तेरे बिना जिंदगी से कोई...

माणसाचा भूतकाळ हा खरं तर आयुष्यातून पुढं सरकून गेलेला असतो. तो मागं टाकून वर्तमानाची भविष्याकडे वाटचाल सुरू असते; पण कधी कधी असंही घडतं की, भूतकाळ अचानक वर्तमानासमोर उभा ठाकतो.
Movie
Moviesakal

तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही...

शिकवा नही, शिकवा नहीं, शिकवा नहीं

तेरे बिना जिंदगी भी लेकिन, जिंदगी तो नही

जिंदगी नही, जिंदगी नही, जिंदगी नही...

माणसाचा भूतकाळ हा खरं तर आयुष्यातून पुढं सरकून गेलेला असतो. तो मागं टाकून वर्तमानाची भविष्याकडे वाटचाल सुरू असते; पण कधी कधी असंही घडतं की, भूतकाळ अचानक वर्तमानासमोर उभा ठाकतो. वर्तमानाला विचलित करू पाहतो. अशा प्रसंगी त्या भूतकाळाशी छेडछाड न करता त्याला युक्तीनं एक वळसा घालून पुढं जाणं चतुराईचं ठरतं. कारण, वर्तमान हीच शेवटी आयुष्याची नियती असते.

ती एक ‘बडे बाप’ की बेटी. तिनं प्रेम केलं एका मध्यमवर्गीयावर. इतरांची दृष्ट लागावी असं दोघांचंही एकमेकांवर निरतिशय प्रेम. विवाह करून सुखाचा संसारही सुरू होता; पण तिच्या राजकारणी वडिलांचा त्यांच्या संसारातला हस्तक्षेप त्याला असह्य होऊ लागला. कटकटी वाढू लागल्यानं नाइलाजानं दोघं ऐन तारुण्यातच विभक्त झाले. तो गाव सोडून दूर कुठं तरी निघून गेला. ती वडिलांबरोबर राजकारणात रमली.

काळ बराच पुढं सरकला...आणि, वयाची साठी ओलांडल्यानंतर आज अचानक अनपेक्षितपणे त्यांची भेट झालेली आहे. ज्या हॅाटेलमधे ती उतरली आहे त्याच हॅाटेलचा तो मॅनेजर आहे. भोवती कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा बाळगून असलेली ती आता राजकारणातलं एक मोठं नेतृत्व आहे. साहजिकच ती किंवा तो आपापसातले त्यांचे जुने संबंध कुणासमोर प्रकट करू शकत नाहीत; कारण, चारित्र्यलांच्छनाचा कलंक लागून तिच्या राजकीय कारकीर्दीवर परिणाम होऊ नये.

मात्र, प्रेम कधी स्वस्थ बसेल काय? त्या भावना उचंबळू लागल्या की अनावर होतात. विशीतलं यौवन त्या भावनांना बेभान करतं, तर साठी-सत्तरीत त्या भावनांना संयमाचा बांध असतो. मात्र, प्रेमभावनांचा उमाळा तोच आणि तसाच असतो. रात्रीच्या गुपचूप भेटीत ती दोघं आता ‘हॅाटेल मॅनेजर’ आणि ‘राजकीय नेतृत्व’ नसून आहेत फक्त प्रेमिक-प्रेमिका. इतक्या वर्षांच्या दीर्घ दुराव्यानंतर काय बोलावं ते सुचत नसल्यानं दोघंही मुग्ध आहेत.

परिस्थितीनं लादलेल्या विरहाची अपरिहार्यता आणि खऱ्या प्रेमाची आंतरिक ओढ यांमुळे हृदयात उसळलेली वादळं आतल्या आत थोपवून ठेवण्याची कसरत दोघं करत आहेत. तो आतला उचंबळलेपणा नवथर उच्छृंखलतेनं व्यक्तही करता येत नाही असा विचित्र भावनिक कोंडमारा होतो आहे.

मात्र, एकमेकांच्या नजरेची भाषा त्यांना चांगल्या प्रकारे वाचता येत आहे...मनात विचार दोघांच्याही एकच आहे. ‘तू नाहीस म्हणून आयुष्याकडं माझं काही गाऱ्हाणं नाही...तरीसुद्धा तुझ्याशिवाय हे जगणं म्हणजे जगणंच नाही.’

विरहिणीच्या मनातली आनंदयुक्त व्यथा मांडताना कवी-गीतकार गुलजार लिहितात :

जी में आता है तेरे दामन में सर छुपा के हम

रोते रहे...रोते रहे

तेरी भी आँखों में आँसुओं की नमी तो नही

मध्येच तो भोवतालच्या निसर्गाचं सौंदर्यवर्णन करताना सांगतो : ‘हे सगळं दिवसाउजेडी पाहायला पाहिजे.’ तेव्हा, तीही हताशपणे उत्तरते : ‘हे सारं बघायला दिवसा मी इथं कशी येऊ शकणार?

यावर तो म्हणतो : ‘रात्री चंद्राकडं बघत जा. चंद्र रात्रीच दिसतो, दिवसा नव्हे. तो रोज दिसतो; पण मध्येच अमावास्या येते...पण या वेळची अमावास्या जरा लांबलीच, नाही का?’

अशा लहानशा संवादांतून गुलजार यांनी जरी गद्य लिहिलेलं असलं तरी त्याचंही काव्यच होऊन गेलं आहे! गीतातल्या अर्थपूर्ण शब्दरचनेला समर्पक, म्हणूनच कानालासुद्धा त्या भावना समजतील, अशी गोड चाल यमन रागात संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी बांधली आहे.

गाण्याच्या सुरुवातीचा सतारीचा झंकार आणि पाठोपाठ येणारी बासरीची धून मनोवेधक. लता मंगेशकर यांनी जवळपास प्रत्येक शब्दाला लांबवत लांबवत केलेले उच्चार हे या गीताच्या गोडव्याचं गमक आहे. किशोरकुमार यांनी त्यांना चांगली साथ दिली आहे. स्वत: वयानं तरुण असताना वयस्क व्यक्तिरेखा साकारणं या संजीवकुमार यांचा हातखंडा! इथंही त्यांच्यातला कसदार अभिनेता दिसून येतो.

थंडी बाधू नये म्हणून आपला कोट तिला देऊन ते आपुलकी व्यक्त करतात, तरीही गाण्यात कांकणभर सरस ठरल्या आहेत त्या सुचित्रा सेनच! थोडीशी लज्जा, थोडीशी चिंता, थोडीशी भीती, मीलनातला आनंद अशा अनेक भावना त्यांनी आपल्या सुंदर डोळ्यांमधून त्याहूनही सुंदररीत्या प्रकट केल्या आहेत. विरहानं विदीर्ण झालेल्या हृदयाचं मूक रूदन वाचतानाचा दोघांचाही मुद्राभिनय गीताच्या शब्दाशब्दाला न्याय देतो. ओठ बंद आहेत तरी ते एकदुसऱ्याच्या भावविश्वाला प्रतिसाद देत आहेत...व्यक्त होत आहेत. हे व्यक्त होणं आपल्याही हृदयाला भिडतं.

चांदण्या रात्रीतल्या त्यांच्या भेटीसाठी भग्न मंदिराच्या अवशेषांची पार्श्वभूमी घेण्यात आली आहे. मंदिराची पडझड झालेली असली तरी जे काही अवशेष शिल्लक आहेत त्यांवरचं नक्षीकाम, कलाकुसर यांचं सौंदर्य अद्याप अबाधित आहे. त्या पती-पत्नीला विभक्त व्हावं लागलं असलं तरी त्यांच्यातलं आंतरिक प्रेम आजही आटलेलं नाही असं दिग्दर्शक आपल्याला सुचवू पाहतो. त्यामुळे भग्न मंदिर हेसुद्धा या गाण्याचं ‘नायक’ बनतं!

गाण्याच्या सुरुवातीला जे चित्रण आहे ते काश्मीरमधल्या श्रीनगरजवळच्या अवंतीस्वामीमंदिराचं आहे. नंतरच्या भागात अनंतनागजवळचं मार्तंड सूर्यमंदिर आहे. इसवीसनाच्या नवव्या शतकातली ही मंदिरं असून अवंतीपूर ही काश्मीरची त्या काळातली राजधानी होती.

एकंदरीत, गीतकार गुलजार आणि दिग्दर्शक गुलजार या गाण्यातून ठायी ठायी दिसून येतात. प्रेमिक मनांची व्यथा आणि कथा त्यांनी सादर केली आहे. हे गाणं इतकं सुश्राव्य आहे की, संगीतकार राहुलदेव बर्मन यांचं ते ‘मास्टरपीस’च म्हणावं लागेल.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com