मानससूत्र : ‘कंफर्ट झोन’ तोडायचा कसा?

एका माहुताने, एक छोटेसे हत्तीचे पिल्लू आणले. लोखंडी झाडाला साखळदंडाने त्याचा एक पाय बांधून ठेवला- जेणेकरून ते पिल्लू पळून जाणार नाही.
comfort zone
comfort zonesakal

- डाॅ. जयश्री फडणवीस

एका माहुताने, एक छोटेसे हत्तीचे पिल्लू आणले. लोखंडी झाडाला साखळदंडाने त्याचा एक पाय बांधून ठेवला- जेणेकरून ते पिल्लू पळून जाणार नाही. पहिले आठ-दहा दिवस पिल्लानं साखळदंड तोडण्याचे खूप प्रयत्न केले; पण हळूहळू त्याला बंधनाची सवय होऊ लागली. बंधनात राहणं सुखकर वाटू लागलं- कारण माहूत त्याला भरपूर आहार समोर आणून ठेवत होता. त्याची स्वच्छ निगा राखली जात होती.

जेवढा लांब साखळदंड जाईल तेवढं आजूबाजूला फिरताही येत होतं. आणि हो! जंगलापेक्षा इथं तो सुरक्षितही होता. काही वर्षांनी पिल्लाचं रूपांतर मोठ्या हत्तीमध्ये झालं. माहूत आता त्याला साखळीऐवजी चक्क दोरखंडानं बांधत होता. आता हत्ती तो दोरखंडच काय; पण संपूर्ण वृक्षही उखडून टाकू शकला असता; पण गेल्या काही वर्षांत आरामात जगण्याची सवय लागलेले हत्तीमहाराज आपल्या सर्व क्षमता विसरून गेले होते.

माणसाचंही असंच काहीसं होतं! ‘जसं चाललंय ते छान चाललंय! काय कमी आहे? थोडक्यातच समाधानी असावं!’ किंवा ‘मी माझ्या मर्जीचा राजा

आहे, मला हवं तेवढंच मी काम करतो,’ असं आपण म्हण असतो. काही गोष्टी करणं गरजेचं असतं, समोरचा सांगतही असतो- ‘अरे, जरा वजन कमी कर. व्यायाम कर!’ पण मानवी मन मुळातच जरा आळशी असतं. पटकन् सुखावतं आणि म्हणून आपला हा ‘हेवीवेट चँपियन’ हार्ट ॲटॅक आल्यावरच जागा होतो. पहाटे उठून पळायला लागतो.

‘कंफर्ट झोन’ ही एक मानसिकता आहे. एक अशी जागा अथवा परिस्थिती जिथं माणसाला जीवनावश्यक सुविधा; तसंच सुरक्षितता मिळते, तिथं तो सुखावत जातो. मनाचा कल ताणरहित जगण्याकडे असतो. असा हा ‘कंफर्ट झोन’ हळूहळू तयार होत जातो. सर्वप्रथम स्वतःचा एक ठाम ग्रह करून घेणं, की ‘आहे त्या परिस्थितीत मी खूप सुखी आहे.

उत्तम घर, सात्त्विक भोजन व सामाजिक सुरक्षितताही आहे.’... पण यातही अंतर्मनात एक सुप्त अस्वस्थता दडलेली असते. ती बाहेर पडू नये म्हणून त्याच त्या चक्रात जगत जाणं सुरू होतं. एखाद्यानं बदल सुचवल्यास उगीचच स्वभावात भिनवलेला ताठरपणा, कडकपणा दाखवून तो बदल नाकारण्याची सवय लागते. या सर्वांमागचं कारण म्हणजे मर्यादित अनुभवांचं गाठोडं.

मानवी मन जगण्यासाठी अनेक ‘कंफर्ट झोन’ तयार करून ठेवतं :

१. नोकरी-व्यवसाय : वर्षानुवर्षं एकाच ठिकाणी नोकरी, तिथंही नवीन आव्हान पेलणं टाळणं. ‘कशाला हव्यात नवीन कटकटी? आपलं बरं चाललंय! नियमीत पगार येतो, वेळेवर घरी जातो. रात्री कट्टयावर गप्पा मारत बसतो,’ असे विचार.

२. नवीन कौशल्य शिकण्याचा कंटाळा : जग सतत बदलतंय. टेक्नॉलॉजिकल सिस्टिम्स दर दोन दिवसांत बदलतात. पण ‘मला या सर्वांची काही गरज पडत नाही. मी कशाला नवीन गोष्टी वापरू? आपलं बरं चाललंय,’ अशी मानसिकता.

३. नाती : अनेकदा आपल्याला पाहायला मिळतं, की एकमेकांशी अजिबात पटत नाही, एकमेकांच्या सहवासाचा आनंदही नाही तरीही ते नातं ओढत जाऊन टिकवलं जातं- कारण अनेक गरजा निवांतपणे भागवल्या जातात. आर्थिक गरज, सुरक्षितता, एकटेपणा; तसंच जग काय म्हणेल, ही भीती.

४. अपयशाची भीती : कोणतंही आव्हान स्वीकारताना किंवा संधींचा लाभ घेताना अपयशाच्या भीतीनं ती आव्हानं अथवा संधी घेणंच टाळणं. कारण यात ‘कंफर्ट झोन’ सुटण्याचीच भीती खूप मोठी असते.

इथं आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की कोणीतरी ‘कंफर्ट झोन’ तोडले म्हणून आज आपण एक प्रगत आणि विकसित आयुष्य जगतोय.

गुहेत राहणारा माणूस घरात आला. गरजेतून अनेक शोध लावत गेला. अग्नी प्रज्ज्वलीत करण्याचा शोध लावला आणि आज अनेक ऊर्जेचे स्रोत आपणास ज्ञात झाले. इटलीचा ख्रिस्तोफर कोलंबस दर्यावर्दी आणि वसाहतकार! अटलांटिक महासागर ओलांडून गेला, तेव्हा जगाला ‘अमेरिका’ कळली. म्हणूनच ‘कंफर्ट झोन’ सोडला पाहिजे. त्याचे अनेक फायदे आहेत :

१. व्यक्तिमत्त्वविकास : ‘कंफर्ट झोन’ सोडताना अनेक बदल स्वीकारावे लागतात. अनेक आव्हानं स्वीकारताना अनेक तंत्रं; तसंच जीवनकौशल्यं शिकत जावी लागतात. त्यातूनच व्यक्तिमत्त्वविकासही होत जातो. हे बदल, आव्हानं जेव्हा यशस्वीरित्या पार पडू लागतात, तेव्हा एक वेगळाच आत्मविश्वास व्यक्तिमत्त्वातून परावर्तित होऊ लागतो.

२. वैचारिक परिपक्वता : मन अनुभवसंपन्न होत जातं, तसतशी वैचारिक परिपक्वता मानवी मनास येऊ लागते. शास्त्रशुद्ध विचारांना तत्त्वनिष्ठांची जोड मिळते. ठामपणे निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. अशी अनेक प्रगल्भ व्यक्तिमत्त्वं आपल्या निदर्शनास येतात- जी हळूहळू काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवरही विजय मिळवू लागगत.

‘कंफर्ट झोन’ सोडताना होणारा त्रास हा तात्पुरता असतो; पण मिळणारे फायदे कायमस्वरूपी असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, की ‘कंफर्ट झोन’च्या बाहेर ‘ग्रोथ झोन’ आहे; पण तिथं पोचताना एक छोटासा ‘पेन झोन’चा बोगदा पार करावा लागतो. तो संपल्यावर लख्ख प्रकाश पडतो.

‘हर नयी शुरुआत थोडीसी डराती है।

सफलता तो मुश्किलोंके बाद ही आती है।’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com