तरल भावना व्यक्त करणारा काव्यपट (डॉ. संदीप शिसोदे)

book review
book review

मुखपृष्ठावरच्या सुबक, रेखीव चित्रानं आणि "तसवीर-ए-सुखन' या चमकदार अक्षरांनी सजलेल्या पुस्तकावर क्षणार्धात नजर स्थिरावते. व्यवसायानं अभियंता असूनही आवड म्हणून हाती कुंचला आणि लेखणी धरलेल्या गिरीश मगरे यांचं हे पुस्तक. ही सुबक आणि देखणी चित्रं स्वत: कवीनंच रेखाटली आहेत, हे प्रस्तावना वाचताना समजतं. "तसवीर-ए-सुखन' या गजलसंग्रहाचे दोन भाग असून, दोन्ही तितकेच वाचनीय आहेत.

उर्दू गजलची सुरवात कशी झाली, कुठं झाली, हेही मगरे सुरवातीला सांगतात. गजल, कविता यांच्या संदर्भातल्या मूलभूत संकल्पना; तसंच अवघड शब्दांचे अर्थ, यांची माहिती काही पानांवर त्यांनी दिली आहे. पर्शियन आणि उर्दू भाषेतले नेहमी वापरले जाणारे शब्दही पुस्तकात अर्थासह देण्यात आले आहेत. यामुळं उर्दू आणि गजल यांविषयी अनभिज्ञ असलेल्या वाचकालाही पुरेपूर वाचनानंद घेता येईल. मिर्झा गालिब, फैज अहमद फैज, कैफी आजमी, आनंद बक्षी, मीर शौक, साहिर लुधियानवी यांचेही उत्तम, निवडक शेर पुस्तकात वाचायला मिळतात. या सगळ्यातून कवीचा उर्दू शेरोशायरीचा दांडगा व्यासंग दिसतो.

पुस्तकाच्या पहिल्या भागात "इश्‍किया नज्मे' आहेत. यात एकूण 53 नज्म आहेत. या सगळ्या प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या आहेत. दुसऱ्या भागात "दुनियादारी की नज्मे' आहेत. यात एकूण 54 नज्म आहेत. कवीची संवेदनशीलता, हळवेपणा यांचं दर्शन पुस्तकाच्या शीर्षकापासून आतल्या अनेक नज्ममध्येही वारंवार होतं. पहिल्या भागात कवी आपल्याला प्रेमाच्या विश्‍वाची सफर घडवतो, तर दुसऱ्या भागात आयुष्यातल्या वास्तवाशी "रूबरू' करून देतो. कवितासंग्रहाच्या पहिल्या भागाची सुरवात मधुबालाचं मनमोहक चित्र आणि "मुस्कान का जौहर' या नज्मनं होते. पुस्तकाच्या एका बाजूस उर्दू लिपीमध्ये लिहिलेली नज्म, तर दुसऱ्या बाजूस देवनागरीत लिहिलेली तीच नज्म "मुस्कान'विषयी भाष्य करते. अतिशय सुंदर शब्दात कवी म्हणतो :
लबपर लगी सीधी लकीरे,
सुस्कुरा कर थोडी तिरछी कर
यार मुस्कुराकर जी ले जिंदगी,
मुस्कुराते हो रुख्सत दुनियासे यार

सहज, उत्स्फूर्त शैलीत या नज्म मनाच्या तारा छेडत जातात. माणसाच्या आयुष्यातल्या सुंदर भावना कवी खूबसूरतीने त्याच्या कवितांमध्ये फुलवत जातो.
इश्‍क ही किती "पाकिजा' भावना आहे, हे तो सांगतो. इश्‍क हे "रुहानी' आहे, ते शरीराच्या पुढचं आहे, असा सुफियाना अंदाज नज्ममध्ये दिसून येतो. इश्‍क, प्रेम "रुहानी' असल्यामुळं ते जगभरात सगळ्यांना द्यावं, प्रेम ही देवाने माणसाला दिलेली एक देणगी आहे, या आशयाच्या कविता मनाला मोहरून टाकतात. पुढच्या काही कवितांमध्ये कवी देवाशी संवाद करतो. सृष्टीकर्त्याविषयी त्याच्या भावना व्यक्त करतो. देवाकडं काय मागावं, हे अतिशय सुंदरपणे मांडताना शायर म्हणतो :
दो ऐसी खैरात तुम मुझे
करो देनेवालोंके काफिलोंमे शामिल

काव्यसंग्रहाच्या पहिल्या भागाचं संमोहन कायम असतानाच आपण "तसवीर-ए-सुखन'चा दुसरा भाग हातात घेतो. या दुसऱ्या भागात कवी दु:ख, वेदना, तुटलेपणा, वैर आदींबाबत चिंतन मांडतो. जगण्यातले निखारे, विखारी नजरांपुढं करावी लागणारी धडपड तो व्यक्त करतो. जगाविषयी भावना कवी नेमकेपणानं कवितांमधून मांडतो. दु:खातून, त्रासातून माणसाला आयुष्याचा "फलसफा' उमगत जातो. काही नज्ममधून विदारक सत्य वाचकांपुढं कवी मांडतो. मगरे यांच्या संग्रहाचे दोन्ही भाग वाचताना जीवनव्यवहारात प्रकट झालेल्या प्रीतीच्या भावना आणि इष्ट, अनिष्ट गोष्टींकडे पाहून व्यक्त होणारा एक संवेदनशील कवी आपल्यापुढं उभा राहतो. खडतर जीवनप्रवासाचं वास्तव कळूनही प्रेमाच्या वाटेवर चालण्याची तो धडपड करतो. आयुष्याचा वेध घेऊ पाहतो. मनातल्या भावनांचा शब्दांच्या माध्यमातून आविष्कार करतो. उर्दूसारख्या गोड आणि मधुर भाषेवरील हुकमत नज्मच्या माध्यमातून समोर ठेवतो. या सगळ्यातून कवीच्या अभिव्यक्तीची समृद्धता लक्षात येते.

पुस्तकाचं नाव : तसवीर-ए-सुखन (भाग 1,2)
कवी : गिरीश मगरे
प्रकाशक : माइंड डिझाइन मार्केटिंग अँड कम्युनिकेशन्स, मुंबई
पानं : 132, 134, किंमत : 280 रुपये (प्रत्येकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com