संशोधनाची दिशा आणि गती (सदानंद मोरे)

संशोधनाची दिशा आणि गती (सदानंद मोरे)

श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जसं भाषा व धर्म यांच्याकडं लक्ष पुरवलं होतं, तसं कॉम्रेड शरद पाटील यांनीही पुरवलं होतंच आणि त्याची सुरवात अर्थातच इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी करून ठेवली होती. साहसी प्रतिभावंतांच्या चुकीच्या सिद्धान्तानंसुद्धा इतिहाससंशोधनाला वेगळी दिशा मिळते. चौकटीबाहेरचे संशोधक नवी दिशा देतात. चौकटीतले संशोधक संशोधनाला गती द्यायचं काम करतात. संशोधन पुढं जाण्यासाठी दोन्ही प्रकारातल्या संशोधकांची आवश्‍यकता असते.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे-कोशकर्ते श्रीधर व्यंकटेश केतकर-कॉम्रेड शरद पाटील हा इतिहासलेखनाचा प्रवाह नीट समजून घेतला नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासाचं यथार्थ आकलन होणार नाही. राजवाडे यांचं शेवटच्या टप्प्यावरचं लेखन वाचून, ‘राजवाडे जगते तर मार्क्‍सप्रमाणे भौतिकवादी होते,’ असं कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना वाटत होतंच. डांगे हे राजवाडे यांचं संशोधन त्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करू पाहत होते, यात शंका नाही. डांगे यांच्या अभ्यासाबद्दल आणि बुद्धिमत्तेबद्दलही संशय नाही; तथापि डांगे हे पूर्ण वेळ राजकारणी होते, हे विसरता कामा नये. तेव्हा त्यांच्याकडून ही अपेक्षा करणं रास्तही नाही.

डांगे यांच्याप्रमाणे केतकर हेही पूर्ण वेळ राजकीय नेते नव्हते. त्यामुळं राजवाडे यांचे विचार अमुक एक दिशेनं न्यायलाच पाहिजेत, अशी वैचारिक सक्ती त्यांच्यावर नव्हती. त्यामुळं राजवाडे यांच्या पद्धतीशास्त्रातलं व्याकरण व व्युत्पत्ती यांच्यावर दिला जाणारा भर डांगे यांच्याकडून सुटला, तसं केतकर यांच्या बाबतीत घडलं नाही.
इकडं डांगे यांच्याप्रमाणेच पूर्ण वेळ राजकारणी असलेले शरद पाटील यांच्यामध्ये राजवाडे-केतकर यांच्या विचारांमधलं व्याकरणव्युत्पत्तीचं स्थान मात्र अबाधित राहतं, यांचं कुणाला आश्‍चर्य वाटेल; पण त्याची गरज नाही. कारण, मुळात ज्या कर्मठ मार्क्‍सवादी शोधपद्धतीमुळं डांगे यांच्यावर मर्यादा आल्या, त्यांना ओलांडून जायची पाटील यांची भूमिका होती आणि त्या ओलांडणं व्याकरण व व्युत्पत्तीला प्राधान्य देऊनच शक्‍य होईल, ही त्यांची खात्री होती. पाटील यांच्या यापुढच्या प्रवासात पाटील यांना व्याकरण व व्युत्पत्तीही पुरेशा नाहीत, याची जाणीव झाल्यामुळं ते थेट नेणिवेच्या मानसशास्त्रात घुसले; पण तो भाग वेगळा.

इथं आणखी एका बाबीचा उल्लेख करायला हवा. भांडवलशाहीच्या उत्कर्षाच्या काळातल्या युरोपात विचार करणाऱ्या मार्क्‍सला कामगारांच्या म्हणजेच श्रमिकांच्या दास्याच्या अंताचा प्रश्‍न महत्त्वाचा वाटल्यामुळं मार्क्‍सनं त्या अनुषंगानंच इतिहासाची मांडणी केली. पाटील यांची प्राथमिक बांधिलकी हीच आहे व तिथूनच त्यांच्या राजकारणाची सुरवात झाली होती. तथापि, दास्यत्वाची व्याप्ती यापेक्षा अधिक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. स्त्रियांच्या दास्याचा प्रश्‍न तितकाच महत्त्वाचा असल्याची जाणीव त्यांना झाली व भारतीय परिस्थितीत जात हे दास्याचं आणखी एक कारण असल्याचं त्यांच्या लक्षात आले. सर्वंकष दास्यत्वाच्या व त्यातून मुक्तता करून घेण्याच्या या सर्व स्तरांवरच्या प्रयत्नांच्या खाणाखुणा भारताच्या इतिहासात शोधता येतात, याची खात्री पटली. या खाणाखुणा शोधण्यासाठी व्याकरण व व्युत्पत्ती कामाला येतील, रूढ मार्क्‍सवादी पद्धतीच्या चौकटीत हे शक्‍य होणार नाही, हेही त्यांच्या लक्षात आलं. मात्र, त्यांच्या पद्धतीशास्त्राचे मर्मस्थान वेगळंच आहे. ‘भारतातल्या प्रचलित मार्क्‍सवादी वैचारिक संस्कृतीत व नेतृत्वाखाली श्रमिकांचा म्हणजेच वर्गीय प्रश्‍न महत्त्वाचा मानला जाऊन जातीच्या प्रश्‍नाकडं दुर्लक्ष झालं, याचं कारण ही संस्कृती व हे नेतृत्व उच्चवर्णीयांचं आहे, जातिव्यवस्थेत त्यांचे भौतिक-अभौतिक हितसंबंध गुंतले आहेत,’ या निष्कर्षापर्यंत ते आले व त्यातूनच त्यांच्या अब्राह्मणी पद्धतीशास्त्राचा उदय झाला. या अब्राह्मणी पद्धतीचा त्यांनी सर्वंकषपणे उपयोग केला. इतका की व्याकरण व व्युत्पत्तीही त्यातून सुटली नाही! पाटील हे अब्राह्मणी व्याकरणाची मांडणी करते झाले.

केतकर व पाटील यांच्या संदर्भात हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्य प्रवाह म्हणता येईल, अशा प्रचलित व प्रभावी असलेल्या पाणिनीच्या व्याकरणाला पर्याय होता व त्याचा उपयोग इतिहासाची मांडणी करण्यासाठी होऊ शकेल, याची जाणीव पाटलांच्याही अगोदर केतकर यांना झाली होती. मात्र, केतकर यांना सापडलेल्या या पर्यायाचा संबंध ब्राह्मणी-अब्राह्मणी अशा ‘कॅटेगरीज्‌’शी नव्हता. त्यांनी व्याकरणपरंपरेत ‘उत्तरेची’ व ‘दक्षिणेची’ असा भेद कल्पिला. पाणिनीचं व्याकरण हे उत्तरेकडचं व्याकरण होय. दाक्षिणात्यांची परंपरा वेगळी. कालौघात दाक्षिणात्य परंपरा लुप्तप्राय झाली व पाणिनीची उत्तरेकडची परंपरा प्रभावशाली ठरली. इतिहास समजून घ्यायचा झाला तर दाक्षिणात्य परंपरेचं पुनरुज्जीवन करायला पाहिजे, असा आग्रह केतकर यांनी धरला.
पाटील यांची ‘लाइन’सुद्धा अशीच आहे. मात्र, त्यांनी केलेला भेद उत्तर-दक्षिण असा नसून, ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असा आहे.

खरंतर केतकर हे पाटील यांच्या बऱ्याच जवळ पोचले होते, असं म्हणण्याइतपत पुरावा केतकरी साहित्यात पुरेसा उपलब्ध आहे. या संदर्भात ‘प्राचीन महाराष्ट्र’ या केतकर यांच्या ग्रंथातलं पुढील वाक्‍य लक्षणीय आहे ः ‘ग्रंथकार राजकुलाबद्दल तेवढी फिकीर दाखवितात; तथापि खरा सांस्कृतिक व सामाजिक इतिहास पाहावयाचा म्हणजे जातीविषयक इतिहासाकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे ‘आणि’ राजकीय इतिहास या भाषात्मक इतिहासातलं एक उपप्रकरण आहे.’’
आणि जातीविषयक इतिहास लिहिण्यासाठीच मराठी भाषेचा अभ्यास व्हायला हवा, असंही केतकर सुचवतात.
पाटील बऱ्याच प्रमाणात संस्कृत व काही प्रमाणात प्राकृत भाषांच्या क्षेत्रात वावरले. मराठीपर्यंत पोचले नाहीत. त्यामुळं केतकर-पाटील यांच्याविषयीची चर्चाही त्याच मर्यादेत करणं उचित ठरेल.

भाषेची चर्चा करताना केतकर पाणिनीपूर्व व्याकरण संप्रदायांकडं वळतात. या संदर्भात ‘निरुक्त’कार यास्काचार्य यांचा उल्लेख अपरिहार्यच आहे; पण त्यानंतर केतकर जे सांगतात ते अधिक महत्त्वाचे आहे. त्यानुसार ‘पाणिनीपूर्वीचे व्याकरणसंप्रदाय दक्षिणेत रूढ होते. यावरून संस्कृत व्याकरणाचा अभ्यास दक्षिणेत पाणिनीच्या पूर्वीचा आहे.’ यादवकालीन महाराष्ट्रीय व्याकरणकारानं आपल्या ‘मुग्धबोध’ या ग्रंथात व्याकरणकारांची यादी देणारा श्‍लोक रचला आहे, तो केतकर उद्‌धृत करतात. या यादीतल्या शाकटायनासारख्या काही विद्वानांकडं पाटील अब्राह्मण व्याकरणाचे पुरस्कर्ते म्हणून पाहतात.

पाणिनी, कात्यायन, पतंजली या व्याकरणातल्या मुनित्रयाची चर्चा करून झाल्यावर केतकर लिहितात ः ‘पतंजलीच्या महाभाष्यात व्याकरणशास्त्राच्या विकासाचा निदान त्या काळापुरता तरी कळस झालेला दिसतो. पुढची तीन-चार शतकं प्राकृत भाषांच्या वाढीतच गेल्यानं ती संस्कृत व्याकरणाच्या विकासाच्या दृष्टीनं जवळजवळ टाकाऊच ठरतात, तेव्हा पतंजलीनंतर व्याकरणाचे इतिहासकार बऱ्याच उत्तरकालीन चंद्रगोमिन्‌ या वैय्याकरणाकडं वळतात. आपणास त्याविषयी सध्या काही कर्तव्य नाही.’’

चंद्रगोमिन्‌ हा वैदिक परंपरेतला नसल्यामुळं त्याच्यासारख्याच्या व्याकरणातून उपलब्ध होणारे पुरावे पाटील यांना अत्यंत महत्त्वाचे वाटतात, हे उघड आहे. हेच त्यांचं अब्राह्मणी व्याकरण होय.
केतकर यांच्या इतिहासामधला संघर्ष हा उत्तर आणि दक्षिण, तसंच संस्कृत आणि प्राकृत यांच्यामधला आहे. विशेषतः महाराष्ट्री प्राकृतमधल्या लेखनाची प्रतिष्ठा त्यांना महत्त्वाची वाटते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘संस्कृत काव्याचे आणि इतर साहित्याचे भवितव्य ठरवण्यास प्राकृत काव्य आणि विशेषतः महाराष्ट्री काव्य कारण झाले...संस्कृत साहित्याचे आणि त्यांच्या शास्त्राचे अस्तित्वच महाराष्ट्री प्राकृत काव्याने शक्‍य केले असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.’

पाटील यांना विशिष्ट प्रांतात किंवा विशिष्ट भाषेत स्वारस्य नाही. त्यांच्यासाठी इतिहास हा दास्यत्वाचा, दास्यमुक्तीच्या प्रयत्नांचा व त्यासाठी केल्या गेलेल्या संघर्षाचा इतिहास आहे. या इतिहासाचा उत्कर्षबिंदू म्हणजे अर्थातच समताधिष्ठित समाजरचना हाच असणार, हे वेगळं सांगायची गरज नाही.

थोडक्‍यात सांगायचं झाल्यास, शरद पाटील हे पूर्णवेळ राजकारण व पक्षकारण करणारं व्यक्तित्व. अर्थात त्यांचा कम्युनिस्ट पक्ष हा मुळातच विशिष्ट अशा शोधपद्धतीनं रचल्या गेलेल्या इतिहासाच्या मांडणीवर विश्‍वास ठेवून त्या अनुरोधानं राजकारण करणारा असल्यानं या राजकारणाचा परिणामही इतिहासाच्या मांडणीवर होणं अटळ असतं. या पक्षाचे नेते इतिहासाच्या माध्यमातून पक्षाच्या राजकारणाची आखणी व समर्थन करत असल्यामुळं इतिहासाची मांडणी राजकारणात पूरक ठरावी, याची शक्‍य होईल तेवढी काळजी ते घेत असतात. या पद्धतीत प्रतिकूल पुराव्याकडं दुर्लक्ष करणे, त्याचा अनुकूल असा अन्वयार्थ लावणं, त्याच्यामुळं आपल्या सिद्धान्ताला बाधा येणार असेल, तर सिद्धान्तामध्ये कामचलाऊ डागडुजी करणं अशा कृतींचा समावेश होतो. या प्रवृत्तीवर गेल्या शतकातले प्रसिद्ध विचारवंत कार्ल पॉपर यांनी कठोर टीका केली आहे.
पॉपर यांच्या या टीकेतून पाटील यांना वगळण्याची आवश्‍यकता नाही. योग्य निष्कर्षाच्या अगदी जवळ येऊनसुद्धा विशिष्ट राजकीय प्रणाली पुढं नेण्याच्या वृत्तीनं मात केल्यामुळं संशोधन कसं भरटकतं, याची अनेक उदाहरणं सापडतात.
ते काहीही असो. पारंपरिक मार्क्‍सवादी बैठक, मानववंशशास्त्राची जोड आणि व्युत्पत्तिज्ञान यांच्या आधारे पाटील अवैदिक संस्कृतीचा वेध घेऊ शकले, हे कुणीच नाकारू शकत नाही. अर्थात त्यांच्यालेखी समतेसाठी केला जाणारा संघर्ष महत्त्वाचा असल्यानं ते त्या संघर्षाचा मागोवा घेत थेट अनार्य देवता निॡतीपर्यंत पोचले. हा मागोवा घेत असताना पाटील यांनी ‘समाजातला प्राथमिक साम्यवाद’ या पारंपरिक मार्क्‍सवादी धारणेला आव्हान दिले. सगळ्यात अगोदर स्त्रीसत्ताक समाजरचना होती, असं प्रतिपादन केलं. त्यातून गणदेवता, द्यूत आदी गोष्टींचा त्यांनी नव्यानं अन्वयार्थ लावला.

केतकर यांच्या इतिहासाच्या मांडणीत अशा प्रकारच्या अन्वयार्थाचा प्रश्‍नच उद्भवत नव्हता; परंतु, स्वतः केतकर हे वर्तमानकालीन स्त्रीदास्याच्या विरुद्ध होते आणि या दास्याचा अंत घडवून नवीन समतावादी रचना अस्तित्वात येण्यासाठी ‘ब्राह्मणकन्या’ या आपल्या कादंबरीतल्या वैजनाथशास्त्री धुळेकर या पात्राकरवी नवी स्मृती बनवून घेतली. हे धुळेकरशास्त्री म्हणजे दुसरं-तिसरं कुणी नसून, इतिहासाचार्य राजवाडे यांना केतकर यांनी दिलेलं नवं रूप होतं. तो राजवाडे यांचा ‘मेटॅमॉर्फोसिस’ होता. (याविषयीचं सविस्तर विवेचन ‘गर्जा महाराष्ट्र’ या  माझ्या ग्रंथात करण्यात आलेलं आहे). थोडक्‍यात, या अर्थानं एका वेगळ्या पातळीवर राजवाडे-केतकर-पाटील असा अनुबंध जोडता येतो. नाहीतरी पाटील यांच्या शोधपद्धतीत नेणितेच्या मानसशास्त्राला स्थान आहेच.

अर्थात यापूर्वीच सूचित केल्याप्रमाणे, महाराष्ट्राचा इतिहास हे केतकरांचं लक्ष्य आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाला भारताच्या आणि जगाच्या इतिहासाशी जोडून घेण्याचा त्यांचा व्यापक प्रयत्न आहे; पण तरीही केंद्रस्थानी महाराष्ट्रच आहे. पाटील यांच्यासाठी महाराष्ट्राचा इतिहास तितका महत्त्वाचा असायचं कारण नाही. शेवटी ते मार्क्‍सवादी आहे आणि मार्क्‍सच्या लेखी संपूर्ण मानवसमाज हाच इतिहासाचा विषय असतो. कुणी देशाचा वगैरे इतिहास लिहायचा झाला, तर तो एकूण मानवसमाजाच्या इतिहासाचा भाग असेल.

अर्थात असं असलं तरी पाटील यांचं भौगोलिक कार्यक्षेत्र महाराष्ट्र हेच होतं. त्यांना सहकारी, अनुयायी वा कार्यकर्ते मिळणार होते ते महाराष्ट्रातूनच आणि विरोध झाला असता तर तोसुद्धा मुख्यत्वे महाराष्ट्रातूनच. त्यामुळं निदान व्यावहारिक कारणांसाठी का होईना, त्यांना महाराष्ट्राकडं लक्ष द्यायची गरज होतीच.
दरम्यानच्या काळात मीदेखील महाराष्ट्रासंबंधी, महाराष्ट्राच्या संतपरंपरेसंबंधी व आधुनिक महाराष्ट्रातल्या चळवळींसंबंधी लेखन करत होतो. पाटील आणि माझा वैयक्तिक व जाहीर पातळीवर संवाद होता. मी एकदा त्यांना उद्देशून असं लिहिलं, की ‘आपण ज्या कालखंडाविषयी, म्हणजे अतिप्राचीन काळाविषयी, लिहीत आहात, त्यात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला स्वारस्य असायचं काही कारण नाही. लोक आपली ‘आयडेंटिटी’ सांगताना इतिहासात इतक्‍या मागं जाऊन त्या काळातल्या नायकांशी तद्रूपता सांगत नाहीत. मराठी माणसापुरतं बोलायचं झाल्यास तो यादवकाळापर्यंत जातो. त्या काळातले चक्रधर, नामदेव, ज्ञानेश्‍वर, मुक्ताई, जनाई हे त्यांच्या निजात्मतेचे भाग बनले आहेत. त्यानंतर अर्थातच शिवकाल. शिवाजीमहाराज हे तर महाराष्ट्राच्या निजखुणेचे मानबिंदू ठरलेले आहेत. पूर्वीच्या चालुक्‍य, राष्ट्रकूट इत्यादींबद्दल मराठी माणसाला फारशी आस्था नसते; त्यामुळं ज्याला चळवळीसाठी इतिहासाचा उपयोग करायचा असेल, त्याला संत आणि शिवराय यांना धरूनच इतिहासाची मांडणी करायला हवी.’

मी म्हणालो म्हणून नव्हे, पण शरद पाटील हे यथावकाश या प्रांतात प्रविष्ट झाले. त्यांनी तांत्रिक शाक्त मार्गासंबंधीचे सिद्धान्त या कालखंडाला लावले व त्यातून इतिहासाची एक वेगळी मांडणी पुढं आली. तिच्यावर त्यांच्या राजकारणाची दाट छाया असणं अपेक्षितच होतं.

पाटील यांची इतिहासमीमांसा हा आपल्या चर्चेचा विषय नाही. मला एवढं दाखवून द्यायचं आहे, की धर्म व या संदर्भात धर्माचा इतिहास हासुद्धा इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भाषा हे जसं संस्कृतीचं एक महत्त्वाचं अंग आहे, तसंच धर्म हेही महत्त्वाचं दुसरं अंग विशेषतः भाषेची प्राचीन रूपं शोधायची असतील, तर ती धार्मिक ग्रंथांत व कर्मकांडात सापडणार. भाषा व धर्म यांच्याकडं केतकर यांनी लक्ष पुरवलं, तसं पाटील यांनीही पुरवलं होतंच आणि त्याची सुरवात अर्थातच राजवाडे यांनी करून ठेवली होती.

यासंदर्भात डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. भांडारकर यांची विद्वत्ता, व्यासंग अशा बाबी जमेस धरूनही भांडारकर या तिघांच्या चर्चेत येत नाहीत याचं कारण म्हणजे राजवाडे-केतकर-पाटील यांच्याकडं असलेलं ‘प्रातिभ साहस’ भांडारकर यांच्याकडं नाही. भांडारकर हे चौकटीत काम करणारे श्रेष्ठ संशोधक होत; पण चौकट मोडण्याचं, ‘पॅरेडाईम’च बदलण्याचं, उलथापालथ करण्याचं काम त्यांचं नव्हे. साहसी प्रतिभावंतांच्या चुकीच्या सिद्धान्तानंसुद्धा इतिहाससंशोधनाला वेगळी दिशा मिळते. चौकटीबाहेरचे संशोधक नवी दिशा देतात. चौकटीतले संशोधक संशोधनाला गती द्यायचं काम करतात. संशोधन पुढं जायला दोघांचीही गरज असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com