मनाचे यथातथ्य दर्शन : मन वढाय वढाय!

Bahinabai Chaudhari
Bahinabai Chaudhariesakal

रसिका, कवियित्री बहिणाबाई चौधरींचे (१८८०-१९५१) नाव माहीत नसलेला मराठी रसिक अभावानेच आढळेल. बहिणाबाईंचा जन्म जळगाव जवळच्या असोद्याचा आणि सासर जळगावचे. त्यांचा प्रत्यक्ष वावर खऱ्या अर्थाने पंचक्रोशीपुरता मर्यादित होता. तरीही त्यांचे अनुभवविश्‍व अत्यंत विस्तृत नि तितकेच तरल होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला, नि ऐन तारुण्यात त्यांना वैधव्य आले. त्याकाळी विधवा स्त्रीकडे बघण्याचा रोगट दृष्टिकोन, त्यातून येणाऱ्या पिडा नि संसाराचे ओझे त्यांच्यावर पडले. हे सारे सांभाळताना त्यांनी आपले समृद्ध भावविश्‍व वेगवेगळ्या कवितांतून व्यक्त केले. अक्षरओळख नसल्याने त्यांच्या कितीतरी कविता विस्मरणाच्या गर्तेत वाहून गेल्या. त्याचे पुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी त्या कविता एकदा आचार्य अत्रेंना दाखविल्या. त्या वाचून अत्रे उद्‌गारले, ‘अरे, हा तर मराठीचा अनमोल ठेवा आहे. तो दडवून ठेवू नकोस, प्रकाशित कर!’ या अनमोल ठेव्यातील एक अनोखी ठेव म्हणजे ‘मन वढाय वढाय’ ही कविता होय.

मन एक न उलगडणारे विलोभनीय कोडे आहे. युगायुगापासून मनाचा शोध अनेक कवी, साहित्यिक, तत्त्वज्ञ नि शास्त्रज्ञ घेताहेत. गीताकारांना मन सहावे इंद्रिय वाटते, त्यावर शिक्कामोर्तब करताना तर्कशास्त्र ‘सुख-दुःखाचा बोध करणारे ते मन’ अशी मनाची परिभाषा करून मोकळे होते. पाणिनीला मन नपुसंकलिंगी वाटते, तर अर्जुनाला ते ‘चंचलं ही मन कृष्ण’ वाटते. श्रीरामांना तर ते ‘मनो धावति सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत’ अर्थात, उन्मत्त संचार करणाऱ्या गजराजासारखे वाटते. तर कविकुलगुरू कालिदासाला कोमल, मुलायम वाटते. सुभाषितकारांना ‘मन एव मनुष्यानां कारणं बंधमुक्तयो:’ अर्थात, बंधन व मुक्तीचे कारण मनच आहे, असे वाटते. त्यामुळेच ते ‘मनसिच परितुष्टे को अर्थवान को दरिद्रः’चा अर्थात, मनच संतुष्ट असेल, तर गरिबी श्रीमंतीला अर्थच राहत नाही, असा सिद्धांत मांडून मोकळे होतात. याकारणानेच तुकाराम महाराज ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ म्हणत मनाच्या समाधानावर भर देतात. मात्र, योगकार वसिष्ठांना मनसंतुष्टी नाही, तर मनोनाश हाच मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग वाटतो.

Bahinabai Chaudhari
सदाबहार... १९८३!

मानसशास्त्रज्ञांचा विचार केला, तर सिग्मंड फ्राइडला तो चेतन, अर्धचेतन नि अचेतनचा तिढा वाटतो. त्यामुळेच तो त्याला वासना, नैतिकता नि त्यातील तडजोडीच्या स्वरूपात सादर करतो नि आपल्याला केवळ दशांशच मन समजू शकते, असा निर्वाळा देतो. बोधनिक मानसशास्त्रज्ञ मनाला बुद्धीच्या दावणीला जुंपतात. या सगळ्यांवर कहर करत आधुनिक मानसशास्त्र तर मनाचे अस्तित्वच नाकारते. तरीही गंमत म्हणजे मनाचे नाव घेतल्याशिवाय मानसशास्त्रालाही जगात संचार करता येत नाही.
या साऱ्या कोलाहलापासून दूर बहिणाबाई मात्र आपल्या साध्या सरळ शब्दांत मनाचे चित्तवेधक वर्णन करतात. मन कसे आहे, ते सांगताना अस्सल ग्रामीण ढंगात; पण तितक्याच अचूकतेने त्या गातात.

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर।
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर।।

ज्याप्रमाणे जनावराला कितीही वेळा हाकललं, तरी शेतातील पिकाकडे ते पुनः पुन्हा धावत येते, त्याचप्रमाणे मनसुद्धा कितीही वेळा मनाई केली, तरी एका विषयाकडे धाव घेते. रसिका बघ! यात मनाला दिलेली ‘उभ्या पीकातलं ढोरं’ची व विषयासाठी वापरलेली ‘उभ्या पिका’ची उपमा किती चपखल बसते.
पुढील कडव्यात त्या सांगतात, मन मोकाट आहे. त्यामुळे ते कुणीकडेही पळू शकते. मन हे उंडारलेले वारा वावधान आहे. मन इतकं लहरी आहे, की त्याचा भरवसा नाही. मनाच्या स्वभावाला कवयित्रीने दिलेल्या मोकाट लहरीच्या उपमा वाचताना वा ऐकताना रसिक सहमत होतो न होतो तोच बहिणाबाई आपल्या पुढ्यात मनाचे विद्रूप रूप मांडतात.

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर।
अरे! इचू साप बरा, त्याले उतारे मंतर।।

विंचू, साप यांनी डंख मारला, की ते विष भिनते हे सामान्यांना ठाऊक असणारे तथ्य होय. याचाच आधार घेत कवयित्री सांगते, की तंत्रमंत्रांनी विंचू-सापाचे विष उतरू शकते; पण मनाच्या विषाचे काय? मनाचे जहर म्हणजे कोणाविषयीचा अकारण आकस, द्वेष होय. आपण पाहतो, की कितीही समजावले, पटवले तरी तो कमी होत नाही. उलट वाढतच जातो. बहिणाबाईंना त्याचं हे तंत्र विचित्रच वाटते.
पुढील कडव्यात मनाची चंचलता वर्णन करताना त्या म्हणतात, की मन पाखरासारखे आहे. ते झटकन जमिनीवर येते नि चटकन आकाशात उडते. मन इतकं चपळ आहे, की त्याला जराही धीर नाही. वीज जशी अधीर होऊन धरतीवर कोसळते. तसंच मन अधीर झाले, की कोणावरही बरसते. येथे आपल्याला बहिणाबाईंनी चपळ मनाला दिलेली चपला-विजेची उपमा, त्यांनी जोडलेली अमाप शब्दसंपत्तीही दाखवून जाते. पुढील कडव्यात मनाचे एक आगळं रूप दाखवताना त्या म्हणतात,

मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना।
मन केवढं केवढं?, आभायात बी मायेना।।

मनाचे हे आगळेवेगळे रूप दाखविताना बहिणाबाई म्हणतात, ‘कधी कधी मन एवढी उदारता दाखवते, की तेव्हा वाटते, ते आभाळातसुद्धा मावणार नाही अन् कधी कधी ते जेव्हा कंजुषी दाखवते, तेव्हा ते खसखशीच्या दाण्याहूनही बारीक वाटायला लागते.’ ही दोन वेगवेगळी मने नसतात, तर एकाच मनाच्या दोन टोकाच्या तऱ्हा असतात. तुकाराम महाराज ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी।’ असे म्हणतात, तेच बहिणाबाईला अतिउदारतेचे लक्षण वाटते. याच लंबकात मन दोन्ही टोकाला वारंवार फिरत राहिले, तर जो मनोविकार जडतो, त्याला उन्माद, अवसाद चक्री आजार म्हणतात. त्याची ढोबळ लक्षणे बहिणाबाई वर्णितात तशीच असतात.

अशा न्याऱ्या मनाचा थांग आपल्या मनाला लागत नाही. हे पाहून बहिणाबाई थेट देवालाच विचारतात, ‘देवा! असे विचित्र मन तू कसे काय रे दिलं?’ अशी करामत करणारा योगी तूच आहेस. येथे देवाला योगी शब्द वापरताना कवयित्री आपल्या ज्ञानाची गहराईच दाखवते. कारण योगी कोण? तर जो कौशल्याने कर्म करतो तो आणि कौशल्याने कर्म करणे म्हणजे कर्म करायचे; पण त्या कर्माच्या कर्तेपणापासून मुक्त राहायचे. देवही तेच करतो हे कवयित्रीला ठाऊक आहे. मनाचे कोडे कुणालाच उलगडणे शक्य नाही. याची कल्पना आल्याने त्या सरळ देवालाच प्रश्‍न विचारतात,

देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं?
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं॥

Bahinabai Chaudhari
हिवाळा वाटे उदास, उदास !

नीट पाहिलं तर इथे कवयित्री आपल्याला मनाचे कोडे उलगडत नाही, असे दाखवताना कोणतीही उपमा न वापरता केवळ ‘आसं कसं मन’ असा चपखल प्रश्‍न विचारते अन् ते देवाला जागेपणी पडलेले स्वप्न आहे, अशी ग्वाही देऊन कविता संपवते. कुणाला वाटेल जागेपणी स्वप्नं कसे पडेल? त्यांना ठाऊकच नाही. देव कधीच झोपेत नसतो अन् त्याची कोणतीही करणी ही व्यर्थची नसते. तत्त्व चिंतनाची ही उंची गाठत कवयित्री कविता थांबवते.
बहिणाबाईंची ही कविता मनाचा गुंता सोडविण्यासाठी नाही, तर मनाचे स्वरूप जसेच्या तसे मांडण्यासाठी आहे. त्यात बहिणाबाई कमालीच्या यशस्वी ठरल्यात असेच आपल्याला म्हणावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com