स्मरण-निरीक्षणाला चिंतनाची जोड

बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे आणि सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असणारे कोल्हापुरातील एक उत्साही आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व म्हणजे उत्तम फराकटे.
Hinganmittha Book
Hinganmittha Booksakal

बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे आणि सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असणारे कोल्हापुरातील एक उत्साही आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व म्हणजे उत्तम फराकटे. सुमारे चार दशकांपूर्वीच्या बालपण-तरुणपणावर प्रकाश टाकण्याच्या निमित्ताने विविधरंगी स्मृतींना उजाळा देण्याचं ठरवून त्यांनी केलेलं ललित लेखन म्हणजे ‘हिंगणमिठ्ठा’. नावाप्रमाणेच चविष्ट, चटकदार, चमचमीत पण चिंतनशील स्वरूपाचं असं हे पुस्तक आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी, बालपण, शिक्षण, शाळा, सवंगडी, शिक्षक, शेजारी, परिसरातील आणि गल्लीतील विविध नमुन्याच्या व्यक्ती आणि वल्ली, सणसमारंभ, रूढी, परंपरा, गमती-जमती, लोकांचे छंद, सवयी, भांडणं, ईर्षा, खेळ, शर्यती या सगळ्यांविषयी फराकटे यांनी भरभरून लिहिलंय. विशेषत: दहीहंडी, गुढी पाडवा, रंगपंचमी, गणेशोत्सव, मोहरम, शिवजयंती, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, वटपौर्णिमा यांसारख्या सणापासून लपाछपी, लंगडी, विटी-दांडू, भोवरे, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट यांसारख्या खेळापर्यंतची वर्णनं करताना ते भूतकाळात रमून जातात.

वादकापासून वाढप्यापर्यंत आणि धूम्रपानापासून मद्यपानापर्यंतच्या अनेक गमती जमती सांगताना फराकटे खास कोल्हापुरी रंगढंगांचं प्रत्ययकारी दर्शन घडवतात. ‘नीट बोल रे गाढवा !’, ‘अरे ते साप सोडतंय !’, ‘ढोल पी पी’, ‘पी ढबाक’, ‘हर हर गंगे’, इत्यादी शीर्षकं वाचली तरी त्यातील कोल्हापुरी झलक पाहावयास मिळते. तर ‘आखरी रास्ता'', ''खेळ मांडला'' यांसारखे लेख जीवनातील वास्तव, गांभीर्य यावर करुणरसपूर्ण शब्दांत भाष्य करतात.

‘रंग वाटले कुणी'' सारखा लेख वाचताना हिंदू-मुस्लिमांतील परंपरागत अतूट आणि उत्कट सलोखा प्रकट होतो आणि अलिकडच्या काळात याला तडे गेल्याचे कटू आणि कठोर वास्तव मात्र वेदनादायी आणि क्लेशदायी ठरतं. ‘शाईचा पेन, पेनाचे टोपण’ हा लेख वाचताना फराकटे यांची गुरुविषयीची कृतज्ञता आणि आदरभाव प्रकर्षानं लक्षात येतो. ‘धर्म जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा अधर्माची सुरुवात होते.'

यासारखी वाक्यं पेरून अलिकडच्या काळातील काही बदलत आणि बिघडत चाललेल्या घटना-प्रसंगांवर ते जाता जाता नापसंती व्यक्त करतात, यातून त्यांची मनोभूमिका स्पष्ट होते. भूतकाळातल्या चांगल्या गोष्टींची पुन:पुन्हा प्रचिती येत राहावी आणि अनिष्ट गोष्टी टाळल्या जाव्यात, हा संदेश अनेक लेखांतून वाचकांपर्यंत पोहोचवण्याची फराकटे यांची तळमळ वाखाणण्याजोगी आणि अनुकरणीय आहे.

व्यक्तिचित्रण, भाषाशैली, घटना-प्रसंगांचं खुमासदार वर्णन करण्याची लेखनशैली, सुभाषितवजा वाक्यांची पेरणी, लालित्यपूर्ण आणि नर्मविनोदी शब्दांच्या माध्यमातून आशय प्रकट करण्याचे कौशल्य, स्मरणशक्ती आणि निरीक्षणशक्तीचे सामर्थ्य अशा वाड्मयीन अंगांनं विचार करता या पुस्तकाची सरसता आणि गुणवत्ता निदर्शनास येते.

नामवंत समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना, ज्येष्ठ लेखक प्रा. दिनेश डांगे यांचा समर्पक अभिप्राय, वाचकांनी आवर्जून आस्वाद घ्यावा असा हा ‘हिंगणमिठ्ठा’ म्हणजे मराठी ललित गद्यात पडलेली मोलाची भरच होय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पुस्तकाचं नाव : हिंगणमिठ्ठा

लेखक : उत्तम फराकटे

प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर

(संपर्क : ७३८७७३६१६८)

पृष्ठं : १६०

मूल्य : २२५ रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com