परदा है परदा...

कव्वाली हा इस्लामी कंठसंगीतातला भारतात रुजलेला प्रकार. भारतीय संगीतात ख्याल, बंदिश, ठुमरी, कजरी, भजन, भक्तिगीत असे विविध गानप्रकार आहेत.
rishi kapoor
rishi kapoorsakal

परदा है परदा परदा है परदा

परदे के पीछे परदानशीं है

परदानशीं को बेपरदा ना कर दूँ तो

अकबर मेरा नाम नही है

कव्वाली हा इस्लामी कंठसंगीतातला भारतात रुजलेला प्रकार. भारतीय संगीतात ख्याल, बंदिश, ठुमरी, कजरी, भजन, भक्तिगीत असे विविध गानप्रकार आहेत. त्यांत इस्लाम धर्मामधल्या सूफी पंथातल्या संगीताचाही समावेश होतो. सूफी संगीतातसुद्धा भजन आणि लौकिक गीत असतं. या लौकिक गीतात कव्वाली मोडते. कव्वालीचं वैशिष्ट्य हे की, गाण्याचा मुखडा तथा धृपद हे जोरदारपणे कोरसकडून गायिलं जातं.

दोन्ही हातांच्या विशिष्ट लकबीनं हालचाली करत टाळ्यांनी ताल घरला जातो. तालात गायिल्या जाणाऱ्या; पण सप्तकभर झपाट्यानं वर-खाली फिरणाऱ्या ताना हे कव्वालीचं आणखी एक वैशिष्ट्य. भारतात रूढ असलेल्या भजनांच्या धर्तीवर सूफी पंथाच्या पर्शियन संगीतशैलीत केलेली मांडणी असं कव्वालीचं वर्णन करता येईल. या रचना फक्त भजनासारख्या विषयावरच नसून लौकिक प्रकारातल्या शृंगारिक विषयावरही असतात. उर्दू भाषेचं सौंदर्य कव्वालीच्या ठायी ठायी जाणवत असतं.

हिंदी सिनेमानं मात्र कव्वाली हा गीतप्रकार भारतात मुस्लिमेतर आणि बिगरउर्दूभाषक सर्वसामान्य समाजात लोकप्रिय करायला मोठा हातभार लावला. सिनेमातली कव्वाली ही मुख्यत: लौकिक प्रकारातली आहे; भजनप्रकारातली कमी. साठच्या आणि सत्तरच्या दशकात अनेक सिनेमांतून कव्वालीचं श्रवण-दर्शन होतच राहिलं.

संगीतकार नौशाद, रोशन, सचिनदेव बर्मन, सलील चौधरी, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राहुलदेव बर्मन अशा बुजुर्ग संगीतकारांपासून तर अलीकडच्या साजिद-वाजिद यांच्यापर्यंत बहुतेक संगीतकारांनी कव्वाली संगीतबद्ध केली आहे.

प्रस्तुत कव्वाली आहे सन १९७७ मधल्या ‘अमर अकबर अँथनी’ या सिनेमातली. मुशायऱ्यात गात आहे अकबर इलाहाबादी हा तरुण कव्वाल. चिकाच्या झिरझिरीत काळ्या पडद्यामागं (चिलमन) आपला चेहरा झाकून प्रेक्षकांमध्ये त्याची प्रेमिका सलमा पहिल्या रांगेत बसलेली पाहून तो चांगलाच उत्तेजित झाला आहे; पण तिच्या समवेत तिचा (अकबरच्या दृष्टीनं) खडूस बाप आपल्या तीन बायकांसह आलेला पाहून आज तर तिच्या बापासमोरच तिच्या चेहऱ्यावरचा पडदा दूर सारायचा या निश्चयानं तो गाऊ लागतो.

शबाब पे मैं जरा सी शराब फेकूँगा

किसी हसीं की तरफ ये गुलाब फेकूँगा

त्याला केवळ चेहऱ्यावरचा कापडी पडदा हटवायचा नाहीये, तर तो आहे तिच्या लज्जेचा पडदा, तिच्या बापाच्या भीतीचा पडदा, समाजाच्या बंधनांचा पडदा. असे अनेक पडदे दूर सारण्यासाठी आज चांगली संधी त्याच्यासमोर चालून आली आहे. त्यामुळेच तो तिलाही सांगतोय की, ‘तूही जरा धाडस करून पडदा बाजूला कर; नाहीतर तुला या मैफलीत बदनाम (रुसवा) करीन.’

तेरा दामन न छोडूँगा

मै हर चिलमन को तोडूँगा

ना डर जालीम जमाने से

अदा से या बहाने से

जरा अपनी सूरत दिखा दे

त्याचा असा आक्रमक आविर्भाव पाहून ती चेहऱ्यावरून हळूच पडदा वर घेते तेव्हा ‘खुदा का शुक्र है, चेहेरा नजर तो आया है’ असा आनंदही तो व्यक्त करतो. अशा रीतीनं, न घाबरता सगळ्या जगासमोर प्रेमाची अभिव्यक्ती करताना त्याला पाहून तीसुद्धा स्वत:शी निश्चय करून, न घाबरता त्याचं प्रेम स्वीकारत स्टेजवर येते.

मी पडदा हटवणार असं सुरुवातीला सांगून पुढं तो, तिलाही पुढं येण्याचं आवाहन करतो. नंतर तिनं प्रतिसाद देताच देवाचे आभार मानतो. अशी गाण्यातली एकेक स्टेप चढत्या क्रमानं लिहीत गीतकार आनंद बक्षी यांनी शब्दरचना केली आहे. शबाब, पर्दानशीं, चिलमन, मेहेजबीं, हया, रुसवा अशा अनेक उर्दू शब्दांची रेलचेल गाण्यात असल्यानं ते भाषिकदृष्ट्या भारदस्त वाटतं.

संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी आकर्षक चाल तर दिलीच आहे; शिवाय पिपाणी, ढोलक यांच्या जोडीनं टाळ्यांचा तालही फार छान साधलाय. इंट्रोला वाजणारी गिटारची लहानशी ट्यून ढोलकनं पुढं नेली जाते, मग पिपाणी वाजते. अशी कल्पक सुरुवात केल्यानं गाण्याकडं लक्ष वेधलं जातं. गायक अंतरा गात गात पुन्हा मुखड्याकडे येतो आणि कोरस टाळ्यांच्या तालावर जोरकसपणे मुखडा गातो हे कव्वालीचं वैशिष्ट्य या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतं.

कमाल केली आहे गायक महंमद रफीनं. रफीनं प्रत्येक शब्दाला, पंक्तीला लांबलचक ताना घेतल्या आहेत. एकापाठोपाठ एक अशी वाक्यांची फेक करत रफी जे गातो ते खरोखरीच लाजवाब. ‘जरा अपनी सूरत दिखा दे नहीं तो...समा खूबसूरत बना दे नहीं तो...तेरा नाम ले के, तुझे कोई इल्जाम दे के’ ही त्याची उदाहरणं.

शब्दांचे आरोह-अवरोह व्यवस्थित सांभाळत रफीचा स्वर सप्तकभर वर-खाली फिरत राहतो. एके ठिकाणी ‘तुझ को इस महफिल में रुसवा ना कर दूँ...परदानशीं को बेपरदा ना कर दूँ तो ऽ तो ऽऽ तो ऽऽऽ ऽ ’ असा सूर त्यानं अगदी उंच नेला आहे. त्यानं केलेले उर्दू शब्दांचे उच्चारसुद्धा अतिशय श्रवणीय. गायकाच्या ओळी पुढं कोरस चपखलपणे उचलतो.

रफी : किसी की जान

कोरस : जाती है

रफी : किसी को शर्म

कोरस : आती है

रफी : कोई आँसू

कोरस : बहाता है

रफी : तो कोई

कोरस : मुस्कुराता है

अशा पद्धतीनं गीतकार, संगीतकार, गायक आणि कोरस यांचं उत्कृष्ट टीमवर्क साधलं गेल्यानं गाणं पुनःपुन्हा ऐकावंसं वाटतं.

नाट्यगृह प्रेक्षकांनी गच्च भरलेलं आहे. पहिल्या रांगेत तय्यब अली हा त्याच्या तीन बायकांसह आणि कन्या सलमासह बसला आहे. गाणं ऐकताना आपल्या बायकांना कह्यात ठेवणं, कन्येला धाक दाखवणं अशा काही हालचाली बुजुर्ग विनोदी अभिनेता मुक्री यानं मजेशीरपणे केल्या आहेत.

नाट्यगृहातला त्याचा प्रवेशही मजेदार आहे. जिच्यासाठी हे सारं चाललं आहे त्या परदानशीं नीतू सिंगची सलज्ज मुद्राही छान. आणखी एक रसिक-प्रेक्षक अँथनी हा लाल रंगाचं जर्किन पेहरून मधल्या पॅसेजमध्ये आपल्या दृष्टिहीन आईसह प्रेक्षकांत बसला आहे. या त्रयीतला तिसरा जो आहे तो अमर नावाचा अकबरचा दोस्त.

अमिताभ बच्चन. मध्येच उठून तो अकबरला दाद तर देतोच; शिवाय स्टेजवर जाऊन त्याला नोटांचा हारही घालतो, तय्यबअलीची खोडीही काढतो. असे नाट्यमय प्रसंग गाण्यात भरपूर आहेत. अकबरच्या गाण्यानं शेवटी शेवटी प्रेक्षक-श्रोते इतके भारावतात की, तेही उठून टाळ्या वाजवत नाचू लागतात व अकबरच्या म्हणण्याला जणू पुष्टी देतात.

धमाल केली आहे ती ऋषी कपूरच्या अकबरनं. कव्वालचा हिरवा पेहराव, हिरवी टोपी, गळ्यात लाल स्कार्फ, दोन्ही हातांना लाल रुमाल बांधलेले...अशा अवतारात उडी मारून तो स्टेजवर एंट्री घेतो. गाता गाता सलमाला सूचक हालचालींनी खुणावणं, तय्यब अलीला खिजवणं, स्टेजवर नाचणं, नाचता नाचता स्वत:भोवती गिरक्या घेणं, विशिष्ट लकबीत टाळ्या वाजवणं अशा देहबोलीतल्या अनेक मुद्रा त्यानं मस्त वठवल्या आहेत.

नाटकी वागण्यातून त्याची जोमदार एनर्जी दिसून येते. तिला देण्यासाठी गुलाबाचं फूल तो एका चांदीच्या लहानशा पेटीतून काढतो; पण ते तिच्याकडं तो एकदम फेकत नाही. एकदा लहानशा आरशात तिचं प्रतिबिंब पाहतो. शेवटी भारावून जात सलमा स्टेजवर येऊन त्याचं तोंड अखेर स्वत:च्या हातानं बंद करते तेव्हाच तो थांबतो. स्टेजवरचे वादक, कोरस इत्यादी सहकलाकार त्याला चांगली साथ देतात. स्टेजचं नेपथ्य कव्वालीला साजेसं. आकर्षक.

एकंदरीत, केवळ करमणूक आणि फक्त करमणूक डोळ्यांसमोर ठेवून दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी ही कव्वाली चित्रित केली आहे आणि त्यांचा हेतू चांगलाच यशस्वी झाला आहे.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com