अल्कोहोलशिवाय सिरोसिस

यकृत हा तुमच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. शरीराला अन्न पचवण्यास, ऊर्जा साठवण्यास आणि अन्नातील घटक शरीरात मिसळण्याआधी अन्नातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास यकृत मदत करते.
Cirrhosis without alcohol
Cirrhosis without alcoholsakal
Summary

यकृत हा तुमच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. शरीराला अन्न पचवण्यास, ऊर्जा साठवण्यास आणि अन्नातील घटक शरीरात मिसळण्याआधी अन्नातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास यकृत मदत करते.

- डॉ. अविनाश सुपे

यकृत हा तुमच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. शरीराला अन्न पचवण्यास, ऊर्जा साठवण्यास आणि अन्नातील घटक शरीरात मिसळण्याआधी अन्नातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास यकृत मदत करते. जेव्हा आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त साखर किंवा चरबीयुक्त अन्न खातो तेव्हा आपले शरीर ही अतिरिक्त साखर किंवा चरबी यकृतामध्ये चरबीच्या रूपात साठवते. बदलत्या जीवनशैलीमुळे फॅटी यकृताचा आजार सामान्य होतो. जीवनशैलीत बदल करून, व्यायाम आणि आहार नियंत्रणाद्वारे बहुतेक प्रकरणांमध्ये हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो; परंतु काही रुग्णांना सिरोसिसचा त्रास होऊ शकतो.

अलीकडे मी ५० वर्षांची एक महिला पाहिली, तिला सौम्य कावीळ आणि जलोदर होता. तिला खूप अशक्त आणि थकल्यासारखे वाटत होते. वजन जास्त होते. तपासणीत तिला यकृताचा सिरोसिस (इंद्रियात ऱ्हासकारक बदल) व जलोदर झाल्याचे निदान झाले. याबद्दल तिला सांगितले तेव्हा ती म्हणाली, ‘‘डॉक्टर, माझ्यासोबत असे का झाले. साधारणपणे दारू पिणाऱ्या लोकांमध्ये सिरोसिस होतो. मी दारूला कधी हात लावला नाही. मला याचा त्रास का होतोय?’’

मी तिला समजावून सांगितले. गेल्या दोन दशकांमध्ये यकृतात चरबीचे प्रमाण वाढत गेले. ४०% पेक्षा जास्त सिरोसिस झाले, ते नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर किंवा चरबीयुक्त यकृत रोगामुळे होते. सिरोसिस प्रामुख्याने दोन प्रकारात विभागला गेलेला आहे, एक अत्याधिक मद्यपान आणि दुसरे मद्यपान न करता. दुसरा प्रकार जास्त करून चयापचयाच्या विकाराशी संबंधित आहे.

आजकाल, अनेक रुग्णांमध्ये पोटाची सोनोग्राफी यकृतातील चरबीत वाढ दर्शवते आणि वेगवेगळ्या ग्रेडसह फॅटी लिव्हर रोग म्हणून नोंदवले जाते. असा अहवाल पाहून सामान्य माणूस हैराण होतो आणि चिंताग्रस्त होतो.

यकृत हा तुमच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. शरीराला अन्न पचवण्यास, ऊर्जा साठवण्यास आणि अन्नातील घटक शरीरात मिसळण्याआधी अन्नातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास यकृत मदत करते. जेव्हा आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त साखर किंवा चरबीयुक्त अन्न खातो तेव्हा आपले शरीर ही अतिरिक्त साखर किंवा चरबी यकृतामध्ये चरबीच्या रूपात साठवते.

एनएएफएलडी म्हणजे काय?

१. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) म्हणजे मद्यपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये यकृतातील चरबी वाढणे. याचे दोन प्रकार आहेत. एक साधा फॅटी म्हणजेच चरबीयुक्त यकृत रोग, ज्यामध्ये तुमच्या यकृतातील चरबी वाढलेली आहे; पण यकृताच्या पेशींना नुकसान करत नाही. दुसरे नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (एनएएसएच), ज्यामध्ये यकृताच्या पेशींचे नुकसान होते, यकृतामध्ये अनेक बदल होतात. यामुळे यकृत फायब्रोसिस किंवा यकृत पेशींचा नाश होऊ शकतो. एनएएसएचमुळे पुढे सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो.

२. अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग, ज्याला अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीस (यकृताची जळजळ) देखील म्हणतात. अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा आजार जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने होतो. तुमचे यकृत शरीरातील अल्कोहोलवर प्रक्रिया करते आणि ते तुमच्या शरीरातून काढून टाकते. अल्कोहोलद्वारे तयार होणारी ऊर्जा चरबीच्या स्वरूपात यकृतामध्ये साठवली जाते; पण असे केल्याने हानिकारक पदार्थ तयार होतात. हे पदार्थ यकृताच्या पेशींचे नुकसान करतात. यामुळे तुमच्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते. तुम्ही जितके प्याल तितके तुमचे यकृत खराब होईल. अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग हा अल्कोहोलिक गंभीर यकृत रोगाचा प्रारंभिक टप्पा आहे. पुढील टप्पे अल्कोहोलिक हेपेटायटीस आणि सिरोसिस आहेत.

चरबीयुक्त यकृत रोग कारणे : जेव्हा तुमच्या आहारातील चरबीचे नीट पचन होऊन त्याचा योग्य वापर होत नाही तेव्हा यकृतामध्ये चरबी जमा होते. हे आहारात जास्त साखर किंवा चरबी आणि कमी व्यायाम / हालचालीमुळे होते. लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉइड/इतर अंतःस्रावी कमतरता, गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया आणि रक्तातील कोलेस्टेरॉल/ट्रायग्लिसराइडचे उच्च प्रमाण यकृतातील चरबीचे प्रमाण वाढवते.

फॅटी यकृत रोगाचा धोका मधुमेह, लठ्ठपणा, मध्यमवयीन किंवा वृद्ध, रक्तातील चरबीचे उच्च प्रमाण, जसे की कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स, उच्च रक्तदाब, कॉर्टिकोस्टिरॉईड्स आणि काही कर्करोग औषधे, मेटाबोलिक सिंड्रोम आणि चयापचय विकार, जलद वजन कमी होणे, ‘हिपॅटायटीस सी’सारखे आजार असलेल्या लोकांना फॅटी यकृत रोग होण्याची शक्यता जास्त असते.

गेल्या काही दशकांपासून जीवन धकाधकीचे बनले आहे. या जीवनशैलीतील बदलांचे परिणाम आपल्याला यकृतातील चरबीच्या रूपात दिसून येतात. नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग जगातील सुमारे २५ टक्के लोकसंख्येला प्रभावित करते. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग फक्त अशा लोकांमध्ये होतो जे जास्त प्रमाणात दीर्घकाळापासून मद्यपान करतात.

फॅटी यकृत रोगाची लक्षणे

चरबीयुक्त यकृत हा एक सुप्त आजार आहे. याला चार श्रेणींमध्ये वर्गीकृत केला जातो. ग्रेड १ हा एक अल्पवयीन आहे, ज्यामध्ये यकृतात कमीतकमी किंवा कोणतेही बदल होत नाहीत. यकृताची अंतस्थ रचना विस्कळित झालेली नसते. ग्रेड ४ म्हणजे यकृताला गंभीर नुकसान होते. बहुतेक लोकांना ग्रेड १ फॅटी लिव्हर रोग असतो. प्रारंभिक आजाराने (ग्रेड (१) कोणतीही समस्या उद्भवत नाही आणि कोणतीही लक्षणे नाहीत; परंतु काही लोकांना थकवा जाणवू शकतो किंवा त्यांच्या ओटीपोटाच्या वरच्या उजव्या बाजूला सौम्य जळजळ होऊ शकते; परंतु हा आजार गंभीर असल्यास यकृत मोठे होणे, सुजणे आणि कावीळ होऊ शकते.

फॅटी यकृत रोगाचे निदान करण्यात काही चाचण्या मदत करतात. सोनोग्राफी, रक्त तपासणी, इलॅस्टोग्राफी आणि कधीकधी बायोप्सी यांचा समावेश होतो. वाढलेल्या चरबीचे निदान अल्ट्रासोनोग्राफी, सीटी स्कॅन किंवा एमआरआय यांसारख्या तपासणीद्वारे केले जाते. रक्ततपासणीद्वारे कावीळ ओळखता येते. एएलटी, एएसटी, जीजीटी एन्झाईम्सची रक्तामध्ये किती प्रमाण आहे याची चाचणी केली जाते. यकृतातील चरबीमुळे यकृताच्या पेशींचा नाश होत असल्यास रक्तातील काही एन्झाइम्स-द्रव्य (जीजीटी) वाढतात. यकृताच्या पेशींचा नाश झाल्यामुळे यकृत अधिक कडक होऊ शकते. यकृताच्या कडकपणाचा अर्थ फायब्रोसिस म्हणजेच व्रणाच्या जागी पेशीजालाची निर्मिती असू शकतो. त्याचे नंतर सिरोसिस-जलोदरामध्ये रूपांतर होऊ शकते.

फॅटी लिव्हर रोगावर उपचार

यकृत हा स्वतःला दुरुस्त करण्याची प्रचंड शक्ती असलेला अवयव आहे. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरसाठी वजन कमी करण्याची शिफारस केली जाते. वजन कमी केल्याने यकृतातील चरबी, जळजळ आणि फायब्रोसिस कमी होऊ शकते. काही औषधे यकृतातील चरबी वाढवू शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने हे थांबवता येऊ शकते. मधुमेहावरील काही औषधे आणि व्हिटॅमिन ई यकृतातील चरबी कमी करण्यास मदत करू शकतात.

अल्कोहोल-संबंधित यकृतातील चरबीच्या आजारावर उपचार करण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मद्यपान थांबवणे. सिरोसिस अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग किंवा नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग (नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीस) मुळे होऊ शकतो. सिरोसिसमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर औषधोपचार, शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय प्रक्रियेद्वारे उपचार करता येतात. सिरोसिसमुळे यकृत निकामी झाल्यास, तुम्हाला यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असू शकते.

जीवनशैलीत बदल आवश्यक

  • संतुलित आहार घ्या, मीठ आणि साखर मर्यादित करा आणि भरपूर फळे आणि भाज्या खा.

  • जास्त मद्यपानापासून दूर राहा. जास्त अल्कोहोल वापरणे रोगाच्या प्रगतीशी संबंधित आहे

  • हिपॅटायटीस ए आणि बी, फ्लू आणि न्यूमोकोकल रोगासाठी लसीकरण.

  • वजन व्यवस्थापन आवश्यक आहे. नियमितपणे व्यायाम करा, ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल आणि यकृतातील चरबी कमी होईल. बेरिएट्रिक (वजन कमी करणारी) शस्त्रक्रिया आणि औषधेदेखील अत्यंत लठ्ठ व्यक्तींसाठी उपयुक्त आहेत.

  • जीवनसत्त्वे किंवा कोणतेही पूरक किंवा पर्यायी औषधे किंवा विशिष्ट आहार घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com