esakal | थिअरी ‘बटरफ्लाय इफेक्ट’ची
sakal

बोलून बातमी शोधा

Chaos-Theory

विशेष
हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या फुलपाखराच्या पंखांची फडफड आपल्याकडे तुफान आणू शकते का? हा प्रश्न १९६३ मध्ये वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या अ‍ॅडवर्ड लॉरेन्झ या शास्त्रज्ञाने ‘असोसिएशन फॉर द एडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ च्या १३९ व्या बैठकीत जगासमोर केला होता.

थिअरी ‘बटरफ्लाय इफेक्ट’ची

sakal_logo
By
डॉ. नानासाहेब थोरात saptrang@esakal.com

हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या फुलपाखराच्या पंखांची फडफड आपल्याकडे तुफान आणू शकते का? हा प्रश्न १९६३ मध्ये वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या अ‍ॅडवर्ड लॉरेन्झ या शास्त्रज्ञाने ‘असोसिएशन फॉर द एडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ च्या १३९ व्या बैठकीत जगासमोर केला होता. किंवा अंदमानमध्ये एक छोटे फुलपाखरू उडताना त्याच्या पंखांमधून येणाऱ्या हवेच्या तरंगामुळे मुंबई मध्ये वादळ येऊ शकते का ? किंवा न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या वादळाला ब्राझीलमध्ये उडणाऱ्या फुलपाखराचे तरंग कारणीभूत होते का? या गोष्टी वाचताना अशक्य किंवा अनाकलनीय वाटतायत ना? पण गणिताच्या अनागोंदी सिद्धांतानुसार (केऑस थिअरी नुसार) हे शक्य आहे. या नियमाला ‘द बटरफ्लाय इफेक्ट’ असे म्हणतात, यावर एक हॉलिवूड चित्रपटही येऊन गेलाय.

अ‍ॅडवर्ड लॉरेन्झ यांनी या थिअरीचा वैज्ञानिक अभ्यास केल्यानंतर दिसून आले की कोणत्याही मोठ्या घटनेच्या सुरुवातीच्या परिस्थितीत झालेल्या अगदी लहान किंवा सूक्ष्म बदलामुळे भविष्यात एक वेगळाच पण मोठा परिणाम दिसून येतो. यामध्ये फुलपाखरू प्रभाव (‘द बटरफ्लाय इफेक्ट’) हा उदाहरणदाखल घेतला आहे. याचा खोलवर जाऊन अभ्यास केल्यास आपल्या वैयक्तिक जीवनातील, व्यवसायातील, बाजारपेठेतील आणि इतर बऱ्याच काही समस्या सोडवण्यासाठी नवीन दिशा मिळू शकतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जर जगातील मोठ्या घडामोडी विचारात घेतल्या आणि त्याच्या खोलवर जाऊन पाहिले तर समजते की यासाठी फारच छोट्या घटना ( विचारात सुद्धा न येणाऱ्या) कारणीभूत होत्या. उदा : एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला उत्तरेत एका राजाच्या मुलीच्या अंगावर दिवा पडला म्हणून इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले, विसाव्या शतकाच्या सुरवातीला एका वाहनचालकानं चुकीचं वळण घेतल्यामुळे जगात पहिले महायुद्ध झाले, पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैनिकाने एका जर्मन सैनिकाला जीवदान दिले म्हणून दुसरे महायुद्ध झाले. अगदी राजकारणातील अलीकडचे उदाहरण द्यायचे असेल तर राजस्थानमधील एका उमेदवाराच्या पत्नी आणि मुलीचे मतदान करायचे राहिले आणि तो उमेदवार फक्त दोनच मतांनी पराभूत झाला, तो जर जिंकला असता तर तो राजस्थानचा मुख्यमंत्री झाला असता. उत्तर आफ्रिकेतील एका देशात रस्त्यावर खेळणी आणि फळे विकणाऱ्या फेरीवाऱ्याला पोलिसांनी अटक केली म्हणून, लिबिया, इजिप्त, सीरिया, ट्युनिशिया, बहारीन आणि येमेन यासारख्या देशात ‘अरब स्प्रिंग’ घडून आले. या घटना जर घडल्याच नसत्या तर कदाचित जग आज आहे त्यापेक्षा वेगळे असते. सामान्य लोक याला नशिबाचा खेळ किंवा दुर्दैव, प्रारब्ध असे म्हणू शकतात, पण विज्ञान सध्या अशा घटनांना ''द बटरफ्लाय इफेक्ट'' असे संबोधते. अगदी २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात, चीनमध्ये एक मासे विकणारी आणि साधारण ताप आलेली महिला डॉक्टरकडे जाते आणि त्या एका घटनेमुळे सगळे जग लॉकडाऊन होते, अलीकडच्या काळातील बटरफ्लाय इफेक्टचे हे समर्पक उदाहरण आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बटरफ्लाय इफेक्ट आणि आपले आयुष्य 
प्रत्येक मनुष्याचे वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य हे गणितीय भाषेत सांगायचे झाले तर अरेखीय  (नॉनलिनियर) आणि जटिल (कॉम्प्लेक्स) असते. आयुष्यात आजच्या दिवशी केलेल्या छोट्या गोष्टीमुळे भविष्यात नक्की काय परिणाम करेल याचा आत्मविश्वासाने अंदाज करणं अशक्य असतं. केऑस थिअरी अशाच गुंतागुंतीच्या संकल्पनेच्या मुळाशी जाण्यासाठी आणि अत्यंत जटिल प्रणालींसाठी (उदा हवामानाचा अंदाज लावण्यासाठी किंवा शेअर मार्केट मध्ये) वापरली जाते. 

अध्यात्मिक जगात आपल्या वर्तमानातील संकटे सोडवायची असतील तर आपल्या अंतरंगात डोकावून पहा, म्हणजेच भूतकाळात अगदी खोलवर जाऊन पहा, आपल्याला संकटाचे उत्तर मिळते, यालाच विज्ञानाने ‘बटरफ्लाय इफेक्ट’ हे परिमाण दिलेय. मी आज या ठिकाणी का आहे? मी आज हीच नोकरी किंवा व्यवसाय का करतोय? माझ्या आयुष्यात हाच जोडीदार का आहे? सामान्य माणूस म्हणेल की हेच माझ्या नशिबात होतं म्हणून असं झालं. पण अशा अनेक वैयक्तिक आयुष्यातील घटनांची उत्तरे ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या वैज्ञानिक संकल्पनेने मिळतात. याचा वापर करून लोकांच्या वैवाहिक, सांसारिक, सामाजिक, किंवा जीवनातील इतर प्रश्न सोडविता  येतील का याचा विचार व संशोधन सध्या सुरू आहे. 

२०२० मध्ये जगभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे घटस्फोट घेण्याचे प्रमाण १५० टक्क्यांनी वाढलेय. जोडप्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यामध्ये खूपच ताणतणाव निर्माण झालेत. घटस्फोटामुळं लोकांचे वैयक्तिक आयुष्याचेच फक्त नुकसान होत नाही तर अर्थशास्त्रीय भाषेत सांगायचे तर वाढलेल्या घटस्फोटामुळं लाखो मानवी कामाचे तास वाया जात आहेत. आणि जवळपास २०२१ मध्ये शंभर बिलियन डॉलरचे नुकसान होतेय, हा आकडा युरोपियन युनिअनच्या २०२१ ते २०२७ च्या आणि भारताच्या पाच वर्षाच्या रिसर्च बजेट एवढा आहे. नॉर्वे देशातील न्यायालयांनी घटस्फोटाचं प्रमाण कमी करण्यासाठी ‘बटरफ्लाय इफेक्ट’चा वापर करून जोडप्यांच्या अंतरंगात जाऊन घटस्फोटाच्या छोट्यात छोट्या कारणांचे शोध घेतले, आणि या उपायामुळे त्या देशातील घटस्फोटाचे प्रमाण कमी झालेले दिसून आलेय. कदाचित आपल्यापैकी काहींनी जर आपल्या भूतकाळात डोकावून पहिले तर ‘बटरफ्लाय इफेक्ट’ आपल्या आयुष्यातील अनेक वेगवेगळ्या घटनांचे पैलू उलघडवून दाखवेल. माझेच उदाहरण द्यायचे झाले तर २००९ मधील जुलै महिन्यातील एका पावसाळी सकाळी गाडीवरून जाताना समोरच्या बसने माझ्या शर्टवर पाणी उडवल्यामुळे मी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये २०२० च्या सप्टेंबरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून जॉईन झालो. तुमच्याकडे सुद्धा अशाच काही छोट्या घटना असतील ज्यामुळे तुमचे आयुष्यच बदलून गेले असेल. 

बटरफ्लाय इफेक्ट आणि कोरोनाव्हायरस
आपण भविष्याबद्दल किती चांगले अंदाज लावू शकतो? कोरोनाव्हायरसचे मानवी जीवनावरील झालेल्या परिणामाचा अजूनतरी पूर्ण अंदाज आला नाही. जसे जसे दिवस पुढे जातायत तसे तसे नवीन घटनांचा उलघडा होतोय. भविष्यात अजून काय वाढून ठेवलेय, अशा प्रकारची महामारी मानवी आरोग्य आणि देशोदेशीच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम करेल. जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात आत्ताच भविष्यातील कोरोनाव्हायरस सारखा विषाणू तयार होतोय का? दहा नाहीतर शंभर वर्षानंतर येणारी भविष्यातील महामारी आज सांगू शकू का? खरेच तिसरे महायुद्ध होईल का? होणारच असेल तर आज वर्तमानकाळात अशी कोणती छोटी घटना घडतेय ज्यामुळे तिसरे महायुद्ध होईल? भविष्यात शेअर मार्केट मध्ये काय घडेल? अशा अनेक प्रश्नांचा उलघडा करण्यासाठी शास्त्रज्ञांनी बटरफ्लाय इफेक्ट या गणितीय संकल्पनेचा वापर करण्यास सुरवात केली आहे. 

शेवटी खरा प्रश्न उरतोय, खरेच हजारो किलोमीटर दूर फुलपाखराच्या पंखांची फडफड आपल्याकडे तुफान फडकावू लागले आहे का? काही दिवसांपूर्वी नासाने अमेरिकेत आलेल्या तीन वादळांचा अभ्यास केला, त्यासाठी त्यांनी किनारपट्टीपासून दोन हजार किलोमीटर परिसरातील सॅटेलाइट (कृत्रिम उपग्रहीय) माहिती एकत्र करून सुपरकॉम्पुटर वरती वातावरणीय बदलांचे विश्लेषण केले, तेव्हा नासा मधील शास्त्रज्ञांना सुद्धा आढळून आले कि या वादळांच्या पाठीमागे हजारो किलोमीटरवरील एक सूक्ष्म वातावरणीय घटना कारणीभूत होती. हा लेख वाचत असताना हजारो किलोमीटर दूर एखादे फुलपाखरू फडफडत जाऊन कदाचित भविष्यात येणाऱ्या वादळासाठी हवेत तरंग निर्माण करत असेल...

Edited By - Prashant Patil

loading image