शताब्दी योगाचार्यांची (डॉ. दिलीप सातभाई)

शताब्दी योगाचार्यांची (डॉ. दिलीप सातभाई)

योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांची जन्मशताब्दी १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ‘अय्यंगार योगविद्ये’चे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुजींनी योगासंदर्भात मूलगामी विचार मांडले. जगभर त्याचा प्रसार केला. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा परिचय.

बेल्लूर कृष्णम्माचार सुंदरराजा अय्यंगार (बी. के. एस.) अय्यंगार म्हणजे ‘अय्यंगार योगविद्ये’चे जनक. जगभरातल्या प्रथितयश योगशिक्षकांचे शिक्षक म्हणून त्यांची गणना केली जात होती आणि पुढंही त्यांच्याकडे योगप्रसार करणारी अतिमहत्त्वाची व्यक्ती म्हणून सतत उल्लेख होत राहील. योगप्रघात आणि तत्त्वज्ञानावरची अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. १९६६ मध्ये अय्यंगार गुरुजी यांनी पहिलं पुस्तक ‘लाइट ऑन योगा’ प्रकाशित केलं. हे त्या वर्षअखेरीस एक आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम विक्री झालेलं पुस्तक ठरलं. त्याचा १७ भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि तीस लाख विक्रमी प्रतींची विक्री केली गेली होती. ‘योगावरील प्रकाशदीपिका’ हे पुस्तक ‘प्राणायाम आणि योगाच्या’ तत्त्वज्ञानाच्या पैलूंवर आधारित होतं. अय्यंगार गुरुजींनी चौदा पुस्तकं लिहिली. गुरुजींना केंद्र सरकारनं १९९१ मध्ये पद्मश्री, १९९८ मध्ये पद्मभूषण आणि २०१४ मध्ये पद्मविभूषण सन्मान प्रदान केला. २००४ मध्ये ते ‘टाइम’ मासिकाच्या ‘जगाच्या सर्वांत प्रभावी शंभर लोकां’पैकी एक होते. तीन ऑक्‍टोबर २००५ रोजी सॅनफ्रान्सिस्कोच्या ‘सिटी ऑफ बोर्ड ऑफ सुपरवाइझर्स’नं त्यांच्या योगविद्येचा आदर करून ‘बी. के. एस. अय्यंगार डे’ म्हणून घोषित केला. १४ डिसेंबर २०१५ रोजी म्हणजे त्यांच्या ९८व्या वाढदिवशी, त्यांना ‘गुगल डुडल’सह सन्मानित करण्यात आलं होते. योगप्रसार व सर्वोत्तम योगशिक्षण देणारी भारतातली सर्वोच्च संस्था म्हणून त्यानी स्थापन केलेल्या ‘रमामणी अय्यंगार मेमोरिअल योग इन्स्टिट्यूट’ला यंदा पंतप्रधान कार्यालयामार्फत पंचवीस लाख रुपयांचं पारितोषिक देऊन विशेष सन्मानित करण्यात आलं. जे. कृष्णमूर्ती, लोकनायक जयप्रकाश नारायण आणि जगप्रसिद्ध संगीतकार येहुदी मेनुहिन यांच्यासह अनेक नामवंतांना गुरुजींनी योगाचं प्रशिक्षण दिलं. बेल्जियमच्या राणी एलिझाबेथ ऐशी वर्षांच्या असताना गुरुजींनी शीर्षासनांची शिकवण दिली. कादंबरीकार अलडस हक्‍स्ले, अभिनेत्री ॲनेट बेनिंग, चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आणि डिझायनर डोना करन; तसंच अनेक क्रिकेट कसोटीवीर आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आदी अनेकांना गुरुजींनी मार्गदर्शन केलं. माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनीदेखील त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं.  

सुरवातीची वर्षं
अय्यंगार यांचा जन्म कर्नाटक राज्यातल्या कोलार जिल्ह्यातल्या बेल्लूर इथं एका गरीब श्रीवैष्णव अय्यंगार कुटुंबात झाला. त्याच्या जन्माच्या वेळी इन्फ्लूएन्झाची साथ होती. त्या रोगाचे आघात सहन न झाल्यानं त्यांची प्रकृती अतिशय कृश आणि दुर्बल होती. बालपणात त्यांना मलेरिया, टीबी, विषमज्वर आणि सामान्य कुपोषणसह अनेक विकार झाले. त्यांचं डोकं शरीराच्या मानानं जड झाल्यानं त्यांना ते मोठ्या मेहनतीनं सतत उचलावं लागत होतं, इतकी त्यांची प्रकृती क्षीण झाली होती. शाळेत शिक्षक असणारे कृष्णम्माचार व शेषम्मा यांच्या तेरा अपत्यांमधले ते अकरावे अपत्य. गुरुजी पाच वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब बंगळूर इथं आलं. गुरूजी नऊ वर्षांचे झाले, तेव्हा वडिलांना झालेल्या ॲपेंडिसायटिसमुळं त्यांचं पितृछत्र हिरावलं गेलं होतं. अशा प्रतिकूल परिस्थितीत योगविद्येच्या आधारे त्यानी स्वतःची प्रकृती सुधारून घेतली आणि योगाभ्यासानं उत्तम प्रकृती राहू शकते याचा मूलमंत्र दिला.   

योगामधील शिक्षण
१९३४मध्ये योगी तिरुमलई कृष्णमाचार्य यांनी योगाभ्यासासाठी म्हैसूरला येण्यास सांगितलं. तिथं गुरुजींनी योगासनांचा अभ्यास केला. गुरुजींना कृष्णमाचार्यांबद्दल फारच आदर होता. कृष्णमाचार्यांनी आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांची योगाद्वारे सोडवणूक करण्यासाठी एक उपायश्रृंखला शिकवली. त्यात गुरुजींनी खूप प्रगती केली. कधीकधी गुरुजींना एका विशिष्ट आसनात खूप तास बसवून योगज्ञान व महती आत्मसात होईपर्यंत काही खाण्यासदेखील मनाई केली होती. असं खडतर जीवन कंठून त्यांनी योगशिक्षण केवळ आत्मसातच केलं नाही, तर त्यात प्रावीण्यही मिळवलं; पण त्या काही दिवसांत ते जे शिकले ते त्यांची आयुष्याची शिदोरी करणारं ठरलं. १९३७मध्ये कृष्णमाचार्यांनी अठराव्या वर्षी योगशिक्षण पूर्ण करून अय्यंगार गुरुजींना पुणे इथं पाठवलं. पुण्यात योगशिक्षण करणं तसं सोपं नव्हतं. सुरुवातीला त्यांच्या योगशिक्षणाची, शरीरयष्टीची व त्यांनी शोध लावलेल्या प्रॉप्सची सनातनवादी लोकांनी खिल्ली उडवली होती. सुरवातीला डेक्कन जिमखाना मैदानात भरत असलेले योगविद्येचे वर्ग बंदही करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, गुरुजी डगमगले नाहीत आणि आपलं कार्य सुरू ठेवलं. कारण काही चांगल्या लोकांचा त्यांना पाठिबाही मिळाला होता. थोडक्‍यात सांगायचं तर सुरवात कठीण होती. त्यानंतर त्यांना बुधवार पेठेतल्या एका गुजराती शाळेत योगशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यावर काही विद्यार्थ्यांना योगशिक्षण देण्याची संधी मिळाली. अशा वेळी सर्वसाधारणपणे हुशार, नियमित असणारे, गुरुजनांसह सर्वांचा आदर करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी करण्यात येते; परंतु गुरुजींनी मुख्याध्यापकांना सर्वांत खोडसाळ, अनियमित, वर्गात कोणाचंही न ऐकणाऱ्या; तसंच अभ्यासात ‘ढ’ असणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी केली. त्यामुळं मुख्याध्यापकदेखील चक्रावून गेले. तथापि, गुरुजींच्या विनंतीला मान्यता देऊन त्यांनी त्या विद्यार्थ्यांचा गट स्थापन केला. गुरुजींनी त्यांना योगविद्या शिकवली आणि त्यांच्यातल्या वाईट प्रवृत्तीवर मात केली. योगामुळं हे शक्‍य झालं. तीस-पस्तीस वर्षांनंतर यातले काही विद्यार्थी गुरुजींकडं परत आले आणि त्यांच्या जीवनातल्या यशाचं श्रेय गुरुजी आणि त्यांनी शिकवलेल्या योगासनास दिलं. असे हटके निर्णय घेणाऱ्या गुरुजींची निर्णयक्षमता अफलातून होती.

गुरुजींनी शोधलेले प्रॉप्स इतके गुणकारी होते, की अवघड वाटणारी आसनंदेखील सोपी झाली होती. त्यांनी पहिल्यांदा फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य राजवाडे यांच्यावर प्रोप्सद्वारे प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. राजवाडे ८५ वर्षांचे होते, तेव्हा त्यांना हालचाल करणं कठीण झालं होतं. अशावेळी सर्वसाधारणपणे उभं राहून करायची आसनं शक्‍य नसतात. त्यातलं त्रिकोणासन हे एक गुणकारी आसन आहे. त्यांनी पहिल्यांदा आपल्या प्रोप्सचा वापर करून राजवाडे यांचं सुप्त त्रिकोणासन (म्हणजे झोपून केलेले त्रिकोणासन) घेतलं आणि त्यानंतर आठवड्याच्या आत राजवाडे यांच्या प्रकृतीत भरीव सुधारणा होत गेली. ते काही दिवसांच्या प्रयत्नांनंतर नुसते उठून उभेच राहिले नाहीत, तर फिरायलादेखील जायला लागले. गुरुजी याचं श्रेय योगतंत्राला देतात. महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दि. ब. देवधर यांना काही काळ गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी नीटशी करता येत नव्हती. त्यांना योगासनं शिकवून गुरुजींनी त्यांच्यातला दोष दूर केला आणि त्यानंतर देवधर केवळ क्रिकेटच खेळू लागले नाहीत, तर त्यानंतर ते संघाचे कर्णधारदेखील झाले.

गुरू कृष्णमाचार्य यांनी मान्यतासंपादन
एका मुलाखतीत, गुरुजींनी कृष्णमाचार्यांच्या शिक्षणशैलीचे गुणविशेष सांगितले आहेत : ‘‘त्यांनी (कृष्णमाचार्य) मला खूप शिकवले नाही; पण त्यांनी मला मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास शिकवलं. १९६१मध्ये ते पुण्यात आले होते. त्यावेळी माझी मुलगी व मुलगा शिकत होते. त्यांनी त्यांची बरीच तासांची  शिकवणी घेतली; पण दुर्दैवानं ते त्यांना दाखवण्याचा जो प्रयत्न करीत होते, ते मुलांना कळत नव्हतं.’’ गुरुजींनी नंतर मुलांना काय कळत नाही हे विचारलं, तेव्हा गुरुजींच्या मुलीनं त्यांना एका आसनाबद्दल, त्याच्या उपयुक्ततेबद्दल व महतीबद्दल समजलं नाही असं सांगितलं. तेव्हा गुरुजींनी तिला समजावून सांगितलं, की तुला या आसनाच्या शेवटपर्यंतचा भाग करायला हवा व नंतर त्याचा परामर्ष घ्यायला हवा. कृष्णमाचार्यांनी हे पाहिलं, तेव्हा त्यांनी गुरुजींना ‘योगशिक्षक चक्रवर्ती’ म्हणून सुवर्णपदक दिलं. त्याचा अर्थ आहे ः ‘योग शिक्षकांचा समीक्षक, शिक्षकांचा शिक्षक.’

योगाचा प्रसार
पतंजली यांनी असं म्हटलं आहे, की योगाभ्यास हा चित्तवृत्ती निरोध आहे. योगज्ञान आत्मसात केल्यानंतर व्यक्तीच्या चित्तवृत्तींत सकारात्मक बदल होतात, म्हणजे अपप्रवृत्तींचा त्याग होतो आणि चांगल्या प्रवृत्तींकडं मन आपोआपच वळतं. चित्त म्हणजे चैतन्य, जे सतत कंपनावस्थेत असतं. विचार स्थिर वा बदलत असले तरी! योग म्हणजे चैतन्याची व्याप्ती- जी संपूर्णतः परमोच्च सुखाच्या शांततेच्या समाधी अवस्थेत पोचण्यासाठी असलेला आध्यात्मिक मार्ग. गुरुजींनी भरपूर बौद्धिक आणि आध्यात्मिक योगकार्य करून त्यांचं अशा पद्धतीनं विश्‍लेषण केलं आहे, की ते योग शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरेल. ‘संशोधन व विकासआधारित अनुभव’ आणि ‘अनुभवआधारित संशोधन आणि विकास’ या धारणेच्या आधारे योग आत्मसात करण्याचं तंत्र त्यांनी शोधून काढलं आहे. या तंत्रास जगभरात ‘अय्यंगार पॅटर्न’ म्हणून संबोधलं जातं. गुरुजींच्या या योग शिकवणीअंतर्गत कोणीही दररोज सर्व योगासनं करणं अपेक्षित नाही. आठवड्यात करायच्या महत्त्वाच्या आसनांची एक विवेकी यादी सर्वसामान्य लोकांची आवश्‍यकता लक्षात घेऊन त्यांनी तयार केली आहे व तेवढी आसनं केल्यास योगविद्येचे फायदे मिळू शकतील, असं निरीक्षण त्यानी नोंदवलं आहे. जगभरात त्याच्या ‘अय्यंगार योगा’ची पद्धत सर्व जाती, पंथ आणि वंशांत वापरली जात आहे. योगाभ्यासाच्या योगदानासाठी शेकडो अय्यंगार योग केंद्रं कार्यरत आहेत. भारतात पुणे, बंगळूर, मुंबई, दिल्ली, चेन्नई, डेहरादून, ऋषिकेश आदी ठिकाणी अशी योग केंद्रं आहेत, तर अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडासह अनेक देशांत त्यांचे शिष्य अशी केंद्रं चालवून योगप्रसार करत आहेत.

मेनुहिन यांचे गुरू
गुरुजींनी व्हायोलिनवादक येहुदी मेनुहिन यांच्याशी १९५२ मध्ये मैत्री केली. गुरुजींनी प्रसिद्ध तत्त्वचिंतक जे. कृष्णमूर्ती यांना शिकवलं होतं, त्यांनी गुरुजींना मेनुहिन यांना भेटण्यासाठी मुंबईत जाण्यास सांगितलं. गुरुजी मेनुहिन यांना भेटायला गेले, तेव्हा मेनुहिन यांनी, आपण खूप थकलो आहोत आणि पाचच मिनिटं बोलू शकू, असं सांगितलं. गुरुजींनी त्यांना शवासनामध्ये झोपण्यास सांगितलं आणि त्या आसनाच्या गुरुजींच्या पद्धतीमुळं मेनुहिन गाढ झोपी गेले. एक तासानंतर मेनुहिन ताजेतवाने झाले आणि गुरुजींसोबत त्यांनी आणखी दोन तास घालवले. योगामुळं आपलं व्हायोलिनवादन सुधारलं, असं मेनुहिन यांचं मत झालं आणि त्यामुळं ते गुरुजींकडं आकर्षित झाले. त्याचा परिपाक म्हणून १९५४ मध्ये त्यांनी गुरुजींना स्वित्झर्लंडला आमंत्रित केलं. त्या भेटीच्या शेवटी त्यांनी गुरुजींना एक घड्याळ भेट दिलं. त्या घड्याळाच्या मागं त्यांनी ‘माझे सर्वोत्तम शिक्षक बी. के. एस. अय्यंगार यांना’ असं लिहिलं होतं. तेव्हापासून अय्यंगार यांनी नियमितपणे पाश्‍चिमात्य देशांना भेट दिली आणि त्यांची योगशाळा जगभर पसरली.

१९७५मध्ये अय्यंगार गुरुजींनी आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ पुणे येथे रमामणी अय्यंगार मेमोरियल योग संस्थेची स्थापना केली. १९८४मध्ये ते अधिकृतपणे सेवानिवृत्त झाले; परंतु अय्यंगार योगाच्या जगात सक्रिय राहणं, विशेष वर्गांमध्ये शिक्षण देणं, व्याख्यानं देणं आणि पुस्तकं लिहिणं सुरू राहिले.

कौटुंबिक पार्श्‍वभूमी
अय्यंगार गुरुजींचा रमामणी यांच्याशी विवाह झाला. त्यांना पाच मुली आणि एक मुलगा अशी अपत्यं. अय्यंगार गुरुजींची मोठी मुलगी गीता आणि चिरंजीव प्रशांत हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे योग मार्गदर्शक झाले आहेत. गीता अय्यंगार यांनी ‘योग ए जेम फॉर वुमेन’ हे, तर प्रशांत यांनी ‘ए क्‍लास आफ्टर ए क्‍लास: योग’सारखी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. हे दोघंही पुण्यात रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूटमध्ये योगअध्यापनाचं  काम करतात. गुरुजींच्या कन्या सुनीता यांनी निगडी इथं अय्यंगार योगशाळा स्थापन करून हजारो विद्यार्थ्यांना योगशिक्षण दिलं आहे. वनिता, सुचिता आणि सविता ही त्यांच्या इतर कन्यांची नावं. गुरूजींच्या एक नात, अभिजाता श्रीधर-अय्यंगार यांनी गुरुजींच्या पालकत्वाखाली अनेक वर्षं योगाचं प्रशिक्षण प्राप्त केलं असून, आता त्या पुण्यातील इन्स्टिट्यूटमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर योग मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत.

परोपकार आणि सक्रियता
अय्यंगार गुरुजींनी सर्व प्रकारचे प्राणी आणि पक्षी यांचं जतन करणं महत्त्वाचं आहे, असं सांगून तो प्रकृतिसंवर्धनाचा आधार आहे, असं मत मांडलं होतं. म्हैसूर इथल्या चाराजेन्द्र प्राणिसंग्रहालयास त्यांनी वीस लाख रुपयांची देणगी दिली. कोणत्याही प्राणिसंग्रहालयासाठी वैयक्तिक व्यक्तीकडून आतापर्यंत देण्यात आलेली ही सर्वांत मोठी देणगी. मल्टिपल स्क्‍लेरॉसिस सोसायटीच्या पुणे शाखेच्या माध्यमातून या रोगाबाबत जागृतीसाठी त्यांनी मदत केली. गुरुजींचे सर्वांत महत्त्वाचे धर्मादाय प्रकल्प कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील बेलूर या आपल्या मूळ जन्म गावी आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या ट्रस्ट फंडाद्वारे त्यांनी गावात बदल घडवून आणला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com