नाथाची वाडी ! (डॉ. मनोहर जगताप)

डॉ. मनोहर जगताप
रविवार, 20 मे 2018

भैरवनाथाला पुन्हा एकदा नमस्कार करून मी बसथांबा गाठला. हमरस्त्यापर्यंत जाणाऱ्या गाडीत बसलो. पूर्वी पाच-दहा माणसं निरोप द्यायला यायची. "आता पुन्हा कधी येणार?' असं आपुलकीनं विचाराची. आज कुणीच नव्हतं. गाडी सुटली...गाव, गावातली घरं, गावकुसाबाहेरची ठिकाणं मागं पडत होती...

भैरवनाथाला पुन्हा एकदा नमस्कार करून मी बसथांबा गाठला. हमरस्त्यापर्यंत जाणाऱ्या गाडीत बसलो. पूर्वी पाच-दहा माणसं निरोप द्यायला यायची. "आता पुन्हा कधी येणार?' असं आपुलकीनं विचाराची. आज कुणीच नव्हतं. गाडी सुटली...गाव, गावातली घरं, गावकुसाबाहेरची ठिकाणं मागं पडत होती...

"एक "नाथाची वाडी फाटा' द्या,'' कंडक्‍टरच्या हातात पाचशेची नोट देत मी म्हणालो. त्यानं मला तिरकस नजरेनं न्याहाळलं. मला वाटलं, सुट्या पैशांसाठी तो माझ्याकडं बघतोय; पण तिकीट आणि उरलेले पैसे देत तो म्हणाला ः ""अहो "नाथाच्या वाडी'चं राजेंद्रनगर होऊन जमाना झालाय आता...नवीन दिसताय तुम्ही!'' मी फक्त हसलो. एसटी भरधाव धावत होती. रस्त्याच्या कडेनं कासरा-दोन कासऱ्यावर छोटी-मोठी हॉटेलं, ढाबे दाटीवाटीनं उभे होते. दूरपर्यंत दिसणारी लहान-मोठी घरं माझी सोबत करत होती. दोन गावांमधलं सुनसान मोकळं माळरान कुठंही दिसत नव्हतं. वाहनांची वर्दळ आणि सलग लोकवस्तीमुळं एखाद्या उपनगरासारखं चित्र दिसत होतं.

-मी तब्बल 20 वर्षानंतर आज गावी चाललो होतो. नोकरीच्या निमित्तानं शहरात गेलो आणि शहरालाच आपलंसं केलं. आई-वडील असेपर्यंत वर्ष-दोन वर्षांनी यात्रेच्या निमित्तानं गावाला धावती भेट व्हायची; पण नंतर संसाराच्या कचाट्यात एवढा गुंतून गेलो की गाव-शिवाराला पुरता विसरून गेलो. आज मुलं आपापल्या विश्वात रमली आहेत. त्यांचं अवकाश त्यांना साद घालत आहे. मला आता माझा निवृत्तीचा काळ, पांगलेल्या सावल्या दिसू लागल्या आहेत. आयुष्यभर दगदग करून काय कमावलं आणि काय गमावलं याचं अवघड गणित सोडवण्याचा प्रयत्न मी करत आहे. डोळ्यापुढं गावची हवा, मोकळं शिवार, आपुलकीची माणसं दिसू लागली आहेत. गावातल्या मातीत उमटलेल्या पाऊलखुणा पुन्हा अनुभवाव्यात म्हणून मी आज मुद्दाम गावी निघालो आहे. इतक्‍या वर्षांनंतरही आठवण येताच गावाचा नकाशा डोळ्यासमोर जसाच्या तसा येत होता. तिथल्या आठवणी एखाद्या चलच्चित्रासारख्या स्मृतिपटलावरून सरकत असतानाच गाडी थांबली. "चला, राजेंद्रनगर' कंडक्‍टरचे घोगऱ्या आवाजातले शब्द कानावर आदळले.

पटकन खाली उतरलो. फाटा गजबजलेला होता. चौकाच्या दुतर्फा छोटी-मोठी दुकानं, हॉटेलं होती. बाजूला रिक्षा-स्टॅंडही होतं. पूर्वी राघू टांगेवाला असायचा. मोठ्या घरचे पाहुणे आल्यावर कुणीतरी राघूला निरोप द्यायचं. राघू येईपर्यंत पाहुण्यांना सुनसान फाट्यावर नांदुर्कीच्या झाडाखाली ताटकळत बसावं लागायचं.

-मी सरळ रिक्षात जाऊन बसलो. नाथाच्या वाडीच्या म्हणजेच राजेंद्रनगरच्या दिशेनं रिक्षा धावत होती. माझी नजर फाट्याच्या आसपास असणारा मैलाचा दगड (नाथाची वाडी) शोधत होती; पण रुंदावलेला डांबरी रस्ता व दाट घरांमुळं तो मला दिसलाच नाही. एक टेकडी पार करताच पलीकडच्या गळाला खोलगटाची वाडी लागेल या विचारात मी होतो; पण बाजूला एक इंचही मोकळी जमीन नव्हती. इतकंच काय, वघळीच्या काटवनाच्या जागी चक्क द्राक्षबाग होती. भुईसपाट झालेल्या टेकडीवरून गावात पोचलो. "राजेंद्रनगर पंचायत आपलं सहर्ष स्वागत करत आहे,' या भव्य कमानीवरच्या अक्षरांनी माझं लक्ष वेधून घेतलं. पिंपळाच्या पिळणावर एसटी थांब्याची शेड दिमाखात उभी होती. गावाला आता थेट गाडीची सोय झाली आहे, हे लक्षात आलं! नवनवीन फॅशनच्या कपड्यातली तरुणाई चहूकडं दिसत होती. मुली-महिला इथंही दुचाकीवरून सहज वावरताना दिसत होत्या. मध्ये बराच काळ लोटल्यामुळं मला कुणी ओळखण्याचा प्रश्‍नच नव्हता!

जुन्या चौसोपी वाड्यांच्या जागी उभे असलेले बंगले, व्यावसायिक इमारती बघत बघतच भैरवनाथाच्या देवळाजवळ पोचलो. हार-फुलांच्या दुकानातून हार-फुलं घेतली. ग्रामदैवत भैरवनाथाच्या चरणी डोकं ठेवल्यावर समाधान वाटलं. देवळाच्या पायऱ्या उतरताना बाजूला बसलेली एक वयस्कर व्यक्ती दिसली. चेहरा पुसटसा ओळखीचा वाटला. जवळ गेलो तर ते खंडूनाना होते. माझ्या वडिलांचे जिवलग मित्र. मी मोठ्या आवाजात त्यांना माझी ओळख सांगितली. त्यांनी माझ्या गालांवरून हात फिरवला आणि पुन्हा शून्यात नजर लावून बसले. त्यांना नमस्कार करून, नाथाला...भैरवनाथाला पुन्हा एकवार पाहून मी पुढं निघालो. गावाची खालची-वरची अशा दोन्ही आळ्या फिरलो. जुन्या धाटणीचं एखादंच घर, बाकी कॉंक्रिटच्या इमारती. खालच्या आळीच्या शेवटच्या टोकाला सटवाईच्या मागं असलेल्या भुताच्या वाड्याच्या जागी पंचायतीची दुमजली इमारत उभी होती. पूर्वी इकडं दिवसासुद्धा फिरकायला किती भीती वाटायची! दक्षिणेला असलेल्या पाणवठ्यावर गेलो. पूर्वीच्या नितळ पाण्याच्या जागी गुडघाभर गढूळ पाणी आता तिथं होतं. काळपट तवंग पसरलेल्या पाण्यावर डासांचे थवेच थवे उडत होते. नाकाला रुमाल लावून वाडवडिलांच्या जुन्या घरी निघालो. डांबरी बोळानं घराजवळ पोचलो. त्या ठिकाणी नुसता दगड-मातीचा राडारोडा पडलेला होता. दरवाजा, सागाच्या तुळया, कोरीव दगड गायब झालेले होते. समोर काठ तुटलेला रांजण होता...पण मातीनं भरलेला! लहानपणी अंगणात पहुडून आजीकडून ऐकलेल्या गोष्टी, अंगणात झोपता झोपता चांदण्या मोजण्याचा विफल प्रयत्न या गोष्टी जणू काल-परवाच घडल्यासारख्या भासत होत्या. खिन्न मनानं शेताकडं निघालो.

शहरात जाताना शेतीवाडी विकली होती; तरीही माझी पावलं आपोआप रानाच्या दिशेनं वळली. पूर्वी वाटेत बारमाही वाहणारा ओढा होता. पावसाळ्यात ओढा पार करताना हाताची साखळी करून जावं लागायचं. आता तिथं ना ओढा, ना पाणी. शेतात हिरवीगार पिकं डोलत होती. तिथून येणारा शिवारवारा ओळखीचा वाटला. बऱ्याच वर्षांनंतर शेता-मातीचा वास मन प्रसन्न करून गेला. उमाटाच्या रानातली पलाण आता वीतभर बांधात बदलली होती. पलाणीवरची आंब्याची-जांभळीची झाडं गायब झाली होती. उन्हाळ्याच्या दिवसात आमचे कित्येक खेळ याच झाडांच्या सावलीत रंगायचे. शेतावरची माणसं दुपारची न्याहारी याच सावलीत गोळ्यामेळ्यानं खायची. घटकाभर कलंडायची. शेजारच्या शेतावर आईबरोबर कधीमधी येणाऱ्या राणीशी याच झाडांच्या आडून नकळत्या अल्लड वयात नजरानजर व्हायची...!

एव्हाना उन्हाचा चटका जास्तच जाणवू लागला होता. पाणी प्यावं म्हणून पाझरातल्या हेळावर गेलो, तर तिथं पाच-सहा पुरुष खोल विहीर. पाण्यानंही तळ गाठलेला. पूर्वी काठावर वाकून हातानं पाणी पिता यायचं. मावळतीच्या टेकडीवर खडी फोडणाऱ्या मशिनची अखंड घरघर सुरू होती. तिकडून उडणारी कच-धूळ शेतापर्यंत पसरत येत होती. तिच्यामुळं डोळे चुरचुरू लागले. बहुतांश टेकड्या दगड-मुरमासाठी पोखरून सपाट होत चालल्या होत्या. दूरपर्यंत पसरलेलं शिवार डोळ्यात साठवत मी माघारी फिरलो. गावात पारावर गप्पांचा फड नव्हता. इथंही दरवाजे बंद.

नाथाला...भैरवनाथाला पुन्हा एकदा नमस्कार करून बसथांबा गाठला. हमरस्त्यापर्यंत जाणाऱ्या गाडीत बसलो. पूर्वी पाच-दहा माणसं निरोप द्यायला यायची. "आता पुन्हा कधी येणार?' असं आपुलकीनं विचारायची. आज कुणीच नव्हतं. गाडी सुटली...गाव, गावातली घरं, गावकुसाबाहेरची ठिकाणं मागं पडत होती. आज काही जुन्या खुणा अस्तित्व टिकवून असल्या तरी त्या आक्रसून उभ्या आहेत हे अगदी जाणवत होतं. गाडीतून मागं पडणारी झाडं-झुडपं, कसाबसा तग धरून उभा असलेला कित्येक पिढ्या जुना असलेला वड मागं पडत होता. माझ्या शिवाराला समांतर धावणाऱ्या बसमधून माझी नजर मात्र या नव्या राजेंद्रनगरात आक्रसून शेवटच्या घटका मोजणाऱ्या माझ्या गावाला - नाथाच्या वाडीला - शोधत होती...

Web Title: dr manohar jagtap write article in saptarang