गर्भपात आणि संभ्रम

गेल्या काही दशकांत विवाहपूर्व संबंध व त्यामुळे गर्भधारणा होणे याचे प्रमाण समाजात वाढले आहे.
Abortion
Abortionsakal
Summary

गेल्या काही दशकांत विवाहपूर्व संबंध व त्यामुळे गर्भधारणा होणे याचे प्रमाण समाजात वाढले आहे.

- डॉ. अविनाश सुपे

गेल्या काही दशकांत विवाहपूर्व संबंध व त्यामुळे गर्भधारणा होणे याचे प्रमाण समाजात वाढले आहे. मुलाने लग्नास तयारी न दाखवल्यास जगात अनेक वेळा अविवाहित मुली आपले मूल खंबीरपणे वाढवताना दिसतात. अविवाहितेने अपंग मूल वाढवणे आपल्या समाजात मात्र अजूनही कठीण आहे. अपंग नागरिक जन्माला येऊ देणे किती योग्य आहे, हाही वेगळा विचार आहे. म्हणूनच वयात येताना प्रत्येक मुलीला याबाबत योग्य ते लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे.

साधारणतः २०१७ मधील घटना. नीलम ही १७ वर्षांची अविवाहित तरुणी होती. तिचे तिच्या कॉलेजमधील एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. तिची मासिक पाळी चार महिने बंद झाली, तरी भीतीने तिने हे कोणालाच सांगितले नाही. स्वतःहूनच काही औषधेही घेतली; परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. चार महिन्यांनंतर तिने आईला सांगितले आणि मग धावपळ सुरू झाली. ती गरोदर असल्याचे लक्षात आले. घरामध्ये यावर तीव्र प्रतिक्रिया, रागावणे तसेच काय करावे याबाबत अनेक खलबते झाली; परंतु यासाठी दोन आठवड्यांचा अवधी गेला. शेवटी गर्भपात करावा असे ठरले.

आपल्या देशात त्या वेळी १२ आठवड्यांपर्यंत गर्भपात एका स्त्री रोग तज्ज्ञांद्वारे करता येत असे; परंतु १२ ते २० आठवडे गर्भाचा गर्भपात करण्यासाठी दोन स्त्री रोग तज्ज्ञांनी एकत्र येऊन निर्णय घेणे आवश्यक असते. यासाठी अनेक तपासण्या करणेही आवश्यक असते. या सर्वांमध्ये नीलमचा बराच वेळ गेला. दरम्यान, पुन्हा सोनोग्राफी केल्यावर बाळामध्ये व्यंग असल्याचे लक्षात आले. त्या वेळी २० आठवड्यांची मर्यादा संपली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने उच्च न्यायालयात अर्ज केला, की ती २२ आठवड्यांची गरोदर आहे आणि तपासणीअंती असे समजले, की तिच्या बाळामध्ये तीव्र स्वरूपाचे व्यंग आहे. ते बाळ जन्मानंतर अपंग राहील. त्या मुलाचे हृदय आणि मेंदू हे नीट काम करणार नाही आणि जन्मभर तिला ते अपंग बाळ सांभाळावे लागेल...

कायद्यानुसार २० आठवड्यांनंतर गर्भपात करता येत नसल्याने तिने अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने तात्काळ केईम रुग्णालयाचे संचालक म्हणून माझ्याकडे तिच्या अर्जाचा विचार करून सल्ला सुचवण्याचे आदेश दिले. २००९ मध्ये अशा एका प्रकरणी अर्ज न्यायालयाने नाकारला होता. त्यामुळे सदर प्रकरण एक आव्हान होते. आम्ही सात जणांची एक समिती स्थापन केली, ज्यात स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, जनुकशास्त्रतज्ज्ञ, वैद्यकीय समाजसेवक यांचा समावेश होता. आम्ही सदर परिस्थिती, आईचे आरोग्य, मानसिकता आणि भविष्य अशा सर्व बाजूंनी विचार करून या निकषापर्यंत पोचलो, की न्यायालयाने गर्भपात करण्यास अनुमती द्यावी. भारतामध्ये प्रथमच उच्च न्यायालयाने त्या वेळी याप्रकरणी गर्भपातास अनुज्ञा दिली. फक्त एकच अट घातली, की गर्भपात तुमच्या देखरेखीखाली व्हावा. त्यावेळी आम्ही त्या मुलीला महापालिका रुग्णालयात दाखल करून स्त्रीरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली औषधे, इंजेक्शन्स आणि सलाईन देऊन तिचा काळजीपूर्वक गर्भपात केला. भारतीय स्त्रीवैद्यक शास्त्रात आणि स्त्रियांसाठी जीवनाला कलाटणी देणारी ही महत्त्वपूर्ण घटना होती. त्यानंतर पुढील दोन-तीन वर्षांत ९-१० प्रकरणी आमच्या समितीने गर्भपात करावा; तर काही प्रकरणी गर्भपात करू नये, असेही न्यायालयाला सांगितले. ही प्रकरणे वादाची होती; पण त्यामध्ये मुख्यत्वे बाळाचे अपंगत्व कशा प्रकारचे आहे, आईला गर्भपातामुळे किती धोका आहे आणि गर्भाचे वय हे महत्त्वाचे निकष होते.

२४ आठवड्यांपर्यंत गर्भाची ओळख नसते. २४ आठवड्यांनंतर गर्भामध्ये जीव असतो. त्यामुळे काही देशांत इंजेक्शन देऊन प्रथम गर्भाचा मृत्यू घडवतात आणि नंतर गर्भपात करतात. विविध देशांमध्ये विविध प्रथा आहेत व गर्भपाताचे वय हे वेगवेगळे आहे. साधारणतः गर्भातील विकृती १६ ते २० आठवड्यांनंतर लक्षात येतात. जर आई आणि मुख्य म्हणजे डॉक्टर जर जागरूक, सजग नसतील तर ती विकृती २० आठवड्यांपर्यंत लक्षात येत नाही. म्हणून भारतात गर्भपात करण्यासाठी २४ आठवडे हा कालावधी निश्चित करणे आवश्यक होते. यावर स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेने केलेल्या शिफारसीनुसार आता २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्यास परवानगी दिलेली असून. संसदेत सदर विधेयक मंजूर झाले असून तो नियम अमलात आला आहे.

हा एक नाजूक सामाजिक व धार्मिक रुढींचा प्रश्न आहे. गेल्या काही दशकांत विवाहपूर्व संबंध आणि त्यामुळे गर्भधारणा होणे याचे प्रमाण आपल्या समाजात वाढले आहे. मुलाने लग्नास तयारी न दाखवल्यास जगात अनेक अविवाहित मुली आपले मूल खंबीरपणे वाढवताना दिसतात. अविवाहितेने अपंग मूल वाढवणे मात्र आपल्या समाजात अजूनही कठीण आहे. अपंग नागरिक जन्माला येऊ देणे किती योग्य आहे, हाही वेगळा विचार आहे. म्हणूनच वयात येताना प्रत्येक मुलीला याबाबत योग्य ते लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. गर्भधारणा झाल्यास योग्य वेळी औषधे घेणे किंवा गर्भपात करणे आवश्यक आहे. उशिरा गर्भपात करणे हे बालकासाठी, मातेसाठी धोकादायक आणि त्यासाठी अनावश्यक खर्च या सर्वच दृष्टीने अनाठायी आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने जागरूक राहून गर्भावस्थेमध्ये सोनोग्राफी करून घेऊन आपले बालक निरोगी आहे, याची खात्री करून घ्यावी.

(लेखक मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com