मानससूत्र : मैत्री, प्रेम आणि आकर्षण

डेटिंग ॲप्सचा वापर यावर लेख लिहिताना आपण त्या ‘ॲप्स’नी आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचीही चर्चा केली.
Friendship
Friendshipsakal

- डॉ. जयश्री फडणवीस

डेटिंग ॲप्सचा वापर यावर लेख लिहिताना आपण त्या ‘ॲप्स’नी आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचीही चर्चा केली. ‘ॲप्स’ वापरणारी मंडळी अनेकदा संमिश्र भावनांमधून जात असतात. एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर, त्या व्यक्तीबद्दल नेमकं काय वाटतं याचा गोंधळ उडालेला असतो. नात्याविषयी कोणतीही स्पष्टता नसते.

मैत्री, प्रेम आणि आकर्षण हे मानवी जीवनातील कधी सुखद, तर कधी क्लिष्ट कंगोरे असलेले घटक. यातूनच पुढे मानवी नातेसंबंध आकार घेतात. या घटकांमधील भावनांमधील प्रत्येक संकल्पना नात्यांना गतिमान बनवते. मात्र, रक्ताच्या नात्यांना प्रत्येक संकल्पना लागू पडेलच असं नाही.

आकर्षण

आपल्याला एखादा नट, कलाकार त्यांचं दिसणं, बोलणं, वागणं; तसंच त्यांचा पेहराव या सर्वांचंच आकर्षण असतं. तो नट किंवा नटी आपल्याला खूप आवडते. अचानक ती व्यक्ती पुढे आली, तर हरवून जायला होतं; पण हे सर्व तात्पुरतं असतं. आकर्षण दीर्घकाळ टिकत नाही. अशा आकर्षणातून कोणतेही नातेसंबंध विकसित होत नाहीत; पण आकर्षण हा मैत्री आणि प्रेम यांच्यातील एक मुलभूत घटक आहे. आकर्षण म्हणजे नैसर्गिक ओढ वाटणं.

मग ती जशी एखाद्या व्यक्तीबद्दल असेल, तसंच एखादा रंग, आकार, वस्तू तसंच स्थळाबद्दलही वाटू शकते. आकर्षण हे वेगवेगळ्या स्वरावर प्रकट होताना दिसतं. जसं की शारीरिक, भावनिक अथवा बौद्धिक स्तर. ही कोणत्याही नातेसंबंधाची प्रथम पायरी असू शकते. एखाद्या व्यक्तीविषयी अथवा वस्तूविषयी असणारं कुतूहलही आकर्षणातलं कारण ठरू शकतं. मानवी जीवनात किशोरवयापासून भिन्नलिंगी व्यक्तींमधील आकर्षण हे नैसर्गिकरित्या उपजत होतं.

मैत्री

आकर्षणातून निर्माण होणारी अजून एक भावना म्हणजे मैत्री. यामध्ये परस्परांविषयी सातत्यानं वाढणारी आपुलकी आणि भेटीची ओढ असते. भेटी आनंददायक असतात. एकमेकांवरील विश्वास काळानुरूप वाढत जातो. नात्यातील सहजता ही मैत्रीतच अनुभवता येते. मैत्रीवरील अतूट विश्वासामुळे एकमेकांवर अवलंबून राहता येतं. कोणत्याही कठीण प्रसंगी अथवा अडचणीच्या वेळी मैत्री कामास येते. सुख-दुःखाचे क्षण कोणताही ताण न येऊ देता सहज व्यतित करता येतात. अशा क्षणांमुळे मैत्री घट्ट होत जाते.

प्रेम

मैत्री आणि आकर्षण या दोन्हींपलीकडची प्रेम ही संकल्पना अथवा भावना आतिशय गुंतागुंतीची समजली जाते. त्यातील ओढ ही गहन स्वरूपाची, अनेकदा न समजणारी असते. प्रेमाची सुरवात आकर्षणातून तर होतेच; पण त्यात एकनिष्ठता, प्रामाणिकपणा तसंच दृढ विश्वासही अपेक्षित असतो. त्यातूनच काळजी करण्याची प्रवृत्ती बळावते. अनेकदा काही गोष्टी विनाकारणच ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, तिच्यावर लादल्या जातात. निरपेक्ष प्रेम करणं खूप कठीण असतं. मालकी हक्क नकळत गाजवला जातो.

आकर्षण

  • रंग, रूप, आकार तसंच दिसणं यावरून व्यक्तीकडे आकर्षित.

  • एखाद्या व्यक्तीतील सर्जनशीलता, वक्तव्य अथवा हुशारीचं आकर्षण.

  • नोकरी-व्यवसायात दिवसातील अनेक तास एकत्र घालवताना सहवासातून निर्माण होणारं आकर्षण.

मैत्री

  • बालमैत्री, शाळेत अगदी बालवाडीपासून एका बाकावर बसणारे.

  • शेजारी राहणारे.

  • एका गावात राहणारे, एकाच ऑफिसमध्ये काम करणारे.

  • एकसारख्या आवडी-निवडी, छंद असणारे.

प्रेम

  • रोमॅंटिक लव्ह : दोन व्यक्तींमधील आंतरिक, उत्कट प्रेम- ज्यात भावनिक तसंच शारीरिक बंधनं खोलवर रुजत जातात.

  • कौटुंबिक प्रेम : एकाच कुळात जन्मलेली, रक्ताची नाती जपणारं प्रेम.

  • अटी-शर्ती नसणारं निरपेक्ष प्रेम.

  • वेळ, पैसा या पलीकडे जाऊन जपलं जाणारं प्रेम.

  • प्लेटॉनिक लव्ह : कोणत्याही कामवासनेचा लवलेशही नसणारं विशुद्ध प्रेम.

आकर्षण, मैत्री आणि प्रेम या भावनांमधील फरकांची पुसट रेषा नीट समजून घेतल्यास जीवन जगणं सोपं होईल. गैरसमज शिल्लक राहणार नाहीत. आयुष्याला आनंद देणारे, विधायक विचारांचे मानवी नातेसंबंध विकसित होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com