परिघावरून पुन्हा केंद्रस्थानी

साधना साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील निवडक लेखनाचा ग्रंथसंच तयार करण्याची कल्पना डॉ. दाभोलकरांनीच पुढे आणली.
Dr Narendra Dabholkar
Dr Narendra Dabholkarsakal
Summary

साधना साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील निवडक लेखनाचा ग्रंथसंच तयार करण्याची कल्पना डॉ. दाभोलकरांनीच पुढे आणली.

- विनोद शिरसाठ

‘साधना’ साप्ताहिकाचं २००७-०८ हे हीरकमहोत्सवी वर्ष होतं. तेव्हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना ‘साधना’चे संपादक होऊन दहा वर्षं पूर्ण झाली होती आणि त्यांनी वयाची साठी ओलांडली होती. त्या दहा वर्षांत त्यांनी साप्ताहिकाचं संपादन, वितरण, व्यवस्थापन, अर्थकारण या चारही आघाड्यांवर चैतन्य निर्माण केलं होतं.

मात्र, त्याच दहा वर्षांत साधना प्रकाशनाबाबत फार काही करता आलेलं नाही, याची खंत त्यांना होती. त्यामुळेच २००५ मध्ये साधना प्रकाशनाला मुंबईतील एक प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांच्या मनात संकोच होता. ‘संयोजकांनी हा पुरस्कार साधना प्रकाशनाच्या पूर्वीच्या कामासाठी दिला आहे, याची मला नम्र जाणीव आहे’, हे त्यांनी त्या कार्यक्रमात स्पष्टपणे सांगितलं होतं.

कारण त्या दहा वर्षांत पूर्वीच्या काही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या काढणं आणि साधना परिवारातील मधू दंडवते, ग. प्र. प्रधान, वसंत बापट इत्यादी व्यक्तींची काही नवी पुस्तकं काढणं एवढंच घडलं होतं.

त्यातील बहुतांश पुस्तकांचं संपादनाचं काम त्या त्या व्यक्तींचे चाहते वा सहकारी करून देत होते आणि पुस्तक निर्मितीचं काम सत्यजित वैद्य व सुरेश माने हे साधनाचे दोन सहकारी करून घेत होते. त्यामुळे ना काही खर्च, ना काही उत्पन्न, अशी त्या काळातील साधना प्रकाशनाची स्थिती होती.

अशा पार्श्वभूमीवर, साधना साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील निवडक लेखनाचा ग्रंथसंच तयार करण्याची कल्पना डॉ. दाभोलकरांनीच पुढे आणली. त्यासाठी ग. प्र. प्रधान व रा. ग. जाधव या दोघांना मुख्य संपादक होण्याची विनंती केली.

त्यांच्या मदतीला तीन-चार साहाय्यक संपादक दिले. मग साठ वर्षांतील जवळपास तीन हजार अंकांचं मंथन करून, निवडक साधना ग्रंथसंच तयार झाला. पाचशे संच छापून घ्यायचे, त्यातील दोनशे-अडीचशे संचांची प्रकाशनपूर्व नोंदणी होईल आणि उर्वरित संच भेट देण्यासाठी व किरकोळ विक्रीसाठी वापरता येतील, असा सर्वांचाच अंदाज होता.

पण साठ वर्षांतील निवडक लेखन, अडीचशे पानांचे आठ खंड आणि प्रकाशनपूर्व सवलतीत केवळ पाचशे रुपये, हे तीनही मुद्दे भलतेच चर्चेत आले. परिणामी, ‘काहीसा तोटा सहन करून हे पाचशे संच छापून घेऊ,’ हा आधीचा अंदाज साफ चुकला. प्रत्यक्षात तीन हजार संचांची विक्री झाली. त्यामुळे सर्व खर्च वसूल होऊन, अडीच- तीन लाख रुपये शिल्लक राहिले. साधना प्रकाशनासाठी हा नवा टर्निंग पॉइंट होता.

त्यानंतर, सुरेश द्वादशीवार यांची ‘मन्वंतर’ व ‘तारांगण’, देवेंद्र गावंडे यांची ‘नक्षलवादाचे आव्हान’, नामदेव माळी यांची ‘शाळाभेट’, लक्ष्मीकांत देशमुख यांची ‘बखर भारतीय प्रशासनाची’, सुहास पळशीकर यांची ‘राजकारणाचा ताळेबंद’, राजन गवस यांची ‘कैफियत’,

राजन खान यांची ‘कथेमागची कथा’, राजा शिरगुप्पे यांची ‘न पेटलेले दिवे’ आणि ‘शोधयात्रा’, गोविंद तळवलकर यांची ‘वैचारिक व्यासपीठे’ इत्यादी लेखमाला पुस्तकरूपात आल्या. शिवाय, ‘भारतातील प्रादेशिक पक्ष’, ‘भारताचे शेजारी’, ‘तत्त्वप्रणाली व अंमलबजावणी’ या विशेषांकांचीही पुस्तकं लगेच आली.

आशय व विषय यांचा विचार करता ही पुस्तकं वैशिष्ट्यपूर्ण होती. यातील बहुतांश लेखक नामवंत होते आणि या सर्वच पुस्तकांची पहिली आवृत्ती लवकर संपत होती, त्यामुळे प्रकाशन वाढवायला चांगला वाव आहे, हा विचार डॉ. दाभोलकरांच्या मनात बळकट होत

गेला. मग अनेक लहान-मोठ्या प्रकाशकांशी आणि प्रकाशन क्षेत्रातील विविध घटकांशी ते अधिकृत बैठका घेऊ लागले. अनौपचारिक भेटीतही चर्चा करू लागले. त्यातून आशादायक व निराशाजनक अशा दोन्ही प्रकारचं चित्र पुढे येत होतं; पण ज्या कल्पना पटल्या, त्यावर डॉ. दाभोलकरांनी अनेक लहान-थोरांना घेऊन काही प्रयोग केले. मात्र, एखादा प्रयोग फसणार वा तोट्यात जाणार याचा अंदाज आला की, ते लगेच माघार घेत होते.

त्या सर्व प्रयोगांतून हेच सिद्ध झालं की, साधना अंकातील लेखनाची बहुतांश पुस्तकं सर्व अर्थांनी यशस्वी ठरतात आणि साधना अंकाच्या बाहेरील लेखनाची पुस्तकं (माझी काटेमुंढरीची शाळा हा अपवाद) सर्व अर्थांनी अयशस्वी ठरतात.

याचं कारण उघड होतं, साप्ताहिकातील लेखनाची पुस्तकं येतात, तेव्हा त्यांचं संपादन त्या त्या वेळीच झालेलं असतं, त्यांची निर्मिती सहज-सुलभ व जलद होते, त्यासाठी खर्च कमी येतो आणि साधना अंकातून जाहिरात केली, तर त्या पुस्तकांची विक्रीही चांगली होते. यातील कोणतीच अनुकूलता बाहेरून आलेला मजकूर थेट पुस्तकरूपात आणताना नसते.

डॉ. दाभोलकर पंधरा वर्षं साधनाचे संपादक होते. त्यातील आधीच्या आठ-दहा वर्षांत त्यांनी प्रामुख्याने साप्ताहिकावरच लक्ष केंद्रित केलं होतं; पण हीरकमहोत्सवापासून पुढील सहा-सात वर्षांत त्यांनी साप्ताहिकाच्या साठ वर्षांच्या सर्व अंकांचं डिजिटल स्कॅनिंग करून घेतलं.

साधना बालकुमार दिवाळी अंकांसाठी राज्यव्यापी मोहीम राबवली, साधना साहित्य संमेलनं सुरू केली, महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्य व समाजकार्य पुरस्कारांच्या कार्यवाहीची जबाबदारी साधनाकडे घेतली, साधना मीडिया सेंटर हे पुस्तक विक्री केंद्र चालवलं आणि हे सर्व करीत असताना साधना प्रकाशनाचं पुनरुज्जीवनही केलं.

या काळात मी साधनातच होतो. स्तंभलेखक, अतिथी संपादक, युवा संपादक, कार्यकारी संपादक अशी माझी लेबलं बदलत गेली; पण एवढंच खरं की, त्या दशकभरात मी डॉ. दाभोलकरांचा साधनातील उजवा हात होतो. त्यामुळे त्यांची विचारपद्धती व कार्यशैली झपाट्याने आत्मसात करीत होतो.

डॉ. दाभोलकरांच्या अखेरच्या दहा वर्षांच्या काळात जेमतेम पन्नास पुस्तकं प्रकाशित झाली; पण त्यामुळे साधना प्रकाशनाला भरारी घेण्यासाठी भक्कम खेळपट्टी तयार झाली आणि म्हणूनच ते गेल्यानंतरच्या दहा वर्षांत मला आणि माझ्या सहकाऱ्यांना उत्तम दर्जाची दीडशे पुस्तकं प्रकाशित करता आली. त्याचा परिणाम, हीरकमहोत्सवी वर्षात मराठी प्रकाशनविश्वाच्या परिघावर असलेलं साधना प्रकाशन अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा एकदा मराठी प्रकाशनविश्वाच्या केंद्रस्थानी आलं. हे कसं घडलं, पुढील लेखात पाहू..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com