
ज्ञानेश्वरीचं जन्मगाव!
आता या घटनेला आठ वर्षं होऊन गेलीत. रयत शिक्षण संस्थेचे तत्कालीन चेअरमन, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या रयत विज्ञान परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. २८ फेब्रुवारी, १ व २ मार्च २०१४ या तीन दिवसांत झालेल्या या परिषदेच्या नियोजनासाठी आम्ही संस्थेच्या श्रीरामपूर येथील कार्यालयात बसलो होतो. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी इतकंच नव्हे, तर श्रीरामपूर परिसरातील अगदी वारकरी मंडळींनीही या रयत विज्ञान परिषदेसाठी यावं अशी चर्चा झाली. ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. अनिल काकोडकर यांनी परिषदेला येणार होते. त्यामुळे आम्हा सर्वांनाच विशेष आनंद झाला. प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अफाट परिश्रम घेऊन रावसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही विज्ञान परिषद अत्यंत कल्पकतेने यशस्वी केली.
डॉ. माशेलकर सरांच्या संपूर्ण दौऱ्याची जबाबदारी रावसाहेबांनी माझ्यावर सोपवली होती. विज्ञानदिनी, २८ फेब्रुवारीला सकाळी परिषदेचं उद्घाटन करण्याचं ठरलं होतं. माशेलकर सर दिल्लीहून पुण्याला येऊन २८ रोजी श्रीरामपूरला पोहोचणार होते. पण, मला एक कल्पना सुचली, रावसाहेबांशी बोलून ती मी माशेलकर सरांना सांगितली. आदल्या दिवशी, म्हणजेच २७ फेब्रुवारीला (जागतिक मराठी दिन) त्यांनी दिल्लीहून पुण्याला न येता संध्याकाळपर्यंत औरंगाबादला यावं आणि मुक्काम श्रीरामपूरलाच करावा. कारण ऐन मराठीदिनी वाटेत नेवाशाला थांबता येईल आणि ज्या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी विश्ववंद्य ज्ञानेश्वरी साकारली, त्या मंदिरातील ‘पैस’ (खांबा)चं दर्शन घेता येईल. माशेलकर सरांना ही कल्पना खूपच आवडली, त्यांनी आपल्या दौऱ्यात आवश्यक ते बदल केले. विमानाने ते औरंगाबादला पोचले. ज्या पाषाणाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कथन केली, त्याची गळाभेट घेऊन दर्शन घेण्याची प्रथा तिथं आहे. आम्ही सर्वांनी त्या पद्धतीने दर्शन घेतलं. अक्षरशः अंगावर शहारे आले. ‘आपल्या आयुष्यातील हा एक अद्भुत, रोमांचकारी अनुभव आहे, मी कृतार्थ आहे,’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया डॉ. माशेलकरांनी तिथं व्यक्त केली. ‘ज्ञानेश्वरांच्या दर्शनासाठी विज्ञानेश्वर’ असं आम्हा सर्वांना त्या वेळी वाटलं.
श्री क्षेत्र नेवासा ! अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीच्या तीरावर वसलेलं वारकरी किंवा भागवत धर्माचं जणू एक आध्यात्मिक पीठच! पुराणकाळापासून ओव्यांमध्ये जो उल्लेख सापडतो, त्या श्रीविष्णूंचं मोहिनीरूप धारण केलेलं अतिसुंदर हेमाडपंती पद्धतीचं मंदिर इथं आहे. चक्रधर स्वामींच्या ‘लीळाचरित्रा’मध्येही या मोहिनीराज अवताराविषयी उल्लेख आहे. महालयामाहात्म्य, आन्हिक सूत्रावली या ग्रंथांमध्येदेखील हे उल्लेख आढळतात असं नेवासा संस्थानच्या पुस्तिकेत नमूद केलं आहे.
तत्कालीन कर्मठपणामुळे आई-वडिलांना देहान्त प्रायश्चित्त घ्यावं लागल्यानंतर आळंदीहून पैठणला गेलेली ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं तिथून परतताना नेवासा इथं थांबली. या चारही भावंडांचा मुक्काम करवीरेश्वराच्या देवळात होता. इथं कोरण्यात आलेला शके ११६१ चा शिलालेखही उपलब्ध झाला आहे.
आजच्या ज्ञानेश्वर मंदिराच्या जागी त्यापूर्वी असलेल्या करवीरेश्वर मंदिरात असलेल्या पवित्र खांबावर (पैस) चंद्र-सूर्याच्या मूर्ती कोरलेल्या असून एक शिलालेखही आहे. अनेक शतकांपूर्वी मंदिराच्या अखंड दीपज्योतीसाठी ज्या दानशूर भाविकांनी आपलं योगदान दिलं, त्यांचाही नामोल्लेख या मंदिरात सापडतो. १९५३-५४ मध्ये पुण्यातील ख्यातनाम डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ)मधील संशोधक डॉ. एच. डी. साकलिया, इरावती कर्वे यांनी सध्याच्या ज्ञानेश्वर मंदिराच्या उत्तरेस ज्या टेकड्या होत्या, तिथं उत्खनन करून काही निष्कर्ष काढले. प्रवरा-गोदावरीच्या खोऱ्यातील मानववस्ती आणि तिथं जे अवशेष सापडले, त्यावरून ते अश्मयुगातील, ताम्र-पाषाण युगातील, तसंच सातवाहन काळातील आहेत, असेही उल्लेख आहेत.
थोरले बंधू श्रीगुरू निवृत्तिनाथांच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वरांनी करवीरेश्वर मंदिरातील पैस खांबाला टेकून सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरी सांगितली. गीतेच्या सातशे श्लोकांवर ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’त नऊ हजार ओव्यांमधून भाष्य केलं आहे. ज्ञानेश्वरी ही केवळ गीता टीकाच नाही, तर तिच्यात काव्य आणि तत्त्वज्ञानाचा समन्वय दिसून येतो. इतकंच नाही, तर समन्वयवादी विचारसरणीचा पुरस्कार करून ज्ञानेश्वरांनी शैव आणि वैष्णवांमधील संघर्षही नाहीसा केल्याचं संतसाहित्याचे भाष्यकार सांगतात.
‘शके बाराशे बारोत्तरे। तै टीका केली ज्ञानेश्वरे।
सच्चिदानंद बाबा आदरे। लेखकू जाहला।।’
ज्या मंदिरात बसून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, ते करवीरेश्वराचे मंदिर १५ व्या शतकापर्यंत चांगल्या स्थितीत होते. पुढे काळाच्या ओघात मंदिराचे अवशेष गेले; पण पैस खांब मात्र टिकून राहिला. काही काळानंतर जळके खुर्द येथील श्री. परदेशी यांनी या पवित्र खांबाचा जीर्णोद्धार केला. १९१७ च्या सुमारास कृष्णाजी त्रिंबक जोशी वकील आणि साथीदारांनी मंदिराचा विकास केला. याच नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी इथं जन्मलेले आणि पुढे ह.भ.प. बन्सी महाराज तांबे या नावाने ख्यातनाम झालेल्या बन्सी महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रचनास्थानाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी खूप परिश्रम घेतले. १६ जून १९४७ रोजी ज्ञानेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंडळाची स्थापना झाली. २५ मार्च १९४९ रोजी कै. मामासाहेब दांडेकरांच्या हस्ते कोनशिला बसविण्यात आली. त्यांच्याच हस्ते मंदिराचं लोकार्पण करायचं होतं; पण मामासाहेब आजारी पडल्यामुळे त्यांच्याच सांगण्यावरून २२ मार्च १९६३ रोजी इथल्या वास्तूचं ह.भ.प. धुंडा महाराज यांच्या हस्ते, रावसाहेब पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं. मंदिरासभोवती २४ खोल्यांचा भक्तनिवास, पाकशाळा, ओवरीचं बांधकाम, दत्त मंदिर, लक्ष्मी-नारायण मंदिराचीही उभारणी अनेकांच्या देणगीतून झाली. याच काळात बन्सी महाराजांनी अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराज सप्तशताब्दी सोहळा साजरा केला. इथं सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानराज माउली जन्मसोहळा (कृष्णाष्टमी), तुकाराम महाराज गाथा पारायण, कथा-कीर्तन-प्रवचनादी कार्यक्रम नियमितपणे होत असतात. संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्यानंतर अनेक वारकरी नेवासा इथं येतात. वेगवेगळ्या दिंड्याही येतात आणि तीन दिवसांचा हरिजागर सोहळा साजरा होतो. पुढे १९९४ मध्ये बन्सी महाराजांच्या निधनानंतर त्यांचं समाधी मंदिरही इथं बांधण्यात आलं.
या मंदिराला मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, सहजानंद भारती, आचार्य विनोबा भावे, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, सौ. वेणूताई चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे, पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील, बी. जे. खताळ, वि. स. पागे, बाळासाहेब भारदे अशा दिग्गजांनी भेटी देऊन ज्ञानेश्वरीच्या रचनास्थानाचं दर्शन घेतलं. संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचनाचं भाग्य ज्यांना लाभलं असेल, त्यांना स्वतःला वेगळीच कृतार्थता जाणवत असेल; पण ‘जागतिकीकरणाचं आद्य डॉक्युमेंट’ म्हणता येईल असं त्यातलं पसायदान म्हणताना, किंवा ऐकतानाही आपल्या मनातील अब्द अब्द विचार बाजूला जात असतील आणि विश्वकल्याणाच्या प्रार्थनेत आपण तल्लीन होऊ लागल्याचाही अनुभव अनेकांना येत असेल, येत असतो.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात, ‘ज्ञानेश्वरीतील पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीच्या उत्तुंग देवालयावरील कांचनाचा कळस आहे. देवालयाच्या दारापर्यंत ज्यांना पोचता येत नाही, ते आकाशात उंचावर गेलेल्या कळसाला दुरून नमस्कार करतात. पसायदान हा ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा सारांश आहे. ज्ञानेश्वरीचा प्रवास हा हिरे-माणकांनी भरलेल्या रत्नगुंफेतील प्रवास आहे. हा प्रवास संपवून आपण पसायदानापाशी येतो तेव्हा चैत्रातील सुंदर सोनेरी सकाळ आपल्याभोवती उजाडते आहे, असं वाटतं.’ नेवासा इथल्या मंदिरात पैस खांबाची गळाभेट आणि दर्शन घेऊन विनम्र होताना अनेक भक्तांच्या मनात याच भावना प्रकटत असतील !
(सदराचे लेखक पत्रकार असून शिक्षणक्षेत्रातल्या घडमोडींचे अभ्यासक आहेत.)
Web Title: Dr Sagar Deshpande Writes Dnyaneshwari Birthplace
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..