कॅन्सरवर उपचार करताना भावनिक मूळ शोधा 

डॉ. प्रमोद फरांदे 
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

ज्या रुग्णांवर बालपणी शारीरिक, मानसिक आघात झाले आहेत, त्यांच्यात कॅन्सर होण्याचा धोका 47 टक्‍क्‍यांनी वाढल्याचा अभ्यास "कॅन्सर' नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाल्याचा दाखला शोधनिबंधात दिला आहे. 

कॅन्सर आणि रुग्णांचा भूतकाळ यांचा जवळचा संबंध असल्याचे पुढे येऊ लागले आहे. मी स्वत: भूतकाळातील भावनिक आघात आणि कॅन्सर यांच्यातील संबंध समजून घेऊन त्या पद्धतीने स्वतःवर उपचार केले. कॅनडा येथील Dr. Adam Mcleod यांचा बालपणातील शोषण आणि कॅन्सर यावरचा शोधनिबंध नुकताच वाचनात आला. बालपणी झालेले आघात मोठेपणी कॅन्सरचा धोका वाढण्यास कारणीभूत होत असल्याचे या शोधनिबंधात म्हटले आहे. ज्या रुग्णांवर बालपणी शारीरिक, मानसिक आघात झाले आहेत, त्यांच्यात कॅन्सर होण्याचा धोका 47 टक्‍क्‍यांनी वाढल्याचा अभ्यास "कॅन्सर' नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाल्याचा दाखला शोधनिबंधात दिला आहे. 

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता ही सतत गस्त घालून काही विकृत पेशी निर्माण होत असल्यास त्यांचे रोगात रूपांतर होण्यापूर्वी त्या नष्ट करतात. आपण तणावाखाली असताना आपली रोगप्रतिकारक शक्ती खूपच म्हणजे लक्षणीयरीत्या कमी झालेली असते. त्यामुळे अशा दुर्बल प्रतिकारक शक्तीला कॅन्सरयुक्त पेशी ओळखता येत नाहीत. त्यामुळे कॅन्सर होतो. बालपणातील स्थिती आता राहिली नसली तरी त्या वेळी निर्माण झालेला तणाव मात्र तसाच राहतो. अनेकांमध्ये बालपणातील मानसिक, शारीरिक आघाताबाबत मनात भीती असते. या मानसिक भीतीतून भावनिक तणाव येतो. असे तणाव रोगप्रतिकार क्षमतेला दुर्बल बनवितात.

बालपणात आघाताला बळी पडलेल्या व्यक्ती आपल्या अनुभवाबाबत अव्यक्त राहणे पसंत करतात; तर काही रुग्ण असे अनुभव मनात येऊच देऊ नयेत आणि काहीच झाले नाही, अशा थाटात राहतात. अशा रुग्णांच्या मनावर झालेले आघात शरीरावर आतून परिणाम करतात. लहानपणी सहन केलेल्या भावनिक आघाताचे भावनिक ऊर्जेत शक्तिशाली बदल केल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. त्यासाठी कधी कधी साधे ऍक्‍युपंक्‍चर उपचार किंवा समुपदेशन रुग्णांच्या मनातील घट्ट झालेल्या भावना वर काढण्यास व त्यांचा निचरा करण्यास उपयुक्त ठरत असल्याचे शोधनिबंधात म्हटले आहे. त्यामुळे रुग्णाला बरे होण्याकडे वाटचाल करण्यासाठी त्याच्या आजाराचे भावनिक मूळ शोधणे अत्यावश्‍यक असल्याचा निष्कर्ष निघतो. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी सामना करताना आपण उपचाराचा भावनिक घटक दुर्लक्ष करून चालणार नाही, हे रुग्णांनीही लक्षात घेणे गरजेचे आहे. भावनांचा निचरा करण्यासाठी समुपदेशकाची मदत घेणे कधीही चांगले. 

Web Title: Dr Pramod Pharande article on Cancer