मी लेखक कसा घडलो....(डॉ. शेषराव मोहिते) 

मी लेखक कसा घडलो....(डॉ. शेषराव मोहिते) 

मराठी साहित्य संघ कडोली द्वारा आयोजित 34 व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला देऊन आपण माझा जो बहुमान केला आहे. त्याबद्दल इथल्या आयोजकांचे मी प्रथम ऋण व्यक्त करतो. मी तसा शेतीशास्त्राचा विद्यार्थी. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एका गावातील शेतकरी कुटुंबातील माझा जन्म. दहावीच्या वर्गात असताना मराठीच्या पुस्तकातील स्थूलवाचन विभागात आनंद यादव यांची "इंजेन' नावाची कथा होती. त्या संपूर्ण अभ्यासक्रमात आपलं काही जवळचं वाटावं असं तेव्हा वाटलं, पण पुढील शिक्षणात मराठीचा अभ्यास विषय म्हणून कधी संबंध आला नाही. अगदी काहीं काळ द्वितीय भाषा म्हणून मराठीचा पर्याय असताना देखील मराठी विषय घेतला नाही. इतकी धास्ती मराठीची बसण्याचे कारण म्हणजे मराठी विषयाचे पेपर तपासणारे शिक्षक. त्यांनी मनात मोठी धास्ती निर्माण करून ठेवली होती. दहावीला गणितात 90 गुण मिळाले होते तेंव्हा मराठीत गुण होते केवळ 45. मराठीच्या शिक्षकांनी जेवढे मराठीचे नुकसान केले आहे, तेवढे अन्य कुणी केले नसावे. 

कुठलाही लेखक लिहू लागण्यापूर्वी काही अनुभवातून जातो. कांही वाचतो. त्यातून त्याचा स्वतःचा असा कांही सूर गवसतो तेव्हाच तो लिहू लागतो. पुन्हा हे तो जे काही लिहीतो ते त्याला किंवा तिला जोवर वाटत नाही की हे जे जे काही मी अनुभवलं आहे, जाणवलं आहे, ते केवळ आपणच लिहू शकतो, अन्य कुणी नाही. तेव्हाच त्याच्या तिच्या हातून चांगलं काही लिहिलें जाण्याची शक्‍यता असते. 

वाचनाची आवड तशी शाळेत अक्षर ओळख झाली तेव्हापासूनच लागली. इतर सर्वजण वाचतात तसं चंद्रकांत काकोडकर, बाबूराव अर्नाळकर, बाबा कदम, गुलशन नंदा यांची पुस्तकं वाचण्यापासूनच ही सुरूवात झाली. हे लेखक साहित्यिक म्हणून मोठे असोत की नसोत पण शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकांच्या कपाटाकडे आम्हाला वळविण्याचं काम या लेखकांनी केलं या विषयी कुणाही वाचणाऱ्याने यांच्या विषयी कृतज्ञच असलं पाहिजे. तसा मी आहे. प्रत्येक मराठी वाचणाऱ्या आणि लिहिणाऱ्या माणसाच्या आयुष्यात साने गुरुजींचे साहित्य विशेषतः त्यांची "श्‍यामची आई' हा एक अपरिहार्य टप्पा येतोच. तसा तो माझ्याही वाट्यास आला. पण त्यापूर्वीच व्यंकटेश माळगुडकरांची "बनगरवाडी' आनंद यादवांची "गोतावळा' आणि रा रं बोराडे यांची "पाचोळा' या कादंबऱ्या विशेष जवळच्या वाटल्या होत्या. उद्धव शेळके यांची "धग' किंवा भालचंद नेमाडे यांची "कोसला' ह्या त्यामानाने उशीरा वाचनात आलेल्या कादंबऱ्या पण या दोन कादंबऱ्याचे माझ्यात लेखक किंवा कादंबरीकार म्हणून झालेल्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे. आजचे भाषण म्हणजे कांही आभार प्रदर्शनाचे किंवा सर्वाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचे भाषण नव्हे याची मला जाणिव आहे. पण एखादा गुरामागे हिंडणारा मुलगा साहित्याच्या प्रांतात कसा आला याचा मी स्वतःच्या मनाशी धांडोळा घेतो तेव्हा या लोकांची आठवण हमखास होते. 

देवघरात मंद तेवणाऱ्या समई सारखं प्रत्यक्ष जगणं आणि त्यांची कविता होती त्या मराठीतील थोर कवयित्री इंदिरा संत. ज्यांच्या कथा केवळ मराठीतच नव्हे तर जागतिक कथा वाङ्‌मयात श्रेष्ठ ठरल्या आहेत असे जी ए कुलकर्णी. कुणी म्हटलं आहे की जी. ए. म्हणजे मराठीतून लिहिणारा इंग्रजी कथाकार आहे. ज्यांच्या "कैरी', "राधी', "तुती मंगळागौर', "विदुषक', "स्वामी' या कथांनी महिनो न महिने नव्हे तर "कैरी' सारख्या कथेने तर आयुष्यभर पुरेल एवढी अस्वस्थता दिली. 

कुणी ग्रामीण कादंबरीकार म्हणून जेंव्हा माझा उल्लेख करतो, तेंव्हा मी स्वतःच संभ्रमात पडतो. आज कडोली आणि बेळगावला येण्यासाठीचे सर्वात मोठे आकर्षण माझ्यासाठी कोणते असेल तर प्रकाश नारायण संत यांच्या "वनवास', "शारदा संगीत', "पंखा' आणि "झुंबर' मधील लंपन आणि त्यांचे सर्व मित्र जिथे क्रिकेट खेळले ते बेळगावातील क्रिकेटचे मैदान, ते रेल्वेचे रूळ, ते भाजी मार्केट खूप दिवसांपासून जसं वाटत होते तो जी. एं. च्या कथातून साकारलेला परिसर एकदाचा पाहावा. तसाच हा लंपनचा परिसर आणि त्याचं बेळगाव पाहावं. प्रकाश नारायण संत यांनी या चार कथासंग्रहातील एक कथासंग्रह प्रत्येक मोठ्या माणसाच्या आत दडलेल्या लहान मुलास अर्पण केलाय. 

माणसाच्या जगण्यातील तो लंपन आणि सुमीच्या माध्यमातून मांडलेला शाळकरी पोर वयातील टप्पा. तो जगण्यातील निरागसपण प्रकाश संत यांना व्यक्त करता आला तो कोणाही लेखकास हेवा वाटायला लावणारा आहे. प्रकाश नारायण संत यांचे जेंव्हा केवळ वयाच्या 65-66 वर्षी अकाली अपघाती निधन झाले तेव्हा महाराष्ट्रातील कुठल्यातरी महाविद्यालयात अकरावी विज्ञानाच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थाचे पत्र "अनुष्टूंभ'मध्ये छापून आले होते. तो म्हणाला होता आज ती बातमी वर्तमानपत्रात वाचल्यापासून मला सारखं वर्गात रडू येत होतं. दिवसभर वाटल होतं की आज कोणत्या तरी शिक्षकानं वर्गात येऊन शिकविण्याऐवजी प्रकाश नारायण संत यांच्याविषयी बोलावं पण कुणीच काही बोललं नाही. 

1980 च्या दशकात महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक, निफाड, चाकण भागात कांद्याच्या आणि उसाच्या भावासाठी शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरु केलं. 1981 ला हे आंदोलन निपाणीच्या तंबाखू उत्पादकांपर्यंत येऊन पोहचलं. हा निपाणीहून जाणारा पुणे बंगळूर महामार्ग कित्येक दिवस तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांनी आणि सुभाष जोशी यांनी संघटीत केलेल्या विडी कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांनी रोखून ठेवला. आदल्या दिवशी शरद जोशी, सुभाष जोशी, भाई धारिया यांना पोलिसांनी अटक करून बेल्लारीच्या तुरूंगात टाकले आणि इकडे मध्यरात्री तेंव्हाच्या गुंडूराव सरकारच्या पोलिसांनी झोपेत असणाऱ्या शेतकरी स्त्री पुरूषांवर गोळीबार करून तेरा जणांचा बळी घेतला. 

परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठात तेव्हां शिकायला असणारे आम्ही विद्यार्थी "साप्ताहिक माणूस' मधील विजय परूळकर यांची लेखमाला "रक्तसूट' वाचून अक्षरशः बेभान झालो होतो. सगळ्या जगाला आग लावून टाकावी इतका संताप तेंव्हा यायचा. मराठवाड्यातील आंबेजोगाईला लागून असलेल्या मोरेवाडीतून श्रीरंगराव मोरे हे शेतकरी चळवळीतील एक नेते "भूमीसेवक' नावाचे पाक्षिक चालवायचे. 1981 च्या पंधरा ऑगस्ट विशेषांकात माझी पहिलीच कविता छापून आली तिचं शिर्षक आहे 

आमचा पंधरा ऑगस्ट कवा हाय? 

जवा उद्या पंधरा ऑगस्ट असायचा 
तवा माय माझी फाटकी आंगी टाचायची 
नवे कापडं नाहीत म्हणून 
बापावर राग काढायची 
कर्मावर बोटं मोडायची 

तवा बाप माझा 
कोपऱ्यातल्या दिव्याजवळ बसून 
पायतले काटे काढायचा 
तिथं मेण लावून जाळायचा 
आणि व्हटावर व्हट गच्च दाबून 
डोळ्यातून टिपं गाळायचा 

जवा उद्या पंधरा ऑगस्ट असायचा 
पण अलिकडं अलिकडं 
पंधरा ऑगस्ट आला की 
बाप माझा बिथरल्यावनी करतोय 
कुळवाचं रुमणं हातात घेतोय 
नाशिकात निपाणीत सांडलेल्या रक्ताच्यान 
आमचा पंधरा ऑगस्ट कवा हाय म्हणतोय 
आमचा पंधरा ऑगस्ट कवा हाय? 

तेव्हा माझं आणि निपाणी बेळगावचं नातं असे रक्ताचं आहे. इथलं ते आंदोलन समाप्त झाल्यावर बेल्लारीच्या तुरूंगातून शरद जोशी यांना सोडण्यात आले. त्यानंतर आम्ही परभणीच्या कृषी विद्यापीठात आयोजित केलेल्या शेतकऱ्यांच्या शिबीरासाठी ते आले होते. तो सगळा भाग तसेच देशभरातील शेतकऱ्यांत घडून आलेले जागरण हा माझ्या पुढील कादंबरीचा विषय असेल. 

माझी पिढी जेव्हा या लिहिण्याच्या प्रकाराकडे वळत होती तेव्हा मराठी साहित्य विश्‍वात एक मोठे मन्वंतर घडून गेले होते. तोवर एका विशिष्ट मध्यमवर्गीय महानगरीय वर्तुळातच केवळ मराठी साहित्य गुंतून पडले होते. एखाद्याच जी. ए. कुलकर्णी सारख्या या महानगरच्या बाहेर दुर कर्नाटकातील धारवाड सारख्या गावात राहून या संकूचित अनुभव विश्‍वाच्या कक्षा ओलांडल्या होत्या. तेंव्हा नारायण सुर्वे, बाबूराव बागुल, दया पवार, नामदेव ढसाळ, प्र. ई. सोनकांबळे, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर यांच्यारुपाने एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. दलित जाणिवेच्या कविता आणि दलित आत्मकथनं यांच्याद्वारे एका मोठ्या वंचित समाज घटकातील पिढ्या न पिढ्यापासून कोंडून राहिलेली घुसमट तो राग तो संताप ती हतबलता ती उद्वीग्नता व्यक्त झाली आणि हे वेदनेचं साहित्य मराठी साहित्यास जागतीक पातळीवर घेऊन गेलं कोंडवाडा या कविता संग्रहातील सुरूवातीच्याच कवितेत दया पवारांनी म्हटले आहे 
आज विषाद वाटतो 
कशा वागविल्या मनामनाच्या बेड्या 
चिखलात हत्तीचा कळप रुतावा 
तशा इच्छा आशा आकांक्षा रुतलेल्या 
शिळेखाली हात होता 
तरीही नाही फोडला हंबरडा 

तेव्हा माझ्या पिढीला साहित्य निर्मितीची प्रेरणा कुठून मिळाली असेल तर याचं नैसर्गिक उत्तर येतं दलित साहित्यातून. 

1980-81 च्या आसपासच्या नरहर कुरूंदकर यांचा एक लेख वाचनात आला. आजचे मराठी ग्रामीण साहित्य सामाजिक दृष्ट्‌या पुरेसे प्रक्षोभक आहे का? आम्हा मराठवाड्यातील तेंव्हाच्या संवेदनशील तरूण तरूणींसाठी नरहर कुरूंदकर म्हणजे दैवत. आजच्या म्हणजे तेंव्हाच्या मराठी ग्रामीण कथामधून जे किस्से सांगितले जात होते, त्यावर कुरूंदकरांनी तीव्र आक्षेप त्या लेखात घेतला आहे. ग्रामीण जीवनातील फॅक्‍टस वास्तव या कथातून यायला पाहिजे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती केवळ त्यामुळेच म्हणून नव्हे पण तेव्हाच्या एकूणच मराठी साहित्यातील शेतकऱ्यांच्या चित्रणाविषयी एक तीव्र असमाधान मनात होते. नागर समाज जीवनात वावरलेला लेखक कवी शेतकऱ्यांविषयी समजा काहींच लिहिणार नाही. पण जे लेखक विशेषतः कथा कादंबरीकार खेड्यातून आले आहेत त्यांच्याही लेखनात शेतकरी हा एकतर खलनायक म्हणून चित्रित झालेला किंवा बावळट खराखुरा हाडामांसाचा शेतकरी जो संत तुकारामाच्या अभंगातून आला. बहिणाबाई चौधरीच्या गाण्यातून आला. मुन्शी प्रेमचंद्र यांच्या कथा कादंबरीतून आला. पर्लबकच्या "द गुड अर्थ' मधून आला. तसा काही मराठीतून येतच नव्हता. अनेकांचा रोष पत्करून मी थोड बहुत जर काही केलं असेल तर हे शेतकऱ्याचं जगण आहे तसं कादंबरीतून आणण्याचा प्रयत्न केला. माझं हे म्हणणं काहीसं उद्धटपणाचे आहे हे मला कळतं पण हा उद्धटपणा लिहिणाऱ्या प्रत्येकाकडे असायला हवा असे मला प्रामाणिकपणे वाटतं 

जाता जाता आणखी एका गोष्टीचा कृतज्ञापूर्वक उल्लेख मला केला पाहिजे तो म्हणजे 1984 सालच्या "सोबत' या दिवाळी अंकात जेम्स हॅरियट या एका पशुवैद्यकीय डॉक्‍टरने लिहिलेल्या "ऑल दि क्रिएचर्स ऑफ गॉडः स्मॉल ऍन्ड ब्युटिफुल ट्रॅक' या कादंबरीतील काही भागाचा अनुवाद प्रसिद्ध झाला होता. एक वेगळ्याच प्रकारचं अनुभव विश्‍व जेंव्हा एखादा लेखक साकारतो तेंव्हा निश्‍चितपणे त्या त्या साहित्याच्या कक्षा रुंदावतात. ते साहित्य अधिक समृध्द बनते. एका पशुवैद्यकीय डॉक्‍टरच्या अनुभवांचे चित्रण इतक्‍या सुंदर आणि आनंददायी पद्धतीने येऊ शकते तर आपणासारख्या ऍग्रीकल्चर क्षेत्रातील माणसाने लिहायला काय हरकत आहे, अशी भावना ते लेखन वाचून झाली आणि त्या जेम्स हॅरियटच्या कादंबरीअंशाचा अतिशय सुंदर अनुवाद केला होता बेळगावच्या अनंत मनोहर यांनी. बेळगाव, धारवाड, निपाणी आणि एकूणच हा कर्नाटकात राहून मराठी साहित्य आणि मराठी समाजजीवन, मराठी संगीत, मराठी संस्कृती समृध्द करणाऱ्या या भूप्रदेशाविषयी माझ्या मनात असलेला कृतज्ञाभाव व्यक्त करतो आणि थांबतो. 

धन्यवाद 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com