esakal | वक्रकोटि महाकाय : 'तुतारी'
sakal

बोलून बातमी शोधा

keshav sut

वक्रकोटि महाकाय : 'तुतारी'

sakal_logo
By
- डॉ. नीरज देव


तुतारी

केशवसुतांच्या गाजलेल्या कवितांतील सर्वाधिक गाजलेली कविता म्हणजे ‘तुतारी’ होय. या कवितेच्या नावाने एक मंडळ स्थापन करण्यात आले. अनेकानेक कवींनी या कवितेचे अनुकरण करण्याचा प्रयास केला पण ‘तुतारी’ची उंची कुणालाच गाठता आली नाही. तुतारीच्या रूपाने केशवसुतांनी सुधारणेचे बंडच पुकारले होते अशी अनेकांची साक्ष आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी नव्या प्रकारची पद्यरचनाही तुतारीतूनच वापरली. यात प्रत्येक कडव्यात पाच चरण असून, पहिल्यात वाक्यार्थाचा उपन्यास, मधल्या तीन चरणांत वाक्यार्थाचा विस्तार आणि पाचव्यात समारोप अशी रचना केली.
लोकांना जे सांगायचे आहे ते तत्कालीन रूढी-परंपरांना धक्का देणारे असल्याने केशवसुतांनी कर्कश आवाज करणारी तुतारी वापरली. पहिल्याच कडव्यात कवी गातो,


एक तुतारी द्या मज आणुनि,
फुंकिन मी जी स्वप्राणाने,
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनि,


काही जणांना प्रश्न पडतो, की केशवसुत तुतारी इतरांना का मागतात? त्याचे मुख्य कारण येथे कवी सुधारक कर्त्याच्या भूमिकेत नसून केवळ सुधारणा करणाऱ्यांचा दूत बनून आलेला असावा किंवा ही सुधारणा प्रत्यक्ष लोकांना करावी लागणार आहे हे कवीला सुचवायचे असावे. आजवर ज्यांना बोलताच येत नव्हते किंवा आपले म्हणणे मांडता येत नव्हते त्यांना बोलायला लावायला मंजूळ नाद करणारी सारंगी, सतार, वीणा, मृदंग, सनई इत्यादी कामाचे नाही तर कर्कश नाद करणारी ही तुतारीच उपयोगी आहे, असे कवीला वाटते.
अन्यायी रूढी मानव्याला फाडून खातात हे योग्य आहे का तुमच्याच मनाला विचारा. पुराणातील चमत्कार खरे अन् आताचे सर्व खोटे असे जे ढेरपोटे सांगतात त्यांचा धिक्कार, असो अशी गर्जना करत ते गर्जतात,

हेही वाचा: 700 वर्षांची परंपरा जपणार 'कोकणातलं' गाव

जुने जाऊ द्या मरणालागुनी;
जाळुनि किंवा पुरुनी टाका

जुने ते सोने नसून ते मृत झालेले आहे हा अत्यंत विद्रोही विचार मांडत जुन्याला जाळून किंवा पुरून टाकण्याचा सल्ला ते देतात, मात्र हे काम एकांगी वा ध्वसंक राहू नये तर सर्जक असावे असे त्यांना वाटते म्हणून लगेच पुढील कडव्यात ते गातात,

प्राप्तकाल हा विशाल भूधर,
सुंदर लेणी तयात खोदा।
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!


खरीच गोष्ट आहे ही. मिळालेला काळ वापरून, कालानुरूप आपल्यावर आलेले दायित्व आपण पार पाडायचे असते त्यालाच कवी विक्रम संबोधतो. त्यासाठी विसंगत अन् निरुपयोगी रूढी बाजूला सारायच्या असतात. धर्माचे तथाकथित अवडंबर कवीला बौद्धिकदृष्ट्या विचार करता अडथळे वाटतात. नीती अन् समता यासाठी ते दूर सारणारे, नाकारणारे कवीला बंडखोर अन् शूर वाटतात. त्यामुळे कवी पुढील एका कडव्यात महान सत्य सांगतो की,

हेही वाचा: आफ्रिका खंडातील सुदान देशामध्ये गणेशोत्सवाची धूम

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा,

मानवाच्या गरजा पाहून नियमांची निर्मिती होत असते पण कालौघात तेच नियम धर्म, रूढी-परंपरा या रूपाने मानव्यापेक्षा श्रेष्ठ ठरायला लागतात. त्यामुळे कळत-नकळत नियम केंद्रस्थानी पोचतात कवी स्पष्ट शब्दांत सांगतो की माणूस, माणुसकी महत्त्वाची आहे. शेष साऱ्या बाबी गौण होत.
केशवसुतांनी ही कविता २८ मार्च १८९३ ला लिहिली होती. या पहिल्या आवृत्तीत आर्थिक विषमता, स्त्रियांतील अज्ञान, पुनविर्वाह नि अस्पृश्यता इत्यादी सुधारणांचा विचार होता. त्यासाठी कवीने योजलेली कडवी काव्यदृष्ट्या पण सरस होती, मात्र सुमारे आठ वर्षांनी जानेवारी १९०१ च्या ‘मौज’मध्ये प्रकाशित झालेल्या आवृत्तीत ती स्वतः कवीनेच गाळलेली होती. कवीने केलेला विचार योग्यच होता, असेच बहुतेक समीक्षकांचे मत आहे. असो! एकंदर कवितेतील विचार नि कवितेचा काळ ध्यानात घेता केशवसुत काळाच्या खूप पुढे होते हे सहजी मान्य करावे लागते.

loading image
go to top