युवक क्रांतीची ज्वाला

कॉलेज या मर्यादित क्षेत्रापेक्षा व्यापक कामाचे आकर्षण वाटू लागले. युवक क्रांती दल संघटना, दलित पॅंथर, श्रमिक संघटनांशी ओळख झाली आणि युवक क्रांतीशी जोडले गेले.
yuvak kranti dal sanghatana
yuvak kranti dal sanghatanasakal

कॉलेज या मर्यादित क्षेत्रापेक्षा व्यापक कामाचे आकर्षण वाटू लागले. युवक क्रांती दल संघटना, दलित पॅंथर, श्रमिक संघटनांशी ओळख झाली आणि युवक क्रांतीशी जोडले गेले.

मेडिकलच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापासून माझा अभ्यास व कॉलेजबाह्य कार्य याच्यावर चांगलाच जम बसू लागला.

वरळी सीफेसला अगदी समुद्रासमोरच्या ‘बसंत पार्वती’ या इमारतीत आम्ही म्हणजे आई, बाबा, जेहलम हे चौकोनी चेहऱ्याचे कुटुंब राहायला लागले होते. आता जेहलम चर्चगेटच्या जयहिंद कॅालेजच्या प्रथम वर्षाला जाऊ लागली होती. एकत्र कुटुंबातील तीन भावंडे म्हणजे बाबा, मोठे काका व मोहन काका यांची अशी तीन घरे झाली होती. आदर्शनगरच्या घरात आम्हा मुलांसाठीच गणपती सुरू केला होता.

घरे वेगळी झाल्यावर एक-एक वर्ष गणपती फिरता करावा का, यावर विचार झाला. पण मला व जेहलमला वाटत होते की दरवर्षी कायमच गणपती आपल्याकडे असावा. आम्ही आमचे पॉकेट मनीचे पैसे घेऊन दादरला गेलो. आमच्या या दादरच्या वाण्याकडे गणेशाच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असत.

तिथून आम्ही श्री गणेशांना घेतले व टॅक्सीने सांभाळत वरळीला गणेशांना घेऊन हजर झालो! आई-बाबांच्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही, पण प्रेमाने व श्रद्धेने आणलेल्या या गणेशजींचे आगमन मग आमच्याकडे सातत्याने होत राहिले.

पोदार मेडिकल कॉलेजात गणपती उत्सव असे. आरतीला सर्व वर्षांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी ८-१० आरत्या जोरजोराने म्हणत असत. त्यात जोश व धमाल असायची. त्यानंतर हा मोर्चा आमच्या घरी वळत असे. आमच्या त्या आलिशान इमारतीत ३०-४० मुले-मुली आरतीला आली की पंजाबी, सिंधी शेजाऱ्यांच्या भुवया उंचावत असत.

या सर्व वातावरणात कॉलेजात जी.एस.ची निवडणूक झाली. सीनियर्समध्ये दोन गट पडले. चुरस वाढत गेली. बिनविरोध निवडणूक होणार नाही व वातावरण गढूळ होईल असे दिसू लागले. आम्हा ज्युनियर मुला-मुलींवर कौल थोडा अवलंबून होता. अर्ज भरायच्या आधी कॉलेजच्या पोर्चमध्ये फॉर्म कुणी भरायचा व कुणी भरायचा नाही यातून बोलणे सुरू झाले.

काही वेळातच त्याला बोलाचालीचे रूप आले. आवाज चढले व भांडण सुरू झाले. आमचा १२-१५ चा ग्रुप असल्याने मी व शैला तिथेच होतो. एक क्षण आला की आता एक कोणी माघार घेतली तर तिढा सुटणार होता. मी तो वाईटपणा घेतला व विरोधी गटातील स्पर्धकास तुम्ही अर्ज मागे घ्या, असे म्हटल्यावर मुला-मुलींनी विरोधकांचा मोठा हुर्यो केला. चरफडतच त्या स्पर्धकाने माघार घेतली. बिनविरोध निवडणूक झाली. आमच्या ग्रुपला मात्र नंतर असुयेचे धनी व्हावे लागले.

महाविद्यालयामधील या मर्यादित क्षेत्रापेक्षा व्यापक कामाचे आकर्षण वाटू लागले. मी कथा लिहू लागले. घरात ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ व ‘मनोहर’ येत असे. मी ‘किर्लोस्कर’च्या अंकात कथास्पर्धेची माहिती वाचली. एक कथा लिहिली व त्यात भाग घेतला. विशेष म्हणजे या कथेला पुरस्कार मिळाला. नंतरही मी बरीच वर्षे अधून-मधून कथा लिहीत असे. त्यातील दीर्घ कथांचा संग्रह ‘ऊरल्या कहाण्या’ या नावाने प्रसिद्ध झाला!

कथांसोबत याच काळात ७३-७४ ला मी आंतर महाविद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याचा विचार केला. पुण्याच्या आंतरमहाविद्यालयीन रानडे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. त्यात एक प्रकार उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचा होता. विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घ्यावा की घेऊ नये, असा विषय होता.

मी राजकारणात भाग घ्यावा या बाजूने बोलले. आई माझ्या सोबतीला पुण्यात आली होती. आईमुळे मला बोलायला हुरूप होता. महाराष्ट्रातून प्रत्येक कॉलेजातून दोन प्रतिनिधी असे पुण्यात आले होते. माझ्या भाषणाला चांगला प्रतिसाद मिळाला असे वाटले. स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.

पहिल्या तीनात माझे नाव नव्हते. मी निराश झाले. तेवढ्यात उत्स्फूर्त भाषण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले होते. आम्हाला खूप आनंद झाला. या स्पर्धेचा निकाल नंतर बऱ्याच वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाला. त्यातही नाव प्रसिद्ध झाले.

काही दिवसांतच निवडक विद्यार्थ्यांना लेस्ली सॉनी फाऊंडेशन यांनी शिबिरास बोलावले. डॉ. अरुण लिमये, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. अनिल अवचट, सुधीर गाडगीळ हे त्या चर्चासत्रात होते. माझी युवक क्रांती दल संघटना, दलित पॅंथर, श्रमिक संघटना यांच्या विचारांशी ओळख झाली. मुंबईतील तुरळक बैठकांना गेले. कॉलेजची सहामाही परीक्षा ऑक्टोबरमध्ये होती, त्यामुळे मी ६-८ महिने असेच काढले.

७४ च्या डिसेंबरमध्ये औरंगाबादला युक्रांदचे वार्षिक शिबिर होते. मुंबईत शिवाजी पार्कला लक्ष्मण पाटील यांच्या घरच्या गच्चीवर युक्रांदची मिटिंग होत असे. शिबिरास मला बोलवायला पोदार मेडिकलमध्ये युक्रांदिय आले होते. त्यात एक-दोन मुलीही होत्या. दाढीवाले, झोळीधारक युवक पाहून कॉलेजमध्ये सर्वांना थोडे आश्चर्य वाटले. मग मी त्यांना घरीही घेऊन गेले. आईने शिबिराचे ऐकून लगेच परवानगी दिली नाही. ‘मी ह्यांना विचारून सांगते’ असे तिने त्यांनाही सांगितले.

शिबिर नाताळच्या सुटीत होते, त्यामुळे मला परवानगी मिळाली. शुक्रवारचे कॉलेज करून मग मी संध्याकाळी शिबिरात पोचले. आता मी एका महाविद्यालयाच्या चौकटीत राहिले नव्हते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेकडो गरीब विद्यार्थी, बेरोजगार व तुरळक मुली अशांनी शिबिराचे प्रांगण फुलून गेले होते. शिबिराचा तो अनुभव मला अविस्मरणीय ठरला.

neeilamgorhe@gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com