तहान मायेची...

‘ऐक ना...लवकर ‘ओटी’मध्ये ये,’ सकाळी सकाळी खाली हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला गेलेल्या आमच्या ‘अहों’चा कॉल आला. माझी योगासनं सुरू होती.
Hospital Treatment
Hospital Treatmentsakal

- डॉ. साधना भवटे, sadhanabhaote123@gmail.com

‘ऐक ना...लवकर ‘ओटी’मध्ये ये,’ सकाळी सकाळी खाली हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला गेलेल्या आमच्या ‘अहों’चा कॉल आला. माझी योगासनं सुरू होती. त्यांत व्यत्यय आल्यामुळे थोडी नाराजच झाले मी...पण जाणंही गरचेचंच होतं.

मी आहारतज्ज्ञ व फिजिओथरपिस्ट आहे; पण बऱ्याच वेळेला होतं काय की, महिलारुग्णाचं ऑपरेशन असलं की महिलांना कम्फर्टेबल वाटावं म्हणून काही वेळेला माझे पती मला ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावून घेतात...अन् मीही आवडीनं जातेच; कारण, त्यानिमित्तानं सगळ्यांशी गप्पाही होतात...पण आज अगदी वेळेवर बोलावल्यानं माझं सकाळचं रुटीन डिस्टर्ब होणार होतं..आणि एकदा तसं झालं की दिवसभराची कामं बारगळतात..पण नाइलाजानं का होईना, गेलेच मी...

पण जाताक्षणीच वाटलं, बर झालं आले मी. कारण, तिथं होती एक चौदा-पंधरा वर्षांची, दहावीत शिकत असलेली मुलगी. ऐश्वर्या. थोडी घाबरलेली, बावरलेली. आणि, का नाही बावरणार? मुख्य डॉक्टर सोडून बाकी सगळेच अनोळखी होते तिला. भूल देणारे डॉक्टर, बाकीचे तीन असिस्टंट्स...सगळेच.

मात्र, मला पाहिलं अन् चेहराच उजळला तिचा. रिलॅक्स झाली ती थोडी. तिची सर्जरी मांडीची होती. भुलीचं इंजेक्शन देताना त्रास कमी वाटावा म्हणून मी तिचा हात हातात घेतला. तिनंही लगेच हात घट्ट धरल्याचं जाणवलं. अगदी गार होता तिचा हात; पण का कुणास ठाऊक, त्या गारव्यापेक्षाही जाणवली ती तिची तहान! तहान त्या मायेच्या, प्रेमळ, आश्वासक स्पर्शाची. आणि, मग पूर्ण वेळ एकटक माझ्याकडंच पाहत राहिली ती...

माझ्या स्वभावानुसार लगेच मी तिच्याशी गप्पा मारू लागले आणि तीही अगदी भडाभडा सांगायला लागली सगळंच. दूध उतू जावं तसं. जसं काही माझ्या विचारण्याचीच वाट पाहत होती ती.

‘मी पाच-सहा वर्षांची असतानाच माझी आई गेली, मॅडम. आणि, थोड्याच दिवसांत पप्पांनी मला न सांगताच लगेचच दुसरं लग्न केलं; पण नवीन आईला काही मी आवडत नव्हते. नवी आई पप्पांशी भांडली. म्हणाली : ‘‘या घरात एक तर मी राहीन, नाहीतर ही तुमची मुलगी.’

मग काय, पुढल्याच महिन्यात मला माझ्या नानीकडं पाठवून देण्यात आलं. मॅडम खरं सांगू... ती नवीन आई असं म्हणाली तेव्हा जास्त वाईट वाटलं नाही; कारण, शेवटी तशी ती माझी कुणीच नव्हती; पण माझ्या पप्पांनी एकदा तरी माझ्यासाठी लढायला हवं होतं!

ते काहीच बोलले नाहीत, आणि जणू काही सोडूनच दिलं त्यांनी मला. खूप खूप रडायला येतं मॅडम, ते सगळं आठवलं की..’

‘माय मरो; पण मावशी जगो’ असं म्हणतात ना...तसं झालं होतं ऐश्वर्याच्या बाबतीत. मावशीनं आणि आजीनं तिची जबाबदारी घेतली. आणि, आता एवढ्या वर्षांपासून ती त्यांच्याबरोबरच राहत आहे.

‘एवढं मोठं ऑपरेशन होतंय माझं...पण मॅडम, माझ्या पप्पांनी मला येऊन साधं पाहिलंही नाही...का करत असतील असं पप्पा? त्यांचीच तर मुलगी आहे ना मी...? माझ्याबद्दल काहीच प्रेम का वाटत नसेल हो त्यांना? मम्मी तर लवकर गेलीच मला सोडून; पण हे पप्पा तर असूनपण नसल्यासारखेच आहेत...’ ऐश्वर्या तिचं मन मोकळं करत राहिली.

धस्स झालं काळजात माझ्या! किती हे दुःख अन् एकटेपणा एवढ्याशा जिवाला? का बरं असं करत असेल हा परमेश्वर तरी? काय चूक आहे हिची?आई-वडील असणं ही तर किती मूलभूत गरज असते ना या पिल्लांची. डोळ्यांत पाणी येण्याच्याच बेतात होतं; पण मी ते येऊ दिलं नाही. कारण, भोवती सगळेच होते.

लगेच आमचे डॉक्टरसाहेब म्हणाले : ‘‘अरे बेटा, जास्त टेन्शन घायचं नाही...हे बघ, ही मॅडम तुझी मम्मी आणि मी म्हणजे तुझा पप्पा...’ लागलीच हसली खुदकन ती.

थोड्याच वेळात ऑपरेशन संपायला आलं. ‘‘आता मॅडमना जाऊ दे बेटा,’’ डॉक्टर म्हणाले. मात्र, ती काही माझा हात सोडायला तयारच नव्हती. तिच्याकडे पाहिलं तर ती डोळ्यांनीच जणू मला म्हणत होती : ‘‘थांब ना गं थोडा वेळ...आई!’

तिची ती तहान पाहून मलाही प्रेमाचा पान्हा फुटला.

थोडा वेळ आणखी थांबून, तिच्या डोक्यावरून हात फिरवत, गप्पा मारत, तिला गोंजारत राहिले मी. थोडा वेळ का होईना, दिली मी माझ्यातली आई तिला! तीही अगदी तहानलेल्या बाळागत मनात साठवत राहिली माझी माया...

त्या दिवशी पूर्ण वेळ फक्त ऐश्वर्याच होती माझ्या डोक्यात अन् काळजात. मन सारखं आर्जव करत राहिलं : ‘परमेश्वरा, बाकी काही दे किंवा देऊ नकोस रे...पण प्रेमाचं, मायेचं भरभरून ऐश्वर्य दे माझ्या ऐश्वर्याला...’

खरंच, कधीच विसरू शकणार नाही मी तिला...अन् कदाचित तीही मला...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com