सामान्य-असामान्य : सुरक्षाबंधन

कालच राखीपौर्णिमा होऊन गेली. भावा- बहिणीच्या अतूट नात्याची ही निशाणी. आपल्याकडे या सणाला फार महत्त्व आहे.
Raksha bandhan
Raksha bandhanSakal

- डॉ. संजय वाटवे

कालच राखीपौर्णिमा होऊन गेली. भावा- बहिणीच्या अतूट नात्याची ही निशाणी. आपल्याकडे या सणाला फार महत्त्व आहे.

चेतन सांडभोर एका कंपनीत कामाला होता. ऑफिसची कामं चोख करायचा म्हणून बेंद्रेसाहेबांचा लाडका; पण गेले काही दिवस बिथरल्यासारखा वागत होता. बाहेर गेला, की बाहेरच. फोन नेहमी स्वीच्ड ऑफ यायचा. फोन उचलला गेलाच, तर प्यायला आहे हे कळायचं.

इतकं वागणं बिथरलं, की त्याला हाकलून द्यावं असं सगळ्यांचं मत पडलं; पण बेंद्रेसाहेब वेगळा विचार करणारे होते. ते म्हणाले, ‘‘त्याचं संतुलन बिघडलं आहे. त्याला ट्रीटमेंट देऊ.’ ते स्वखर्चानं त्याला ट्रीटमेंटसाठी घेऊन आले. चेतन बारीक चणीचा. चालताना तोल सावरावा लागत होता. तांबरलेले डोळे, पिंजारलेले केस, रापलेला उग्रट चेहरा, कित्येक दिवस नीट जेवला नसावा, झोपलेला नसावा. बेचैनी चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

माझ्या प्रश्नोतरात काहीही इंटरेस्ट नव्हता. उडवाउडवीची उत्तरं दिली. व्यसनाचा इन्कार केला. मग शपथेवर उद्यापासून सोडतो म्हणाला. त्याच्याबरोबर एक ऑफिस कलीग आली होती. काळीसावळी, नीटनेटकी आणि तरतरीत. तिनं चेतनची नीट माहिती सांगितली. ट्रीटमेंटची माहिती घेतली आणि प्रिस्क्रिप्शन घेऊन औषध आणायला गेली.

ती गेल्यावर बेंद्रेसाहेबांकडे तिची माहिती घेतली. बेंद्रेसाहेब म्हणाले, ‘ती आमच्या ऑफिसचा कणा आहे. ती स्वतःची कामं झपाट्यानं करतेच आणि इतरांना मदतही करते. सगळा स्टाफ तिच्याशी खासगी गोष्टी शेअर करतो. ती सगळ्यांना धीर देते, सल्ला देते, आर्थिक मदतही करते. कामचुकार लोकही तिच्या शब्दावर कामं करतात. तिनंच आमच्या ऑफिसला शिस्त लावली. सिस्टिम लावली.’

बेंद्रेसाहेब कौतुकानं बोलत राहिले. ते म्हणाले, ‘आजकालच्या स्वार्थी जगात हा एक ‘युनिक पीस’ आहे. राखी चव्हाण तिचं नाव. सहा वर्षांपूर्वी आमच्या ऑफिसला आली. आणि सगळी कार्यक्षमता बदलवून टाकली. मी बॉस म्हणून काही गोष्टी करू शकत नव्हतो; पण ती वर्कर लेव्हलला जाऊन आपुलकीनं बोलून त्यांना धीर द्यायची. त्यांच्याकडून कामं करून घ्यायची. तिचा स्वभाव उदार, दिलदार आणि मनमिळाऊ आहे.

तसंच तिची लाईफस्टोरीही इंटरेस्टिंग आहे. ती मूळची भोरची. लग्न करून पुण्यात आली. तिच्या नवऱ्याचं एक छोटंसं युनिट आहे. तिला दोन मुलं आहेत. धाकटा भाऊ सुनील भोरला शेतीत खुश होता. सुनीलला गावातलीच मुलगी करून दिली. राखी दर तीन महिन्यांनी सुनीलकडे जाणार म्हणजे जाणार; पण सुनीतावहिनीचं वागणं उथळ आणि भांडखोर. राखीच त्यांची मिटवामिटवी करायची. सुनीलला जुळ्या मुली होत्या. करिश्मा आणि करिना.

दर सणाला राखी खाऊ, खेळणी, कपडे घेऊन जायची. मुलींचा पाचवा वाढदिवस आणि राखीपौर्णिमा एकाच आठवड्यात आल्या. राखीनं ती जोरदार साजरी केली. सगळ्यांना प्रेमभेटी दिल्याच. सुनीलला राखी बांधून प्रेमळपणे डोळे वटारले आणि रक्षण करायचा आदेश दिला. भावजयीला गोडीत वागण्याच्या सूचना दिल्या. आणि सुखानं परतली.

हा सुखसोहळा विसरायच्या आत आभाळ कोसळलं. सुनील शेतमाल घेऊन बाजाराकडे जात असताना त्याला ट्रकनं उडवलं आणि तो जागीच मरण पावला. राखी मोठी सुट्टी घेऊन भोरला मुक्कामी आली. भोरचं सगळं मार्गी लावूनच ती पुण्याला आली. राखी पुण्याला आली, तशी सुनीलची बायको बेबंद वागायला लागली. बाहेरची कामं आहेत असं सांगून बाहेर राहायला लागली.

मुलींना वेळच्या वेळी जेवायलासुद्धा मिळेनासं झालं. शाळेचे हाल व्हायला लागले. मुली खऱ्या अर्थानं उघड्यावर पडल्या. सुनीलच्या बायकोची बाहेर लफडी आहेत, असं कळालं. मग राखीनी चंग बांधला. सगळ्या नातेवाईकांना घेऊन भोरला गेली. दोन दिवस भलीथोरली मिटिंग घेतली. सुनीलची बायको सगळ्यांशी उर्मटपणेच वागली.

करिश्मा आणि करिनाला सगळ्यांसमोर आणलं गेलं. त्यांची केविलवाणी अवस्था पाहून राखीनं हंबरडा फोडला. दोघींना कुरवाळलं, मांडीवर घेतलं. नंतर शेतजमीन, राहतं घर, पीकपाण्याची विक्री असे सगळे आर्थिक व्यवहार नीट बसवले. सगळे जायला उठले.

राखीनं त्यांना थांबवून घेतलं आणि म्हणाली, ‘एक महत्त्वाचा निर्णय सांगायचाय. माझ्या भावाच्या माघारी पोरींचे हाल नकोत. मी पोरींना माझ्याकडे घेऊन जाणार आहे.’ सगळे अवाक झाले. चर्चा झाली; पण राखी आपल्या मतावर ठाम राहिली. पोरींना स्वतःकडे घेऊन गेली. काही वर्षं मुली तिच्याकडेच आहेत.

मी स्टोरी ऐकून प्रभावित झालो. राखी औषधं घेऊन आली. माझ्या नजरेत कौतुक, आदर असे भाव तरळले. मी म्हणालो, ‘तुमची स्टोरी समजली. तुम्हाला स्वतःचीही दोन मुलं आहेत ना? मग एवढी मोठी स्टेप कशी घेतली?’ राखी हसली आणि म्हणाली, ‘माझी दोन पोरं आहेत. त्यात या दोन पोरी. गुण्यागोविंदानं राहतात. भावाच्या पोरी म्हणजे माझ्याच की, लहान पोरांना माया लागते. राहतील गोडीगुलाबीने माझ्याकडे.’

मी थक्क होऊन ऐकत राहिलो. इस्टेटीवरून किंवा मानापमानावरून एकमेकांच्या जीवावर उठलेल्या भावा-बहिणींच्या अनेक केसेस आठवल्या. चेतन सांडभोरही तिचा कुणीही नव्हता; पण त्याच्यासाठीही ती झटत होती. बेंद्रेसाहेब आणि राखी जायला उठले. राखीचं कौतुक करायला माझ्याकडे पुरेसे शब्दही नव्हते; पण राखीला तरी काय हवं होतं? ती मनोभावे रक्षाबंधन पाळत होती. भाच्यांना सुरक्षाकवच देत होती. ती भरून पावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com