मानससूत्र : छंदाची ‘एक’तारी

‘मोनोमॅनिया’ म्हणजे एकच विषय, विचार अथवा ध्येयानं पछाडलेला. गेल्या काही लेखांमध्ये आपण छंद, छंदांची जोपासना; तसंच छंदाचे अनेक प्रकारही पाहिले; पण या छंदांच्याही पलीकडे जाऊन काही व्यक्ती जगत असतात.
Hobby
HobbySakal

- डॉ. जयश्री फडणवीस

‘मोनोमॅनिया’ म्हणजे एकच विषय, विचार अथवा ध्येयानं पछाडलेला. गेल्या काही लेखांमध्ये आपण छंद, छंदांची जोपासना; तसंच छंदाचे अनेक प्रकारही पाहिले; पण या छंदांच्याही पलीकडे जाऊन काही व्यक्ती जगत असतात. अशा व्यक्ती एखाद्या विषयाला अथवा ध्येयाला घेऊन अगदी झपाटल्यासारखे त्याच्या मागे लागलेले दिसतात. त्यांना आयुष्यात दुसरं काही दिसतही नाही, सुचतही नाही!

नकळत आपल्या मनात विचार येतो, की ‘अरे हा वेडा की खुळा?’

या व्यक्ती एखाद्या संशोधनात पूर्ण बुडून जातात. अनेकदा हे वेड काही काळापुरतंही असू शकतं; पण कधी कधी तो मानसिक विकाराकडेही झुकू लागतो. मानसशास्त्रीय भाषेत या मानसिक असंतुलनाला ‘मोनोमॅनिया’ असं संबोधलं जातं.

‘मोनोमॅनिया’ होण्याची व्यक्तिपरत्वे वेगवेगळी कारणं असू शकतात. भोवतालची परिस्थिती, एखादा अपघात, तर कधी टोकाची नकारात्मक भावनिक घटना. काही व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यंही इतरांना त्रासदायक ठरतात. उदाहरणार्थ, ओसीडी (ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर).

अति स्वच्छता, सतत हात धुणं, सतत गॅस बंद आहे ना हे पाहणं, कुलूप लावल्यावर दहा वेळा ओढून बघणं अशा व्यक्ती अतिसंवेदनक्षमही असतात. अति औषधोपचारांनीही मानसिक संतुलन बिघडून व्यक्ती ‘मोनोमॅनियाक’ होऊ शकते.

अशा या मानसिक असंतुलनाचे विपरीत परिणाम दैनंदिन जीवनावर होऊ लागतात. ‘मोनोमॅनिया’मध्ये एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यानं रोजची दिनचर्या पाळण्यात अडथळे येऊ लागतात. कुटुंब अथवा मित्रपरिवार यांच्याशी संवाद संपत जातो. हळूहळू अशा व्यक्ती एकलकोंड्याही होतात. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेलं असल्यानं त्यातील यश-अपयशानं मानसिक ताण येतो.

नैराश्य, चिंता हा जगण्याचा एक भाग होऊन जातो. अशा व्यक्तींना इतर कोणत्याही गोष्टीत रस वाटत नाही. भोवताली घडणाऱ्या अनेक आनंददायी घटनांमध्ये ते समरस होऊ शकत नाहीत. रोजच्या आहार-विहाराकडे दुर्लक्ष झाल्यानं शारीरिक आरोग्यही ढासळतं. ‘मोनोमॅनियाक’ व्यक्ती बऱ्याचदा एकाच गोष्टीवर असलेला पैसा खर्च करीत जाते. आधीच व्यवसायावर झालेलं दुर्लक्ष, त्यातून वाढत जाणारा तोटा, याचा गंभीर परिणाम या व्यक्तींच्या आर्थिक नियोजनावर होतो.

मोनोमॅनियाची लक्षणं दिसताच त्या व्यक्तीकडे ‘तो जरा विशीतच आहे!’ असं म्हणून दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच मानसशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानं मानसोपचार तातडीनं सुरू करायला हवेत. कधीकधी हा मज्जातंतूंचाही विकार असू शकतो. अशा वेळी ‘न्युरॉलॉजिस्ट’ची मदत घ्यायला हवी.

हे उच्च प्रशिक्षित चिकित्सक मानसिक स्थिती, विविध संवेदना, आपली दृष्टी, बोलणं; तसंच शरीर व मनाचा तोल या सर्वांचं निरीक्षण करून, झालेल्या निदानावरून औषधोपचार करतात.

‘मोनोमनिया’ची काही दुर्मीळ, अपवादात्मक, सकारात्मक विधायक व्यक्तिमत्त्वंही होऊन गेलीत; तसंच आजही दिसतात. या व्यक्ती आयुष्यातील ध्येय- उद्दिष्टं; तसंच कोणत्याही क्षेत्रातील उच्चतम श्रेणी गाठण्याकरिता सकारात्मक पद्धतीनं स्वतःची ‘मोनोमॅनियाक’ स्थिती वापरतात. त्यांच्यातील अद्वितीय कौशल्यांमुळे ते जागतिक कीर्ती प्राप्त करतात; केलेली आपण पाहिली आहे.

उदाहरण द्यायचं झालं, तर लिओनार्दो दा व्हिन्सी- जागतिक कीर्तीचे चित्रकार. चिकित्सक प्रवृत्तीतून निसर्गाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यातून अनेक जगप्रसिद्ध तैलचित्रांची निर्मिती झाली. त्यांनी आयुष्यातील काही वर्षं मनोरुग्णालयातही घालविली होती; पण तिथंही चित्रकला थांबली नाही.

असंच उदाहरण आयझॅक न्यूटन यांचं. त्यांच्या वेडातून जन्माला आलं ते भौतिकशास्त्रातील वैविध्य आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. अगदी अलीकडच्या काळातील उदाहरण कल्पना चावला यांचं. अंतराळात गेलेली पहिली भारतीय स्त्री. आयुष्यातील सर्व काळ तिनेे अंतराळ संशोधन व कार्यात व्यतीत केला. तिचं अपघाती निधन हे एक दुर्दैवच म्हणावं लागेल.

मित्रांनो, आयुष्यातील समतोल ढळू देऊ नका. असं म्हणतात, की छंद हे आवड आणि ‘मोनोमॅनिया’ यांच्यामधील समतोल साधण्याचं उत्तम माध्यम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com