आपत्ती अन्‌ द्विधा मनस्थिती

मुंबई १९९३ मध्ये बॉम्बस्फोटांनी हादरली होती. असंख्य रुग्ण केईएममध्ये येत होते. माझ्यासमोर दोन रुग्ण आले. एकाला ताबडतोब शस्त्रक्रियेची आवश्यकता होती.
Emergency
EmergencySakal
Summary

मुंबई १९९३ मध्ये बॉम्बस्फोटांनी हादरली होती. असंख्य रुग्ण केईएममध्ये येत होते. माझ्यासमोर दोन रुग्ण आले. एकाला ताबडतोब शस्त्रक्रियेची आवश्यकता होती.

- डॉ. अविनाश सुपे

मुंबई १९९३ मध्ये बॉम्बस्फोटांनी हादरली होती. असंख्य रुग्ण केईएममध्ये येत होते. माझ्यासमोर दोन रुग्ण आले. एकाला ताबडतोब शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. दुसरा जवळजवळ मरणासन्न.अशा परिस्थितीत. वाचवायचे कुणाला?

मुंबईकर कधीही विसरू शकणार नाहीत १२ मार्च १९९३ हा दिवस. बॉम्बस्फोटाने अवघ्या देशालाच नाही, तर जगाला हादरवलं. या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात आहेत. या बॉम्बस्फोटांमध्ये कुणी आपली आई तर कुणी बाबा, कुणी भाऊ, तर कुणी बहीण गमावली. शेकडो लोक जखमी झाले.

दुपारची वेळ होती आणि केईएममध्ये अचानक रुग्णांचा ओघ सुरू झाला. शहरात ठिकठिकाणी दादर, वरळी अशा अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. तिथून हातगाड्या, टॅक्सी, जे वाहन मिळेल त्याने जखमी झालेले रुग्ण घेऊन लोक येऊ लागले. त्या वेळी केईएमच्या अपघात विभागामध्ये ८० ते ९० मृतदेह आणि १५० ते २०० अत्यंत जखमी अवस्थेतील रुग्णही आणले होते. मी आणि बापट सर तिथेच होतो आणि आम्ही लगेच रुग्ण तपासायला सुरुवात केली.

त्या वेळी सर्वात महत्त्वाचं काम असतं की, रुग्ण व मृतदेह तपासून त्यांची वेगवेगळी व्यवस्था करून व्यवस्थापन करायचे. कारण नातेवाईकांची प्रचंड गर्दी होऊ लागते. रुग्णामध्येसुद्धा कमी गंभीर व अतिगंभीर रुग्ण वेगळे करून त्यांना उपचार सुरू करायचे असतात. त्याच वेळी ध्येय असते की, जास्तीत जास्त रुग्ण वाचवणे. रुग्णसंख्येच्या मानाने अपुऱ्या पडलेल्या सुविधांमध्ये सर्वच रुग्णांना वाचवणे आव्हान असते. जे वाचवता येतील, त्यांच्यावर जास्त लक्ष द्यायचे व ज्यांची वाचायची काही शक्यता नाही, अशाकडे कमी लक्ष द्यायचे.

त्या वेळी अपघात विभागात माझ्यासमोर दोन रुग्ण होते. एक ३०-४० वर्षांचा रुग्ण होता आणि त्याला पोटामध्ये आतड्याला इजा झाली होती. त्याला ताबडतोब शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. तो वाचवता येण्यासारखा होता. त्याच्या बाजूला दुसरा रुग्ण होता तो साधारण २०-३३ वर्षांचा तरुण होता. जवळजवळ मरणासन्न अशा परिस्थितीत. त्याच्याबरोबर त्याचा भाऊ व इतर सगळे सोबत होते. ४० वर्षांचा रुग्ण होता, त्याच्याबरोबर कोणी नव्हते. आमच्याकडे माणसं होती; परंतु रुग्णाची संख्या इतकी जास्त होती, की प्रत्येकाला पूर्णपणे लक्ष केंद्रित करून उपचार करता येत नव्हते. आम्ही नवीन मदत मागवली; परंतु २०० पेक्षा जास्त रुग्ण हे एकदम अत्यंत बिकट अवस्थेमध्ये येतात, त्या वेळी त्यांच्यासाठी लागण्याएवढी यंत्रणा नव्हती. अशा वेळी मनामध्ये विचार होता कोणाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायचे?

२० वर्षांचा जो मुलगा होता, त्याचे सगळे नातेवाईक मला सांगत होते की, डॉक्टर, तुम्ही आमचा माणूस वाचवा; परंतु आमच्या मनामध्ये होते की हा मुलगा जवळ जवळ गेलेला आहे. त्याला वाचवू शकणार नाही, एवढा त्याच्या मेंदूला मार लागलेला आहे. त्यातून तो वाचणे शक्यच नव्हतं. तो पूर्णपणे ग्रेड तीन कोमामध्ये गेला होता. मेंदूच्या चिंधड्या झाल्या होत्या. त्याला इतरही खूप खोल जखमा होत्या. अशा वेळी जेव्हा आपल्याकडे द्रव्यांची, साधनांची कमतरता असते, त्यावेळी जो माणूस वाचण्यासारखा आहे, त्याच्यावर आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण तसा प्रयत्न करतो; परंतु त्याच्या भावाचा आणि इतर कुटुंबीयांचे आक्रंदन माझ्या डोक्यामध्ये अजूनही आहे. अर्थात आम्ही आतड्याची इजा झालेल्या रुग्णास प्राधान्य देऊन त्याला वाचवले.

साधारणपणे युद्ध असो किंवा इतर कसलीही आपत्कालीन परिस्थिती, वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाअंती धोरण निश्चित करून ट्रायएज असे वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये त्यांना विविध प्रकारचे रंगीत बेल्ट हाताला लावले जातात. ग्रीन बेल्ट, रेड बेल्ट, ब्लॅक बेल्ट हे वर्गीकरण अनुभवी व्यक्तीनेच करायचं असतं. एखादा रुग्ण ज्याला साधारण जखम झाली आहे, त्याला कनिष्ठ डॉक्टरकडून पट्टी लावून नंतर उपचार केले तरी चालतात. तो एकटाच बसला, तरी काही फरक पडत नाही. त्याच्यावर नंतर टाके मारले, तरी चालू शकतात. दुसऱ्या प्रकारचे मरणासन्न रुग्ण असतात, त्यांनासुद्धा एका वेगळ्या पद्धतीने उपचार करून वेगळी व्यवस्था करावी लागते; परंतु जे वाचणारे रुग्ण असतात, त्यांच्यावर सर्व लक्ष केंद्रित करून त्यांचे जीव वाचवले जातात.

आपत्तीच्या वेळी जेव्हा मोठ्या संख्येने अत्यवस्थ रुग्ण येतात, त्या वेळी खूप ताण येतो.

आपल्या धर्माने आणि विशेष करून या सेवाभावी पेशाने शिकवण दिली आहे, ‘समत्वाचा फिरवीत चरखा, एकत्वाचे सूत्र धरू या, या आपल्या पवित्र देशात धागा धागा अखंड विणू या.’ आपत्ती काळात द्विधा मनस्थिती होतेच; पण अशा वेळी अनुभवाने व शास्त्रीय आधारावर जास्तीत जास्त रुग्णांना कसे वाचवता येईल, हेच आपले ध्येय असले पाहिजे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून, अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com