विद्यार्थिदशेतील माझे अमेरिकेचे अनुभव

सध्या भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रचंड संख्येनं अमेरिकेत जात आहेत. अमेरिकेत शिकायला येणाऱ्या एकूण परकीय विद्यार्थ्यांत भारतीय विद्यार्थ्यांचंच प्रमाण आता सर्वाधिक असतं.
Education in America
Education in Americasakal

- डॉ. अनिल राजवंशी, anilrajvanshi@gmail.com

सध्या भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रचंड संख्येनं अमेरिकेत जात आहेत. अमेरिकेत शिकायला येणाऱ्या एकूण परकीय विद्यार्थ्यांत भारतीय विद्यार्थ्यांचंच प्रमाण आता सर्वाधिक असतं. या भारतीय विद्यार्थ्यांपैकी बहुतेकजण विज्ञान आणि अभियांत्रिकी शिकायला तिकडे जात असतात.

माझ्या मते, अमेरिकेतील शिक्षणव्यवस्था ही जगातील एक सर्वोत्कृष्ट शिक्षणव्यवस्था आहे. मी स्वतः या व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. सत्तरच्या दशकातील तिथल्या माझ्या विद्यार्थिजीवनात मला आलेले अनुभव तरुणांना सांगावेसे वाटतात. 

मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं प्रगत शिक्षण घ्यायला मी १९७४ मध्ये गेन्झविल इथल्या फ्लोरिडा विद्यापीठात गेलो. तिथं प्रथम मी माझी पीएच. डी. पूर्ण केली आणि मग त्याच विद्यापीठात सुमारे अडीच वर्षं शिकवण्याचा अनुभव घेतला. तब्बल सात वर्षं मी तिथं राहिलो. फलटण इथं ‘नारी’ (निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट) ही संस्था चालवण्यासाठी १९८१ च्या अखेरीस मी ग्रामीण भारतात परतलो. 

सत्तरच्या दशकातील अमेरिकी समाज छानच होता. मुक्त आणि सौजन्यशील! माझं तिथलं वास्तव्य अत्यंत सुखावह झालं. त्या  साऱ्या अनुभवांचं सविस्तर वर्णन ‘1970’s America - an Indian Student’s Journey’ या नावाच्या माझ्या पुस्तकात मी केलं आहे. तिथल्या माझ्या वास्तव्यात मी तीन प्रमुख धडे शिकलो. पन्नासेक वर्षं उलटलीत; पण आजही ते तिन्ही धडे तितकेच योग्य आणि उपयुक्त आहेत असं मला वाटतं. 

त्यातील पहिली गोष्ट ही की, आपण शिकायला जातो त्या विद्यापीठातील अध्ययन-अनुभवांची व्याप्ती प्रत्येक विद्यार्थ्यानं वाढवता येईल तितकी वाढवत नेली पाहिजे. बऱ्याच भारतीय विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की, प्राध्यापकांनीच आपल्याला एकूण एक सामग्री पुरवावी...सर्व प्रकारची मदत करावी.

आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षाकेंद्रित मनोवृत्ती याला काही प्रमाणात कारणीभूत आहे. भारतीय शिक्षणपद्धती परीक्षा उत्तीर्ण होण्यावरच फार भर देते. अध्ययन हे तिचं प्रमुख लक्ष्य नसतं. त्यामुळे मुलांना विचारप्रवृत्त केलं जात नाही. मग शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्याची प्रक्रिया ठरते. शिक्षणाचा संबंध प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडवण्याशी मुळी उरतच नाही.

त्यामुळे लवकरात लवकर परीक्षेत उत्तीर्ण होऊन पटापट नोकरी मिळवणं हेच इथून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं. ज्ञानप्राप्तीची फारशी लालसा त्यांच्या अंगी असत नाही. आपल्या पदवीच्या अभ्यासक्रमाच्या बाहेरील काही शिक्षण मिळवावं आणि आपल्या अध्ययन-अनुभवांची कक्षा व्यापक करावी अशी आस बहुधा त्यांच्या मनी असत नाही. 

फ्लोरिडा विद्यापीठात शिकत-शिकवत असताना अनेक विषयांबद्दलचं कुतूहल माझ्या मनी असे. अधिकाधिक ज्ञान मिळवण्याच्या हेतूनं वेगवेगळ्या अध्ययन-विभागांतील अनेक अभ्यासक्रम मी पूर्ण करत असे. माझा स्वतःचा विषय मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा होता; पण मी रसायनशास्त्र, विद्युत्-अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, प्रगत गणित याही विषयांतील अभ्यासक्रम पूर्ण करायचो.

इतकंच काय, निद्रा आणि स्वप्नं, चित्रपटरसग्रहण याही विषयांतील कोर्सेस मी करायचो. या सगळ्यामुळे माझं शिक्षण परिपूर्ण व्हायला मदत झाली. असे वेगवेगळे कोर्सेस करत राहिल्यानं खूप काही शिकता येतं. निव्वळ आपल्या संशोधनापुरताच विचार करण्यापेक्षा ही गोष्ट केव्हाही अधिक फलदायी ठरते. 

आजच्याप्रमाणेच त्याही काळात अमेरिकी विद्यापीठांमधील वातावरण विद्वत्तेनं भारलेलं होतं. विविध क्षेत्रांतील ज्ञान एकाच ठिकाणी आत्मसात करण्याची उत्कृष्ट संधी तिथं सर्वांना लाभत असे.  त्यामुळेच  विविध विभागांत होणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रांना उपस्थित राहायला मी सुरुवात केली.

या चर्चासत्रांत क्वांटम भौतिकशास्त्र, यूएफओज्, देहातीत अनुभव, अराजकतेचा सिद्धान्त अशा अनेकविध विषयांवर उच्च प्रतीच्या तज्ज्ञांनी केलेल्या मांडणीमुळे माझ्या ज्ञानात अधिकाधिक भर पडत गेली. म्हणून अमाप कुतूहल बाळगत राहायला हवं हाच युरोप-अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा बोध होय.

कुतूहल हीच ज्ञानसंपादनाची चेतनादायी प्रेरणा असते. हल्ली परदेशी जाणारे बरेचसे विद्यार्थी स्वखर्चानं शिक्षण घेत असतात, त्यामुळे तर अध्ययनप्रक्रियेची व्याप्ती वाढवण्यावर त्यांनी भर देण्याची अधिकच आवश्यकता आहे.

मी शिकलेला दुसरा मोठा धडा असा की, प्रत्येक विद्यार्थ्यानं अमेरिकी संस्कृतीचा घेता येईल तेवढा अनुभव घेत राहिलं पाहिजे. त्यासाठी तो सारा देश जेवढा पालथा घालता येईल तेवढा पालथा घातला पाहिजे. 

बऱ्याचदा माझ्या असं निरीक्षणास आलं आहे की, अमेरिकी विद्यापीठात शिकायला गेलेले भारतीय विद्यार्थी भारतीय वस्तीतच राहतात. भारतीय कोंडाळ्यातून ते सहसा बाहेर पडत नाहीत. विद्यापीठ असलेल्या जवळजवळ प्रत्येक मोठ्या शहरात बहुधा एक ‘महात्मा गांधी मार्ग’ असतो.

बहुतेक सगळे भारतीय विद्यार्थी तिथंच राहतात. केवळ आपल्या देशवासीयांतच मिसळतात आणि भारतीय अन्नाचंच सेवन करतात. उर्वरित अमेरिकी समाजाशी ते फारसा संपर्क ठेवत नाहीत. त्यामुळे परदेशात राहण्याचा खराखुरा समृद्ध अनुभव त्यांना घेता येत नाही.

तशी संधी चालून आलेली असूनही ती ते स्वतःहून गमावतात. अमेरिकेतील कार्यसंस्कृती, आपली शहरं आणि छोटी छोटी गावंसुद्धा स्वच्छ राखण्याची त्यांची पद्धत, तिथं सगळीकडेच ध्वनिप्रदूषण अत्यंत कमी कसं काय ठेवलं जातं अशा साऱ्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्यापासूनच शिकायला हव्यात. भारतीय मुलं त्यांच्यात मिसळली तरच हे होऊ शकते.

मी आणि माझी पत्नी निर्मला तिथं शिकत होतो तेव्हा जास्तकरून आम्ही अमेरिकी लोकांच्याच सहवासात असायचो. भारतीयांपेक्षा आम्हाला अमेरिकी मित्रच जास्त होते. त्यामुळे अमेरिकी समाजाचं नीट दर्शन आम्हाला व्हायचं. स्थानिक लोकांशी आमचा संपर्क व्हायचा. त्यामुळे बहुतेक भारतीयांच्यात नेहमीच सुरू असलेल्या ‘अधिकाधिक पैसे कसे मिळवावेत?’ याबाबतच्या  नित्य चर्चेतून आमची सुटका होत असे. 

अमेरिकेत शिकायला येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी बहुतेक जण आयुष्यभर तिथंच राहण्याचा निर्णय घेतात. क्वचितच कुणी भारतात परततात. त्यामुळे अमेरिकी समाजाचा एक भाग बनणं त्यांना अधिक गरजेचं असतं. असं झालं तरच स्थानिक लोकांच्यात त्यांचं मनःपूर्वक स्वागत होईल. त्यांना उपरेपण जाणवणार नाही. अमेरिकी लोक आणि अमेरिकी समाज यांची पुरती जाण आल्यानंच एखाद्याला अधिक चांगला भारतीय बनता येईल असं मला वाटतं. 

सर्वसाधारणपणे अमेरिकी लोक मैत्र जोडणारे आणि स्वागतशील असतात. त्यांच्याशी मिळून-मिसळून राहणं मुळीच कठीण नसतं. मित्र म्हणून भारतीयांना ते अगदी सहज स्वीकारतात. आता अमेरिकेत भारतीयांची संख्या वेगानं वाढत आहे.

तिथल्या भारतीयांची पहिली आणि दुसरी पिढी ही उद्योग, शिक्षण व संशोधनक्षेत्राबरोबरच राज्य आणि संघराज्य सरकारांतही मोठमोठ्या अधिकारपदांवर आरूढ झाली आहे. मैत्र वाढवण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याची आज खरी  गरज आहे. 

अखेरीस, अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मी आणखी एक गोष्ट सुचवू इच्छितो. त्यांनी तिथल्या राष्ट्रीय उद्यानांत जाऊन अमेरिका निरखावी. अमेरिकेतील सृष्टिसौंदर्य लाजवाब आहे. ही सारी नैसर्गिक सौंदर्यस्थळं, तिथली  हिरवळ, तसंच परिसराची निगा राखण्यासाठी  त्यांनी केलेले प्रयत्न पाहून हा देश आपण अधिकच जवळून रसिकतेनं समजून घेऊ शकतो. 

आमच्या विद्यार्थिजीवनात आम्ही इथं ग्रँड कॅन्यन, योसेमाइट नॅशनल पार्क, कार्ल्सबडच्या गुंफा वगैरे अनेक स्थळं पाहिली. आजही आम्ही अमेरिकेला जातो तेव्हा मुख्यतः तिथली शहरं नव्हे तर, निसर्गसौंदर्यानं नटलेली तिथली विविध स्थळं पाहतो. संपूर्ण अमेरिकेत एकंदर पन्नासच्या वर राष्ट्रीय उद्यानं आहेत. 

याउलट, बहुतेक भारतीयांची प्रवृत्ती केवळ शहरं पाहत, याची-त्याची खरेदी करण्याकडे झुकलेली आढळते. अमेरिकी समाज तसा मोठ्या प्रमाणात एकसारखा आहे. बहुतेक सगळ्या शहरांचं रूपडं जवळपास एकसारखंच आहे. एकाच स्वरूपाचे मॉल्स आणि एकाच स्वरूपाची रेस्टाँरंट्स! एकसाचीपणा इतका की, एक शहर पाहणं हे बहुतेक सगळी शहरं पाहण्यासाखंच आहे! 

अमेरिकेचे खरं सौंदर्य अलास्कापासून फ्लोरिडापर्यंत आणि कॅलिफोर्नियापासून न्यूयॉर्क आणि पूर्व अमेरिकेपर्यंत पसरलेल्या त्या देशाच्या वैविध्यपूर्ण सृष्टिवैभवात आहे. भ्रमंती करत आपण या साऱ्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला हवा.

सत्तरच्या दशकात आमच्या शैक्षणिक जीवनाचा आनंद लुटत असताना अमेरिकेतील वास्तव्याचं सुखही आम्ही पुरेपूर अनुभवलं. विद्यार्थ्यांना आम्ही सांगू की, शिक्षणासाठी त्यांनी जरूर अमेरिकेला जावं. आपलं क्षितिज विस्तारत न्यावं. मात्र, शिक्षण संपल्यावर त्यांनी भारतात परत यावं आणि अमेरिकेत मिळवलेलं ज्ञान इथं उपयोगात आणावं. आपला भारत हे एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी ते सारं नक्कीच साह्यभूत ठरू शकेल.

(अनुवाद: अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com

(लेखक हे फलटण येथील ‘निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’चे संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com