृत श्लोकामध्ये शब्द आहेत ‘आलयं करुणालयं. आलय म्हणजे निवासस्थान. राहायचं घर. विद्या राहते ते विद्यालय, बर्फ राहतो तो हिमालय. भावनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सेवा देणाऱ्या सर्व ठिकाणांचं खरं नाव असलं पाहिजे ‘करुणालय.’

माझ्या मनातल्या करुणालयाची चार दशकांची घडण कशी घडली त्याचा मागोवा आपण वर्षभर घेणार आहोत या संवादमालेतून.

(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, लेखक, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com