मानससूत्र : सारासार विचार

अतिविचारांच्या आहारी गेलेला रवी खूप काळवंडला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार झाली होती; तब्येतही खालावलेली दिसत होती.
Thinking
Thinkingsakal

- डाॅ. जयश्री फडणवीस

अतिविचारांच्या आहारी गेलेला रवी खूप काळवंडला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार झाली होती; तब्येतही खालावलेली दिसत होती. त्याची ही अवस्था बघून राजूनं त्याला एका जीवनशैली प्रशिक्षकाला - गुरूला भेटण्याचा सल्ला दिला. रवी लगेच गुरूंना जाऊन भेटला. त्यांना स्वतःच्या अतिविचारांची समस्या सांगितली.

गुरूंनी त्याच्या हातात एक पाण्यानं पूर्ण भरलेला तांब्या दिला आणि म्हणाले, ‘‘आता हा तांब्या स्वतःच्या छातीपर्यंत उचल, काय होतंय?’ ‘खूप जड आहे; पण उचलतोय.’

‘बरं मग आता त्याला अजून वर, खांद्यापेक्षाही वर उचलून घर, आता काय होतंय?’ ‘हात खूप दुखतोय!’

‘बरं, आता तांब्या डोक्यापेक्षाही उंच नेऊन धर. आता?’ ‘अहो, आता माझा हात निखळून पडेल असं वाटतं आहे.’

‘मग आता काय करणार?’ रवीनं त्वरेनं तांब्या जमिनीवर ठेवला, हात झटकू लागला. गुरू म्हणाले, ‘बघितलंस! तुझा हात खूप दुखला. आता अजून पुढे काय या विचारांनी मानसिक अस्वस्थताही वाढली; पण मला एक सांग, की त्या तांब्यात काही बदल झाला का? त्यातील पाण्यातही काही बदल झाला का?’’

आपल्या आयुष्यातील घटना, प्रसंग घडून जातात आणि त्यानंतर त्यात कोणताही बदल करता येत नाही. ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही, त्या एकतर आहेत तथा स्वीकारायला हव्यात अथवा तिथंच सोडून पुढे जायला हवं. अतिविचार न करता, ते टाळण्याकरता काही सहज, सोपे उपाय शिकायला हवेत. वापरायला हवेत.

सर्वप्रथम कोणकोणत्या प्रसंगांनी अथवा कारणांनी आपली अतिविचारांची कळ दाबली जाते ते शोधून काढा. उदाहरणार्थ, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ‘लोक काय म्हणतील?’ या विचारांनीच त्रस्त होऊन करायच्या कृतीस विलंब होणं. अनेकदा असं वाटतं, की मी कुणालाच आवडत नाही आणि मग त्यातून आप्तेष्टांच्या गाठीभेटी टाळणं. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ लागणं, अशा गोष्टी होतात. नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होताच स्वतःला विचारा, ‘या गोष्टीस काही ठोस पुरावा आहे का? अशा या विचारांमध्ये काही तथ्य आहे, की एखाद्या नकारात्मक अनुभवातून, एखाद्या भीतीतून निर्माण झालेली ही माझीच कल्पना आहे?’

निर्णयक्षमता : कोणताही निर्णय घेताना, माझा निर्णय बरोबरच असला पाहिजे असा नकळत अट्टहास धरला जातो. अशा वेळी मनाला समजवायला हवं, की ‘माझ्याजवळ उपलब्ध असलेल्या माहितीनुसार; अनुभवानुसार मी निर्णय घेत आहे. पुढे त्याचं काय होणार याची कल्पना आत्ताच करणं सोपं नाही, ते आपल्या हातात नाही.’

वेळेची मर्यादा : अनेकदा एखादा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा अतिविचार करत बसल्यानं योग्य वेळ निघून जाते. म्हणूनच मनाला वेळेची मर्यादा घाला, ‘मी फक्त पंधरा मिनिटं या गोष्टीवर विचार करीन आणि सोळाव्या मिनिटाला निर्णय घेऊन टाकीन. घेतलेला निर्णय चुकीचा की बरोबर ते वेळच ठरवेल.’

सतत व्यग्र राहा : आपल्या जागृतावस्थेतील चौदा ते पंधरा तासांचं योग्य नियोजन करा. प्रत्येक क्षण कृतीशील असावा. व्यवसाय, नोकरीबरोबरच स्वतःला आनंद मिळेल या गोष्टींना आवर्जून वेळ द्या. आपले छंद नियमित जोपासा.

सकारात्मक स्वसंवाद : स्वतःच्या मनाशी संवाद करताना नकारात्मक विचारांना सकारात्मक करा.

‘मला हे जमणार नाही’ यापेक्षा ‘मला हेसुद्धा नक्की जमेल, माझं सर्व कौशल्य मी पणाला लावीन. हे काम उत्तमपणे पार पाडीन,’ असं म्हणा. काही गोष्टी मनाला नीट समजावून सांगा. उदाहरणार्थ, ‘प्रत्येक वेळी मी बरोबरच असेन अथवा माझं प्रत्येक कार्य उत्तमपणे पार पडेलच असं नाही. मीसुद्धा एक माणूस आहे, चुका घडू शकतात. चुकांमधूनही माणसं शकतात.’

एकाग्रचित्त (माइंडफुलनेस) : पूर्ण जागरूकतेनं, लक्षपूर्वक एखादं काम करणं, वर्तमानात जगणं आवश्यक आहे. अनेकदा आधी काय झालं? आणि नंतर काय होणार या विचारांमध्येच गढून गेल्यावर ‘माइंडफुल’ राहणं कठीण होतं. त्याकरता मेंदूला वर्तमानात राहण्याची सवय जाणीवपूर्वक लावता येते. उदाहरणार्थ, ‘मी आत्ता जेवायला हॉटेलमध्ये आलोय, तर इथं कोणते पदार्थ मिळतात?

त्याची चव, रंग, वाढण्याची पद्धत, खाण्याची पद्धत कशी आहे? हॉटेल डेकॉर कसं आहे?’ असं दिवसाच्या प्रत्येक घटनेचं अवलोकन शांतचित्तानं कराल, तेव्हा आपोआपच ‘माइंडफुलनेस’मध्ये जगण्याचा आनंद मिळू लागेल. एखादा नकारात्मक विचार आला, तर सरळ त्याला टोला मारा- ‘जो होगा देखा जाएगा! ये लम्हा जी लेने दो!’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com