संसार गीता : अरे संसार संसार...

Bahinabai Chaudhari
Bahinabai Chaudhariesakal

बहिणाबाई जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगांना अत्यंत तरलतेने चितारताना दिसतात. मग संसाराचे विशाल चित्र डोळ्यांपुढे येताच त्यांच्या वाणीला बहर न आला तर आश्‍चर्यच म्हणावे लागेल. सुमारे सत्तर- ऐंशी वर्षांपूर्वी वैधव्यात जीवन कंठताना त्यांना हा संसार खूपच कठीण वाटला असेल. पण, त्यावर मात करीत त्यांनी ‘अरे संसार संसार...’ ही अत्यंत सुंदर कविता लिहिली. आरंभीच त्या गातात-

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर

आधी हाताला चटके तव्हा मिळते भाकर

किती चपखल वर्णन आहे हे, संसार म्हणजे चुलीवरचा तवा होय. चुलीवरचा तवा गरम असतो. तो दोन गोष्टी शिकवितो, एक- सदासर्वदा कार्यतत्पर राहा. त्यामुळेच असेल घरातील गृहिणी नेहमी बजावतात, ‘गॅसजवळ असताना लाख कामं सांगा मी करेल, पण एकदा का सगळे आवरले की काहीही सांगू नका’, चुलीवरचा तवा याच कामसूपणाचे प्रतिनिधित्व करतो. ‘तवा गरम असताना पोळी भाजून घ्यावी’चा एक अर्थ काम साधून घ्यावे, असाही होतो. दुसरे- गरम तवा प्रतीक ठरतो जीवनाला आकार देण्याचे. त्यामुळेच बहिणाबाईंना गरम तवा संसाराचे प्रतीक वाटतो. हाताला बसणारे चटके म्हणजे संसारात जे अवमान, अवहेलना सहन कराव्या लागतात ते होत. कष्ट करीत, अवमानाचे चटके सहन करीत जेव्हा आपण पुढे सरकतो तेव्हाच आपल्याला यशरुपी भाकर मिळत असते, असे कवयित्रीला वाटते.

Bahinabai Chaudhari
गिरणा परिक्रमा एक चांगली सुरवात...

बेगडी नि पोकळ तत्त्वज्ञानाचे स्तोम माजवीत संसाराला खोटा म्हणणाऱ्यांना कवयित्री ठासून सांगते, की ‘संसाराला कधीच खोटा म्हणू नये. जसे देवळाच्या कळसाला लोटा म्हणू नये’ लोटा काहीच नसण्याचे प्रतीक असतो, तर कळस लोट्यासमान दिसत असला तरी वैभवाचे प्रतीक असतो. आपण म्हणत नाही का? काय होते त्याच्याकडे? शहरात आला तेव्हा त्याच्याकडे फक्त लोटा होता. हे फक्त लोटा असणे म्हणजे काही नसणे दाखवते. त्यामुळेच येथे कवयित्रीची उपमा सुबक दिसते.

कित्येकांना संसार गळ्यात अडकलेले लोढणे वाटतो. त्यांना बहिणाबाई सांगतात, संसार लोढणे नसून गळ्यातील हार आहे. लोढणे कष्टकर तर हार भूषणावह असतो. खरेतर हे भूषण मिळवायला अनेक उचापती कराव्या लागतात. कष्ट झेलावे लागतात. पण, भूषणावह होताच ते कष्ट लोपले जातात, विरून जातात. हे अत्यंत खुबीने कवयित्री येथे मांडते.

कडवी क्रमांक ४, ५ व ६ मध्ये त्या संसाराची रसाळ गोडी पटविताना त्यावरून तुरट आणि आतून गोड असणाऱ्या काकडीचे, गोडंबीचे व सुबक सागर गोट्यांचे उदाहरण रसिकांपुढे ठेवतात. तेव्हा ‘चोखा डोंगा परी रस नोहे डोंगा’ म्हणणाऱ्या संत चोखोबांची आठवण आल्याविना राहात नाही. फरक एवढाच, की चोखोबा संसाराच्या पलीकडे जाऊन बोलतात, तर बहिणाबाई अलीकडे थांबून बोलतात.

पुढील कडव्यात एक अप्रतिम सत्य मांडताना त्या म्हणतात, ‘संसार दोन जिवांचा विचार आहे. जो सुखाला नकार देतो तर दुःखाला होकार देतो.’ कोणाला वाटेल कवयित्री येथे चुकते की काय? दुःख असेल तर संसार कसा होणार? तेथे मजा तरी असेल काय? संसार तरी टिकेल का? हे प्रश्‍न विचारणाऱ्यांना मानसशास्त्रीय तथ्य ठाऊकच नाही. सुख माणसाला फक्त स्वमग्न करते, एकटे पाडते, तर दुःख एकजीव, एकजूट करते. कारण दुःख आपली अपूर्णता जाणवून देते. दुःख व्यक्ती व्यक्तीला जोडून ठेवण्याचा चिरंतन मार्ग दाखवते, हे कवयित्री अचूक हेरते.

त्यामुळेच संसार तिला दोन जिवांचा सुधार करणारा वाटतो. सुख-दुःखाचा व्यापार वाटतो. यात आपले सुख जोडीदाराला द्यायचे अन् त्याचे दुःख आपण घ्यायचे, असा प्रेमळ व्यवहार असतो, असे कवयित्रीला वाटते. छोट्या छोट्या प्रसंगावरून, मला गिफ्ट दिले नाही म्हणून भांडणाऱ्या आजच्या जोडप्यांना बहिणाबाईंचा हा कानमंत्र नक्कीच उपयोगी ठरावा. अदमासे शंभर वर्षांपूर्वी पती-पत्नीच्या समानतेचा तितक्याच समरसतेने विचार मांडणारी ही निरक्षर अन् विधवा स्त्री भल्याभल्यांना विस्मयित करून जाते.

Bahinabai Chaudhari
महिला आता प्रश्न विचारू लागल्यात...

कवयित्रीला ठाऊक आहे, की ती आदर्श संसाराची कल्पना ठेवते आहे. प्रत्यक्षात उलटे ही असू शकते. त्यामुळे ती समजावणीच्या सुरात सांगते, ‘संसार म्हणजे परमेश्वरासोबत केलेला सौदा आहे. दैवाचे देणे आहे, ते निभावले तर ते आधार देणारे ठरते.’ याचा अर्थ संसार हा आपण स्वीकारलेला सौदा असल्याने तो भांडण-तंटे

टाळत,

खुबीने मार्ग काढत जगायला हवा, हेच कवयित्रीला सुचवायचे आहे. ही संपूर्ण कविता जणू संसार गीताच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com