
विशेष
भारत बायोटेक कंपनीच्या लशीवरून चर्चा सुरू झाली. कुठल्याही कंपनीची लस ही सुरक्षितच आहे. सोशल मिडीयावरून होणाऱ्या चर्चेत लशीबद्दल चुकीची माहिती दिली जाते. पण वैज्ञानिकांनी सर्व लशी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.
लस हा शब्द उच्चारला आणि त्याचा विचार केला, तर लहान मुलांनाच ती दिली जाते हा समज आपल्यामध्ये आजपर्यंत होता. कोरोना व्हायरसवर लस तयार होतेय आणि ती सर्वानाच म्हणजे लहान-तरुण आणि वयोवृद्ध या सगळ्यांना घ्यावी लागणार, हे समजल्यापासून लोकांच्यात लसीबद्दल अचानक अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. लसीच्या फायद्यापेक्षा त्याचे दुष्परिणामच जास्त आहेत असे गैरसमज लोकांच्यामध्ये पसरू लागले आहेत. सध्याची कोरोना व्हायरसवरची लस कमी वेळेत तयार झाली, तसेच सोशल मीडियावरील पसरवली जाणारी माहिती या सगळ्यांमुळं लोकांमध्ये गैरसमज पसरण्यास किंवा लसीची भीती तय्यार होण्यास मदत होत आहे. त्यामध्ये या आठवड्यामध्ये आणखीन भर पडली, जेव्हा भारत बायोटेकच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष जाहीर होण्यापूर्वीच, त्या लसीला मान्यता दिली गेली. सुरवातीला आपण भारत बायोटेकची लस नक्की कशी आहे ते पाहूया.
भारत बायोटेकची लस
हैद्राबादमध्ये १९९६ मध्ये स्थापन झालेली भारत बायोटेक कंपनी, रोटाव्हायरस या लशीचे उत्पादित करत होती. फारशी कुणाला माहित नसलेली आणि सातशेच्या आसपास कर्मचारी असलेली कंपनी अचानक गेल्या वर्षी मे महिन्यात चर्चेत आली जेव्हा त्यांनी जाहीर केले की ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या सहकार्यानं भारतीय बनावटीची कोरोना व्हायरसवर लस तयार करणार. भारत बायोटेक तयार करीत असलेली लस ही लस (कोवॅक्सिन) विकसित करण्याच्या जुन्याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
विकासाचा कालखंड
जून २०२० मध्ये लसीला मानवी चाचणीस परवानगी देण्यात आली. जुलै २०२० मध्ये लसीच्या फेज १/२ च्या ७ ५५ स्वयंसेवकांवर चाचणीस सुरवात झाली. सप्टेंबरमध्ये काही प्राण्यांवर चाचण्या घेण्यात आल्या (माकड आणि हॅमस्टर - मोठ्या घुशीसारखा दिसणारा व विविध गोष्टी कुरतडणारा प्राणी). ऑक्टोबरमध्ये कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील २५ हजार ८०० स्वयंसेवकांवर चाचणी करण्याचे जाहीर केले. डिसेंबरमध्ये कंपनीने फेज १/२ चाचणीचे निष्कर्ष जाहीर केल्यानुसार कोवाक्सिनची लस स्वयंसेवकांवर गंभीर दुष्परिणाम न करता प्रतिपिंडे तयार करते. ३ जानेवारी २०२१ ला सरकारने अचानक या लसीला लसीकरणासाठी परवानगी दिली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या लसीवर आक्षेप काय ?
सुरवातीपासूनच कंपनीनं नक्की कोणते तंत्रज्ञान वापरून लस तयार केली जातेय हे जाहीर केले नाही. फेज १/२ चाचणीचे निष्कर्ष जाहीर केल्यावर नक्की किती स्वयंसेवकांवर चाचणी केली हेसुद्धा सांगितले नाही, लस जरी गंभीर दुष्परिणाम करत नसली तरी स्वयंवसेवकांवर तात्पुरते दुष्परिणाम करते का नाही ? हे सुद्धा सांगितले नाही. लसीवर आक्षेप घेण्याचं मुख्य कारण म्हणजे या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अजून चालू आहेत. लस कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यास किती परिणामकारक आहे याची कोणतीही माहिती कंपनीने जाहीर केलेली नाही. या महिन्याच्या २ तारखेला या लसीबद्दल अजून माहिती सादर करण्याचे कंपनीला सांगण्यात आले होते, अचानक दुसऱ्या दवशी म्हणजे ३ जानेवारीला संध्याकाळी या लसीला मान्यता देण्यात आली हे सुद्धा लसीवर आक्षेप घेण्याचे मुख्य कारण आहे. कोरोना व्हायरस लस विकसित करण्यामध्ये घाई होतेय का?
या प्रश्नाचे जर सरळ-सरळ उत्तर द्यायचे म्हंटले तर नाही असेच आहे. कारण जरी आपण सर्वाना कोरोना व्हायरस लस मग ती कोणत्याही कंपनीची असो, कमी वेळात लसीकरणासाठी आलेली दिसत असली तरी यामागील सर्व प्रक्रिया या आंतरराष्ट्रीय नियमाला धरूनच आहेत. तसेच ही लस कमीत कमी वेळेत तयार करावी लागणार आहे ही देखील काळाची गरजच आहे.
लसीला मान्यता मिळवण्यासाठी सर्वात प्रथम त्यांच्या प्राण्यांवर यशस्वी चाचण्या झालेल्या असाव्यात. त्याची माहिती घेऊनच कोणत्याही देशाची सरकारी मान्यता देणारी एजन्सी त्या लशीच्या मानवी चाचणीस परवानगी देते. मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात १० ते १००, दुसऱ्या टप्प्यात १०० ते ५०० आणि तिसऱ्या टप्प्यात १० हजार पेक्षा अधिक स्वयंसेवकांवर चाचण्या झालेल्या असाव्यात. या सर्व टप्प्यातील माहितीचे विश्लेषण करूनच लसीला अंतिम लसीकरणासाठी परवानगी दिली जाते. आत्तापर्यन्त जेवढ्या कोरोना व्हायरस लसींना वेगवेगळ्या देशांनी मान्यता दिली आहे, त्या सर्व कंपन्यांनी या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत तसेच मुख्य कंपन्यांनी (फायझर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका, स्फुटनिक) या प्रक्रियेची माहिती आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रकाशित करून जगासमोर आणली आहे. पूर्वीच्या लसी विकसित करताना अशाप्रकारे पब्लिक डोमेनमध्ये ही माहिती आणली जात नव्हती. तसेच पूर्वी लसीकरणाच्या चाचणीसाठी लागणारे निरोगी स्वयंसेवक कमी वेळात मिळत नव्हते तसेच ते स्वतःहून तयारसुद्धा होत नव्हते. यावेळी मात्र सर्वच कंपनीच्या लशीच्या चाचणीला लोकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. ज्या चाचणींसाठी पूर्वी काही वर्षे लागायची त्या चाचण्या यावेळी एक ते दोन महिन्यामध्ये पूर्ण झाल्या.
त्यानंतर सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर जेव्हा कंपन्या त्या माहितीचे विश्लेषण करून लसीला मान्यता देणाऱ्या सरकारी एजन्सीपुढे ठेवतात तेव्हासुद्धा या एजन्सीज मान्यता देण्याआधी फार वेळ घेतात किंवा काही चाचण्या पुन्हा करण्यास सांगतात. यावेळी मात्र सर्वच सरकारी एजन्सीजनी कमीत कमी वेळात कंपन्यांनी दिलेल्या माहितीचे विश्लेषण करून मान्यता दिल्यात. यामध्ये कोणत्याच देशाने लसीच्या गुणवत्तेबद्दल किंवा परिणमकारकता आणि सुरक्षितता याबद्दल तडजोड केलेली दिसत नाही. उदाहरण द्यायचे तर अमेरिकेची एजन्सी ‘एफडीए’ने ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेकाच्या सुरवातीच्या माहितीमध्ये काही दोष काढल्यानंतर कंपनीला पुन्हा तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेण्यास सांगितले आणि या कंपनीने पुन्हा ३० हजार स्वयंसेवकांवर चाचण्या घेण्यास सुरवात केली. या चाचण्यांच्या निष्कर्षांनंतरच ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका कंपनीच्या लसीला अमेरिकेमध्ये मान्यता मिळेल. लस सुरक्षित आणि परिणामकारक आहेत का?
या प्रश्नाच्या उत्तरचे दोन भाग होतात, पहिला म्हणजे सर्वच कंपन्यांच्या लस सुरक्षित आहेत का? याचे उत्तर होय असे आहे. लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या या लसीच्या सुरक्षेची क्षमता पाहण्यासाठीच असतात. सर्वच कंपन्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सुरक्षा चाचणीचे निष्कर्ष तपासल्यावर आणि सरकारी एजन्सीला दिल्यावरच त्याना तिसऱ्या म्हणजे त्याची परिणमकारकता पाहण्याच्या चाचणीला परवानगी मिळाली आहे.
दुसरा प्रश्न म्हणजे सर्वच कंपन्यांच्या लस परिणमकारक आहेत का? याचे उत्तर मात्र हो किंवा नाही अशा स्वरुपामध्ये देता येत नाही. कंपन्यांनी जाहीर केलेली आकडेवारी प्रत्येक लसीसाठी वेगवेगळी आहे. उदा: फायजर ची लस ९० टक्के, मॉडर्नाची लस ९४ टक्के, ऑक्सफर्डची लस ७०टक्के , रशियन स्फुटनिक ९० टक्के कोरोनाव्हायरसचे संक्रमण रोखण्यास परिणामकारक आहेत. अमेरिका, युरोप, ब्रिटन तसेच इतर आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार कोणतीही लस सुरक्षित असेल आणि ५० टक्क्यांपेक्षा अधिक व्हायरसचे संक्रमण रोखण्यास परिणामकारक असेल तर अशा लसीला सार्वत्रिक किंवा खाजगी लसीकरणासाठी परवानगी दिली जाते.
Edited By - Prashant Patil