बेटी सद्‌गुणांची पेटी

आपल्या पोटचा मुलगा जर आजारी असेल, तर त्याला वाचवण्यासाठी आई-वडील हवे तेवढे कर्ज काढतात; पण तोच आजार मुलीला असेल तर कर्ज काढत नाहीत.
Daughter
DaughterSakal
Summary

आपल्या पोटचा मुलगा जर आजारी असेल, तर त्याला वाचवण्यासाठी आई-वडील हवे तेवढे कर्ज काढतात; पण तोच आजार मुलीला असेल तर कर्ज काढत नाहीत.

- डॉ. अविनाश सुपे

आपल्या पोटचा मुलगा जर आजारी असेल, तर त्याला वाचवण्यासाठी आई-वडील हवे तेवढे कर्ज काढतात; पण तोच आजार मुलीला असेल तर कर्ज काढत नाहीत. असा दुजाभाव करण्याची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. केवळ ती मुलगी आहे म्हणून तिला रुग्णालयात वाऱ्यावर सोडून गेलेले आई-वडील मी पाहिले आहेत. आजही त्या घटनेचे ओरखडे माझ्या मनावर उमटले आहेत.

ज्यावेळी मी अधिष्ठाता होतो, त्या वेळी बरेचदा रात्री आठ ते साडेआठपर्यंत काम करीत असे. ते वर्ष होते २०१६-१७ चे. एकदा संध्याकाळच्या वेळी सात वाजता मला एक भेटीसाठी कार्ड आले. ते पोलिस इन्स्पेक्टर होते भोईवाडा पोलिस स्टेशनचे. त्यांना मला भेटायचं होतं. मला वाटलं कुठे अपघात झाला असेल, कुठला तरी गुन्हेगार असेल, बंदोबस्त असेल आणि त्याबाबत ते भेटायला आले असतील. ते आले आणि मला म्हणाले, ‘डॉक्टर, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. कक्ष नंबर तीन (लहान मुलांचा शस्त्रक्रियेचा कक्ष) मध्ये आमच्या नातेवाईकाची एक तीन आठवड्याची मुलगी, तिचे ऑपरेशन झाले आहे. ती व्हेंटिलेटरवर आहे. तो व्हेंटिलेटर तुम्ही काढून टाका.’ माझ्याबरोबर डॉक्टर प्रवीण बांगर बसले होते आणि आम्ही दोघेही त्याच्या त्या विनंतीवर हबकूनच गेलो. कोणी एखाद्या रुग्णाचा व्हेंटिलेटर काढून टाका, असं म्हणू शकतात, यावर आमचा विश्‍वास बसत नव्हता. आम्ही त्यांना विचारलं, ‘का, तुम्ही असं का म्हणता?’ त्यांनी सांगितलं की, त्या मुलीच्या आई-वडिलांना एक मोठा मुलगा आहे दोन वर्षाचा आणि ते शेतमजूर आहेत. ते नांदेडजवळच्या गावातील रहिवासी आहेत. त्या मुलीचा जन्म झाल्यानंतर ते तिला उपचारासाठी इथे घेऊन आले आणि आता त्यांच्याजवळचे सगळे पैसे संपले. आता पैसे नाहीत, असं ते म्हणतात. मीसुद्धा त्यांना खूप मदत करायचा प्रयत्न केला; परंतु आता त्यांनी तिला सोडून द्यायचं ठरवलं आहे. ते आता गावाला निघूनही गेले आहेत. तिची काळजी घ्यायला कोणीच नाहीये. तेव्हा तुम्ही आता तिचा तो व्हेंटिलेटर काढा. कारण आता तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही.

आम्हाला साधारणपणे सततच पेशंट वाचवा किंवा पेशंटची जास्त काळजी घ्या, अशा प्रकारचे खूप फोन येतात. त्यांना मदत करा म्हणून विनंती असते; परंतु ही आगळीच विनंती आल्यावर मी त्याला शांतपणे उत्तर दिलं, ‘‘बघा, आमचं हॉस्पिटल जरी पब्लिक धर्मादाय रुग्णालय असलं, तरी आम्ही प्रत्येक पेशंटचा जीव वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. डॉक्टरचा धर्म जीव वाचवणे असतो आणि आम्ही शेवटपर्यंत तसा प्रयत्न करू शकतो. तुमच्याकडे पैसे नाहीत, तरी तुम्ही काळजी करू नका. फक्त तुमचा नंबर द्या. काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू; अन्यथा आम्ही मुलीची सगळी काळजी घेऊ.’’

पुढे दोन ते तीन आठवडे आम्ही आमच्या गरीब रुग्ण निधीमधून तिला लागणारी सगळी औषधं अँटिबायोटिक्स किंवा बाकीची सगळी महागडी औषधं होती ती दिली आणि साधारण तीन आठवड्यानंतर ती मुलगी व्हेंटिलेटरवरून निघाली आणि ती चांगली झाली. मग अशा वेळी आम्ही त्यांना परत बोलावलं आणि तिच्या आई-वडिलांनाही बोलावलं. त्यांना मी सांगितलं की, ‘‘तुम्ही मुलीला असं सोडू नका.’’ मी थोडा चिडलोच होतो. ते मुलीला कसे टाकतात? त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की, ‘डॉक्टर, आजच्या खर्चिक जमान्यामध्ये या मुलीवर एवढा खर्च करणे मला जमणार नाही आणि समजा, जर या मुलीला काही झालं असतं, तर अजून एखाद-दोन वर्षांमध्ये अजून एक मूल आम्हाला झालं असतं.’’ हा दृष्टिकोन मन सुन्न करणारा होता.

मी त्यांना प्रश्न विचारला की, तुम्हाला मुलगा असता, तर तुम्ही असं केलं असतं का? तर त्याच्यावर ते मला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. नंतर मग आनंदाने घरी गेले; पण माझ्या मनामध्ये काहूर माजून राहिलं की मुलगी असेल, तर तिला तुम्ही वाऱ्यावर सोडून देता आणि मुलगा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचं घरही निकालात काढता, हा जो आपल्या देशातला दृष्टिकोन आहे, तो बदलण्याची आवश्यकता आहे. हे मी पुन:पुन्हा पाहिले आहे की, घरामध्ये एखाद्या मुलाला वाचवण्यासाठी आई-वडील हवे तेवढे कर्ज काढतात; पण तोच आजार मुलीला असेल तर ते कर्ज काढत नाहीत. माझ्या मते समाजाची ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. मी समजू शकतो की एखाद्याकडे पैसे नाहीत, फार गरिबी आहे; पण आज आपल्याकडे मानवतेचे असे अनेक हात आहेत, ते तुम्हाला अशा वेळी मदत करतात. केईएम किंवा सायन किंवा नायरसारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेताना अनेक लोक तुम्हाला मदतीचा हात द्यायला तयार असतात. त्यामुळे अशा पेशंटचा खर्च निघू शकतो. औषधांची व्यवस्था होऊ शकते; परंतु केवळ ती मुलगी आहे म्हणून तुम्ही तिची काळजी घेण्यास टाळाटाळ करता, हा प्रसंगच मनामध्ये अनेक वर्षे बोचत राहिला आहे. आजही तो मला त्रास देतो.

मी समाजातल्या प्रत्येकाला आज हेच सांगायचा प्रयत्न करत असतो की, मुलगा आणि मुलगी असा भेद करू नका.

आपल्या समाजामध्ये आज अनेक वर्षांनंतरही मला असं वाटतं की, मुलींकडे अजूनही तसं थोडं दुर्लक्ष होतं. त्यांच्या आरोग्याकडे किंवा त्यांच्या आरोग्यसेवेचा खर्च करायची ग्रामीण किंवा निम्न मध्यमवर्गीयांची तयारी नसते. मला वाटतं तिथे आपण नक्कीच मानसिकतेमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.

(लेखक मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून, अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com