काळावर स्वार झालेला महानायक!

डॉ. हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन या दाम्पत्याच्या पोटी अलाहाबादच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जन्मलेले अमिताभ बच्चन म्हणजे एक दंतकथाच...
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSakal

- डॉ. राजू पाटोदकर saptrang@esakal.com

महानायक अमिताभ बच्चन यांचा उद्या (११ ऑक्टोबर ) वाढदिवस, ते ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त...

डॉ. हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन या दाम्पत्याच्या पोटी अलाहाबादच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जन्मलेले अमिताभ बच्चन म्हणजे एक दंतकथाच... अमिताभ या नावाबाबत त्यांचे पिताश्री डॉ. हरिवंशराय बच्चन यांनी सांगितलं आहे, की माझे मित्र झा यांनी अमिताभसाठी इन्कलाबराय व अजिताभसाठी आझादराय अशी नावं सुचविली होती. याची पार्श्वभूमी अशी, की ऑगस्ट क्रांतीनंतर अमिताभ यांचा व स्वातंत्र्यानंतर अजिताभ यांचा जन्म झाला. पुढे कविवर्य सुमित्रानंदन पंत यांनी डॉ. हरिवंशराय यांना इन्कलाबऐवजी अमिताभ म्हणजे न संपणारा प्रकाश... हे नाव सूचित केलं आणि अमिताभ नावावर शिक्कामोर्तब झालं. मुन्ना हे त्यांचं टोपणनाव. आई-वडील त्यांना याच नावानं बोलावत. डॉ. हरिवंशराय बच्चन यांनी अमिताभ यांना लहानपणी एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता की, "अमित, मनासारखं घडलं तर चांगलं... पण जर मनासारखं नाही घडलं, तर ते अधिक चांगलं," हा आपल्या वडिलांनी दिलेला मंत्र अमिताभ यांनी जपला.

बॉलिवूड प्रवेशाचा संघर्ष अमिताभ यांनाही चुकला नाही. कठोर परिश्रमांनंतर त्यांना एक चित्रपट मिळाला. ७ नोव्हेंबर १९६९ रोजी त्यांचा ''सात हिंदुस्तानी'' हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट कारकीर्दीला नुकतीच ५२ वर्षं पूर्ण झालेली आहेत. आपल्या अर्धशतकाच्या कारकीर्दीत अमिताभ बच्चन यांनी साचेबद्ध भारतीय चित्रपटसृष्टीला एका नवीन बदलाच्या उंबरठ्यावर घेऊन जाण्याचं महत्त्वाचं काम केलं. त्यांनी आपला सहज अभिनय, प्रभावी संवाद आणि वस्तुनिष्ठ भूमिकांमुळं इतर नायकांपेक्षा हिंदी चित्रपटांवर अधिक प्रभावी ठसा उमटविला.

अमिताभ बच्चन यांची चित्रपटांतील कारकीर्द १९७३ नंतरच्या काळात हळूहळू मार्गक्रमण करत उच्च शिखरावर पोहोचली. त्यांनी आपल्या स्वयंप्रज्ञेनं या काळात विविध चित्रपटांतून प्रभावी भूमिका करून आपलं अढळ स्थान निर्माण केलं. सभोवतीच्या समाजातील प्रश्नांचं भान ठेवून संतप्त तरुणांची मतं चित्रपटांतून मांडली आणि त्यामुळंच ती युवकांना, तत्कालीन लोकांना भावली. मध्यमवर्गाच्या पलीकडं जाऊन त्यांनी आपली लोकप्रियता संपादन केली. असंतोषानं ग्रासलेल्या संतप्त युवा पिढीचं प्रभावी नेतृत्व रूपेरी पडद्यावर साकारण्याचं श्रेय अमिताभ बच्चन यांना जातं. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या नव्या पिढीच्या आशाआकांक्षा मांडताना त्यांनी आपली स्वतंत्र शैली विकसित केली. जंजीर, दिवार, कालीया, काला पत्थर, शोले, लावारीस, अग्निपथ यांसारख्या दमदार चित्रपटांतून त्यांनी पारंपरिक साचेबद्धतेला धक्का दिला. प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, यश चोप्रा आदी मातब्बर निर्मात्यांनी त्यांना तशी संधी दिली आणि अमिताभ बच्चन यांनी या संधीचं सोनं केलं.

अभिनय, संवाद कौशल्य व कलात्मक प्रभावांचा विचार करताना असं लक्षात येतं, की अमिताभ बच्चन यांनी आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व विकसित केलं. अगदी शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी नाटकांत भाग घेऊन रंगभूमीची प्राथमिक ओळख करून घेतली होती. पुढं त्यांनी शब्द आणि उच्चार यावर हुकूमत मिळवली. आई-वडिलांच्या प्रभावानं ते कला व साहित्यात रस घेऊ लागले. त्यातून त्यांच्या स्वतंत्र संवादशैलीचा उदय झाला असं म्हणता येईल. मुख्य म्हणजे, आपल्या अभिव्यक्तीमध्ये त्यांनी कृत्रिमतेचा स्पर्श कधी होऊ दिला नाही. कुठलाही कृत्रिम पलायनवाद त्यांनी आपल्या चित्रपटातून कधीही पुरस्कृत केला नाही. अगदी सहज, सुलभ, सुसंवादी अभिनयातून सामाजिक वास्तव मांडण्यावर भर दिला.

जनतेच्या सुख-दुःखांत समरस होणारा नायक, ही अमिताभ बच्चन यांची रास्त भूमिका आहे; आणि ती मुळातच इतरांपेक्षा वेगळी वाटते. त्यांच्या निवडक चित्रपटांचा अभ्यास केला असता हे अधिक स्पष्ट होतं, की शोषित पीडित माणसाचं दुःख अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपटांतून मांडलं. त्या दुःखाची त्यांनी जाहिरात केली नाही, तर त्यावर विजय कसा मिळवायचा, त्यासाठी संघर्ष कसा करायचा हेदेखील दाखवून दिलं.

सध्या संपूर्ण जग कोरोनाचा मुकाबला करत आहे. अगदी लहान-थोर सर्व स्तरांवरील मंडळी कोरोनाच्या विरुद्ध लढत आहेत. अमिताभ बच्चन यांनीदेखील कोरोनावर मात करून विजय मिळवला. कोट्यवधी चाहत्यांसाठी तो मोठा दिलासा ठरला. अडीअडचणींवर मात करणं, हा त्यांचा स्वभावगुण. त्यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक अडीअडचणींवर समर्थपणे मात केली. आरंभीच्या काळातील चित्रपट प्रवेशासाठी करावा लागणारा संघर्ष, ''कुली'' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेला अपघात, पुढं राजकारणात आलेलं अपयश, व्यवसायात ‘एबीसीएल’ कार्पोरेशनमध्ये त्यांना आलेली खोट... अशा सर्व अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी जिवापाड प्रयत्न व मेहनत घेतली, मोठा संघर्ष केला. काही चित्रपटांतील भूमिकांसाठी केलेल्या तडजोडी. या सर्व बाबी पाहता त्यांनी आपलं अपयशसुद्धा खिलाडू वृत्तीनं स्वीकारल्याचं दिसून येतं.

अपयशानं खचून न जाता त्यावर मात करण्यात त्यांना यश आलं, ही एक फार मोठी जमेची बाजू. अमिताभ बच्चन यांचं खरं यश हे अपयश पचविण्यातून दिसून येतं. आपल्या वडिलांनी लहानपणी दिलेला कानमंत्र त्यांनी आयुष्यभर जपला. निश्चितच त्याचा फायदा त्यांना होत आहे. वैयक्तिक जीवनात, तसंच व्यावसायिक जीवनात आणि प्रकृतीची चिंता या तीनही बाबतींत त्यांना अनेक वेळा पडती बाजू स्वीकारावी लागली; परंतु ते कधीही खचून गेले नाहीत. नैतिक मूल्यांच्या दृष्टीनं त्यांनी तडजोड न करता संघर्षातून यशाचा मार्ग प्रखर केला. अगदी छोट्या पडद्यावरील भूमिकांमध्ये कष्ट करून त्यांनी आपल्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर सहजपणे दूर केला आणि स्वतःमधील कलावंत जिवंत ठेवून स्वच्छ, नैतिक चारित्र्याला अधिक दिप्तीमान करून यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं.

कालोघात वाढत्या वयाचा विचार करून अमिताभ बच्चन यांनी काही वेगळ्या भूमिका स्वीकारल्या. साठीनंतर वृद्धावस्थेत झुकत असतानासुद्धा आपल्यातील कलावंत जिवंत ठेवला. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना विविध माध्यमांतून स्वीकारलं आहे, ही एक महत्त्वाची बाजू. चित्रपट असो, केबीसी मालिका असो, की अन्य जाहिराती; अमिताभ बच्चन यांची स्वतंत्र शैली आहे आणि या शैलीमुळं ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात. त्यांच्या समकालीन नायकांना जे जमलं नाही, ते त्यांनी सिद्ध करून दाखविलं. तसंच सामाजिक संदेश असो की संस्कृती ज्ञानवर्धन असो, त्यांनी विविध माध्यमांत काम करून आपला रचनात्मक दृष्टिकोन कायम ठेवला, ही बाब अधोरेखित करण्यासारखीच आहे. कलात्मक अभिव्यक्तीतून सामाजिक जबाबदारीचं तत्त्व अनुसरत, कलात्मक चित्रपट असो की जनसेवा जाहिराती असो, अथवा कोणतंही समाज माध्यम असो, त्यातील त्यांचं काम, त्यांचा हेतू निर्लेप लोकशिक्षणाचा आहे. शतकाच्या पलीकडं डोकावण्याचं सामर्थ्य एक कलावंत या नात्यानं त्यांच्यात आहे, म्हणूनच त्यांना वैश्विक महत्त्व प्राप्त झालं, हे विसरता येणार नाही.

अमिताभ बच्चन यांनी बदलत्या काळाचा वेध घेऊन नव्या जीवनाची चाहूल ओळखली. त्यांनी जाहिरातीप्रमाणेच ''केबीसी''सारख्या मालिकांतून काम केलं. छोट्या पडद्याचं महत्त्व जाणलं आणि त्यावर आपला विलक्षण प्रभाव टाकला. हजरजबाबीपणा, चतुराई व वस्तुनिष्ठता यांच्यावर भर देऊन त्यांनी आपली पावलं विचारपूर्वक टाकली. असंही म्हणता येईल, की छोट्या पडद्याचं २१ व्या शतकातील महत्त्व जेवढं त्यांना कळलं, तेवढं महत्त्व अन्य कोणत्या नटाला कळलं नाही. अगदी आजही आपण त्यांच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील जाहिराती पाहतो. यात पल्स पोलिओसारखी प्रभावी जाहिरातसुद्धा त्यांनी या छोट्या पडद्याच्या माध्यमातून केली आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचले. काळाची पावलं ओळखून त्याचा वेध घेणं हा एक महत्त्वाचा गुण अमिताभ बच्चन यांच्यात दिसतो, कदाचित तो त्यांचा एक वेगळेपणा आहे.

(लेखक माहिती उपसंचालक असून, त्यांनी ‘अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांतील सामाजिक आशय’ या विषयावर पीएच.डी. केलेली आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com