मानससूत्र ; कलेतून व्यक्तिमत्त्वविकास!

कोणत्याही कलेशिवाय हे जग कसे दिसेल, याचा जरा विचार करून बघा! जीवन कसे असेल? प्रत्येक कलेचा मानवी जीवनावर सातत्याने परिणाम होत असतो.
Personality development
Personality developmentsakal

- डॉ. जयश्री फडणवीस

कोणत्याही कलेशिवाय हे जग कसे दिसेल, याचा जरा विचार करून बघा! जीवन कसे असेल? प्रत्येक कलेचा मानवी जीवनावर सातत्याने परिणाम होत असतो. माणसांच्या वागणुकीत, वैचारिक पद्धतीत बदल; तसेच आवडीनिवडीतही बदल घडून येतात. कलेमध्ये अनेक दडलेली सत्ये उघड करण्याची, दाखवण्याची शक्ती आहे.

कला आपल्या कल्पनाशक्तीच्या सामर्थ्यातून मानव नक्की कसा आहे, तो कसा होऊ शकतो आणि तो काय काय करू शकतो, याचेही दर्शन घडवत असते. कलेतून मानवी आयुष्यात सूक्ष्म मानसिक बदल घडत असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कला ही मुक्त आहे. जगण्याचा सुंदर आविष्कार! आज आपण ललितकला आणि उपयोजित कलांचा व्यक्तिमत्त्व विकासाला कसा फायदा होतो, याविषयी जाणून घेऊ या!

ललितकला आणि उपयोजित कला हे दोन्हीही भावनिक अभिव्यक्तीचे परिणामकारक मार्ग आहेत. या मार्गावरील प्रवासात भावनिक बुद्धिमत्ता झपाट्याने विकसित होत असते. ‘मी कोण?’ याचे आत्मपरीक्षण सामान्य व्यक्तीपेक्षा एखाद्या कलाकाराला लवकर जाणवते. चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता वाढते.

आत्मविश्वास व आत्मसन्मान

जसजशी एखाद्या व्यक्तीतील कलात्मक अभिव्यक्ती विकसित होत जाते, प्रगल्भ होते, तसतसा आत्मविश्वास वाढत जातो. एखादे चित्र अथवा शिल्प पूर्ण करण्यासाठी अहोरात्र घेतलेले कष्ट, त्यातून निर्माण झालेली कलाकृती, अपेक्षित कलाकृती पाहून आत्मसन्मानात भर पडते. स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. संगीत, नाट्य, अभिनय या क्षेत्रांमध्येही अनेक आत्मविश्वास व आत्मसन्मानाने समृद्ध उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर येतील.

संयम व चिकाटी

कोणतीही कलाकृती पूर्ण करताना भरपूर वेळ द्यावा लागतो. त्यातील बारीकसारिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागते. मग ते व्यक्तिचित्रातील चेहऱ्यावर रेखाटण्याचे हावभाव असतील किंवा फोटोग्राफी करताना प्राण्यांची विशिष्ट हालचाल चित्रित करण्यासाठी तासन्‌तास दबा धरून बसणे असेल, अथवा संगीताचा वर्षानुवर्षे केलेला रियाज असेल. या सर्वांतून कलाकाराच्या जीवनात संयम व चिकाटी या दोन गुणांचा विकास खूप मोठ्या प्रमाणावर होतो.

गंभीर विचारसरणी व समस्यांचे निराकरण

अनेकदा कलाकारांना कलाकृती विकसित करीत असताना अनेक छोटे-मोठे निर्णय घ्यावे लागतात, समस्यांनाही तोड द्यावे लागते. जसे की, शांत परिसरातील जागा, आर्थिक नियोजन; तसेच इतर अनेक विषयांचेही भान ठेवावे लागते. संस्कृती, राजकारण, समाजकारण! कलाविष्कार करताना रचना, रंगांची निवड, रंगांची अनेक माध्यमे; तसेच नेमकी कोणती पद्धत अथवा तंत्राचा वापर करायचा, या सतत कराव्या लागणाऱ्या विचारांमधून विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित होतो. कोणत्याही विषयाचा गांभीर्याने विचार करून आलेल्या समस्यांचे निराकरण करावे लागते. यामुळे निर्णयक्षमता वाढीस लागते.

संवाद व सहिष्णुता

विविध चित्रांच्या माध्यमातून जनसामान्यांशी मूक संवाद साधता येतो. इतरांच्या गरजा समजून त्यानुसार काम करीत असताना सहिष्णुता व सामंजस्य वाढीस लागते. हे सर्व साधण्याकरिता सखोल, विचारपूर्वक संवाद साधावा लागतो.

ताणतणावांचे निर्मूलन

मानसशास्त्रीय उपचारांमध्ये ‘आर्ट थेरपी’ला खूप महत्त्व आहे. विशेषत: लहान मुलांवर उपचार करताना ‘art therapy’चा खूप फायदा होतो. कोणताही ताण आल्यास आपले लक्ष एखाद्या कलेकडे वळवल्यास त्याचा फायदाच होतो. जसे की - चित्र काढणे, रंगकाम करणे अथवा आवडत्या गायकाचे गाणे ऐकणे. असे केल्याने शरीर आणि मन झपाट्याने रिलॅक्स होते. मानसिक संतुलन सांभाळले जाते.

‘जगण्याची कला शिकताना, हवी संस्कारांची जोड, जगणेच सुंदर करायला, हवी कलेची ओढ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com