वृक्षांची जोपासना हीच शुद्ध हवेची उपासना

कानपूरच्या आयआयटीनं काढलेल्या दक्षिण भारताच्या सहलीतून १९७१ मध्ये मी पहिल्यांदा पुण्याला आलो. त्या वेळच्या पुण्याचं हिरवंगार दर्शन मला आजही प्रामुख्यानं आठवतं.
Cultivation of trees
Cultivation of treessakal
Summary

कानपूरच्या आयआयटीनं काढलेल्या दक्षिण भारताच्या सहलीतून १९७१ मध्ये मी पहिल्यांदा पुण्याला आलो. त्या वेळच्या पुण्याचं हिरवंगार दर्शन मला आजही प्रामुख्यानं आठवतं.

- डॉ. अनिल राजवंशी, anilrajvanshi@gmail.com

कानपूरच्या आयआयटीनं काढलेल्या दक्षिण भारताच्या सहलीतून १९७१ मध्ये मी पहिल्यांदा पुण्याला आलो. त्या वेळच्या पुण्याचं हिरवंगार दर्शन मला आजही प्रामुख्यानं आठवतं. आणि, हेही आठवतं की पुण्यात मी त्या वेळी पाहिलेल्या घरांमध्ये साधे फॅन्ससुद्धा नव्हते. आज पुण्यात एसी नसेल तर जगणं कठीण आहे. हिरवाई गडप झालीय. तिची जागा आता काँक्रिटच्या जंगलानं घेतलीय. शिवाय, हवेचं प्रदूषणही भरमसाट वाढलंय. भारतातल्या जवळपास कुठल्याही महत्त्वाच्या शहरात विमानातून प्रवेश करताना आज भस्सदिशी नजरेत शिरतो तो हिरवाईचा पुरता अभाव. मला वाटतं प्रत्येक शहरात मोठ्या प्रमाणात झाडं लावणं हाच तिथल्या हवेचं प्रदूषण कमी करण्याचा अत्त्युत्तम उपाय आहे.

वृक्षांच्या उपकारकतेबद्दलची पुष्कळच अभ्यासपूर्ण आणि तपशीलवार माहिती जगभर सर्वत्र प्रकाशित झाली आहे. तीतून दिसून येतं की, अत्यंत अपायकारक असलेले २.५ ते १० मायक्रॉन (मायक्रोमीटर) आकाराचे द्रव्यकण हवेतून शोषून घेण्यात झाडं अत्यंत उपयुक्त ठरतात. प्रामुख्यानं स्वयंचलित वाहनांच्या धुरातून आणि जैविक पदार्थांच्या ज्वलनातून हे द्रव्यकण हवेत पसरत असतात. यातील २.५ मायक्रॉन आकाराचे द्रव्यकण श्वासावाटे आपल्या शरीरात शिरले तर ते थेट मेंदूपर्यंत जाऊ शकतात. त्यापासून कॅन्सरसह अनेकविध आजार उद्भवू शकतात. याहून थोडे मोठे म्हणजे २.५ ते १० मायक्रॉन इतक्या आकाराचे द्रव्यकण दमा आणि फुफ्फुसांच्या इतर आजारांना कारणीभूत ठरू शकतात.

उपलब्ध आकडेवारी केवळ अंदाजित असल्यानं नक्की आकडा सांगता येत नसला तरी हे द्रव्यकण श्वासावाटे शरीरात गेल्यानं दरवर्षी जगभरात सुमारे तीस लाख मृत्यू होतात असं अभ्यासकांचं अनुमान आहे.

असे हे उपद्रवी द्रव्यकण, झाडं खालील पद्धतीनं अत्यंत परिणामकारकरीत्या पकडतात. झाडांच्या पानांचा पृष्ठभाग काहीसा मेणकट असतो. शिवाय, ती आडवीतिडवी स्वैर पसरलेली असतात. त्यामुळे विविध बाजूंनी येणारे हे सर्व द्रव्यकण त्यांच्यावर सहज चिकटू शकतात. आणखी एक गोष्ट अशी की, पानं धनविद्युतभारित असतात, त्यामुळे २.५ ते १० मायक्रॉन आकाराचे ऋणविद्युतभारित द्रव्यकण त्यांच्याकडे आपोआप आकृष्ट होतात. या तिन्ही कारणांच्या समुच्चयामुळे झाडं कुशल द्रव्यकणनिवारक बनतात.

इंग्लंडमधील एक्झीटर विद्यापीठात २०१६ मध्ये झालेल्या एका अभ्यासाअंती या प्रतिपादनाला पुष्टी मिळाली आहे. तिथं संशोधकांना असं आढळून आलं की, नागरी वसाहतीत अधिक झाडं असणं आणि तिथल्या रहिवाशांना दम्याचा ॲटॅक येण्याचं प्रमाण कमी असणं यांचा सकारात्मक परस्परसंबंध आहे. जिथं झाडं अधिक तिथं दम्याचा असा ॲटॅक येण्याचं प्रमाण कमी आढळतं.

संशोधकांनी असाही निष्कर्ष काढला आहे की, शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या २० ते ३० टक्के इतका भाग झाडांनी व्यापलेला असेल तर द्रव्यकणांचं हे प्रदूषण जवळजवळ २४ टक्क्यांनी कमी होतं. बहुतेक भारतीय शहरांत वृक्षव्याप्त क्षेत्रफळ केवळ ७ ते १५ टक्के इतकं कमी आहे. हे वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे. झाडं केवळ हवेचं प्रदूषणच कमी करत नाहीत, तर ती आपल्या पृथ्वीला उष्णतारोधक ढालही पुरवतात. झाडं शहरांतील आणि उपनगरांतील काँक्रिटचं आणि डांबराचं उष्णतामान चार ते पाच अंश सेल्सिअसनं कमी ठेवतात आणि सूर्याच्या प्रखर अल्ट्राव्हायोलेट किरणांपासूनही आपल्या त्वचेचं रक्षण करतात. झाडांचं आच्छादन असल्यामुळे शहरातील इमारतींमधील एअरकंडिशनिंग मशिन्सवरील भारही बराच कमी होतो.

सर्वच प्रकारच्या झाडांची पानं अशी प्रदूषक द्रव्यं हवेतून बाजूला करण्याचं काम करत असतात; परंतु पाईन किंवा अन्य सूचिपर्णी वृक्ष हे काम विशेष परिणामकारकरीत्या करतात. हे वृक्ष सदाहरितही असतात. हिवाळ्यातही त्यांची पानं झडत नाहीत. त्यामुळे द्रव्यकण आणि धूळ शोषून घेण्याच्या बाबतीत ते सर्वाधिक कार्यक्षम असल्याचं दिसून आलं आहे. आणि म्हणून, शहरातील वृक्षारोपणासाठी विविध स्वरूपाच्या झाडांची निवड करत असताना या सदाहरित वृक्षांचंही योग्य असं प्रमाण आपण त्यात आवर्जून राखायला हवं.

वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणानं झाडांची पानं धूळ आणि चिकट तेल यांच्या दाट आवरणानं आच्छादली जातात. परिणामी, द्रव्यकण काबीज करण्याची त्यांची क्षमता कमी होते; परंतु सुदैवाची गोष्ट अशी की पावसाची एखादी सरसुद्धा या पानांना सुस्नात आणि पूर्ववत् स्वच्छ करून सोडते. प्रदूषक द्रव्यकण हटवण्याच्या प्रक्रियेसाठी ती पुनःश्च सुसज्ज होतात. शिवाय, जमिनीवरून पाण्याचा जोरदार फवारा मारूनही झाडांची पानं आपण स्वच्छ आणि कार्यक्षम बनवू शकतो. काही लोक हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा उपाय सुचवतात; परंतु असं जमिनीवरून झाडांवर पाणी मारणं हे त्यापेक्षा कितीतरी कमी खर्चाचं आणि अधिक सोईचं आहे.

झाडं आपणा सर्वांच्याच जीवनाचं अमर्याद काळापासून पालनपोषण करत आली आहेत. अगदी शब्दश: भूमी आणि आकाश यांमधील दुवा आहेत झाडं. आपल्या मुळांद्वारे ती जमिनीतील पाणी आणि क्षार शोषतात, आपल्या पानांद्वारा वातावरणातील कार्बन डायॉक्साईड घेतात आणि सौरशक्तीच्या साह्यानं त्या साऱ्याचं रूपांतर सर्वांच्याच जीवनाचे प्रमुख घटक असलेल्या प्राणवायूत आणि अन्नामध्ये करतात. झाडं नसती तर या आपल्या पृथ्वीगोलावर मुळी जीवनच नसतं.

पावसाच्या निर्मितीतही झाडांचा वाटा असतो. त्यांच्या पानांतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे सूक्ष्म पर्यावरणीय बदल घडून येतात आणि पर्जन्यवर्षावाला ते बदल साह्यभूत ठरतात. पावसाचं प्रमाण वाढलं की हवेचं प्रदूषणही कमी होतं. हवा आणि पर्यावरण स्वच्छ ठेवायलाही झाडं मदत करतात. त्यांच्यामुळे धूळ कमी होते, आवाजाचं प्रदूषण मर्यादित होतं. कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायाक्सॉईड, नायट्रोजन डायाक्सॉईड वगैरेंसारखे प्रदूषक घटक झाडं शोषून घेतात. जमिनीची धूपही झाडंच थांबवतात.

दोनेक वर्षांपूर्वी फलटणमधल्या आमच्या घरासमोरच्या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलं. त्या वेळी समोरच्या अवजड यंत्रसामग्रीचा गोंगाट आणि जमीन खोदणाऱ्या यंत्रांनी उडवलेले धुळीचे असह्य लोट काहीसे सुसह्य होऊनच आमच्यापर्यंत पोहोचले. कारण, आमच्या घरासमोरच्या बागेतील झाडांच्या रांगांनी बऱ्याच प्रमाणात ते यशस्वीरीत्या अडवले. ही झाडं नसती तर ते तीन-चार महिने आमच्या घरात राहणं हा आम्हाला नरकवासच वाटला असता.

झाडं जीवनाला उपकारक रसायनांच्या लहरीच्या लहरी वातावरणात सोडतात. हे मोठ्या प्रमाणात होत असता यापैकी काही रसायनांचे फवारे वातावरणाचं योग्य नियमन करण्याला साह्य करतात. अन्य काही जिवाणूरोधक, काही बुरशीरोधक, तर काही विषाणूरोधकही असतात.

झाडं ही जलशुद्धी करणारी नैसर्गिक गाळणी आहेत. पाण्यातील स्फोटक पदार्थ, विद्रावके आणि सेंद्रिय कचऱ्यासह, अत्यंत विषारी पदार्थसुद्धा विलग करून पाणी स्वच्छ करण्याची क्षमता झाडांमध्ये असते. झाडांची मुळं हे काम करतात. त्यासाठी, या मुळांभोवती प्रचंड प्रमाणात वसती करून असलेल्या सूक्ष्म जंतूंच्या दाट वसाहतीचा झाडांना उपयोग होतो. हे जंतू दूषित पाण्यातील पोषक द्रव्यं शोषून घेत असताना उर्वरित पाणी शुद्ध करून टाकतात. या प्रक्रियेला फायटोरिमिडिएशन असं शास्त्रीय नाव आहे.

वरील काही परिच्छेदात वर्णन केलेल्या साऱ्या सेवासुविधा मानवनिर्मित यंत्रांकडून करून घ्यायच्या असतील तर त्यासाठी आपणा सर्वांना दरवर्षी चार ट्रिलियन डॉलर म्हणजे संपूर्ण भारत देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या दुपटीइतका खर्च येईल. एकट्या मुंबई शहरात वृक्ष आपल्याला देत असलेल्या पर्यावरणीय सेवांची एकूण किंमत १३ बिलियन डॉलर इतकी असल्याचा निष्कर्ष अलीकडेच केल्या गेलेल्या एका अभ्यासातून समोर आला आहे. यावरून असं दिसून येतं की, झाडं आणि वनं आपल्याला पुरवत असलेल्या सेवा अन्य कोणत्याही मार्गानं मिळवणं आपल्याला निव्वळ अशक्यप्राय आहे.

काही काळापूर्वी वृक्षारोपणाच्या प्रचारासाठी ‘एक माणूस, एक झाड’ अशी एक घोषणा दिली जायची. मला वाटतं, ही घोषणा आता पुन्हा दिली गेली पाहिजे. झाडं लावणं हे प्रत्येक नगरवासीयाच्या दृष्टीनं अत्यंत हिताचं आहे. त्यासाठी एक अत्यंत सोपी पद्धत अवलंबता येईल. प्रत्येकानं कोणत्याही प्रकारच्या वृक्षाच्या काही बिया आपल्या खिशात ठेवाव्यात. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावरून जात असताना अधूनमधून त्या रस्त्याच्या कडेला फेकत जाव्यात. शहरात जिथं म्हणून मोकळ्या जागा असतील तिथं असंच करावं. कालांतरानं यातील काही ना काही बिया रुजतील आणि रोपं वाढू लागतील. आपल्यापैकी प्रत्येकानं असं केलं तर आपली शहरं अधिक हिरवी दिसू लागतील. मात्र, हे घडायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था किंवा वन खात्यानं सामान्य नागरिकांना पुरेशा बिया उपलब्ध करून द्यायला हव्यात.

दुसरी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. बहुतेक सर्व शहरांत बऱ्याचदा झाडांचा पालापाचोळा गोळा करून जाळला जातो. यामुळे शहरातील हवेचं प्रदूषण वाढतं. त्याऐवजी सगळी पानं आणि अन्य जैव कचरा यापासून कंपोस्ट खत तयार केलं गेलं पाहिजे. त्यामुळे जमिनीची प्रत वाढेल आणि अधिक हिरवाई बहरायला त्याचा उपयोग होईल.

प्राकृतिकरीत्या वातावरण स्वच्छ करण्याचं काम तर झाडं करतातच; पण आध्यात्मिक संवेदनाग्र ( Spiritual Antenna) म्हणूनही त्यांचा उपयोग होत असल्याचं दिसतं. गौतम बुद्ध, रामकृष्ण परमहंस आणि इतरही अनेक संतांना झाडाखाली बसूनच साक्षात्कार झाला. झाडाखाली बसला असताना वरून सफरचंद पडलं तेव्हाच वैश्विक गुरुत्वाकर्षणाची कल्पना न्यूटनला सुचली हे तर आपण वाचत आलो आहोतच.

अनेक महान विचारवंतांना वनात भ्रमंती करत असतानाच मौलिक कल्पना स्फुरल्याची किती तरी उदाहरणं इतिहासाच्या पानापानावर आढळतात.

जपानमधील संशोधकांनी ‘वनस्नान’ असं नाव दिलेल्या कल्पनेचा दीर्घ काळ अभ्यास केला आहे. तणाव निर्माण करणाऱ्या रसायनांची शरीरातील पातळी छोट्या वनात मारलेल्या फेरफटक्यामुळे कमी होते आणि आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीतील, ट्युमरना आणि विषाणूंना तोंड देणाऱ्या लढवय्या नैसर्गिक पेशींची संख्या वाढते. शहरातील समस्याग्रस्त कनिष्ठ वस्त्यांच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, टेकड्यांनी आणि वृक्षराजीनं भरलेल्या परिसरातील लोकांत नैराश्य या विकाराचं प्रमाण कमी असतं. एवढंच नव्हे तर, अशा वस्तीत गुन्हेगारीचं प्रमाणही कमी असल्याचं आढळतं.

मी गेली चाळीस वर्षं फलटणसारख्या निमशहरात, वृक्षराजीनं वेढलेल्या घरात राहत असल्यामुळे हिरवाईच्या अनेक फायद्यांची खात्री मी स्वानुभवातून देऊ शकतो. झाडं माझ्या डोळ्यांना शांत करणारं नेत्रांजन पुरवतात, माझ्या परिसराला शुद्ध हवा पुरवणारी ती फुफ्फुसं बनतात आणि माझ्या अंतरात्म्याला अतीव समाधान देतात.

(भाषांतर : अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com