कोरल ट्रॅंगलच्या विनाशाची नांदी (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

डॉ. श्रीकांत कार्लेकर shrikantkarlekar18@gmail.com
रविवार, 23 डिसेंबर 2018

तापमानबदलाचा वेग असाच सुरू राहिला, तर पृथ्वीवरच्या तापमानात दोन अंश सेल्सिअसनं वाढ होईल आणि जगातले नव्वद टक्के प्रमाण वर्ष 2100पर्यंत पूर्णपणे नष्ट होतील, असा अहवाल इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंजनं नुकताच दिला आहे. जगाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या "कोरल ट्रॅंगल' भागावर मोठा परिणाम होणार आहे. हा भाग नेमका कुठं आहे, त्याची काय वैशिष्ट्यं आहेत, तिथलं पर्यावरण महत्त्वाचं का आहे आदींचा वेध.

तापमानबदलाचा वेग असाच सुरू राहिला, तर पृथ्वीवरच्या तापमानात दोन अंश सेल्सिअसनं वाढ होईल आणि जगातले नव्वद टक्के प्रमाण वर्ष 2100पर्यंत पूर्णपणे नष्ट होतील, असा अहवाल इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंजनं नुकताच दिला आहे. जगाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या "कोरल ट्रॅंगल' भागावर मोठा परिणाम होणार आहे. हा भाग नेमका कुठं आहे, त्याची काय वैशिष्ट्यं आहेत, तिथलं पर्यावरण महत्त्वाचं का आहे आदींचा वेध.

इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंजचा (आयपीसीसी) हवामानबदलाविषयीचा नवीन अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्यानुसार, सध्या जगभरात चालू असलेला तापमानबदलाचा वेग असाच पुढं सुरू राहिला, तर भविष्यात पृथ्वीवरच्या तापमानात दोन अंश सेल्शिअसनं वाढ होईल आणि त्याचे अनेक गंभीर परिणाम होतील. त्यातला एक परिणाम म्हणजे जगातली नव्वद टक्के प्रवाळ (कोरल्स) वर्ष 2100 पर्यंत पूर्णपणे नष्ट होतील. या कोरल्सचं रक्षण करण्यासाठी आतापासून प्रयत्न करणं आवश्‍यक बनलं आहे. "कोरल ट्रॅंगल' हा पश्‍चिम प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर यामधला प्रदेश हे प्रवाळांची नैसर्गिक समृद्धी, त्यांची संवेदनशीलता दाखवणारं एक उत्तम उदाहरण आहे.

आयपीसीसीच्या नवीन अहवालानुसार, तापमानवाढ दोन अंश सेल्शिअसपेक्षा जास्त झाली, तर या त्रिकोणाच्या मोठ्या भागातले प्रवाळ नष्ट होतील. या शतकाच्या अखेरीपर्यंत त्रिकोणातल्या समुद्राचं तापमान एक ते दोन अंशांनी वाढू शकेल. त्यामुळं समुद्रजल अधिक खारट होईल आणि त्यात प्रवाळ अजिबात जगू शकणार नाहीत! समुद्रपातळी निदान एक मीटरनं तरी वाढेलच. यामुळं प्रवाळांबरोबरच खारफुटीचा (मॅन्ग्रोव्ह) मोठा नाश होईल. त्रिकोणाचे काही भाग अशा परिस्थितीतही चांगले टिकून राहतील. गेल्या पन्नास वर्षांतच इथल्या चाळीस टक्के प्रवाळ प्रजाती आणि खारफुटींचा ऱ्हास झाला आहे.

प्रवाळ आणि प्रवाळभित्ती प्रदेश, सदाहरित जंगलं आणि आर्द्रभूमी प्रदेश ही पृथ्वीवरची ऊर्जाकेंद्रं समजली जातात. इथूनच जैविक विविधता सर्वदूर पसरते. प्रवाळ भित्ती (कोरल रिफ) तयार करणारे प्रवाळ हे एकत्रितपणे चुन्याचं संचयन करून विस्तृत वसाहती करणारे सागरी जीव आहेत. सध्याच्या हवामानबदलाचा आणि जागतिक तापमानवाढीचा पहिला बळी प्रवाळ प्रदेश असतील, असे संकेत गेल्या दोन दशकांपासून मिळू लागलेच आहेत. याच कारणामुळं जगातल्या प्रवाळ प्रदेशांचं रक्षण आणि संवर्धन हे पर्यावरणरक्षणाचे प्राधान्यानं करण्याचे उपाय म्हणून त्यांची दखल घेतली जाते आहे. या दृष्टीनं खरं म्हणजे काही प्रदेशांतून प्रयत्नही सुरू झाले आहेत.
उथळ सागरतळांवर आणि सागरी बेटांच्या किनाऱ्याजवळ तयार होणाऱ्या प्रवाळ खडकांना "प्रवाळ भित्ती खडक' किंवा "मंच' असं म्हटलं जातं. सीमावर्ती किंवा फ्रिनजिंग रिफ, रोधक किंवा बॅरिअर रिफ आणि कंकणाकृती किंवा ऍटोल असे त्यांचे मुख्य प्रकार आहेत. प्रवाळ आणि प्रवाळ बेटं ही पर्यावरणबदलांच्या दृष्टीनं खूपच संवेदनशील असतात. प्रवाळ बेटावरच्या पर्यावरणात अगदी थोडासाही बदल झाला, तरी बेटावरच्या प्रवाळांच्या संपूर्ण वसाहतीवर त्याचा दूरगामी व संहारक असा परिणाम होऊ शकतो.

"कोरल ट्रॅंगल' हा पश्‍चिम प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर यांच्या संगमाच्या विषुववृत्तीय प्रदेशात पसरलेला एक विस्तीर्ण सागरी प्रदेश असून, त्यात इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेटं आणि तिमोर लेस्टी या सहा देशांच्या विशिष्ट आर्थिक प्रदेशांचा (ईईझेड) समावेश होतो. यांच्या सीमा जोडून होणारा प्रदेश त्रिकोणाकृती असल्यामुळं याला "कोरल ट्रॅंगल' (प्रवाळ त्रिकोण) असं म्हटलं जातं. याच्या सीमारेषा, प्रवाळ आणि प्रवाळ भित्ती खडकातील मत्स्य संपदेतील वैविध्य यांच्या आधारे नक्की करण्यात आल्या आहेत. सागरी जीवांतलं वैविध्य आणि विपुलता यांचं प्रतिनिधित्व करणारं हे एक सशक्त जैवविविधता जागतिक केंद्र आहे, असंच या त्रिकोणाचं वर्णन केलं जातं.

या त्रिकोणात समुद्राचं जवळजवळ 55 कोटी हेक्‍टर क्षेत्र सामावलेलं आहे. यापैकी आठ कोटी हेक्‍टर क्षेत्र हा समुद्रतळाचा दोनशे मीटर खोलीपर्यंतचा उथळ समुद्रतळ किंवा भूखंड विस्तार (कॉंटिनेंटल शेल्फ) आहे. या त्रिकोणाच्या सीमेवरच्या किनाऱ्याची एकूण लांबी एक लाख 32 हजार 636 किलोमीटर असून, यात समाविष्ट झालेल्या प्रवाळ भित्तींचं क्षेत्र जगातल्या एकूण प्रवाळ खडकांच्या क्षेत्रापैकी तीस टक्के इतकं आहे. जगातील्या समुद्रात दीड टक्के क्षेत्र या त्रिकोणानं व्यापलं आहे.

प्रवाळांच्या दृष्टीनं विचार करता जगातला हा एक विस्तृत असा प्रवाळसमृद्ध प्रदेश आहे. जगातल्या परिचित अशा सर्व प्रवाळ जातींपैकी 76 टक्के जमाती या त्रिकोणात आढळतात. इथल्या प्रवाळ खडकात आढळणाऱ्या मत्स्य जातींपैकी 37 टक्के जाती आणि जागतिक प्रवाळ खडकांपैकी 53 टक्के खडक इथं आढळतात. याचबरोबर या त्रिकोणात खारफुटी जंगलांचे विस्तृत प्रदेशही आढळून येतात. "टुना' माशांचं प्राबल्यही दिसतं. सागरी कासवांच्या सहा प्रजाती, टुना मासे आणि ब्लू व्हेल्स या सर्वांसाठी हा प्रदेश अंडी घालण्याचा आणि रोपणाचा एक आदर्श प्रदेश आहे. या प्रदेशाची जैविक उत्पादनक्षमता केवळ अचंबित करणारी अशीच आहे.

या त्रिकोणातील जैवभौगोलिक (बायोजिओग्राफिकल) परिस्थिती इतकी समृद्ध आणि सशक्त आहे, की सध्याच्या मोठ्या हवामानबदलाच्या काळातही हे प्रवाळ टिकून राहू शकतील आणि अनेक सागरी जीवांसाठी हे एक उत्तम आश्रयस्थान म्हणून उपयोगी पडू शकेल. या त्रिकोणातील सागरी आणि किनारी जैविक संसाधनं (रिसोर्सेस) त्रिकोणातल्या आणि जवळपासच्या 36 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी एक मोठं वरदानच ठरलं आहे.

सध्याच्या सततच्या वाढत्या समुद्रपातळीचा आणि उष्ण व आम्ल बनू लागलेल्या सागरजलाचा परिणाम इथंही जाणवू लागला आहेच. प्रवाळ भित्ती खडक परिसंस्थेच्या झीजेची आणि विनाशाची चिन्हंही आता दिसू लागली आहेत. जगातल्या इतर परिसंस्थांप्रमाणंच माणसाचा हस्तक्षेप इथंही दिसू लागला आहे . किनारपट्ट्यांच्या प्रदेशातली विकासकामं, अतिरेकी मत्स्य उत्पादन यामुळं निम्म्यापेक्षा जास्त प्रवाळ आणि प्रवाळ खडक विरयन (ब्लीचिंग) प्रवण बनले आहेत. प्रवाळ परिसंस्थेचा हा ऱ्हास त्रिकोणातल्या सर्वच देशांच्या दृष्टीनं धोकादायक ठरू शकतो. हे लक्षात आणून देण्यासाठीच "कोरल ट्रॅंगल डे' दरवर्षी जूनमध्ये साजरा केला जातो. त्या अनुषंगानं अन्नसुरक्षा, वैश्विक उष्णतावाढ, सागरी जैवविविधता अशा अनेक समस्यांचा विचारही केला जातो.

सध्या या त्रिकोणातल्या देशांत वाढत असलेली लोकसंख्या, वाढता आर्थिक विकास आणि टुना, श्रिम्प मासे आणि प्रवाळ कीटक यांचा जपान, चीन, अमेरिका आणि युरोप या देशांबरोबर सुरू असलेला व्यापार आणि त्यामुळं होऊ लागलेली प्रमाणापेक्षा जास्त मासेमारी यातून सागरी प्रदूषणासारख्या समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. यामुळं ट्रॅंगलमधल्या देशांनी सागरी संरक्षित क्षेत्रं ओळखून त्यानुसार त्यांचं परिणामकारक व्यवस्थापन सुरू केलं आहे.

या त्रिकोणात सर्वाधिक विविधता इंडोनेशिअन पपुआच्या बर्डस हेड या द्वीपकल्पावर आढळून येते. इथं प्रवाळांच्या 574 जमाती दिसून येतात. सुलू समुद्र, साऊ समुद्र आणि मिल्ने उपसागर इथं केवळ देशी (इंडिजिनिअस) प्रजाती आढळतात. भौगोलिक सुसूत्रता आणि सागर पर्यावरणीय सारखेपणा लक्षात घेऊन या त्रिकोणाचे परिसंस्था विभाग (इको रीजन्स) तयार करण्यात आले असून, त्यांच्या आधारे इथल्या प्रवाळांचं आणि प्रवाळ खडकांचं उत्तम प्रकारे संरक्षण आणि संधारण केलं जात आहे. तरीही त्यांचा सध्या सुरू असलेला ऱ्हास आणि दोन अंशांच्या तापमानवाढीमुळं भविष्यात होऊ घातलेला विनाश काळजी वाढविणारा आहे, यात शंका नाही.

Web Title: dr shrikant karlekar write article in saptarang