भूडखेडा इथं पाण्यामुळे नांदली शांतता!

भूडखेडा इथले सोनाबाबा हे सगळ्यांमधला दुवा बनायचे. ते गावातली माणसं जोडायचे. तत्पूर्वी, इथल्या हिंसक, असहाय्य, निरुपयोगी, आजारी आणि ‘फरार’ झालेल्या लोकांनी संपूर्ण गाव तीन गटांत विभागलेलं होतं.
Bhudkheda Village
Bhudkheda Villagesakal

- डॉ. राजेंद्रसिंह, saptrang@esakal.com

भूडखेडा इथले सोनाबाबा हे सगळ्यांमधला दुवा बनायचे. ते गावातली माणसं जोडायचे. तत्पूर्वी, इथल्या हिंसक, असहाय्य, निरुपयोगी, आजारी आणि ‘फरार’ झालेल्या लोकांनी संपूर्ण गाव तीन गटांत विभागलेलं होतं. हे तिन्ही गट वेगवेगळ्या भागांत सक्रिय होते.

कुँवरराज, दुलैया, चमनसिंह यांनी आम्हाला गावच्या बैठकीला बोलावलं तेव्हाही मला तीन प्रकारचं संभाषण आणि आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते. ज्यांनी गावाचं विभाजन केलं ते या बैठकीला उपस्थित नव्हते. सोनाबाबा यांना रडताना पाहून मी त्यांना विचारलं : ‘‘तुम्हाला असंच गाव लुटायचं आहे की काही चांगलंही करायचं आहे?’

सोनाबाबा म्हणाले : ‘आमचं आजवरचं संपूर्ण आयुष्य उद्‍ध्वस्त झालं आहे. पुढच्या पिढीला तुमची साथ मिळत आहे. आता आम्ही सर्वजण सुधारण्याच्या तयारीत आहोत. तुम्ही ज्या गावात जाल, तिथलं वितुष्ट संपुष्टात आणता. तुमच्या कामानं शेकडो गावं सुधारली आहेत. त्या गावांमध्ये माझे नातेवाईक आहेत...त्यांच्याकडून मला कळतं.

ज्या गावांत चांगली कामं झालेली आहेत ती गावं आणि तिथली कामंही त्यांनी पाहिलेली आहेत. म्हणूनच आता त्यांची मनं बदलत आहेत. आता सर्व काही बदलेल. ते सर्व या बैठकीत नाहीत. पुढच्या वेळी ते सर्व तुम्हालाही भेटतील...’ सोनाबाबांच्या या बोलण्यात साधेपणा, सहजता आणि श्रद्धा होती. या विश्वासाचा माझ्यावरही प्रभाव पडला आहे.

काम सुरू करण्यापूर्वी मी माझ्या बाजूनं स्पष्ट केलं : ‘एकतृतीयांश श्रमाचं योगदान गावानं द्यावं लागेल तरच काही काम पुढं जाईल.’

कुँवरराज (महाराजपुरा), सोनाबाबा (भूडखेडा) हे एकत्रितपणे बोलण्यापूर्वी एकमेकांशी स्वतंत्रपणेही बोलले. त्यानंतर सामूहिक एकमतानं काम करण्याचा निर्णय घेण्यात आला अन् शुभ मुहूर्त काढण्यात आला.त्या वेळी मीही गेलो होतो. काम सुरू झाल्यावर चमनसिंह यांनी या कामाचं व्यवस्थापन हाती घेतलं. पावसाच्या आधी पूर्ण झाल्यावर आणि पुन्हा पावसाच्या पाण्यानं भरल्यावर ताल वाहिली, तीही मी बघायला गेलो.

ग्रामस्थांनी मासेमारीचा ठेका दिला. मोठे मासे पाहायलाही मी गेलो होतो. सायफन पद्धतीचा वापर करून गव्हाचं सिंचन आणि इतर सर्व काही घडताना दिसत होतं. दरम्यान, या कामात अचानक अडथळा निर्माण करण्यासाठी एकानं गुन्हा दाखल केला. सर्व अडथळ्यांवर मात करून, चांगल्या संरक्षणामुळे गव्हाचं आणि मोहरीचं मोठं उत्पादन होत असतानाही मी पाहिलं.

या अशा सकारात्मक कामांमुळे लज्जाराम, मुकेश, ओवारी, रुस्तम, राजवीर, महावीर, रामराज यांच्या मनातूनही हिंसेचे विचार दूर झाले व ते अहिंसावादी बनू लागले. हे सर्वजण आता आपापल्या गावाचा लौकिक वाढवण्यात व्यग्र आहेत.

चांगलं काम करण्याची प्रेरणा गावातील पाण्याच्या उपस्थितीतून-उपलब्धतेतून मिळाली. त्यांना कुणीही त्याग करण्यास, आत्मसमर्पण करण्यास अथवा काहीही करण्यास सांगितलं नाही, केवळ पाण्याच्या उपलब्धतेमुळे ते भयमुक्त, ‘फरार’मुक्त झाले आहेत. आणि, बेरोजगारीतूनही त्यांची सुटका झाली आहे.

स्थानिक गावकरी सांगतात : ‘आता आम्ही पाणीदार आणि श्रीमंत झालो आहोत. आमच्या कुटुंबात आमचा आदर वाढला आहे. पूर्वी महिन्यातून कधी तरीच आम्ही आमच्या बहिणीला किंवा बायकोला भेटायला यायचो, तेही घाबऱ्या अवस्थेतच. आता आम्ही एकत्रच राहतो. आता सगळेच आनंदी आहेत.’

झाडं-पाळीव प्राणी बोलतात आमच्याशी!

ओवारी म्हणतात : ‘पूर्वी आम्ही का भटकत होतो हे कळत नव्हतं.

‘माझ्याशिवाय जगणं कठीण आहे,’ आहे हे आम्हाला पाण्यानं सांगितलं! पाण्याशिवाय उपजीविका साधता येत नाही...शिवाय, विवेकपूर्णही जगता येऊ शकत नाही. रात्रंदिवस हिंडत राहायचो. आता ते जिणं संपलं. आता भोवतालची झाडं-झुडपं, आमचे पाळीव प्राणीही आमच्याशी बोलतात जणू काही, असंच आम्हाला वाटतं! आणि, आम्ही त्यांचं ते बोलणं ऐकत राहतो...हा अनुभव आम्हाला आनंदित करतो. संयम आणि समाधान...सर्व काही साध्य झालं आहे आता.’

भूडखेडा इथले लच्छूसिंह सांगतात : ‘माझ्यावर ४० केसेस होत्या. आता त्या सर्वांतून माझी सुटका झाली आहे. आता मी घाबरत नाही आणि कुणाला घाबरवतही नाही. सर्वजण माझ्यावर प्रेम करू लागले आहेत. माझं कुटुंब आनंदी आहे.’

...तर प्रत्येकाची गोष्ट ही अशी आहे. आता सर्वजण आनंदानं जगत आहेत. सर्वांना विचारलं असता तेच उत्तर मिळतं. इथं पाणी नसताना जीवन जगणंही शक्य नव्हतं. उदरनिर्वाहाच्या संधीच उरल्या नसतील, तर विवेक कसा टिकेल? पाणी आलं, जीवन उपलब्ध झालं, उपजीविकेच्या सर्व संधी उपलब्ध झाल्या.

शेरणी नदीच्या मूळ गावांची परिस्थिती सारखीच होती. आता पाणी आल्यावर सर्वांची ‘प्रकृती’ सुधारण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे. आता संपूर्ण गाव मोकळं झालं आहे आणि स्वत:ची शेती, म्हैसपालन-शेळीपालन, दूध आणि धान्योत्पादन सुरू झालं आहे.

भूडखेडाचं ‘जलशांतिखेडा’ झालंय

रुस्तम म्हणतात : ‘आता भूडखेडा हे ‘प्रेमाचं गाव’ झालं आहे! पाण्यानं प्रेम आणलं आहे. आता पाण्यानं शांतता प्रस्थापित केली आहे. आमच्या गावाचं नाव ‘जलशांतिखेडा झालं आहे आता! संपूर्ण गावात मोठ्या प्रमाणात लुटालूट आणि मारामारी होत असे...कुणीही कुणाच्या जवळही बसत नसे. आता संपूर्ण गाव एकत्र बसून एकमतानं निर्णय घेतं. प्रेमामुळे विश्वास निर्माण झाला. विश्वासानं शांतता प्रस्थापित केली. हा विश्वास पाण्यानं निर्माण केला आहे. आमचं गाव हे ‘जलशांती’चं उत्तम मॉडेल ठरलं आहे.’

राजवीर म्हणतात : ‘आता आमचं गाव जगातील सर्वोत्तम गाव आहे, असं आम्हाला वाटतं. आम्ही ग्रामस्थांनी मिळून स्वतःचा ‘घाणी तलाव’ तयार केला आहे. तो तयार करण्यासाठी आम्ही सर्वांनी आमचा पैसा गुंतवला. ‘तरुण भारत संघा’कडूनही आम्ही काही पैसे घेतले. सगळे ग्रामस्थ या तलावाचे मालक आहेत.

मात्र, इतरांचं चांगलं होत असलेलं न बघवणारेही काही लोक असतात. असे लोक चांगल्या कामात अडथळे निर्माण करतात, असाही अनुभव आला. मात्र, आमच्या गावात सोनाबाबा, बच्चीसिंह असे खूप चांगले लोक आहेत. त्यांनी गावातील अडथळे दूर केले आहेत. आता आमच्या गावालाही उपजीविका मिळाली आहे.’

महावीर म्हणतात : ‘घाणी तलाव’ आमच्या संपूर्ण गावाचं आणि शेरणी नदीचं ‘जीवन’ ठरला आहे. सरकारनं आमच्यासाठी हातपंप लावले आहेत. मात्र, ते सर्व कोरडे पडले असून, त्यांना पाणी मिळालं नाही. मग तहानलेल्या आम्ही सर्व गावांनी मिळून पंडित, ठाकूर, गुर्जर यांच्याशी एकमतानं विचारविनिमय केला व हा ‘घाणी तलाव’ तयार झाला. त्याच्यासाठी प्रत्येकानं पैसे गुंतवले...हा तलाव प्रत्येकाचा आहे. आम्ही सगळे जण त्याचे मालक आहोत. त्यानं आम्हा सर्वांना जीवन दिलं आहे. संपूर्ण गावाचं जीवन म्हणजे ‘घाणी तलाव’ होय!

संपूर्ण गावातून पैसे जमा करून ‘घाणी तलाव’ बांधण्यात आला. आता तो संपूर्ण गावाची जीवनवाहिनी ठरला आहे. तो तयार करण्यासाठी आम्ही ‘तरुण भारत संघा’ची मदत घेतली; मात्र, आम्ही स्वतः तो बांधला. तो बांधण्यासाठी संपूर्ण गाव कामाला लागलं. मात्र, काम सुरू असताना एका व्यक्तीनं - ती व्यक्ती आमच्याच समवेत असतानाही - आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. ईर्ष्येपोटी खोटे गुन्हे दाखल करून ती व्यक्ती संपूर्ण गावाला त्रास देत आहे.

या तलावावर सगळ्यांचा सारखाच हक्क आहे, अधिकार आहे. पाण्याचा लाभही सगळ्यांना सारखाच आहे. तरीही आम्हाला आणि चमनसिंह यांना त्रास देण्यासाठी आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ‘चांगलं तेच जिंकेल,’ असा आम्हाला विश्वास आहे. न्यायालय निकाल देईल आणि तलाव तसाच राहू देईल, अशी सगळ्या स्थानिकांच्या मनातली भावना आहे.’

सोनाबाबांचं वेगळेपण...

‘घाणी तलाव’ बांधायला तयार असणारी सोनाबाबा हा एकमेव व्यक्ती होती. कुँवरराज आणि चमनसिंह यांच्या पुढाकारानं हे काम पूर्ण झालं. या कामावर झालेल्या खर्चापैकी एकचतुर्थांश खर्च पहिल्या वर्षीच मासळी-कराराद्वारे करण्यात आला. गहू, जव आणि मोहरीचं उत्पादन हे खर्चापेक्षा दहापट अधिक भावानं झालं, त्यानंतर मक्याचं आणि ज्वारीचं उत्पादन होऊ लागलं.

या गावातील सर्व हिंसक लोकांनी अहिंसक होण्याचं ठरवलं आहे आणि आता ते शेतीत मग्न आहेत. ज्याच्याकडे एकही म्हैस नव्हती त्याच्याकडे आता चाळीस म्हशी आहेत. कोणताही खर्च न करता प्रत्येकाला गवत, चारा, पाणी मिळू लागलं आहे.

खर्च न करता कमाई!

अधिक खर्च करून अधिक कमाई करण्याचा सध्या ‘ट्रेंड’ आहे; पण खर्च न करता कमावणं हे तत्त्व शेरणी नदीच्या खोऱ्यात प्रस्थापित झालं आहे. इथल्या पाण्यात मासे वाढू लागले आहेत. या पाण्याच्या जमिनीतील ओलाव्यामुळे पिकांचं उत्पादन सुरू झालं आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध झाला आहे, तसंच इंधनाच्या उपलब्धतेमुळे महिलांचंही जीवन सुविधायुक्त होऊ लागलं आहे.

‘जागतिक जलशांतता वर्षा’साठी प्रेरणादायी

रामराज म्हणतात : ‘‘आम्ही कष्टात जन्म घेतला, कष्टात वाढलो... मात्र, आता आयुष्य आनंदी आहे. पाण्यामुळे शांतता आली आहे. जलशांततेनं सर्वांना सुख दिलं आहे. खेडेगावात पाणी शांतता कसं आणतं त्याचं उदाहरण आहे आमचं गाव! हे गाव संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या यंदाच्या ‘जागतिक जलशांतता वर्षा’साठी प्रेरणादायी गाव आहे...जगाला शांततेची शिकवण देणारं हे गाव आहे...

(लेखक हे आंतरराष्ट्रीय जल-पर्यावरणतज्ज्ञ आणि मॅगसेसे पुरस्कारविजेते आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com