सुंदर मी होणार!

मी ग्रामीण स्त्रीचं जीवन पाहत होते तेव्हा मला असं जाणवलं, की त्यांची खूप सांस्कृतिक कोंडी होत आहे. काही कारण असेल तरच त्यांना घराबाहेर पडता यायचं.
Women Life
Women Lifesakal

मी ग्रामीण स्त्रीचं जीवन पाहत होते तेव्हा मला असं जाणवलं, की त्यांची खूप सांस्कृतिक कोंडी होत आहे. काही कारण असेल तरच त्यांना घराबाहेर पडता यायचं. अनेकदा स्त्रीमध्ये स्वतःच्या दिसण्याबाबत असणारा न्यूनगंड वरचढ ठरायचा. आपण दिसायला वाईट आहोत, कुरूप आहोत किंवा आपलं व्यक्तिमत्त्व चांगलं नाही अशा प्रकारची भावना अनेक स्त्रियांच्या मनात असते, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. पण, आपण सुंदर आहोत की नाही, याचं कोणीतरी आपल्याला प्रमाणपत्र देण्यापेक्षा आपलं आरोग्य, आपला व्यक्तिमत्त्वविकास, स्वतःचं काम यातून आपली सुंदरता वाढत जाते. म्हणूनच सगळ्या स्त्रियांनी ठरवायला हवं, की सुंदर मी होणार!

१९८१ ते ८४ ही तीन वर्षं म्हणजे महिला चळवळीकडून सामाजिक न्यायाच्या संघटनेकडे निघालेला प्रवास होता, असं म्हणायला हरकत नाही. या कालावधीबद्दल अतिशय तपशीलवार लिखाण अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘अपराजिता’ पुस्तकामध्ये आहे. त्यातील काही टप्पे स्त्रियांची चळवळ, त्यांचं काम, वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान आणि लिखाण अशी वाटचाल मांडणारे आहेत; परंतु माझा प्रवास दलित चळवळीच्या दिशेने कसा होत गेला ते तेवढं लिहिलं गेलेलं नाही.

१९८१ ते ८४ ही आव्हानात्मक वर्षं होतीच. त्या सुमाराला ज्या घटना घडत होत्या त्यांच्याबद्दलची माहिती माझं मन अतिशय संवेदनशीलतेने टिपून घेत होतं. उदगीरला असताना तिथल्या वातावरणात आणि आता थोडंसं अंतर पडतंय, असं वाटत होतं. खूप मोठ्या प्रमाणात मनावर आसपासच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा एक दबाव होता. त्याचबरोबर छोट्या-मोठ्या राजकीय स्पर्धा करणाऱ्या व्यक्ती किंवा लोकंही त्यात होती.

सातत्याने डी क्लास किंवा डी कास्ट होण्याबद्दलच्या कॉमेंट्स होत असत व त्या व्यक्तिगत नसाव्यात, असं म्हटलं तरी मन व्यथित होत असे. दुर्दैवाने काही चळवळींमध्ये अशी परिस्थिती आली होती, की समोरच्या माणसाला त्याच्या वैचारिक मतभेदांवरून ते न स्वीकारता सातत्याने हिणवत राहणं एक मानसिक प्रवृत्ती झालेली दिसून येत होती. काही गोष्टींच्या आपल्या मर्यादा आहेत, तर ती मजबुरी नसून अवगुण आहे, अशा पद्धतीने त्या व्यक्तीला वागवलं जात असे.

उदाहरणार्थ, तू रात्री सभा कशी घेणार? सकाळच्या वेळेला तुम्ही काय करू शकता? असे प्रश्न! म्हणजे दवाखाना चालवताय ती वेळ सांभाळली तरी चूक व मूल झालं म्हणजे संपलात तुम्ही चळवळीतून! एका बाजूला घरकामाच्या जबाबदारीसाठी सामाजिक व्यवस्थापन असावं, ही मागणी गोंडस आहे; परंतु फार थोडे लोक प्रत्यक्षात स्वतः कौटुंबिक कामात हातभार लावतात.

अशा वेळी तुम्हाला मोठी ऊर्जा मिळते ती स्वतःचं आणि सामाजिक काम यांचा तोल सांभाळूनच... सामाजिक कामातील ऊर्जा संवेदनशील व कर्तृत्ववान व्यक्ती नव्या माणसांना स्वीकारून त्यांना बरोबर घेतात त्यातून मिळते. अशा माणसांच्या सान्निध्यात तुम्ही स्वतःही उमलता, जगता, फुलता आणि इतकंच नव्हे; तर तुम्हाला दिशासुद्धा सापडते.

त्याप्रमाणे पुण्यात परत आल्यावर मला विद्या बाळ, विद्युत भागवत यांच्याबरोबर बाकीच्या सामाजिक चळवळीच्या अनेक कार्यकर्त्या भेटायला लागल्या. लेखक, विचारवंत, लिखाणाच्या स्वरूपामध्ये काही काम करत असलेल्या व्यक्ती, संशोधनाच्या स्वरूपामध्ये काम करणारी माणसं अधिक भेटायला लागली.

त्यामध्ये गं. बा. सरदार, विनायकराव कुलकर्णी, शरद कुलकर्णी, डॉ. वि. म. दांडेकर, प्रा. राम बापट, लता भिसे सोनवणे, हेमा राईलकर, मुमताज रहिमतपुरे, वसुधा सरदार, ‘मनोहर’ साप्ताहिकाचे श्री. महाबळ यांच्या भेटी व बातचीत होऊ लागली. पुण्यातील दलित चळवळीतील नावाजलेले कार्यकर्ते जयदेव गायकवाड, एल. डी. भोसले, मुरलीधर जाधव, विजय जाधव यांच्यासारख्या व्यक्तीही त्यात होत्या. ज्या खूप संघर्ष करत झगडत होत्या.

त्याचबरोबर अरुण खोरे, वरुणराज भिडे यांच्यासारखे पत्रकार होते की आपल्या कामाकडे एका निरपेक्ष बुद्धीने बघत बघत त्यांची भूमिका जीवनवादी झालेली होती. अशा अनेकांच्या जशा ओळखी होत गेल्या तसतसं मला आपण काय करतोय, त्याच्याबरोबर नक्की काय घडतंय, याचा अंदाज यायला लागला. त्यानंतर दुसरीकडे मी ग्रामीण स्त्रीचं जीवनही पाहत होते. त्यात मला असं जाणवलं, की त्यांची खूप सांस्कृतिक कोंडी होत आहे.

अनेक रुग्ण मला सांगायच्या, की आम्हाला तीन कारणांनी घराबाहेर पडता येतं. एक म्हणजे हडपसरच्या भाजी मंडईमध्ये भाजी आणायला आम्ही बाहेर पडू शकतो. दुसरं म्हणजे, घरात काही लग्नकार्य असेल किंवा काही धार्मिक समारंभ असेल तर... तिसरं कारण, दवाखान्यात येण्यासाठी आम्ही बाहेर जाऊ शकतो.

त्यामुळे आम्हाला तुमच्या दवाखान्यात यायला खूप आवडतं आणि आम्ही औषध न घेताच बरं होतो... जेव्हा सहा महिने-वर्ष- दीड वर्ष अशा गोष्टी मी पाहत आले तेव्हा मला जाणवायला लागलं, की हेच मला उदगीरला स्त्रिया सांगत होत्या. काही वेळा त्या पतीलाही सोबत घेऊन यायच्या. ‘मला औषधाचा गुण आलेला आहे, तर त्याबरोबर पतीही बरे होतील आणि आपलं कुटुंब सुखी होईल’ अशी त्यांची भावना होती.

म्हणून मग मी त्यामधून काही सवंगडी किंवा काही मैत्रिणी शोधायला सुरुवात केली. ज्या महिला म्हणत होत्या, की आपण इथे काहीतरी सुरू करू या त्यांची कल्पना आधी अशी होती, की आपण एक महिला मंडळ सुरू करावे; परंतु मला असं वाटलं, की आरोग्य आणि हिंसाचार याचा अतिशय जवळचा संबंध आहे.

त्या काळात एक प्रसिद्ध अशी चळवळ किंवा आंदोलन सुरू होते. जगात सर्वत्र आंदोलन होत होते. त्यातील मुद्दा होता स्त्रीच्या स्वतःच्या दिसण्याबाबत असणारा न्यूनगंड. अमेरिकेतील बोस्टन हेल्थ कलेक्टिव्ह ग्रुपने ‘अवर बॅाडीज अवरसेल्फ’ म्हणजे ‘आम्ही आणि आमचे शरीर’ विषयावर अशा प्रकारची अनेक संशोधनं केली. नंतर त्याची पुस्तकंही निघाली. त्याचा मुख्य सिद्धांत असा होता, की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की तिच्यात काहीतरी कमी आहे.

बाहेरच्या वातावरणामुळे किती उत्तम व अगदी आदर्श असा तिचा चेहरा असला तरी तिला ते चांगलं व सुंदर वाटत नाही. आपण दिसायला वाईट आहोत, कुरूप आहोत, आपलं व्यक्तिमत्त्व चांगलं नाही अशा प्रकारची भावना अनेक स्त्रियांच्या मनात असते, असं त्यांना संशोधनात दिसून आलं.

अत्यंत सुंदर असलेल्या स्त्रियांबाबतही त्यांच्या लहानपणी काही जणांनी त्यांच्या सुंदरतेबद्दल जी नकारात्मक विधानं केली होती, त्यामुळे त्यांच्या मनावर कायमचे ओरखडे उठले होते. ज्याच्याशी मतभेद होतात किंवा पतीला राग आला, तर त्या वेळी तो जे काही तिला शरीरावरून बोलत असतो, मग ते एकदाच असेल किंवा चारचौघात असेल त्यांनी कायम तिचं मन जखमी झालेलं होतं.

अशा न्यूनगंडामुळे स्त्री आरशासमोर बघताना पुन्हा पुन्हा हाच विचार करत राहते, की मी अजून सुंदर कशी दिसेन? अर्थात पुरुषांमध्येसुद्धा ही भावना असतेच; परंतु ज्याला आपण म्हणू की आत्मप्रेमाचा अतिरेक झाल्यावर स्त्री ही स्वतःच्या भोवती दिसण्याबद्दलच संपूर्ण गुरफटली जाते. ते गुरफटल्यावर ध्येय हेच राहतं, की मी चांगली दिसायला हवी.

मी हा विचार केला, की निरोगी शरीर व सुंदरता यातील नातं महिलांसमोर उलगडलं पाहिजे. हे माझ्या लक्षात आल्यावर मेडिकलची विद्यार्थिनी आणि स्वतः डॉक्टर होते म्हणून मी आरोग्यातून सक्षमीकरण हा विषय मनामध्ये सुरू केला. त्या वेळी एक गोष्ट लक्षात आली, की आरोग्य आणि हिंसा यांचाही अतिशय जवळचा संबंध आहे.

माझ्या रुग्णांशी मी पुस्तकावर, या संपूर्ण आत्मप्रतिमेवर जशी बोलायला सुरुवात केली तसतसं लक्षात आलं की, बहुतेक स्त्रियांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे. तो जर वाढवायचा असेल तर आपले सगळ्यांचे अनुभव कसे सारखे आहेत, याची प्रचीती त्यांना झाली तर त्यातून एकमेकींचा धीर व समजही वाढतो. दुसरं म्हणजे, स्त्रीला दिसण्यावरून असं ऐकवलं जातं त्याचं कारण म्हणजे समाजामध्ये तिचं रूप म्हणजे सर्वस्व आहे.

स्त्रीची बुद्धी, काम करण्याची शक्ती, तिची संवेदनशीलता, तिचा हळुवारपणा याच्यापेक्षाही तिच्या फक्त बाह्यरूपावरून संपूर्णपणे तिचा लेखाजोखा मांडला जातो. त्यामुळे त्यासाठीच तिचं जीवन आहे, असं तिच्या मनावर बिंबवलं जातं. अशा समजुतीतून बाहेर पडण्याची गरज आहे आणि म्हणूनच सौंदर्याची व आरोग्याची व्याख्या आपण अधिक बदलली पाहिजे. दिसण्याबाबतचा मनातील न्यूनगंड गेला की स्त्री आनंदी होते अन् खळखळून हसू लागते.

मी स्त्रियांच्या अशा मानसिकतेचं प्रतिबिंब समाजात कसं पडतं, हे पाहायला लागले तेव्हा लक्षात आलं, की स्त्रीचं जीवन ‘स्टेटस ऑफ वूमेन कमिटी’त १९७५ मध्ये डॉ. वीणा मुजुमदार आणि या समितीने वारंवार स्पष्ट केलं होतं, की आरोग्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया दुय्यम स्थानावर आहेत. ‘टू वर्डस् इक्वलिटी’ असं त्या अहवालाचं नाव होते.

तो मी स्वतः वाचला, त्याच्यावर अभ्यास केला होता आणि त्याच्यात मराठीत लिखाण केलं होतं. असे अनेक प्रबंध आणि संशोधन माझ्या मनात, विचारात, बुद्धीत रुजायला लागले होते. ते रुजल्यावर समाजाच्या वास्तविकेतून मला त्याचं प्रत्यंतर माझ्या रुग्णांमधून येत होतं. त्यातीलच काही कार्यकर्त्या पुढे आल्या आणि त्यातून आम्ही मग वेगवेगळे आरोग्यविषयक उपक्रम राबवायला लागलो.

त्या उपक्रमांमध्ये तत्कालीन पुणे शहरामध्ये लोक विज्ञान संघटना, त्यानंतर आरोग्यविषयक काम करणाऱ्या संस्थांमध्ये डॉ. अनंत फडके अशा काहींनी येऊन त्यांचे हेल्थ आणि स्लाईड शो आम्ही वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये दाखवायला लागलो. त्या वस्त्यांमध्ये त्याबाबत चर्चा झाल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदा आम्ही ते दाखवायचो आणि मग नियमित जमायला लागलो.

आपण व आपलं शरीर, आरोग्य शिक्षण यावर दर शुक्रवारी हडपसरला माझ्या दवाखान्यात बैठक व्हायची. त्यानंतर आम्ही बुद्धविहारात बैठक घ्यायला लागलो, हेसुद्धा मी आधीच्या लेखात लिहिलेलं आहेच. त्यामुळे आरोग्याच्या पायातून सौंदर्याच्या निकोप दृष्टीतून स्त्रिया कशा बदलू शकतात याचा मला प्रत्यय यायला लागला. त्यामुळे समाजप्रबोधनाचा भाग हा केवळ विचार नसतो, तर त्याबरोबरच स्त्रीआरोग्य, सौंदर्य यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा जवळचा संबंध आहे. म्हणून प्रत्येक स्त्री म्हणू शकते, सुंदर मी होणार!

डॉ. राममनोहर लोहिया यांनी असं म्हटलं आहे, की प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते व पाहणारे तिच्याकडे ज्या नजरेने पाहतात त्या डोळ्यात सौंदर्य असतं. आपल्याला आपल्या जवळचा माणूस दिसायला कसाही असला तरी सुंदर वाटतो, कारण आपल्या मनात त्याच्याबद्दल प्रेमभावना असते. त्यामुळे सौंदर्य ही सगळ्यांना स्वीकारली गेलेली संकल्पना आहे. सौंदर्यसुद्धा वेगवेगळ्या नजरेनुसार बदलत असतं.

आपण सुंदर आहोत की नाही, याचं कोणीतरी आपल्याला प्रमाणपत्र देण्यापेक्षा आपलं आरोग्य, आपला व्यक्तिमत्त्वविकास, आपलं स्वतःचं काम यातून आपली सुंदरता वाढत जाते. याचीसुद्धा जाणीव या सगळ्या अनुभवातून यायला लागली आणि त्यामुळे सगळ्या स्त्रियांनी ठरवायला हवे, की सुंदर मी होणार!

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

neeilamgorhe@ gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com