समाजभान जपणारा लेखक

आपल्या लेखनातून ग्रामीण तसेच शहरीजीवन मोठ्या आस्थेनं, डोळसपणानं, एकूणच मानवी जीवनाचं आकलन मोठ्या सामर्थ्यानं मांडणारे डॉ. रवींद्र शोभणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड
dr ravindra shobhane elected as president of akhil bharatiya marathi sahitya sammelan
dr ravindra shobhane elected as president of akhil bharatiya marathi sahitya sammelanSakal

- डॉ. अजय कुलकर्णी

मराठीमधले विख्यात कादंबरीकार, कथाकार, समीक्षक म्हणून सर्वपरिचित असलेले आणि आपल्या लेखनातून ग्रामीण तसेच शहरीजीवन मोठ्या आस्थेनं, डोळसपणानं, एकूणच मानवी जीवनाचं आकलन मोठ्या सामर्थ्यानं मांडणारे डॉ. रवींद्र शोभणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड होणं,

ही केवळ वैदर्भीयांच्या दृष्टीनंच नव्हे तर मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. डॉ. शोभणे साहित्यिक-कार्यकर्ता, कार्यकर्ता-साहित्यिक आणि नव्या पिढीला दिशा देणारे साहित्यिक आहेत.

साहित्यावर असलेली त्यांची निष्ठा सर्वश्रुत आहे. साहित्याकडं आणि समाजाकडं पाहण्याचा दृष्टिकोन जात-पात, पंथ आणि धर्म या सर्वांच्या पलीकडं जाऊन विचार करणारा साहित्यिक म्हणून डॉ. शोभणे ओळखले जातात.

बोलताना सर्वसमावेशक आणि कृतीच्या वेळी मात्र जातीचा, धर्माचा, गटाचा विचार करणारी साहित्यक्षेत्रात अनेक मंडळी आहेत. डॉ. शोभणे मात्र साहित्याची सेवा करणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख कायम ठेवतात.

त्यांच्या साहित्यात प्रामाणिकपणा, समाजाविषयी असलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि दोषांवर सडेतोड प्रहार केलेला दिसतो. म्हणूनच अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड वाड्मयीन चळवळीला अधिक सक्षम करणारी ठरते.

महाभारत भारतीय मन:पटलावर कोरलं गेलेलं एक महाकाव्य. हजारो वर्षापासून आजही महाभारतातील व्यक्ती आपल्या अवती-भोवती आहेत. त्या कधी साहित्यातून तर कधी विविध प्रसंगांतून आपल्यासमोर येत असतात.

कुणी आदर्शाचं उदाहरण म्हणून तर कुणी खलनायकाच्या रूपात आपल्याला चांगल्या-वाइटाचा परिचय करून देतात. मुळात महाभारतातील सर्वच व्यक्ती या तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य आहेत. त्यांना देवत्व बहाल केले ते आपण.

त्यांच्यावर काम, क्रोध, मोह, माया ह्या सर्वांचा मोठ्या प्रमाणात पगडा आहे. एक श्रीकृष्ण वगळता फारसं कुणाला देवत्व प्राप्त झालेलं नाही. म्हणजेच महाभारतातील व्यक्तिमत्त्वं तुमच्या-आमच्यासारखी सामान्य माणसे आहेत.

परंतु कालौघात बहुतेक साऱ्यांनाच देवत्व प्राप्त झालं. त्यामुळेच की काय त्या व्यक्ती आपल्यापासून काहीशा दूर गेल्या. त्यांचा आदर्श जोपासायचा म्हणजे आपल्यातही काही भव्य-दिव्य असणं गरजेचं असावं हा सामान्यांचा समज. म्हणूनच त्यांचा मानवतेच्या पातळीवर जाऊन शोध घेणं महत्त्वाचं ठरतं.

या सगळ्यांचं मराठी साहित्यात प्रतिबिंब कशाप्रकारे उमटलं ? बहुतेक कथा-कादंबऱ्यांमधून हे देवत्वच अधोरेखित झालं आहे. कधी अर्जुन नायक तर कधी कर्ण. त्यांच्यात असलेली अद्‍भूत शक्ती, खलनायकाचं नायकत्व, समाजाचा धार्मिक दृष्टिकोन यांना समोर ठेवून वाचकांना काय हवं ते ठरवून त्या हेतूनं सहसा पौराणिक कथा-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या.

महाभारतावरील मराठी कादंबऱ्यांचा विचार केला तर डॉ. रवींद्र शोभणे यांची ‘उत्तरायण’ ही कादंबरी वेगळी आणि महत्त्वाची ठरणारी आहे. ती यासाठी, की देवत्वाचा मुलामा बाजूला सारून माणूस म्हणून वास्तवाच्या पायावर मानवी मनाची गुंतागुंत अत्यंत ताकदीनं, तटस्थपणे त्यांनी चितारली आहे. एका नव्या परिप्रेक्ष्यातून या व्यक्तींकडं त्यांनी पाहिलं आहे.

डॉ. शोभणेंचं सामर्थ्य हे, की वाचक ऐतिहासिक कादंबऱ्या वाचताना नायकाच्या, पात्रांच्या पातळीवर जातात. ते जीवन अनुभवतात. डॉ. शोभणेंनी पात्रांनाच वास्तवाच्या पातळीवर आणलंय. त्यासाठी त्यांनी अद्‍भूततेचं आवरणच बदलवून टाकलं.

अर्थात वास्तवाच्या पातळीवर नायक-नायिकांचा विचार करणं आणि तेही महाभारतासारख्या ग्रंथातील... हे खरं तर शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. आणि हे डॉ. शोभणे लीलया करू शकले हे महत्त्वाचं. याचं कारणच मुळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि लेखनकौशल्यात आणि अभ्यासूवृत्तीत आहे.

राजकारणावरील त्रिखंडात्मक कादंबरीचा संकल्प. त्यादरम्यान ‘उत्तरायण’सारखी आव्हानात्मक कादंबरी, सामाजिक, सांस्कृतिक जबाबदाऱ्या हे सारं प्रचंड ताकदीच्या, क्षमतेच्या व्यक्तीलाच शक्य होतं. डॉ. शोभणेंनी ते शक्य करून दाखविलं.

केवळ मराठीच नव्हे तर इतर भारतीय भाषांमधील साहित्याचं वाचन, चिंतन लेखन हे सारं करीत असताना महाभारत या महाकाव्यावर त्यांनी एक शिल्पच कोरलं आहे. डॉ. शोभणे यांचा मराठी कादंबरीच्या क्षेत्रात ‘उत्तरायण’मुळं लौकिक वाढला.

सामाजिक, ग्रामीण कादंबरीच्या क्षेत्रात त्यांची लेखणी कार्यरत होतीच. त्यांच्या सामाजिक कादंबऱ्यांनी कधी अस्वस्थ केले तर कधी नवा विचार मांडला. भविष्याचा वेध घेऊन ‘चिरेबंद’ सारखी कादंबरी महत्त्वाची मानावी लागेल.

१९९५ मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली. परंपरा आणि आधुनिकता यांचा संघर्ष तसा नवा नाही. नवी पिढी आपला वेगळा विचार घेऊन जगते. समाजाची काही बंधने ती स्वीकारते तर काही मोठ्या धिटाईने नाकारते. यातूनच लिव्ह इनसारखा प्रकार आज मोठ्या प्रमाणात दिसतो. डॉ. शोभणेंनी या कादंबरीत समाजाच्या दोन्ही बाजू मांडल्या आहेत.

विवाहसंस्थेचा पुरस्कार करणाऱ्या आणि स्त्रीमुक्तीचा डंका पिटून वैयक्तिक आयुष्यात अशा घटनांना आपल्यालाच सामोरे जावे लागले तर परंपरा सोडू शकत नाहीत, हे डॉ. शोभणे अधिक सामर्थ्याने चितारतात. मुख्य म्हणजे हीच तर समाजाची खरी मानसिकता आहे.

उक्ती आणि कृतीतला हा फरक दाखवतानाच स्त्रियांच्या अनेक प्रश्नांचा परामर्श डॉ. शोभणे यांनी घेतला आहे. ‘पडघम’, ‘अश्वमेध’ आणि ‘होळी’ ही त्रिखंडात्मक राजकीय कादंबरी त्यांनी लिहिली. मराठीत साहित्यात मुळात राजकीय कादंबऱ्यांची संख्या अत्यल्प. राजकीय कादंबरी म्हटले, की केवळ अरुण साधूंकडं पाहिलं जातं.

परंतु डॉ. शोभणेंनी जेवढ्या ताकदीने सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत, तेवढ्याच ताकदीनं त्यांनी राजकीय कादंबऱ्याही लिहिलेल्या आहेत. आपल्या कादंबरीत्रयीनं त्यांनी हे सिद्ध करून दाखविलं आहे. तसं मराठी साहित्यात आणीबाणीचं चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या अभावानंच दिसतात. असल्या तरी त्यात आणीबाणीचं संपूर्ण चित्रण येत नाही.

मूल्यऱ्हास, जगण्यातील ताण, सत्ता, जीवनातील सनातन प्रश्नांचा शोध घेणारी कादंबरी म्हणून ‘पडघम’कडं पाहिलं जातं. १९७५ ते १९८४ या काळातील राजकीय घडामोडी आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम मोठ्या परिणामकारक रीतीनं डॉ. शोभणे यात मांडतात.

दुष्काळ आणि विदर्भ हे एक समीकरणच आहे. तसं ग्रामीण कादंबरीत दुष्काळाचं चित्रण करणाऱ्या अनेक कादंबऱ्या मराठीत आहेत. पाणीसमस्या ही तर विदर्भाच्या गावोगावची कथा आणि व्यथा.

डॉ. रवींद्र शोभणे यांची ‘पांढर’ ही ग्रामीण कादंबरी विदर्भातील दुष्काळाचं चित्रण करणारी. इथल्या माणसांच्या नशिबी भोगवटाच. विदर्भातल्या दुष्काळाचं चित्रण साहित्यातून अल्पांशाने आलेले. डॉ. शोभणेंनी ते ‘पांढर’मधून अधिक प्रभावीपणे मांडले.

दुष्काळाची भीषणता आणि त्याने उद्ध्वस्त होणारी माणसं याचं मन हेलावून टाकणारं वर्णन या कादंबरीत आहे. मुख्य म्हणजे ग्रामीण समाज कसा भकासतेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे, नवी पिढीचा शेती आणि गावाविषयीचा दृष्टिकोन,

पाण्यामुळे लोकांना गाव सोडावं लागणं - हे सारं मांडताना डॉ. शोभणे यांनी साक्षात त्या व्यक्ती, त्यांची दु:खं, त्यांची ससेहोलपट याचा प्रभावी असा पट वाचकांसमोर मांडलेला आहे. त्यामुळे ‘पांढर कादंबरी जिवंत मरण चित्रित करणारी शोकांत कहाणी वाटते.’ हा अभ्यासकांचा अभिप्राय रास्त आहे.

डॉ. रवींद्र शोभणे जेवढे सकस कादंबरीकार आहेत, तेवढेच ते उत्तम कथाकार आहेत. कादंबरीच्याही आधी ते कथाकार म्हणून श्रेष्ठ आहेत. याची ग्वाही त्यांच्या कथा वाचल्यानंतर सहजपणानं मिळते. कथेचा पट थोडा छोटा असला,

तरी डॉ. शोभणेच्या कथेची बीज मात्र मोठ्या क्षमतेची आहेत. त्यांच्या ‘वर्तमान’ या कथासंग्रहातील आठही कथा ह्या विविधआशयी अशा आहेत. परिस्थितीशी झुंज घेणारे नायक त्यांचे आहेत. ‘दाही दिशा’, ‘शहामृग’, ‘तद्भव’, ‘अदृष्टाच्या वाटा’, ‘चंद्रोत्सव’, ‘ओल्या पापाचे फूत्कार’ आणि ‘भवताल’ या कथासंग्रहांतील कथांमधून आधुनिक जीवन आणि त्याचे होणारे परिणाम, मानवी नात्यातील गुंतागुंत, स्त्रीपुरुष संबंधातील व्यामिश्रता इत्यादींचे चित्रण घडते.

गांधीवादी विचारसरणी असो की ग्रामीण जीवनातील अनेकांगी असो, मुस्लीम कुटुंबाची शोकांतिका असो की दोन पिढ्यांमधील वैचारिक संघर्ष, शिक्षण व्यवस्था असो की लैंगिकता या सगळ्यांचं विविध पातळ्यांवरील प्रभावी चित्रण करीत डॉ. शोभणे कथाविषयाला न्याय देतात. वाचकाच्या मन:पटलावर प्रभाव गाजवणाऱ्या कादंबऱ्यांप्रमाणंच त्यांच्या कथाही आहेत.

डॉ. शोभणे यांचा ‘प्रवाह’ या कादंबरीनं सुरू झालेला प्रवास तब्बल चार दशकांचा आहे. ११ कादंबऱ्या, सात कथासंग्रह, पाच समीक्षाग्रंथ, वैचारिक लेखन, अनेक पुस्तकांचं संपादन, अनुवाद ही साहित्य संपदा त्यांच्या लेखनसामर्थ्याची साक्ष देणारी ठरते.

अर्धशतकापेक्षा अधिक पुरस्कार आणि मानसन्मान प्राप्त झालेले डॉ. शोभणे चाळीस वर्षे सातत्यानं लेखन करताहेत. महाराष्ट्रभर विख्यात लेखक असण्याचं मुख्य कारणं ते आपल्या लेखनात आजही विविधता जपतात.

समकालीन मराठी साहित्यात डॉ. शोभणेंनी आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलंय. ते तर्कनिष्ठ दृष्टिकोनातून सामाजिक प्रश्नांची मांडणी करतात. ग्रामीण आणि आधुनिक माणसाच्या जगण्याचा वेध त्यांनी सतत घेतलाय. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय बदलांचा अभ्यासक म्हणून आणि त्यावर उत्तम भाष्य करणारा लेखक म्हणून डॉ. शोभणे ओळखले जातात.

सतत नव्याचा शोध घेणारा हा लेखक आपल्या संचिताला, अनुभवाला आपल्या साहित्यातून वाचकांसमोर आणण्यात यशस्वी झालाय. सूक्ष्म मनोविश्लेषण, समाजशास्त्रीय पार्श्वभूमी, विषयांचं मूलभूत आकलन ही त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्य म्हणता येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com