अभ्यासाची 'परीक्षा' (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse write article in saptarang
dr shruti panse write article in saptarang

मुलांच्या अभ्यासाविषयी, शैक्षणिक प्रगतीविषयी शाळेतून पालकांपर्यंत काही तक्रार केली जाते, तेव्हा शिक्षकांनी आधी काही निरीक्षण केलेलं असतं. अशा वेळी अनेक पालक भांबावून जातात. हा अक्षरशः पालकांच्याच "परीक्षे'चा काळ असतो. त्याला योग्य रितीनं सामोरं गेलं आणि योग्य उपाय योजले, तर मुलांच्या भविष्याची पायाभरणी योग्य प्रकारे करता येऊ शकते.

मुलं शाळेत जाण्याचा काळ हा बालवाडीपासून ते साधारणपणे बारावीपर्यंत असा खूप मोठा असतो. या काळामध्ये सर्व काही छान चालू राहिलं, सुरळीत असेल, तर आई-बाबांना मुलांच्या अभ्यासाचा "अभ्यास' करावा लागत नाही. मुलं आपापला अभ्यास करतात; पण अनेक घरांमध्ये पालकांना यात लक्ष घालावं लागतं. शाळेत जाऊन मुलांच्या विविध प्रकारच्या तक्रारी ऐकणं ही एक अवघड गोष्ट असते. कारण कितीही वाटलं, तरी आई-बाबा मुलांना समजावून सांगण्याचं, त्यासाठी शिस्त लावण्याचं आणि त्यासाठी रागावण्याचं काम घरी करतील; पण शाळेतल्या वागण्यावर नियंत्रण कसं ठेवणार? याचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं.

इयत्ता पुढं जातात, तशा काही मुलांमध्ये अभ्यासाच्या तक्रारी सुरू होतात. मुलं सातत्यानं परीक्षेमध्ये मागं पडत असतील, तर शिक्षक पालकांना बोलावून लक्ष द्यायला सांगतात. एखादा असा दिवस येतो, की जेव्हा पालकांना शाळेतून बोलावणं येतं आणि "तुमच्या मुलांना अभ्यासात कमी गती आहे- त्याला नेहमीच कमी मार्क पडतात,' अशी तक्रार पालकांपर्यंत जाते, तेव्हा शिक्षकांनी या समस्येचं काही ना काही विश्‍लेषण केलेलं असतं. उदाहरणार्थ, काही मुलं खूप चंचल असतात. ती एका जागेवर बसून अभ्यास करू शकत नाहीत. त्यांच्यात एकाग्रता कमी असते आणि त्यामुळं त्यांना मार्क कमी पडतात. काही मुलं व्यवस्थित अभ्यास करतात, समजून घेतात; पण त्यांच्यात स्मरणशक्ती कदाचित कमी असते आणि त्यामुळं त्यांना परीक्षेमध्ये कमी मार्क मिळतात. शिक्षक मुलांचं परीक्षण करतात. त्यांच्या परीनं काही प्रयत्न करतात आणि जेव्हा हे प्रयत्न अयशस्वी होतात, तेव्हा पालकांना बोलावलं जातं. या अशा प्रश्नांची व्याप्ती आणि संख्या दोन्हीही सध्या वाढत्या प्रमाणात आहे. यासाठी एक विशिष्ट वयही सांगता येणार नाही, कारण पूर्वी आठवी ते दहावी या काळात "आता काहीतरी करायलाच पाहिजे,' अशा पद्धतीनं हा प्रश्न युद्धपातळीवर हाताळला जायचा; पण आता बालवाडीतली छोटी परीक्षादेखील मोठी परीक्षा ठरू लागली आहे.
खरंतर एकदा मुलाला शाळेत पाठवून दिलं, की कित्येक पालकांची भूमिका संपल्यासारखीच असते. मुलांना एखादी गोष्ट येत नसेल, तर काय करायचं हे बहुतांश पालकांना माहीत नसतं आणि स्वतः अभ्यास घेणं ही तर खूपच लांबची गोष्ट असते. त्यामुळं अशा परिस्थितीत नेमकं काय करायला हवं, हे माहीत नसल्यामुळे भांबावून जाण्याची वेळ पालकांवर येते. ज्या वेळेला शिक्षक मुलांच्या वर्तनाबद्दल किंवा अभ्यासातल्या कमतरतांबद्दल बोलत असतात, त्या वेळेला जणू काही आपलीच परीक्षा आहे आणि आपल्यालाच सातत्यानं मार्क कमी पडत आहेत, अशी निराशा पालकांच्या मनात निर्माण होते. ज्या पालकांना वारंवार या गोष्टीला तोंड द्यावं लागतं, त्यांना पुन्हा स्वतःचेच अभ्यासाचे दिवस आठवतात.

अशा- पुन्हा एकदा अभ्यासाला बसलेल्या- पालकांचे दोन ते तीन प्रकार असतात. पहिल्या प्रकारातले पालक स्वतः अत्यंत हुशार, बुद्धिमान आणि पहिल्या नंबरचे असतात. त्यांना "समजत नाही' असं काहीच नसतं. स्वतः मेहनत करून पुढं जाण्याची त्यांची तयारी असते. असे पालक असतील, तर त्यांना मुलांच्या अभ्यासात अशा काय तक्रारी असतात हे समजत नाही आणि खपतही नाही. असे पालक मुलांच्या नाही, तर स्वतःच्या नजरेनं या प्रश्नाकडं बघतात. त्यांना हे लांच्छनास्पद वगैरे वाटतं. याचं कारण मुलांमध्ये बौद्धिक सोडून काही वेगळ्या अडचणी असू शकतात, हे त्यांना मान्य होण्यासारखं नसतं. दुसऱ्या प्रकारचे पालक हे मुलांना अशा काही अडचणी असू शकतात, हे पटकन समजून घेऊ शकतात. कारण तेदेखील शालेय पातळीवर खूप हुशार या वर्गातले नसतात. त्यांनासुद्धा अभ्यासात भरपूर अडचणी आलेल्या असतात. त्यामुळं असे पालक मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि योग्य मार्ग काढू शकतात. तिसऱ्या प्रकारचे पालक असे असतात, की ज्यांना आयुष्यात शिक्षण घेण्याची संधी फारशी कधी मिळालेली नसते. असे पालक अक्षरशः जीवाचं रान करून मुलांना चांगल्या शाळेत घालतात. त्यांची फी भरण्यासाठी आणि त्यांना योग्य ती सर्व संधी मिळण्यासाठी स्वतःच्या आयुष्यात खूप कष्ट उपसत असतात. मुलांनी शिकावं अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. अशा परिस्थितीत जर त्यांच्या अपेक्षांना मुलं कमी पडली तर या पालकांना ते सहन होत नाही. "मी सगळं करतो, तू फक्त शिक' असं म्हणण्याइतकं शिक्षण आता सोपं राहिलेलं नाही. ते गुंतागुंतीचं झालं आहे. शाळेमध्ये अनेक विषय अभ्यासावे लागतात, ते सर्वच्या सर्व मुलांच्या आवडीचे असतीलच असं नाही. कुठल्या तरी आधीच्या इयत्तेत मूल मागं पडलेलं असतं आणि त्यामुळं त्यांना पुढचं येत नसतं. जेव्हा ते सुरवातीला मागं पडतं, त्याच वेळी त्याला मदतीचा हात दिला गेला नाही, तर ते अजून मागं पडत जातं. शिक्षणातली ही गुंतागुंत आई-बाबांच्या माहितीची नसते. मात्र, या तिन्ही पालकांच्या दृष्टीनं विचार केला, तर त्यांच्यासाठी या कसोटीच्या वेळा असतात आणि आता त्यातून कसं बाहेर पडायचं, हे खरोखर त्यांना समजत नसतं.

मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडवणं हे काम आई-बाबांना करायचं असेल, तर सगळ्यात पहिली पायरी आहे, ती म्हणजे हा प्रश्न आपल्याला शांतपणे आणि शास्त्रीय पद्धतीनं सोडवायचा आहे, हे मनात पक्कं करणं. त्यासाठी शिक्षकांकडून नेमक्‍या काय अडचणी येतात हे समजून घेणं. टाइमटेबल आखून योग्य पद्धतीनं अभ्यास होतो आहे का हे बघणं. अभ्यासाचा ताण न घेता आणि न देता रोज एक ते दीड तास अभ्यास या गोष्टीला दिला, तर मुलं यातून बाहेर येऊ शकतील. मुलांचा कल नेमका कुठं आहे, ते ओळखून त्यानुसार पावलं उचलणं ही झाली दुसरी पायरी. मुलांचा जर एखाद्या कलेकडं किंवा खेळाकडं ओढा असेल, तर त्याला त्यापासून पूर्ण परावृत्त करून अभ्यासाला लावणं हे योग्य नव्हे. अभ्यास करायचाच आहे हे सांगून त्याला त्याच्या कलेसाठी किंवा खेळासाठी मोकळीक देणं हे आवश्‍यक आहे. तिसरी आणि या दोन्हींइतकी महत्त्वाची पायरी म्हणजे कुठल्याही प्रकारे आपल्या मुलांचा मार्कांवरून अपमान होणार नाही याची काळजी घेणं. अभ्यासासाठी पाठीमागं लागणं, वेळोवेळी आठवण करून देणं या गोष्टी कराव्या लागतील; पण अभ्यासावरून जर त्याला चारचौघांत बोलणी खावी लागली, त्याला सतत कमी लेखलं, तर ते मूल अभ्यासाला लागत नाही तर अभ्यासापासून लांब पळतं!

आताच्या पिढीला कायमच "अभ्यासू' असावं लागणार आहे, त्यांचा अभ्यास कधी थांबणार- संपणार नाहीये, मग आताच अभ्यासापासून लांब पळून कसं चालेल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com