पत्रकारितेचा वास्तवदर्शी छेद (डॉ. बाळ ज. बोठे पाटील)

book review
book review

"पत्रकारिता हे व्रत आहे. त्यापुढे आर्थिक, भौतिक बाबी तुच्छच समजायला हव्यात. प्रत्येक नीतिमान पत्रकार अदृश्‍य समाजसेवक असतो. उपजीविकेपुरतं माणूस कुठंही कमावतो; परंतु पत्रकारांनी खूप श्रीमंत होण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटत नाही. समाजात वावरताना सर्वांत असूनही त्यानं नसल्यासारखं राहावं. या अलिप्त भावनेतूनच तो समाजाकडे नीटपणे पाहून त्यावर निर्धोक प्रहार करू शकतो. वेड्यासारखे सारेच भौतिक बाबींच्या मागं पळत असताना त्यानं तरी यापासून फटकून राहावं, तरच तो निकोप पत्रकारिता जोपासू शकतो...''

"झुंड' या कादंबरीचा नायक दिनूच्या तोंडी जागोजागी पत्रकारितेविषयी असं चिंतन मांडलेलं दिसतं. या कादंबरीचा आत्मा आहे पत्रकारिता. दिनू जगण्याच्या एका अपरिहार्यतेतून या क्षेत्रात पडतो. त्याला पत्रकारिता आणि शहर या दोन्ही गोष्टी नवीन असतात. वृत्तपत्र वितरणाचे काम करणारा रघू त्याला मदतीचा हात देतो आणि दिनू या क्षेत्रात स्थिरावतो. नंतर त्याला येत गेलेल्या अनुभवाचा पट आणि त्यातून त्यानं केलेलं पत्रकारितेचं चिंतन, यातून ही कादंबरी पुढे सरकत जाते.

पत्रकारिता म्हणजे फक्त सत्य आणि नीतीच्या गोष्टी नव्हेत, तर त्या पत्रकाराच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शक्तीही आहेत, याचा साक्षात्कार दिनकरला होतो. तीन तलाव व चार रस्ते हरवल्याचं प्रकरण, चारशे कोटी बुडवणाऱ्या सहकारी बॅंकेचं प्रकरण, देवस्थानावर नियुक्त केलेल्या अध्यक्ष बाईंचं प्रकरण अशा अनेक प्रकरणांचा छडा लावून ती उजेडात आणण्याचं काम कादंबरीतल्या पत्रकारांनी केलेलं आहे. पत्रकारिता आणि राजकारणाचा परस्परसंबंध कधी रेशमी, तर कधी सुताच्या धाग्यासारखा असतो. कधी गोड, तर कधी कटू. तरीही दोघं एकमेकांचा वापर करून घेताना दिसतात. त्याबाबत लेखकानं केलेली वर्णनं कुठल्याही काळातल्या पत्रकारितेला लागू होणारी आहेत. त्यासाठी बाह्य तपशिलांबरोबरच अंतर्गत नात्यांचा आणि परस्परविरोधाचाही फार बारकाईनं अभ्यास असावा लागतो. तो या कादंबरीतून जाणवतो.

"सूर्योदय'चे संपादक मुधोळकर हे आपलं काम चोखपणे कसं पार पडावं, पत्रकारांनी काय काय पथ्यं पाळावीत, याची जाणीव असलेले, जुन्या पिढीतील नावाजलेल्या संपादकांच्या मांदियाळीत त्यांचा समावेश होऊ शकेल, असे आहेत. ते कुठल्याही प्रलोभनानं विचलित होत नाहीत, की कोणाच्याही मागं धावत नाहीत. वाणी हा पत्रकारही याच पठडीत मोडणारा. आपल्या इमानाशी कायम चिकटून असलेला. परिस्थितीनं हतबल होऊन तो वाऱ्यावर फेकला जातो; पण आपल्या इमानाला वाऱ्यावर सोडत नाही. माने, दासू हे पत्रकार मात्र याला अपवाद आहेत. पत्रकारितेच्या बळावर सारी सुखं ओरबाडण्यात ती मश्‍गूल आहेत. नीती-अनीती पाळणाऱ्या पत्रकारांचे ते प्रतिनिधी ठरतात. शेंडे, राजन, रहीम, असे पत्रकारही आहेत. त्यांचे स्वभाव, वागण्याची पद्धत, आपसांतले संबंध, हे सगळे पत्रकाराच्या भूमिकेतून इथे वाचकांच्या भेटीला येतात.

वेगवेगळ्या अनुभवांतून दिनू कधी उद्विग्न होतो, कधी अडचणीत येतो, इतरांच्या अनुभवाने व्यथित होतो. काही तत्त्वं त्याला चुकीची वाटतात; परंतु तो शेवटपर्यंत कुठल्याही प्रलोभनाला बळी पडत नाही. आजूबाजूचं जग तो उघड्या नजरेनं पाहतो. त्याच्या जगण्याला एक दुखरी किनार आहे. कुटुंबाच्या व्यथेनं तो अस्वस्थ आहे. ती अस्वस्थता या कथानकाला व्यापून टाकणारी आहे. मुखपृष्ठावर धनंजय गोवर्धने यांनी झुंडीच्या मानसशास्त्राची प्रतिमा रंगवलेली आहे. उठावदार आणि आशयसंपन्न असं हे मुखपृष्ठ आहे.

पुस्तकाचं नाव : झुंड
लेखक : संजय कळमकर
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
पृष्ठं : 400, मूल्य : 400 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com