दहा प्रमुख वित्तीय भानगडी

‘भानगड’ या मराठी शब्दाचा इंग्रजी पर्याय बहुधा ‘मॅनिप्युलेशन’ असा असू शकतो. साधारणपणे ‘वित्तीय मॅनिप्युलेशन’ हे लबाडीने कायद्याच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न केला जातो.
financial manipulation
financial manipulationsakal

- डॉ. गिरीश जाखोटिया, girishjakhotiya@gmail.com

‘भानगड’ या मराठी शब्दाचा इंग्रजी पर्याय बहुधा ‘मॅनिप्युलेशन’ असा असू शकतो. साधारणपणे ‘वित्तीय मॅनिप्युलेशन’ हे लबाडीने कायद्याच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारी तपास यंत्रणा या जर पुरेशा सक्षम नसतील, तर काही उद्योजक अथवा उद्योगपती हे वित्तीय मॅनिप्युलेशन करण्याचं नियमित धाडस करीत राहतात, किंबहुना त्यांची अशी मानसिकता बनते की, हे ‘लाचे’लाही ‘सुविधा शुल्क’ म्हणतात!

कराची चोरी करणं, आजारी पडू शकणाऱ्या उद्योगातील स्वतःचं भांडवल काढून घेत अंतिमतः दिवाळं फुंकणं, भागीदारांपासून खरा नफा लपवणं, प्रकल्पांमधील गुंतवणूक जास्त दाखवून पैसे हडप करणं... आदी काही महत्त्वाची कारणं वित्तीय भानगडींची असतात. मोठ्या कंपन्यांचे बरेच वितरक व पुरवठादार हे या कंपन्यांकडून अधिकाधिक फायदे लाटण्यासाठी बऱ्याच वित्तीय भानगडी करतात.

सचोटीने प्रगती करू इच्छिणाऱ्या महत्त्वाकांक्षी उद्योजकांनी अशा वित्तीय भानगडी आपल्या कंपनीत होऊ देऊ नयेत आणि आपल्या पुरवठादारांवर व वितरकांवर याबाबतीत बारीक नजर ठेवावी. वित्तीय पारदर्शकता व शिस्त असेल, तर उद्योजकाचं बॅलन्सशीट सशक्त बनतं, व्हॅल्युएशन सुधारतं, बँक रेटिंग सुधारतं, टेन्शन नसल्याने उद्योजकीय विस्ताराकडे पूर्ण लक्ष देता येतं आदी.

दहा गंभीर वित्तीय भानगडी इथं आपण संक्षेपाने समजावून घेऊयात. पहिल्या प्रकारात उद्योगाचे विविध खर्च वाढवून दाखवले जातात, जेणेकरून नफा कमी दिसेल व कर कमी बसेल. यासाठी शिताफीने फुगलेली बिलं बनवली जातात. दुसऱ्या प्रकारात स्वतःचे खासगी खर्च हे उद्योगाच्या नावे दाखवले जातात.

उदाहरणार्थ - एखाद्या उद्योजकाच्या कंपनीत कागदोपत्री जवळचे नातेवाईक हे संचालक असतात. आंतरराष्ट्रीय प्रदर्शन बघण्याच्या निमित्ताने हे सर्वजण दहा दिवसांची परदेश वारी करून येतात. हा सगळा खर्च मग रीतसरपणे कंपनीच्या नावे दाखवला जातो.

एका नामांकित कंपनीच्या वितरकाने आपला राहता बंगला हा त्याच्या उद्योगाचं गेस्ट हाउस म्हणून कागदोपत्री दाखवला होता. अर्थात, बंगल्याचा जवळपास सर्व खर्च उद्योगाकडे आला. यामुळे या वितरकाने कराची चोरी तर केलीच, सोबतीला स्वतःचा ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’चा दरही कमी दाखवत कंपनीकडून अधिकच्या सवलती मिळविल्या.

तिसऱ्या भानगडीला मी ‘प्रॉफिट लिकेज’ असं नाव देतो. इथं उद्योजक आपल्या सख्ख्या नातेवाइकांना वारेमाप मोबदला देतो व अप्रत्यक्षपणे नफा स्वतःच्या घरी नेतो. उदाहरणार्थ - एका उद्योजकाने स्वतःच्या बायकोला कंपनीचा मुख्याधिकारी बनवून तिला नेहमीपेक्षा तिप्पट पगार देऊ केला होता. दुसरा एक उद्योजक आपल्या जावयाची जागा वापरत असे व बाजारभावापेक्षा त्यांस दुप्पट भाडं देत असे.

चौथ्या भानगडीत उद्योजक हा एका उद्योगाच्या नावावर घेतलेलं कर्ज अन्य उद्योगांसाठी वापरतो. अर्थात, अशा प्रकारात बऱ्याचवेळा त्याचा बँकरही सहभागी असतो. पाचवा प्रकार हा थोडा क्लिष्ट आहे. उद्योजक आपलं स्वतःचं भांडवल एखाद्या जवळच्या मित्राच्या आजोबांनी कर्ज दिल्याचं दाखवतो. अशा कर्जावर मग तो व्याज दिल्याचं दाखवतो व करपूर्व नफा कमी करतो.

या प्रकारामागे दूरगामी उद्देशही असतो. उद्योगाचं दिवाळं निघणार असल्यास हे कर्ज म्हणून दाखवलेलं स्वतःचं भांडवल तो अन्य कर्जांच्या सोबतीने उद्योगाच्या लिलावातून सहीसलामतरीत्या वसूल करू शकतो. याच प्रकाराचं मोठं व आंतरराष्ट्रीय स्वरूप म्हणजे, स्वतःचा काळा पैसा बेकायदा मार्गाने देशाबाहेर न्यायचा व तो पांढरा करून पुन्हा देशात आणायचा. काही मोठे उद्योगपती शेकडो कंपन्यांचं आंतरराष्ट्रीय जाळं विणत भांडवलाची क्लिष्ट अशी हेराफेरी करीत राहतात. या प्रकारात ते यंत्रणेतील दलालांना बरंच ‘सुविधा शुल्क’ देत राहतात.

भानगडीचा सहावा प्रकार हा ‘अकौंटिंग मॅनिप्युलेशन’मध्ये मोडतो. कॉमन खर्चाची वाटणी करताना उद्योजक या खर्चाचा अधिकाधिक वाटा हा सर्वाधिक फायदेशीर उद्योगाच्या नावे नोंदवतो व कराची चोरी करतो. उदाहरणार्थ - एखाद्या उद्योजकाचे तीन उद्योग भाड्यानं घेतलेल्या एकाच मोठ्या इमारतीत असू शकतात.

यापैकी भरपूर नफा मिळवणारा उद्योग एकूण इमारतीचा चाळीस टक्के हिस्साच वापरत असेल; परंतु कागदोपत्री तो साठ टक्के दाखवून भाड्याचा मोठा खर्च इथं वर्ग केला जातो. सातवा प्रकारही असाच ‘अकौंटिंग मॅनिप्युलेशन’चा, जो स्थावर मालमत्ता (फिक्स्ड एसेट) म्हणजे इमारतीच्या बाबतीत बॅलन्सशीटमध्ये मुख्यत्वे केला जातो.

स्वतःच्या मालकीच्या इमारतीचा मोठा हिस्सा हा नफेशीर उद्योगाच्या बॅलन्सशीटमध्ये दाखवून अधिकचा घसारा (डिप्रिसिएशन) व मेंटेनन्स वर्ग केला जातो व नफा कमी दाखवून कराची चोरी केली जाते. बऱ्याचवेळा स्वतःची इमारत प्रचंड भाड्याने दुसऱ्याला वापरायला दिली जाते; परंतु भाड्याची कमाई मात्र नगण्य दाखवली जाते.

वित्तीय भानगडीच्या आठव्या प्रकारात बऱ्याचदा उद्योजकाचे वित्तीय सल्लागार व बँकरही सामील असतात. नव्या उद्योगाच्या प्रकल्पामध्ये लागणारी गुंतवणूक ही फुगवली जाते व संगनमताने खरेदीची बिलं वाढवून घेत पैसे हडप केले जातात. नववी भानगड तर प्राचीनच म्हणायला हवी. अगदी खरेदीपासून उत्पादन व नंतर विक्रीचा मोठा हिस्सा हा अकौंट्समध्ये नोंदवलाच जात नाही. यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे दोन्ही कर चुकवले जातात.

या मोठ्या भानगडीत उद्योजकाचे जवळचे वरिष्ठ सहकारीही सामील असतात, ज्यांना त्यांचा वेगळा मोबदला रोखीत दिला जातो. ही भानगड ‘सिस्टीम’मधील लोकांनाही माहीत असते; परंतु बऱ्याचदा काणाडोळा केला जातो. दहाव्या भानगडीत यावर्षीचा कर कमी करण्यासाठी पुढच्या वर्षाचे खर्च याच वर्षी केले जातात व या वर्षीच्या शेवटच्या एक-दोन महिन्यांतील विक्री ही पुढील वर्षी ढकलली जाते. नेहमीच्या ग्राहकांना कच्च्या पावतीने मालपुरवठा केला जात असल्याने त्यांचाही खोळंबा होत नाही.

वित्तीय भानगडी करणाऱ्या उद्योजकांचं बॅलन्सशीट हे कमजोर राहतं. हे उद्योजक मात्र काळा पैसा भरपूर निर्माण करतात नि खासगीत भरपूर खर्च करतात. वृत्ती संकुचित झाल्याने हे उद्योगवाढीचं मोठं स्वप्न पाहू शकत नाहीत. यामुळे हे ‘सन्माननीय उद्योगपती’ होऊ शकत नाहीत.

स्वतःच्या वित्तीय भानगडींचे संस्कार हे पुढच्या पिढीवरही करतात. यांच्या कुटुंबातील बहुतेकजणांचं मनःस्वास्थ्य नीट नसल्याने कुटुंबात संपत्तीच्याच कारणांवरून दुफळी माजते. सख्खे भाऊ एकमेकांना फसवत जातात नि नंतर अचानक विभक्त होतात. वित्तीय भानगडबाज असणाऱ्या अशा उद्योजकांपासून चार हात दूर राहिलेलंच बरं.

यासाठी यांना आधी ओळखलं पाहिजे. यांना ओळखण्याची पहिली महत्त्वाची खूण म्हणजे, हे लोक सामाजिक- सांस्कृतिक- आध्यात्मिकरीत्या अत्यंत दांभिक असतात. अर्थात, हल्ली ‘ड्यू डिलिजंस’च्या व्यावसायिक पद्धतीने यांची बरीच माहिती मिळवता येते. काही प्रचंड मोठे उद्योगसमूह हे भानगडी करूनच मोठे झालेले असतात.

भरपूर बिझनेस मिळू शकतो म्हणून यांच्याशी व्यवहार करण्याचा खूप मोह होऊ शकतो, जो टाळला पाहिजे. अनेक क्लृप्त्या करत व प्रलोभनं दाखवत हे छोट्या उद्योजकांना आपल्या जाळ्यात ओढतात नि मग त्यांचं पद्धतशीरपणे शोषण होऊ लागतं. सचोटीपूर्ण व आनंदी उद्योग करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी हे सर्व धोकादायक मोह टाळले पाहिजेत. पुढील भागात पाहूयात ‘सरकारी संबंधांचं व्यवस्थापन’.

(लेखक हे व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. देशात व परदेशांत त्यांनी विविध विषयांवर दोन हजारांहून अधिक व्याख्यानं दिली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com