सजग वापर हाच 'इलाज' (डॉ. मृदुला बेळे)

dr mrudula bele
dr mrudula bele

प्रतिजैविकांचा चुकीच्या पद्धतीनं वापर होत असल्यामुळं त्यांचा परिणामही कमी होत आहे. अशाच पद्धतीनं स्थिती वाढत राहिली, तर माहीत असलेलं कुठलंही प्रतिजैविक काम करत नाही अशी भीतीदायक परिस्थितीही येऊन ठेपू शकते. जी परिणामकारक प्रतिजैविकं शिल्लक उरली आहेत त्यांचा वापर सुजाणपणे आणि सजगपणे करणं हेच आपल्या हातात आहे.

"लांडगा आला रे आला!' ही लहानपणी आपण सगळ्यांनीच ऐकलेली गोष्ट. रात्री आपल्या मेंढरांची राखण करणाऱ्या एका गुराख्याची ही गोष्ट. त्याला असते एक वाईट खोड. तो रात्री "लांडगा आला रे...माझी मेंढरं वाचवायला या' असं म्हणून खोटंच ओरडायचं आणि लाठ्या-काठ्या घेऊन गावकरी आले, की "तुमची कशी गंमत केली' म्हणून हसत सुटायचा. असं बरेचदा होतं आणि गावकरी वैतागतात. एके रात्री मात्र खरंच लांडगा येतो. हा गुराखी "लांडगा आला रे... या मला वाचवायला' म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडत सुटतो. गावकरी मात्र नेहमीसारखाच मस्करी करत असेल म्हणून जागचे ढिम्म हलत नाहीत आणि लांडगा या मुलाच्या सगळ्या मेंढरांचा चट्टामट्टा करून पसार होतो. "खरोखर मदतीची गरज असेल तरच कुणाला हाक मारावी. गरज नसताना हाक मारली, की गरज असतानाही लोक येत नाहीत,' असं सांगणारी ही गोष्ट.

गोष्ट आहे सन 2009 मधली. दिल्लीमधल्या एका रुग्णालयात काही उपचार घेऊन मायदेशी परतलेल्या एका स्वीडिश रुग्णाच्या शरीरात स्वीडनमधल्या डॉक्‍टरांना एक वैशिष्ट्यपूर्ण जीवाणू सापडला. उपलब्ध असलेल्या एकाही प्रतिजैविकाला म्हणजे अँटिबायोटिकला हा जीवाणू दाद नव्हता. नेहमी वापरल्या जाणाऱ्या विज्ञानातल्या पद्धतीप्रमाणं या जीवाणूचं नाव ठेवण्यात आलं "न्यू दिल्ली मेटॅलो बीटा लॅक्‍टमेज -1' किंवा "एनडीएम-1.' हाच जीवाणू नंतर आणखी एका सोप्या नावानं ओळखला जाऊ लागला ः "न्यू दिल्ली सुपरबग.' जगभरात या सुपरबगवर चर्चा सुरू झाली. लॅन्सेटसारख्या प्रथितयश मासिकानं यावर एक शोधनिबंधही छापला, आणि भारतभर यावर धुराळा उठायला सुरवात झाली. खरं तर चर्चा व्हायला हवी होती- अशा प्रकारच्या कुठल्याही प्रतिजैविकाला दाद न देणारा जीवाणू भारतात का सापडला आहे याची. मात्र, पार संसदेपासून सगळीकडे चर्चा होती ती "भारताच्या राजधानीचं नाव या जीवाणूला देऊन भारतातल्या "मेडिकल टूरिझमला' आणि भारताला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे,' अशी. या चर्चेनं इतकं उग्र स्वरूप धारण केलं, की शेवटी लॅन्सेटला भारताची क्षमा मागायला लागली. मात्र, या सगळ्यात मूळ मुद्दा बाजूलाच राहून गेला. असा सुपरबग का तयार झाला, आणि तोही भारतातच का सापडला हा तो मूळ मुद्दा. त्याचं उत्तर आहे प्रतिजैविकांचा वापर "लांडगा आला रे' म्हणून ओरडणाऱ्या बेजबाबदार मुलासारखा केला म्हणून! सन 2009 मधे भारतात सापडलेला हा सुपरबग अर्थातच नंतर देशोदेशी पसरला. "अँटिबायोटिक रेझिस्टन्स' हा सन 2019मध्ये जागतिक आरोग्यासाठी असलेला सगळ्यात मोठा धोका असेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) नुकताच दिला आहे. केवळ दहा वर्षांत या प्रश्नानं मोठं अक्राळविक्राळ रूप धारण केलं आहे. किरकोळ आजारांवर गरज नसतानाही उगीचच प्रतिजैविकं देऊन आपण प्रतिजैविकांची अवस्था त्या गोष्टीतल्या मुलासारखी करून टाकली आहे. खरोखर मोठा आजार किंवा संसर्ग जेव्हा घाला घालेल, तेव्हा ही प्रतिजैविकं काहीही मदत करू शकणार नाहीत!

"अँटिबायोटिक रेझिस्ट्‌न्स' म्हणजे काय?
अँटिबायोटिक्‍स ही कुठल्याही जीवाणूमुळं होणाऱ्या जंतूसंसर्गावर काम करणारी औषधं. जीवाणूंवर झपाट्यानं मारा करून त्याना नेस्तनाबूत करून टाकणारी. जीवाणू टिकून रहाण्यासाठी किंवा वाढण्यासाठी ज्या काही जैविक प्रक्रिया वापरतात, त्यात ही प्रतिजैविकं अडथळे आणतात आणि त्यांना नेस्तनाबूत करतात. मात्र, जगणाऱ्या प्रत्येक जीवामध्ये स्वत:चा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत राहण्याचा गुण नैसर्गिकपणे असतो. तसा तो अर्थात जीवाणूंमध्येही असतो. त्यामुळं हे स्मार्ट जीवाणू प्रतिजैविकांपासून वाचण्यासाठी स्वत:मध्ये अनेक बदल करून घेतात. कधी ते आपल्या पेशींच्या भिंतीत असे काही बदल घडवून आणतात, की प्रतिजैविकाना आत शिरकावच करत येणार नाही. कधी स्वत:मध्ये असे बदल घडवतात, की जीवाणू त्यांना ओळखूच शकणार नाहीत. कधीकधी तर जीवाणू याहूनही जास्त शूर बनतात, आणि प्रतिजैविकांवर हल्ला करून त्याना निकामी करून टाकतात. पेनिसिलिन वर्गातल्या प्रतिजैविकांच्या रासायनिक संरचनेत बीटा लॅक्‍टम नावाची एक रिंग असते. त्यांना निकामी करण्यासाठी काही जीवाणू "बीटा लॅक्‍टमेज' नावाचं एक विकर बनवतात आणि जणू "बीटा लॅक्‍टम' प्रतिजैविकांना गिळून टाकतात.

ही ताकद कशामुळे?
औषधांशी मुकाबला करण्याची ही ताकद जीवाणू कुठून आणतात? ती त्यांच्यात नैसर्गिकरित्या नक्कीच नसते, मग ती येते कशी?... जीवाणू ही ताकद आपल्या जनुकांमध्ये बदल करून मिळवतात. प्रतिजैविकांचा मुकाबला करत येईल अशी जनुकं ते स्वत:मध्ये निर्माण करतात. यालाच "म्युटेशन्स' असं म्हणतात. शिवाय जीवाणूंचा पुनरुत्पादनाचा झपाटा प्रचंड असतो. त्यामुळं एका जरी जीवाणूत असं जनुक तयार झालं, तर तो पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत लाखो जीवाणूंना हे जनुक देतो, आणि तेही फार झपाट्यानं. मग हळूहळू हे सगळे जीवाणू त्या प्रतिजैविकाला दाद देईनासे होतात आणि मग काही दिवसांपूर्वी जे प्रतिजैविक एखाद्या रोगावर काम करत होतं ते निकामी व्हायला लागतं. विशेषत: मोठ्या रुग्णालयांत- जिथं रुग्णांच्या मोठ्या संख्येला वेगवेगळ्या जंतूसंसर्गांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रतिजैविकांचा वापर केला जातो तिथं- असे रेझिस्टंट जीवाणू तयार होण्याची शक्‍याता सगळ्यात जास्त असते. तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत किंवा तिथं वापरात असलेल्या उपकरणांमधून हे जीवाणू मोठ्या प्रमाणात पसरतात.
जीवाणूंच्या या अशा प्रकारे प्रतिजैविकाना विरोध करण्याच्या ताकदीला आपण आपल्या भोंगळपणामुळं आणि अज्ञानामुळं मोठ्या प्रमाणात हातभार लावत असतो. तो कसा ते पाहू या :

1. डॉक्‍टर एखाद्या रोगावर/ तापावर पाच दिवसांची प्रतिजैविकं लिहून देतात. तुम्हाला दोन दिवसांत बरं वाटायला लागलं, तरी पाच दिवसांची औषधं घ्यायला हवीत हे डॉक्‍टरानी बजावलेलं असतं. कारण त्या रोगाच्या जीवाणूंचा पूर्ण नायनाट करण्यासाठी प्रतिजैविकाचा तेवढा डोस घेणं गरजेचं असतं. मात्र, जरा बरं वाटायला लागलं रे लागलं, की एक तर कंटाळा म्हणून किंवा पैसे वाचवायला म्हणून, तुम्ही औषध घेणं बंद करून टाकता. त्यामुळं सगळे जीवाणू मरत नाहीत. काही शिल्लक राहतात आणि त्यातला एखादा जरी असा रेझिस्टंट असला तर तो न मरता झपाट्यानं वाढतो. रेझिस्टंट जीवाणूंची एक फौजच मग तुमच्या शरीरात तयार होते. ती तुमच्याकडून इतरांकडेही पोचते आणि पुढच्या वेळी तुम्हाला तसाच ताप आला, तर आधीचं प्रतिजैविक कामच करत नाही.
2. सर्दी किंवा वायरल तापावर कारण नसताना तुम्ही प्रतिजैविकं घेता. एक तर तुम्ही प्रतिजैविकं द्या म्हणून डॉक्‍टरांकडं हट्ट करता किंवा मग सरळ औषधाच्या दुकानातून आपलं आपण आणून घेऊन टाकता. खरं तर विषाणूजन्य आजारांवर प्रतिजैविकं अजिबात काम करत नाहीत. व्हायरल ताप, सर्दी तीन दिवसांनी आपली आपण बरी होते. तुम्ही मात्र प्रतिजैविकं घेऊन उगीचच शरीरात असलेल्या जीवाणूंना रेझिस्ट्‌न्स मिळवायला मदत करता. ताप खाली आणणारं क्रोसिनसारखं औषध आणि प्रतिजैविकं यात फरक आहे. "आला ताप की घे प्रतिजैविक' असं करणं धोकादायक आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.
3. कोंबड्या किंवा बकऱ्यांसारख्या ज्या प्राण्यांना आपण खातो, त्यांना रोग होऊ नयेत म्हणून मोठ्या प्रमाणात प्रतिजैविकं दिली जातात. किती तरी पोल्ट्री फार्म्समध्ये कोंबड्यांच्या खाद्यात सर्रासपणे प्रतिजैविकं मिसळली जातात. अशा कोंबड्यांमध्ये प्रतिजैविकांच्या प्रचंड प्रमाणातल्या सेवनामुळं रेझिस्टंट जीवाणू तयार नाही झाले तरच नवल. त्यांच्याकडून ते आपल्या शरीरात येतात. अलीकडं शेतकरी किती तरी पिकांवर रोग पडू नये म्हणून प्रतिजैविकांची फवारणी करतात आणि ही पिकं आपल्या पोटात जाऊन आपल्याही शरीरात असे जीवाणू तयार होऊ लागतात.

प्रतिजैविकांची साखळी
एका प्रतिजैविकाला एकदा जीवाणू दाद देईनासे झाले, की त्यावर मग दुसरं प्रतिजैविक द्यायला लागतं. हळूहळू या दुसऱ्या प्रतिजैविकालाही ते दाद देईनासे होतात...आणि ही साखळी सुरूच राहते. दुर्दैवानं जीवाणूंचा प्रतिजैविकाना रेझिस्टन्स निर्माण करण्याचा झपाटा प्रचंड आहे. त्या झपाट्यानं नवी प्रतिजैविकं शोधून काढणं आणि त्यांची निर्मिती करणं अशक्‍य आहे. कारण औषधांवरचं संशोधन ही एक अत्यंत वेळखाऊ आणि महागडी प्रक्रिया आहे. गेल्या तीस वर्षांत प्रतिजैविकांचा एकही नवा प्रकार बाजारात आलेला नाही, आणि इतक्‍यात येण्याची शक्‍यताही नाही. ज्या प्रमाणात जगभरात अँटिबायोटिक रेझिस्टंट जीवाणू आढळतायत त्याचे आकडे भीतीदायक आहेत. म्हणूनच 2019 मधे जागतिक आरोग्यासाठी हा सगळ्यात मोठा धोका आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. माहीत असलेलं कुठलंही प्रतिजैविक काम करत नाही अशी भीतीदायक परिस्थिती लवकरच येऊन ठेपणार आहे. अशा वेळी आपण काय करणार आहोत? प्रतिजैविकं अस्तित्वात नव्हती त्या काळात साथीच्या रोगांनी माणसं कीडा-मुंगीसारखी मरत असत, तशा परिस्थितीला आपण आता कसं तोंड देणार आहोत?

सुजाण आणि सजग वापर
आपल्या हातात आता इतकंच आहे, की जी प्रतिजैविकं शिल्लक उरली आहेत त्यांचा वापर सुजाणपणे आणि सजगपणे करणं. सर्दी, व्हायरल तापावर स्वत:च्या किंवा गुगलच्या डोक्‍यानं प्रतिजैविकं घेणं टाळणं. भारतात खरं तर सगळी प्रतीजैविकं ही "शेड्यूल एच' औषधं आहेत. म्हणजे ही औषधं डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेता आणि विकता कामा नयेत. हे शेड्यूल एच औषध आहे हे दर्शवणारी एक ठळक लाल रेघ या औषधांच्या स्ट्रिपवर-खोक्‍यावर असते; पण तरी आपण ही औषधं प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी करतो आणि ती मिळतातही. या बाबतीतले कायदे अधिक कणखर बनवले पाहिजेत हे मान्यच; पण आपण ती मागताच कामा नयेत, इतकं तरी आपण करूच शकतो.... आणि हे करून आपण कुणावरही उपकार करत नाही आहोत. करत असू तर फक्त स्वत:वर आणि पुढच्या पिढ्यांवर. नाही तर किरकोळ संसर्गानी पटापट जीव जाण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे, ही खूणगाठ मनात नक्की बांधून ठेवायला हवी.

"अतिपरिचयात्‌ अवज्ञा' ही म्हण माणसांच्याच नव्हे, तर प्रतिजैविकांच्या बाबतीतही खरी आहे हे लक्षात घेऊ या! जीवाणूंची प्रतिजैविकांशी नको इतक्‍या प्रमाणात ओळख करून दिली, तर ते प्रतिजैविकांची आज्ञा जुमानणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com