कॅन्सर रुग्णांना व्यायाम ठरतो वरदान 

कॅन्सर रुग्णांना व्यायाम ठरतो वरदान 

व्यायाम हा केवळ निरोगी व्यक्तींसाठीच उपयुक्त नाही, तर कॅन्सर बरा करण्यासाठीही फायदेशीर ठरत आहे. संशोधकांच्या मते नियमित व्यायाम केल्यास कॅन्सर 40 टक्के नियंत्रणात राहू शकतो. व्यायाम हा व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी जसा उपयुक्त असतो तसाच कॅन्सर रुग्णांचेही आरोग्य सुधारण्यासाठी फायद्याचा ठरतो. व्यायाम रुग्णाला केवळ बरे करतो असे नाही, तर कॅन्सर ट्रीटमेंटचे साईड इफेक्‍ट नाहीसे करण्यासही तो उपयुक्त ठरतो.

मी केमो रेडिएशन घेताना नियमितपणे सकाळ-संध्याकाळ योगासने करत होतो; मात्र ती करणे अशक्‍य वाटू लागल्याने नुसता प्राणायाम करू लागलो. त्याचा मला चांगला फायदा झाला. मी स्वत: चारचाकी चालवत रोज संध्याकाळी केमो रेडिएशनला जात होतो. प्राणायाम आणि सकारात्मक विचारामुळे हे शक्‍य झाले. 

कॅरोल माइकल्स (Carol Michaels) या कॅन्सर व्यायाम विशेषज्ञ आणि 18 वर्षांहून अधिक काळ फिटनेस सल्लागार आहेत. परवा त्यांचा एक लेख वाचनात आला. त्यांच्या मते, कॅन्सर रुग्णाला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी व्यायाम हा अत्यंत उपयुक्त मार्ग आहे. प्रत्येक कॅन्सर रुग्णाला जाणवणारे साईड इफेक्‍ट वेगवेगळे असतात, ते सारखे नसतात. त्यामुळे एकाच प्रकारचा व्यायाम सर्वांनी करणे योग्य नाही.

आवश्‍यकतेनुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायामाचा प्रकार निश्‍चित केला पाहिजे. रुग्णाची प्रकृती, आजाराचे निदान होण्यापूर्वीची शारीरिक स्थिती, कोणत्या प्रकारचा उपचार घेत आहात अथवा घेतला आहे, उपचारानंतरची शारीरिक स्थिती याचा विचार करून तज्ज्ञांकरवी व्यायाम ठरवून तो मार्गदर्शनाखाली केला जावा.

तज्ज्ञ डॉक्‍टरांनी रुग्णाची शारीरिक चिकित्सा करून समस्या समजून घेऊन तसे व्यायाम करवून घेतले तर रुग्णाच्या आरोग्यामध्ये लवकर सुधारणा होते. व्यायाम करण्यापूर्वी डॉक्‍टरांची मान्यता घेणे आवश्‍यक असल्याचे श्रीमती माइकल्स यांनी म्हटले आहे. आपल्याकडे मात्र डॉक्‍टर कॅन्सर रुग्णांना व्यायाम करण्याचा सल्ला देतात असे माझ्या तरी अनुभवाला आलेले नाही. डॉक्‍टरांनी व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे, असेही रुग्णांच्या तोंडून कधी ऐकलेले नाही. 

अशी करा व्यायामाला सुरुवात... 
कॅन्सर रुग्णाला सुरुवातीला व्यायाम करायला कंटाळा वाटेल; मात्र त्याचा फायदा विचारात घेतला तर आपल्याला प्रेरणा मिळेल. व्यायाम रुग्णाला जगायला बळ देतो. ऊर्जा, एकाग्रता वाढते. जसजशी रुग्णाच्या आरोग्यात सुधारणा दिसू लागेल तसतशी त्याला व्यायामाची प्रेरणा मिळत राहील. व्यायामामुळे शारीरिकबरोबरच मानसिक सुधारणाही होते. आयुष्याचा दर्जा वाढतो आणि रुग्ण इतरांसाठी रोल मॉडेल ठरतो. 

व्यायामाबाबत श्रीमती माइकल्स म्हणतात, ""व्यायामाला सुरुवात हळुवार श्‍वासोच्छ्वास, हलकासा ऍरोबिक, ध्यानाने करावी. जेव्हा तुम्ही रेडी व्हाल, त्यानंतर तुमची शक्ती वाढविण्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. नियमित व्यायामासाठी सकाळी उठल्या उठल्या व्यायाम करा. इतर वेळी काहीतरी अडचणी येतात. व्यायाम करताना पार्टनर असावा. त्यामुळे एकमेकांना प्रेरणा मिळेल. व्यायाम आनंदाने करा. छोटे - छोटे ग्रुप करून व्यायाम केला तरी चालेल.'' 

मी स्वत: व्यायामाला प्राणायामापासून सुरुवात केली. नंतर हळूहळू चालू लागलो. योगासने करू लागलो. तीन वर्षे नियमित चालत होतो. त्यानंतर आता शक्ती वाढविण्याकडे लक्ष देऊ लागलो आहे. शक्ती वाढविणे हा मी नव्या वर्षात संकल्पच केला आहे. 

व्यायाम का करावासा वाटतो ते लिहून काढा.... 
व्यायाम करण्याची कारणे कागदावर लिहिल्यास त्यातून व्यायाम करण्यास प्रेरणा मिळते. व्यायाम करण्याकडे दुर्लक्ष अथवा कंटाळा करू लागल्यास कागदावर लिहिलेली कारणे रुग्णाला व्यायाम करण्यास प्रोत्साहित करत राहतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com