नेताजींचे स्वप्न आणि पराक्रमी भारत

नेताजींचे स्वप्न आणि पराक्रमी भारत

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आयुष्य आणि त्यांच्या कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केलेले भाषण अत्यंत उच्च दर्जाचे होते आणि त्यात नेताजींबद्दलच्या देशाच्या भावना अत्यंत योग्य प्रकारे मांडल्या गेल्या होत्या. देश आज विविध क्षेत्रांत ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या दिशेने प्रवास करीत असताना या भाषणात नेताजींचा संदर्भ अत्यंत सुसंगत होता. नेताजी स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहिले होते व देश आज याच ध्येयाच्या दिशेने पुढे जात असून, हे स्वप्न आता दृष्टिपथात येत आहे.

नेताजींची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे सर्वच स्तरांतून, विशेषतः पश्चिम बंगालमधील जनतेनं स्वागत केलं. याला विरोध करण्याऱ्या राजकीय नेत्यांची किंवा बुद्धिवंतांची बहुतांश भारतीय जनतेचे अजिबात दखल घेतली नाही. नेताजींनी जनतेच्या हृदय आणि मनावर ‘पराक्रमाची मूर्ती’ म्हणूनच राज्य केले असल्याने त्यांच्यासाठी यापेक्षा चांगले विशेषण असूच शकत नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विरोधाभास म्हणजे, लोकांनी हे मान्य केले असतानाच नेताजींचा अवमान करण्याचा इतिहास असलेले किंवा त्यांचा उल्लेख टाळणारे किंवा त्यांना कमी लेखणारे काही राजकीय पक्ष नेताजींच्या नावापुढे ‘पराक्रम’ शब्द लागल्याबद्दल दुःख व्यक्त करीत होते. नेताजींचे वर्णन करताना ‘पराक्रम’ हा शब्द अनिवार्य आहे, त्यातून त्यांची चिरकाल आणि सातत्यपूर्ण गतिशीलता ध्वनीत होते, या शब्दात स्वतःचा असा जोर आहे, तो प्रत्येक पिढी आणि परिस्थितीत नेताजींचं वर्णन करण्यासाठी वापरला गेला आहे. भारत आपल्या कार्यक्षमतेतून जगात मोठे स्थान निर्माण करीत असताना तो उल्लेख अत्यंत महत्त्वाचा असून, पंतप्रधानांच्या भाषणातील प्रत्येक परिच्छेदातून नेमके तेच ध्वनीत झाले.

कॉंग्रेस, कम्युनिस्ट पार्टी आणि लघुदृष्टी असलेल्या, स्थानिक प्रश्न मांडणे आणि देशाच्या मोठ्या ध्येयांशी जुळवून घेणे कधीच सोडून दिलेल्या तृणमूल कॉंग्रेससारख्या पक्षांनी या घोषणाला विरोध केला. खरेतर, त्यांच्या नेताजींबद्दलच्या या नव्या ‘श्रद्धे’मुळे त्यांचा नेतांजींना असलेला विरोध व त्यांचे मोठेपण अमान्य करण्याची वृत्ती उघड झाली आहे. कम्युनिस्ट पक्षांच्या राजवटीत पाठ्यपुस्तकांत नेताजींचे उल्लेख मुद्दाम टाळले गेले किंवा त्यांच्या युगप्रवर्तक म्हणून असलेल्या कार्याला कमी लेखले गेले, मात्र ते बदलण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसने आपल्या राजवटीत कोणतीही पावले उचलली नाहीत. ही पाठ्यपुस्तके ममता बॅनर्जी यांनी कधीही बदलली नाहीत, याबाबत बॅनर्जी यांनी डाव्या पक्षांशी हातमिळवणी केली आणि शिक्षण व्यवसाय पूर्णपणे त्यांच्या हाती सोपवला. त्यामुळे त्यांचा ‘पराक्रम दिवसा’ला असलेला विरोध हा टोकाचा संधिसाधूपणा व घाणेरड्या राजकारणाचा नमुना आहे.

जनशक्ती आणि जनभागीदारी
खरेतर, आपण आपल्या नव्या पिढ्यांना कम्युनिस्ट पक्षांनी नेताजींचा कायमच कसा अवमान केला आणि त्यांना ‘टोजोचा कुत्रा’ म्हणून कसे हिणवले याची आठवण करून दिली पाहिजे. (टोजो दुसऱ्या युद्धकाळात जपानचे पंतप्रधान होते.) कम्युनिस्ट नेताजींच्या मोठेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात किंवा त्यांच्यावर श्रद्धा असल्याचा खोटा आव आणतात तेव्हा ते हे सर्व त्यांच्या मनात खोलवर असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेतूनच करतात. नेताजी आणि त्यांचा वारसा आजही आपला राजकीय इतिहास आणि अस्तित्वच झोकाळून टाकेल, अशी भीती कम्युनिस्टांना वाटते. कम्युनिस्टांनी नेताजींची प्रतिमा कितीही मलिन करण्याचा प्रयत्न केला, तरीही सामान्य भारतीयांच्या हृदयात नेताजींचे स्थान कायम आहे व ते नेताजींची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करण्याचे स्वागतच करतात. बहुतांश भारतीय ‘पराक्रम’ या शब्दाने प्रेरित होतात, कारण त्यांची देशभक्ती वादातीत आहे. भारत मातेबद्दलच्या त्यांच्या प्रेमाला संधिसाधूपणाचा रंग नाही.

देशाला इजा झाल्यास त्यांना स्वतःला इजा झाल्यासारखे वाटते, देश अस्वस्थ असल्यास तेही अस्वस्थ होतात. त्यांची इच्छा देशाची सर्वदूर प्रगती व्हावी अशी आहे. त्यांना एकसंघ, शक्तिशाली आणि आत्मनिर्भर भारत हवा आहे. ही सर्वसामान्य भारतीयांची देशाप्रतिची वचनबद्धता आणि विश्वास आहे. त्यामुळेच देशाला महासत्ता बनण्यासाठीचे बळ मिळते आहे. पंतप्रधानांची लोकसहभागातून समाजात बदल घडवून आणण्यासाठी, लोकांची मानसिकता बदलण्यासाठी ‘जनभागिदारी’ची हाक दिली व लोकांची मानसिकता बदलण्यासाठाची ‘जनशक्ती’ची हाक दिली. यातून नवी शक्ती निर्माण झाली आहे व ती एकत्र येत व योग्य ताळमेळ साधत राष्ट्रपुनर्उभारणीच्या कामी येत आहे. गेल्या सात वर्षांत आपण पाहिले आहे की, पंतप्रधानांनी केलेल्या प्रत्येक आवाहनाला लोकांनी सक्रिय प्रतिसाद दिला आहे आणि त्यागही केला आहे. 

नेताजींना अपेक्षित पराक्रम ‘जनशक्ती’चे आवाहन करण्यासंदर्भातच होता आणि त्यांचे देशाला स्वतंत्र करण्याचे आंदोलन ‘जनभागिदारी’ या तत्त्वावरच आधारित होते. आग्नेय आशियात राहणाऱ्या भारतीयांनी नेताजींच्या देशाला स्वतंत्र करण्याच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला, त्याचबरोबर सामान्य भारतीय, कामगार, त्या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांनीही नेताजींच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला. महिलाही मोठ्या प्रमाणात पुढे आल्या, त्यांनी आपले दागिने गहाण ठेवले, दान केले. इतकचे नव्हे, तर महिला इंडियन नॅशनल आर्मीमध्ये (आयएनए) भरतीही झाल्या. 

इतिहासकार वेरा हिल्डेब्रॅण्ड यांनी ‘वुमन अॅट वॉर - सुभाषचंद्र बोस अॅण्ड रानी ऑफ झॉंशी रेजिमेट’ या पुस्तकामध्ये भारतीय महिला नेताजींच्या देशाला स्वतंत्र करण्याच्या स्वप्नासाठी कशा मोठ्या संख्येने पुढे आल्या या बद्दल विस्ताराने लिहिले आहे. असे सांगतात, की आयएनएमध्ये ५ हजारांपेक्षा अधिक महिला होत्या. या सर्व महिला पराक्रमी होत्या आणि देशाच्या स्वतंत्र आणि आत्मनिर्भर भविष्यावर त्यांचा विश्वास होता. नेताजींच्या देशाच्या इतिहासातील योगदानाचे हे आयाम आहेत व त्याची आपण देशातील तरुणाईला सातत्याने आठवण करून दिली पाहिजे. देशाला वेगवेगळ्या माध्यमांतून अस्थिर करू पाहणाऱ्यांवर हा इतिहास आदर्श उतारा म्हणून 
काम करेल...

मिशन ‘न्यू इंडिया’
नव्या भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पराक्रम गरजेचा आहे. नेताजी कोलकत्यातील आपल्या एल्गिन रोड येथील घरातून हिवाळ्यातील गोठवणाऱ्या थंडीत रात्रीच्या वेळी वेषांतर करून, ब्रिटिश पोलिसांना व गुप्तचरांना गुंगारा देत एकाच ध्येयाने बाहेर पडले होते, ते ध्येय होते भारताला स्वतंत्र व आत्मनिर्भर करण्याचे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्याला आठवण करून दिली आहे, की ‘एलएसी’पासून ‘एलओसी’पर्यंत देश कशाप्रकारे सुरक्षित आहे आणि शत्रू देशाचा संकल्प कसा तोडू शकत नाही. 

त्यांनी आपण ‘राफेल’ आयात करीत असताना पूर्णपणे देशातच बनवलेल्या अत्याधुनिक लढाऊ विमान ‘तेजस’ची बांधणी करीत असल्याचीही आठवण करून दिली आहे. ही दिशा नेताजींना अपेक्षित असलेल्या ‘आत्मनिर्भर’ भारताची आहे. भारतीयांनी सकारात्मक दृष्टिकोन व विविध क्षेत्रांत असलेल्या प्रचंड ज्ञानाच्या जोरावर आपली ओळख जगाचे नेतृत्व करणारा देश अशी निर्माण करावी, असेही त्यांचे स्वप्न होते.        

आज जग भारताला त्याची शक्ती आणि योगदानासाठी ओळखते आहे. ‘भारताची कोरोनावरील लशीच्या उत्पादनाची क्षमता संपूर्ण जगासाठीची मोठी संपत्ती आहे,’ असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस म्हणतात. अतिशय विपरित परिस्थितीमध्ये देशाने थोडेही विचलित न होता कोरोनावरील लस शोधली आणि ती केवळ भारतीयांना नव्हे, तर जगभरातील नागरिकांपर्यंत पोचेल याची काळजी घेतली. नेताजींना अपेक्षित हाच आत्मनिर्भर भारत आहे व त्याच्याच जोरावर त्यांनी ‘मिशन पराक्रम’ची मुहूर्तमेढ रोवली होती. पंतप्रधान मोदींनी ‘न्यू इंडिया’चा नार देताना आपल्याकडून याच इच्छाशक्ती व दृढनिश्चयाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी नेताजींच्या १२५व्या जयंतिनिमित्त कोलकता येथे केलेल्या भाषणात नेताजींच्या संकल्पना व दृष्टिकोनाचा पुनर्उच्चार केला. देशातील जनतेला हे समजले आहे की, या दृष्टिकोनाला विरोध करणाऱ्यांना देश आणि त्याच्या आकांक्षा समजलेल्या नाहीत. खरेतर, विरोधक नेताजींचा दृष्टिकोन आणि संकल्पनांपासून खूप दूर 
गेले आहेत...

(सदराचे लेखक ‘डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशन चे संचालक आहेत.)
(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com