धग उष्णतेची (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

धग उष्णतेची (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

महाराष्ट्रानं नुकतीच उष्णतेची लाट अनुभवली. अकोल्यातला पारा 46.9 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचला, तर पुण्यात सव्वाशे वर्षांतलं सर्वांत जास्त तापमान पाहायला मिळालं. ही लाट नेमकी कशामुळं येते, तिचे परिणाम काय होतात, जगभरात काय स्थिती असते, उष्णतेच्या लाटेची नेमकी व्याख्या काय आदी सर्व गोष्टींवर एक नजर. 

पुण्यातल्या उष्णतेच्या लाटेचा तडाखा आता कमी होत असला, तरी विदर्भ-मराठवाड्यात ही लाट काही कमी झालेली नाही. अकोल्यात पारा नुकताच 46.9 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन टेकला. ता. 28 एप्रिलला या लाटेनं महाराष्ट्रात तापमानाची अक्षरशः सीमा गाठली होती. त्या दिवशी 43 ते 47 अंश सेल्सिअसच्या तापमानकक्षेमुळं निर्माण झालेल्या उष्णतेचा जीवघेणा अनुभव सगळ्या महाराष्ट्रानं घेतला. पुण्यातलं त्या दिवशीचं 43 अंश सेल्सिअस तापमान तर गेल्या शंभर वर्षांतलं उच्चांकी तापमान होतं. त्यानंतर तापमानात थोडी घट झाली असली, तरी जाणवणारी उष्णता आणि हवेतली उच्च आर्द्रता यामुळं आग ओकणाऱ्या सूर्याची दाहकता कमी झाल्याचं कुठंही जाणवत नव्हतं. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य भारतात तीस एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेची धग अनुभवाला येत होतीच. ओडिशाच्या किनाऱ्यावर येऊ घातलेल्या फनी वादळामुळं तापमानात घट झाल्यामुळं उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. 

उन्हाळ्यांची वाढती धग 
खरं म्हणजे आपल्याला या सदैव वाढत्या उष्णतेची जाणीव गेल्या काही वर्षांपासूनच होऊ लागली आहे; पण तरीही या वर्षी हा प्रकोप थोडा जास्तच तीव्र झालाय. जागतिक तापमानवाढ आणि स्थानिक पातळीवर निसर्गात वाढत असलेला माणसाचा हस्तक्षेप आणि त्यामुळं ढासळू लागलेलं वातावरणाचं संतुलन या सगळ्यांचा तो एकत्रित परिणाम आहे. येत्या काही वर्षांतले उन्हाळे याहीपेक्षा अधिक उष्ण होऊ शकतात असं हवामानशास्त्रज्ञांचं भाकीत आहेच! 

उष्णतेच्या लाटेचा थोडा इतिहास बघितला, तर या भाकितातली सत्यता लक्षात येते. गेल्या काही वर्षांपासून सगळा भारत देश मार्च-एप्रिल महिन्यांत होणाऱ्या उष्णतेच्या लाटांचा अनुभव घेतो आहे. अगदी अलीकडच्या काळातली म्हणजे वर्ष 1995 मधली उष्णतेची लाट अशीच तीव्र होती- ज्यात हजार दीड ते दोन हजार जण उष्माघाताचे बळी ठरले होते. त्याही आधी वर्ष 1979 मध्ये आलेली लाट आणि नंतरच्या काळातल्या 2011, 2012, 2013 आणि 2015 मधल्या लाटा आजही अनेकांच्या स्मरणात असतील. वर्ष 1900 पासूनच जगभरात या लाटेनं अनेक वेळा अक्षरशः धुमाकूळ घातलाय. विसाव्या आणि एकविसाव्या शतकांत या लाटेची तीव्रता वाढण्याचे संकेत तेव्हापासूनच मिळत होते. भारतातली वर्ष 2015 मधली लाट अनेक अर्थांनी विध्वंसक होती. त्यावेळी मे महिन्यातलं दिवसाचं कमाल तापमान देशात अनेक ठिकाणी 45 ते 47 अंशांच्या आसपास होतं- जे सामान्य तापमानापेक्षा 3 ते 7 अंशांनी जास्त होतं! त्या वर्षी दिल्लीचं एप्रिल-मेचं तापमान 45.5 अंश, अलाहाबादचं 47.8 अंश, हैदराबादचं 46 अंश, तर खम्माम या शहरातलं तापमान 48 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं होतं! आंध्र प्रदेश आणि तेलंगणात; तसंच पश्‍चिम बंगाल आणि ओडिशात या लाटेचा मोठाच परिणाम जाणवला होता. या वर्षी त्याहीपेक्षा अधिक तीव्रतेच्या उष्णतेच्या लाटेत देशाचा मोठा भाग अक्षरशः होरपळून निघतो आहे. 

लाट नक्की कशामुळं? 
उष्णतेची ही लाट नेमकी कशामुळं आणि कशी तयार होते हे पाहिलं, तर त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण का जातं, तेही कळून येतं. भारतीय हवामान विभागानुसार, मैदानी प्रदेशातल्या एखाद्या ठिकाणाचं तापमान 40 अंश सेल्सिअसइतकं किंवा त्याहीपेक्षा जास्त, समुद्रकिनाऱ्यावरच्या ठिकाणी 37 अंश सेल्सिअसइतकं किंवा त्याहीपेक्षा जास्त आणि डोंगराळ प्रदेशातल्या ठिकाणी 30 अंश सेल्सिअसइतकं किंवा त्याहीपेक्षा जास्त होतं आणि तापमानात सरासरी तापमानापेक्षा 4.5 ते 6.4 अंश सेल्शिअसनी वाढ होते, तेव्हा उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. तापमानानं 46 अंश सेल्सिअस ही मर्यादा ओलांडली, की उष्णतेची अतितीव्र लाट निर्माण झाली असं म्हटलं जातं. या व्याख्येचा विचार करता महाराष्ट्रात परभणी, चंद्रपूर आणि अकोला या सर्व ठिकाणी 47.2 अंश तापमान नोंदलं गेलं असल्यामुळं इथं ही आपत्ती खऱ्या अर्थानं जाणवली. त्यामुळंच इथं सुरवातीला 'ऑरेंज ऍलर्ट' आणि नंतर 'रेड ऍलर्ट' अशी धोक्‍याची सूचना हवामान विभागाकडून देण्यात आली. याशिवाय अमरावती (45.8 अंश ), जळगाव (45.4 अंश ), नागपूर (44.9 अंश) आणि सोलापूर ( 44.3 अंश ) इथंही तापमान 40 अंशापेक्षा जास्त होतं आणि या ठिकाणी पुढं काही दिवस ही लाट कायम राहिली. 

उष्णतेच्या लाटेचा विचार करताना केवळ हवेचं वाढलेलं तापमान बघून भागात नाही. वाढलेल्या तापमानामुळं जाणवणारी परिसरातला उच्चतम उष्णता (हीट) आणि आर्द्रता हीसुद्धा लक्षात घ्यावी लागते. दिवसाचं जास्तीत जास्त तापमान आणि रात्रीचं कमीत कमी तापमान हे एखाद्या ठिकाणी नोंद होणाऱ्या विशिष्ट उच्चतम (थ्रेशोल्ड) तापमानापेक्षा किती वाढतं यावरून तिथं उष्णतेची लाट निर्माण झाली आहे की नाही ते ठरवलं जातं आणि या विशिष्ट मर्यादेच्यावर किती काळ हे तापमान त्याच स्थितीत आहे त्यावरून लाटेच्या तीव्रतेची पातळी ठरवली जाते. 

लाटेसाठी 'अनुकूल' स्थिती 
उच्च वातावरणातल्या वायुभाराच्या काही विशिष्ट परिस्थितीत या लाटा तयार होतात. वातावरणात 3,000 ते 7,600 मीटर उंचीवरच्या हवेतील वायुभार जेव्हा खूप वाढतो आणि एखाद्या भौगोलिक प्रदेशावर अनेक दिवस किंवा आठवडे तसाच टिकून राहतो, तेव्हा उष्णतेच्या लाटा निर्माण होण्याची परीस्थिती तयार होते. उंचावरच्या जेट स्ट्रीम्समुळंही जास्त वायुभार प्रदेश निर्माण होत असतात. या वाढलेल्या उच्च वायुभारामुळं त्या प्रदेशावरची हवा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दिशेनं खाली बसू लागते (सबसाइड्‌स ऑर सिंक्‍स) आणि ज्यात उष्णतेचं संक्रमण (हीट ट्रान्फर) होत नाही, अशा आंतरिक प्रक्रियेमुळं (अडियाबेटीक प्रोसेस) हवेच्या खालच्या थरांचं तापमानही वाढतं व हवा कोरडी होते. खाली येणारी उष्ण, उच्च दाबाची हवा, तापमानाचं उच्चस्तरीय व्यस्तन (हाय लेव्हल इन्व्हर्जन) घडवून आणतं आणि वातावरणात पृष्ठभागाभोवती उष्ण हवेचं घुमटाकृती (डोमल) आवरण तयार होतं. यामुळं हवेतलं अभिसरण (कन्व्हेक्‍शन) कमी होतं आणि जास्त आर्द्रतेची उष्ण हवा खालच्या थरात अडकून बसते. घुमटाच्या (डोम) बाह्य परिघावर (पेरिफेरी) मात्र अभिसरण चालू असतं आणि हवेचा भारही कमी होतो. या परिघीय अभिसरणामुळं वादळांच्या किंवा आवर्तांच्या अतिउंचीवरील बहिर्वाह (आऊटफ्लो) प्रदेशातली हवा घुमटाकृतीत प्रवेश करते आणि उष्णतेत आणखीनच वाढ होते आणि उष्णतेची लाट जाणवू लागते. घुमटाकृतीतली उच्च दाबाची हवा ढगांना आत प्रवेश करू देत नाही. वाऱ्याचं वहन थांबतं आणि सूर्यप्रकाश जास्त प्रखर जाणवतो. 

भारतात मॉन्सूनपूर्व काळात अशी हवामान परीस्थिती नेहमीच तयार होते. मॉन्सूनपूर्व काळात भारतात जो पाऊस पडतो तो कमी झाला किंवा झालाच नाही, तर हवेची आर्द्रता झपाट्यानं कमी होऊन हवा कोरडी होते आणि उष्णतावृद्धी होते. मॉन्सूनपूर्व पाऊस एकाएकी संपून जाण्याच्या गेल्या काही वर्षांच्या वृत्तीचाही उष्णतेच्या लाटा आणि त्यांची तीव्रता वाढण्यात हातभार लागला असल्याचं एक निरीक्षण आहेच. मार्च ते एप्रिल अखेरपर्यंतच्या काळात भारतात पडणाऱ्या मॉन्सूनपूर्व या वर्षी 27 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. देशात मॉन्सूनपूर्व पावसाची सरासरी 59.6 मिलोमीटर आहे. या वर्षी मॉन्सूनपूर्व पाऊस केवळ 43.3 मिलिमीटर एवढाच झाला आहे. जम्मू-काश्‍मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाना, उत्तराखंड आणि हिमाचल या उत्तरेकडच्या पट्टयातल्या राज्यांत मॉन्सूनपूर्व पावसात 38 टक्‍क्‍यांनी आणि दक्षिणेकडच्या राज्यांत 31 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. पूर्व आणि ईशान्य भारतातही मॉन्सूनपूर्व पावसात 23 टक्‍क्‍यांची घट आढळून आली आहे. काही हवामानशास्त्रज्ञांच्या मते, एल्‌ निनो आणि 'लू' नावाचं पाकिस्तान आणि वायव्य भारताकडून वाहणारे वारे यामुळंही उष्णतेच्या लाटेत वाढ होत असावी. 

उष्णतेच्या लाटेतल्या हवेचं तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असतंच, शिवाय हवेची आर्द्रताही 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असते. किनारी हवामानाच्या प्रदेशांत तर आर्द्रता 70 ते 75 टक्केही असते. या लाटांचा प्रादुर्भाव असलेल्या भागांत उष्माघाताचे बळी तर होतातच, शिवाय शेतीचं मोठं नुकसान होतं, जंगलांत आगी लागतात, रस्त्यांवरचं डांबर वितळणं, रेल्वे मार्गावरील रुळ तडकणं, फिश प्लेट्‌सचं प्रसरण होणं अशाही घटना घडतात. 

उष्णतेच्या लाटेचे निर्देशांक 
प्रत्येक देशाचं दैनंदिन कमाल तापमान त्याच्या अक्षवृत्तीय स्थानावर अवलंबून असल्यामुळं निरनिराळ्या देशांनी उष्णतेच्या लाटेचे त्यांचे त्यांचे निर्देशांक ठरवले आहेत. नेदरलॅंड्‌स, बेल्जियम, लक्‍झेनबर्ग इथं सलग पाच दिवसाचं 25 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि त्यापैकी निदान तीन दिवसाचं तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असलं, तर उष्णतेची लाट असल्याचं मानलं जातं. डेन्मार्कमध्ये देशाच्या पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भागांत सलग तीन दिवस तापमान 28 अंशापेक्षा जास्त असेल तर, स्वीडनमध्ये सलग पाच दिवस 25 अंशापेक्षा जास्त, अमेरिकेत सलग दोन ते तीन दिवस 32 अंशापेक्षा जास्त, ऑस्ट्रेलियात सलग पाच दिवस 35 अंशापेक्षा जास्त किंवा सलग तीन दिवस 40 अंशापेक्षा जास्त तापमान असणं यासाठी गरजेचं मानलं जातं. 

भारतात उष्णतेची लाट अधिक तीव्रतेनं जाणवण्याची काही निश्‍चित कारणं आहेत. वेगानं कमी होणारी झाडांची संख्या, कॉंक्रिटीकरणाचं वाढतं प्रमाण, शहरात तयार होणारी उष्णतेची बेटं (हीट आयलॅंड्‌स), अतिनील किरणाचं वाढतं प्रमाण ही त्यातली काही महत्त्वाची कारणं. या संकटाचा सामना करण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात निश्‍चित नियोजन करण्याची नितांत गरज आहे. शहरं आणि ग्रामीण भागातल्या उन्हाळ्यातील तापमानाच्या गेल्या काही वर्षांतल्या नोंदी एकत्र करून त्यावर आधारित असे उष्णतेच्या लाटेचे अंदाज फायदेशीर ठरू शकतात. त्यानुसार, नागरिकांचं आरोग्य, पाण्याच्या आणि ऊर्जा साधनांच्या सोई यांसारख्या गोष्टींचं प्राधान्यानं नियोजन करता येतं. मोकळ्या हवेत काम करणाऱ्या आणि वाढत्या उन्हामुळं लगेच बाधित होणाऱ्या लोकांसाठी त्वरित मदत मिळण्याच्या योजना तयार करणं आणि अशा सगळ्या योजनांची उष्णतेची लाट असलेल्या काळात परिणामकारी अंमलबजावणी राबवणं या गोष्टींची भारतासारख्या देशाला भविष्यात मोठी गरज भासू शकते हे नक्की. 

धगीचे परिणाम 
उष्णतेच्या लाटेमुळं परिणाम खूप वेगवेगळ्या प्रकारचे असल्याचं जगभरातील अभ्यासातून दिसून येतं. आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा विभिन्न पातळ्यांवर या लाटेची धग सर्वदूर परिणाम करीत असते. लाटेच्या काळातल्या अतिउष्णतेमुळं मानसिक ताणतणाव वाढत असल्याचं निरीक्षण अनेकांनी नोंदवल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं माणसाची क्रयशक्ती (परफॉर्मन्स) कमी होते. अनेक वेळा गुन्हेगारी वृत्तीतही वाढ होते. सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर व्यक्ती-व्यक्तींतला संघर्ष आणि कलह वाढतो. वाढलेल्या तापमानाचा देशाच्या आर्थिक उलाढालींवर होणारा परिणाम उत्पादनक्षमतेच्या घसरणीत दिसून येतो. 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात एक अंशानं वाढ झाली, तर दर दिवसाची आर्थिक उत्पादनक्षमता दोन टक्‍क्‍यांनी कमी होते, असंही एक गणित मांडण्यात आलेलं आहे. उष्णतेची लाट असलेल्या काळात वीजनिर्मितीत वाढ करावी लागत असल्यामुळं वीजपुरवठा वारंवार खंडित होऊन त्याचाही परिणाम उद्योगधंद्यावर होतोच. 

या सर्वांबरोबरच परिसर- पर्यावरण- परिस्थितीकी यावरही या लाटेचे मोठेच परिणाम होताना दिसतात. एखाद्या प्रदेशात या लाटेचा प्रादुर्भाव पाच दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिला, तर प्राणी- पक्षी- वनस्पती- पृष्ठजल- भूजल वेगानं बाधित होऊ लागतात. पर्यावरणाचं संतुलन ढासळू लागतं. शेतीप्रधान देशातल्या शेती व्यवसायावर लाटेचा दूरगामी परिणाम होण्याची चिन्ह दिसू लागतात. 

निसर्गाच्या या प्रकोपापासून सगळ्यांचं रक्षण कसं करता येईल, हे पाहणंच केवळ आपल्या हातात असतं आणि ते तसं करताही येतं. सगळ्या उपलब्ध यंत्रणा सक्षमपणे राबवून उष्णतेच्या लाटेची आणि परिणामांची तीव्रता कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी केल्याची उदाहरणं आपल्यासमोर आहेतच! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com