सेवाकार्याचे संस्कार

आपत्तीवेळी केवळ आर्थिक मदत देऊन आपली जबाबदारी संपत नाही. शक्य असल्यास अशा ठिकाणी स्वतः जाऊन या मदतकार्यात निदान खारीचा वाटा तरी उचलला पाहिजे.
rites of service
rites of servicesakal
Summary

आपत्तीवेळी केवळ आर्थिक मदत देऊन आपली जबाबदारी संपत नाही. शक्य असल्यास अशा ठिकाणी स्वतः जाऊन या मदतकार्यात निदान खारीचा वाटा तरी उचलला पाहिजे.

- डॉ. अविनाश सुपे

आपत्तीवेळी केवळ आर्थिक मदत देऊन आपली जबाबदारी संपत नाही. शक्य असल्यास अशा ठिकाणी स्वतः जाऊन या मदतकार्यात निदान खारीचा वाटा तरी उचलला पाहिजे. त्या माणसांशी बोलणे, धीर देणे गरजेचे असते.

अनेक ध्येयवेडे लोक जीवावर उदार होऊन मदतकार्य करत होते. हे चित्र मात्र सुखावणारे होते. प्रत्येकाने अशा आपत्तीच्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव घेतला पाहिजे. त्यामुळे मनावर वेगळे संस्कार होतात आणि ते माणुसकी जपण्यास मदत होते.

ही गोष्ट आहे १९७७ ची. त्या वेळी जनता पक्षाचे राज्य होते. साधारणतः डिसेंबरच्या आसपास आंध्र प्रदेशमध्ये मोठे चक्रीवादळ आले. त्यात हजारो गावे उद्‍ध्वस्त झाली, अनेकांचे प्राण गेले. त्या वेळी आतासारख्या वृत्तवाहिन्या नव्हत्या. वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर त्याबाबत आम्हाला कळाले. तेव्हा आंध्र प्रदेशमध्ये मदत पथक पाठवण्यात आले. त्या पथकाचे नेतृत्व डॉ. नीलम गोऱ्हे आणि डॉ. शैला करत होत्या. तेव्हा माझ्यासह सहविद्यार्थिनी गीता राणे (आताच्या डॉ. गीता सामंत) यांनी आपणही विद्यार्थी म्हणून मदतकार्यासाठी जाऊ या का, असा विचार मनात आला.

त्या वेळी आम्ही चांगले काम करण्याच्या ध्येयाने झपाटलेले होतोच. त्यामुळे मी, गीता, प्रकाश वैद्य आणि त्या वेळच्या अनेक नामांकित व्यक्ती निखिल वागळे, संजीव साबणे आणि राष्ट्र सेवादलाशी निगडित डॉक्टर्स आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास २० निवासी डॉक्टर्स आणि इतर डॉक्टर्स असे आम्ही जायचे ठरवले. डॉ. अरुण लिमये यांनीही त्या वेळी वेळोवेळी मार्गदर्शन केले होते.

चक्रीवादळ ओसरल्यानंतर तीनचार दिवसांनी निघायचे आम्ही ठरवले. सकाळी सहा वाजता आम्ही हाफकिनला जमलो. चक्रीवादळामुळे लोकांना गॅस्ट्रो झालेला असेल, त्यामुळे सोबतीला सलाईन लागेल, या विचाराने सरकारच्या मदतीने हाफकिन फार्मासुटिकल्समधून पाच हजार काचेच्या सलाईनच्या सीलबंद बाटल्या घेऊन निघालो. या सर्व बाटल्या वजनदार असल्याने मानवी साखळी करून आम्ही त्या टेम्पोमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर टेम्पोपासून डब्यापर्यंत उचलून नेल्या. त्याशिवाय सर्व औषधे आणि इतर उपकरणे सोबत होतीच. त्या वेळी हैदराबाद एक्स्प्रेसला आमच्यासाठी खास डबा जोडलेला होता. त्या दुपारच्या एक्स्प्रेस गाडीने आम्ही हैदराबादला निघालो.

पुण्याला बरेच लोक आम्हाला येऊन मिळाले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हैदराबादला पोचलो. तिथे जनता पक्षातर्फे आम्हाला लोक घ्यायला आले होते. रात्री नऊ वाजता आम्ही विजयवाडा येथे पोचलो. तेथील लोकांनी सलाईनची गरज नसल्याचे सांगितल्याने आम्ही त्या सर्व बाटल्या स्थानिक आरोग्य केंद्राला देऊन टाकल्या. दुसऱ्या दिवशी बसने आम्ही अवनीगड्डा नावाच्या एका छोट्या गावात पोचलो. आमची राहण्याची व्यवस्था एका शाळेत केली होती. आम्ही विहिरीतून पाणी काढून अंघोळ करून निघायचो. एक डॉक्टर, एक पब्लिक हेल्थ अटेंडंट, एक विद्यार्थी आणि एक नर्स असे पथक जीपमधून विविध गावांमध्ये जात असू. तिथे पोचल्यावर जे दृश्य दिसायचे ते फार भयावह असायचे. सर्व घरे उद्‍ध्वस्त झालेली होती. घरातील पाणी तोपर्यंत ओसरले होते, पण सर्वत्र मोडतोड झाली होती. अनेक बोटी समुद्रापासून कित्येक मैल वाहून गावात आल्या होत्या. सर्वत्र वाताहत झाली होती.

खरे तर आम्हाला तेथे भाषेची अडचण होती. त्यामुळे वारंवार वापरात येणारे काही शब्द, वाक्ये आम्ही लिहून घेतली होती. ‘तुझे नाव काय...’, ‘कुठे दुखते आहे...’, ‘पोटात दुखते का...’, असे प्रश्न आम्ही तेलुगू भाषेत लिहून घेतले होते. दिवसभरात आम्ही सुमारे २०० रुग्णांची तपासणी करत होतो. रोज वेगवेगळ्या गावांत जायचो. प्रत्येक गावाचा अनुभव वेगळा असे. आम्ही औषधोपचार करेपर्यंत पब्लिक हेल्थ अटेंडंट औषध टाकून पाणीसाठा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायचा. गरीब-श्रीमंत लोक सर्व जण आरोग्य तपासणीसाठी येत. आपत्तीच्या काळात लोकांच्या अडचणी, शासकीय, सामाजिक तसेच राजकीय संस्था कशा प्रकारे काम करतात याचा तो एक उत्तम अनुभव होता. लोकांच्या चांगल्या-वाईट बाजूसुद्धा या वेळी दिसल्या. त्याचा फायदा पुढे अनेक दंगली किंवा आपत्ती व्यवस्थापनावेळी झाला.

आंध्र प्रदेशमध्ये आलेल्या अनुभवांपैकी काही सदैव लक्षात राहिले. एक म्हणजे काही दले फार उत्तम समाजकार्य करीत होती. त्यात राष्ट्रीय स्वययंसेवक संघ, राष्ट्र सेवा दल यांचे काम वाखाणण्यासारखे होते. रस्त्याने चालताना दोन्ही बाजूला प्रेते पडलेली होती. त्यातील काही सडलेली होती, त्याची सर्वत्र दुर्गंधी येत होती. तोपर्यंत त्यांची विल्हेवाट लावणे सरकारला जमले नव्हते. संघाचे कार्यकर्ते नाल्यात उतरून लाल ग्लोव्हज् घालून त्या प्रेतांना बाहेर काढत होते आणि त्यांची विल्हेवाट लावत होते. तिथे असलेली हजारो प्रेते काढून ती लाकडावर टाकून जाळत होते. ते दृश्य फार विदारक होते. माणुसकी, मानवता धर्म पाळून जे लोक हे कठीण काम करीत होते, ते मात्र अत्यंत वाखाणण्यासारखे होते. आपण ज्यांना ओळखतही नाही, अशा मृतदेहांचे केवळ मानवतेच्या नात्याने सन्मानाने दहन करणे हे थक्क करणारे होते. प्रत्येकाने अशा आपत्तीच्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव घेतला पाहिजे. त्यामुळे मनावर वेगळे संस्कार होतात आणि हे माणुसकी जपण्यास कारणीभूत होते.

काही परदेशी लोकही मदतीसाठी आले होते. त्याच वेळी काही लोक या आपत्तीचा राजकीय फायदा कसा करून घ्यावा, हे पाहत होते. आमचे काम सुरू असताना तिथे एखादा ट्रक येई आणि भांडी, कपडे, धान्य आदींचे वाटप करत असे. ते गोळा करण्यासाठी काही लोक अधाशासारखे धावत असत. सर्व ठिकाणाहून वस्तू गोळा करण्याचा वेडा प्रयत्न ते करायचे. अर्थात त्यांची घरे विसकटली होती, त्यातून त्यांची ही मानसिकता झाली होती; पण त्यांच्यामुळे लहान मुले, अपंग माणसे आणि म्हाताऱ्या लोकांना मदतीपासून वंचित राहावे लागे. ही असमानता पाहता मनाला दुःख होई. काही राजकीय व्यक्ती केवळ फोटोसाठी दान करत असावेत असे वाटले. आपत्तीच्या वेळी काही लोक किती निर्दय होऊन स्वतःचा राजकीय फायदा करून घेतात, याचे ते उत्तम उदाहरण होते. त्याच वेळी अनेक ध्येयवेडे लोक मात्र जीवावर उदार होऊन मदतकार्य करत होते. हे चित्र मात्र सुखावणारे होते.

एक वेगळाच अनुभव घेऊन आम्ही परत आलो. अशा आपत्तीवेळी केवळ आर्थिक मदत देऊन आपली जबाबदारी संपत नाही. शक्य असल्यास अशा ठिकाणी स्वतः जाऊन या मदत कार्यात निदान खारीचा वाटा तरी उचलला पाहिजे. त्या माणसांशी बोलणे, धीर देणे गरजेचे असते. मानवाकडून पर्यावरणीय साधनांचा ऱ्हास होत आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी आपण महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. आपत्तीनंतरचे व्यवस्थापन ज्यात मदत आणि पुनर्वसन यांचा अंतर्भाव आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. संवेदनशील आणि सकारात्मक वृत्तीमुळे समाजाकडून आपत्ती व्यवस्थापन राबवले जातेच; पण या सुविधा योग्यरीत्या पोचवण्यासाठी आपण जागरुकतेने खूप काम करण्याची गरज आहे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com