सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india

सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी...!

sakal_logo
By
- डॉ. नीरज देव

रसिका रे, ना. वा. टिळकांची ‘माझ्या जन्मभूमीचें नांव’ ही कविता शालेय जीवनात केंव्हा तरी तुझ्या वाचनात आलीच असेल. राष्ट्रीय भावनेने ओतप्रोत असलेली ही कविता आजही तितकीच उर्जस्वल वाटते. धृपदातच कवि आपल्या जन्मभूमीचे नांव आर्यभू असे सांगत तिचे नाम सामर्थ्य अन्यत्र नाही अशा शब्दात तिला गौरवितो. कवितेच्या आरंभीच कवि,
सृष्टी तुला वाहूनी धन्य!

माते, अशी रुपसंपन्न तूं,

निस्तुला तूं कामधेनू! खरी कल्पवल्ली!

सदा लोभला लोक सारा तुला॥

अशी सलामीच झाडतो. त्याला वाटते माझ्या जन्मभूमीला सर्वस्व अर्पून सृष्टी स्वतःच धन्य झाली. कारण माझी जन्मभूमी अतुलनीय आहे. तुलना करता येण्याजोगी नाही. म्हणूनच तो तिला निस्तुला या अभिधानाने संबोधतो. ती निस्तुला का? याचे स्पष्टीकरण देताना कवि म्हणतो, ती कामधेनू आहे, कामधेनू म्हणजे जिच्याजवळ मागताच सर्वकाही मिळते. तत्क्षणी त्याला वाटते मागितल्यावर तर कोणीही देईल, न मागता केवळ मनात येताच इच्छा पूर्ण करणारी अशी माझी जन्मभू आहे. म्हणून तो तिला कामधेनू, पाठोपाठ कल्पवल्ली संबोधतो. जगातील सारे लोक तिला पाहताच तिच्या प्रेमात पडतात. तिचे हे वैभव पाहून कविला नृत्याची स्फूर्ति होते. इथे कवि काळजीपूर्वक स्फूर्ति असा शब्दप्रयोग करतो. स्फूर्ति सहजी उत्पन्न होणारी व कृती केल्याविना न शमणारी उत्कट भावना असते. कवि गातो हे आर्यभूमी, तुझ्या नावातच एवढे सामर्थ्य आहे, कि जगात ते अन्यत्र कोठेही दिसणार नाही. हे सामर्थ्य आर्यभूला असेच खैरातीत मिळालेले नसून, ते तिने स्वतःच्या मेहनतीने कमावले आहे, हे दाखवताना कवि सांगतो ज्यांच्या पुढे मस्तक नम्रपणाने झुकावे, ज्यांचा आदर्श घ्यावा अशा अनेकानेक महात्मे, तत्ववेत्ते, शूर योद्धे, महाकविंची मालिकाच्या मालिकाच तिने अव्याहत जन्माला घातली आहे. तिने निर्मिलेले लेखक, कवि, साहित्यिक इतके अगणित व उच्चकोटीचे आहेत की त्याला सारस्वतांचा महासागरच म्हणावे लागेल आणि तो केवळ संख्येनेच विशाल नसून, वृत्तीने महाउदार आहे. अशा त्या महोदार सारस्वतात मी मासा बनलो तरी माझी तृष्णा शमणार नाही, इतका सुमधुर अन् तितकाच गहन गंभीर आहे. कोणत्याही देशात जन्माला येणाऱ्या तत्ववेत्त्या व शुरवीरांमुळेच त्या देशाला जगांत गुरु पद लाभत असते, हे माहित असल्यानेच कवि गातो,

हेही वाचा: फसलेल्या धाडसाची कहाणी

आई! गुरु स्थान अंती जगाचे तुझे! यात शंका न कांही जरी, जगाला शेवटी तुलाच गुरु स्थान अर्पावे लागणार. यात मला काहीच शंका वाटत नाही. कारण माझ्या जन्मभूमी विना ते सामर्थ्य अन्य कोणाचेच नाही. अशी ग्वाही कवि देतो अशा मातृभूमीच्या पोटी जन्माला येऊन आपल्या मनाला वाटणारी धन्यता वर्णताना कवि गातो,
वारा तुझ्या स्पर्शने शुद्ध झाला मला लाधला! भाग्य हें केवढें !

मातें! स्वयें देशिं जें अन्नपाणी, सुधा बापुडी कायशी त्यापुढें!

तूं बाळगीशी मला स्कंधि अंकी! सुखाची खरी हीच सीमा पुरीं!

सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी, तसें पाहिलें मी न कोठे तरी!

हेही वाचा: ती अन्‌ शाळा ....

कविच्या जन्मभूमीविषयीच्या भावना या अंतिम कडव्यात शिगेला पोहोचतात. त्याला वाटते वाहणारा वारा जन्मभूमीच्या स्पर्शाने शुद्ध झाला. अर्थात् जन्मभूमी एवढी श्रेष्ठ आहे कि तिला स्पर्शताच वाऱ्यालाही पावित्र्य लाभते. तोच वारा आपल्यालाही स्पर्शतो, हे आपले महद्‌भाग्य होय. जन्मभूमीत पिकलेले अन्नपाणी त्याला इतके मधुर लागते कि त्यापुढे अमृत ही फिके वाटावे. अशा मातृभूमीवर वावरताना सुखाची परिसीमाच होते. अशी भावना व्यक्तवित टिळक आपले काव्य चरम सीमेला नेतात. रसिका, मातृभूमीविषयीच्या इतक्या विशालतम नि तितक्याच सार्थ भावना जगातील क्वचितच कोण्या कविने वर्णिल्या असतील. अशी भावना कोणाही रसिकास ही कविता वाचताना खचितच झाल्याविना राहणार नाही.

- डॉ. नीरज देव

loading image
go to top