सामान्य-असामान्य : स्वातंत्र्य

कालच स्वातंत्र्यदिनाच्या साजरा झाला. स्वातंत्र्यदिन म्हणजे छाती फुगवून, ताठ मानेनं फिरण्याचा, बंधुभावानं जगण्याचा दिवस.
Independence Day Celebration 2023
Independence Day Celebration 2023 Sakal

- डॉ. संजय वाटवे

कालच स्वातंत्र्यदिनाच्या साजरा झाला. स्वातंत्र्यदिन म्हणजे छाती फुगवून, ताठ मानेनं फिरण्याचा, बंधुभावानं जगण्याचा दिवस. दीडशे वर्षं गुलामगिरीत खितपत पडल्यामुळे स्वातंत्र्याची किंमत चांगलीच कळली आहे. कित्येकदा परिस्थितीजन्य जाचामुळे किंवा अंगीभूत कमजोरीमुळे मन खचून जातं. अशा नाजूक अवस्थेत मनाला अनेक बंधनं पडायला लागतात. दुबळेपणा वाढत जातो. मन अनेक प्रकारच्या बेड्यात जखडत जातं. आयुष्याची अनेक प्रकारे फरपट होते.

पुष्कळदा आपल्या संकल्पना आपले विश्वास किंवा पूर्वग्रहदूषित विचार मनाला बंधन घालतात आणि स्वतःच्या प्रगतीला अडकवून टाकतात. मानसिक पारतंत्र्य हे अनेक प्रकारच्या अपयशाला आणि ऱ्हासाला कारणीभूत असतं. या विचारांच्या आणि भावनांच्या शृंखला तोडून काढणं मुळीच सोपं नसतं.

आपणच आपल्या मनाला पाशात गुरफटवलं आहे, मर्यादित केलं आहे याची जाणीव स्वतःची स्वतःला होत नाही. आधी कळतच नाही, कळलं तरी पटत नाही. मग सुरू राहते आयुष्याची घसरण, उदासपणा, अपयश, नाती दुरावणं, करिअरमध्ये फेल जाणं असा सर्वांगीण ऱ्हास.

मनाच्या बेड्या तोडून आपल्या टॅलेंटला मुक्त करण्यासाठी ताकदवान शास्त्राची गरज लागते. जो ती घेतो तो स्वातंत्र्यसुख अनुभवतो. आणि जीवन एक वेगळ्याच पातळीला जाऊन पोचतं, भरारी घेतं. यशस्वीतेचा आनंद घेतं. ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळतं स्वातंत्र्य काय असतं! तुकाराम मेमाणे वडगावजवळच्या खेड्यात राहतात. त्यांची आठवण येण्याचं कारण स्वातंत्र्यदिन. नावाला शेतकरी; पण वडिलोपार्जित शेती जेमतेम दोन एकर. त्याच्यात काय कमावणार?

त्यातून नैसर्गिक आपत्ती, शेजाऱ्यांशी हद्दीवरून भांडणं, शेतमालाला भाव न मिळणं अशा समस्या कायमच्याच. शेतातलं पीक घरी खाण्यापुरतंच; पण मुलांना शिकवून मोठं करायचं हे स्वप्न उरी बाळगलेलं. मग जोडधंदा पाहिजेच. तुकाराम आणि त्याची बायको कष्टाला हटणारे नव्हतेच. तुकारामनं एक जोडधंदा शोधला होता.

तुकारामकडे एक जुनी स्कूटर होती. गावाकडच्या तुटक्या फुटक्या रस्त्यावरसुद्धा चालायची. तुकारामची बायको घरी बॉबी बनवायची आणि स्कूटरवर पिशव्या भरून जवळच्या शाळांमध्ये फिरून वाड्या-वस्त्यांवर जाऊन विकायचा. हळूहळू गोळ्या, चॉकलेटं, बिस्किटं, लॉलीपॉप, बुढ्ढीके बाल असे प्रकार वाढवत नेले. कष्ट फार होते; पण बरी कमाईही होत होती.

स्कूटरवर एवढ्या पिशव्या लादल्या जायच्या. त्या रचल्यावर एवढी तारांबळ व्हायची स्कूटर चालवताना की विचारता सोय नाही. अगदी सुरुवातीला पिशव्या विकल्या जायच्या. आधी तर त्या पिशव्यांच्या चळतीपुढे तुकाराम दिसायचेच नाहीत.

पण शाळेतल्या मधल्या सुट्टीत बरोबर वेळेला पोचायचे. खड्या आवाजातल्या त्यांच्या आरोळ्या ‘आय. एम. बॉबी’ किंवा ‘चॉकलेट’ ऐकल्या की पटापट पोरं गोळा व्हायची. माल खपायचा. थोड्या पिशव्या विकल्या गेल्या, की मागचे तुकाराम दिसायचे. मग पुढची शाळा. शाळांच्या वेळा संपल्या, की छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांत फिरून ‘आय. एम. बॉबी’ आणि ‘चॉकलेट’चे नारे सुरू. पोरं वाटच बघत असायची. सगळा माल संपेपर्यत फिरती चालूच.

पण अचानक नशीब फिरलं. कोरोनाच्या लाटेत वडील वारले. ते दुःख कमी की काय, संधीचा फायदा घेऊन शेजाऱ्यांनी भांडणं काढली. एक-दोन वेळा भांडणं टोकाला गेली. शेजाऱ्यांनी चार-पाच पोरं आणून तुकारामना घरी जाऊन मारलं. जखमी अवस्थेत आठ दिवस घरीच मलमपट्टी करावी लागली. त्यातच शेतमालाचा भाव पडला.

तुकारामच्या जखमा बऱ्या झाल्या; पण मन उभारीच घेईना. फिरती विक्री बंद, कमाई पण बंद झाली. रडायची वेळ आली.

हळूहळू सगळ्यांनी समजावून स्वतःला तयार केलं; पण स्कूटर चालवायचं डेअरींग होईच ना. कोपऱ्यापर्यत गेला, की छातीत कळ. अंगाला घाम. हातापायाची थरथर व्हायची. स्कूटर बंद. धंदा बंद.

तालुक्याच्या दवाखान्यात ईसीजी गोळ्या सगळं चालू होतं. गुण येईना. कमनशिबाचे भोग संपल्यानंतर त्याचा एक मित्र त्याला माझ्याकडे घेऊन आले. मला आठवतंय. सात ऑगस्ट ही तारीख होती. चर्चा झाली. तुकाराम बेड्यात कसे अडकत गेले, याची सविस्तर माहिती घेतली. त्यांना बरं करण्याचं आश्वासन देऊन पंधरा दिवसांच्या गोळ्या लिहून दिल्या.

तुकाराम गोळ्या घेऊन गावाकडे गेले. जवळपास सगळ्यांनी ‘वेडाच्या गोळ्या’ फेकून द्यायचा सल्ला दिला. काहीच झालेलं नाही, असं मतही दिलं; पण बायको ठाम राहिली. औषध घ्यायचीच असा हट्ट धरला. तुकारामनी मन घट्ट केलं आणि गोळ्या सुरू केल्या. पहिल्या दिवसापासून थोडं हलकं मोकळं वाटायला लागलं. रुसून बसलेली झोप सुरू झाली. धडधड कमी व्हायला लागली. भीती कमी झाली.

पंधरा ऑगस्टला संध्याकाळी तुकारामचा फोन आला. ‘साहेब चमत्कार झाला. अनेक महिने घरात खितपत पडलो होतो. हार्टच्या गोळ्या खात होतो; पण भीतीच सोडत नव्हती. त्यामुळे धंदा बंद. मानसिक गोळ्या घ्यायची माझी इच्छा नव्हती आणि इतरांची परवानगी नव्हती; पण असाही मेलोय तसाही मेलोय. म्हणून घेतल्या आणि चमत्कार झाला.

हळूहळू सगळी भीती कमी होती गेली. काल थोडी स्कूटर चालवून बघितली. आज डेअरींग करून स्कूटर काढली. सगळ्या शाळांत ध्वजवंदन होतं. बॉबीच्या जोडीला भिरभिऱ्याचे झेंडे घेतले होते. साठ झेंडे गेले साहेब. इतरही आयटेम बरेच खपले. खूप आनंद झाला साहेब. मन हलकं झालं. मोकळं मोकळं वाटतंय. कमाईही सुरू झाली. स्वातंत्र्याचा आनंद भोगतोय साहेब. सगळ्या बेड्या तुटून गेल्या साहेब!’

तुकाराम भसाभस बोलत राहिले आणि ढसाढस रडत राहिले. मला माझ्या शास्राचा अभिमान वाटला. मी ऐकत राहिलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com