आपण आनंदी आहोत का? (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse
dr shruti panse

पालकत्वाची प्रक्रिया परीक्षा घेणारी असते. मात्र, अनेकदा अनेक नकारात्मक विचार पालकांना निराश करतात आणि पालकत्वाची प्रक्रिया ताणाची होऊन बसते. पालकत्वाची प्रक्रिया आनंददायी करण्यासाठी पालकांनी आधी स्वतःलाच थोडं तपासून बघितलं पाहिजे. आनंदाच्या प्रक्रियेत कोणते विचार अडसर बनत आहेत हे तपासून बघितलं पाहिजे आणि ते दूर केले पाहिजेत. नकारात्मकता निघून गेली, की मन शांत होतं आणि पालक मुलांबरोबर आनंदक्षण घालवण्यासाठी सज्ज होऊ शकतात.

"जगातला सर्वात आनंदी देश कोणता,' हा विषय घेऊन एक सर्वेक्षण केलं तेव्हा 2018 या चालू वर्षी फिनलॅंडचा नंबर पहिला होता. भारताचा 133वा.
आपण आनंदी आहोत का? आपण आनंदी राहण्यासाठी काय करायला हवं? एकदा पालक झालो, की आपण 24 x 7 पालक असतो. आई-बाबा झाल्याचा आनंद काही जगावेगळा असतो. मुलांमुळं आपण पुन्हा एकदा मूल होतो. त्यांच्या नजरेतून जग बघतो. मजा, गंमत, आनंद असतोच; पण विविध आव्हानांना तोंड द्यावं लागतं, हेही नाकारून चालणार नाही. ती आव्हानं पेलताना आणि या समस्या सोडवताना कस लागतो. कारण प्रत्येक मूल वेगळं असतं, तसं या समस्याही वेगळ्या असतात. आपण काही पालकत्वाची "पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री' घेतलेली नसते. जेवढ्या वयाचं आपलं मोठं मूल, तेच आपलं पालक म्हणून वय. समजा, आपण तीस वर्ष वयाची एक सज्ञान, जबाबदार, उच्चशिक्षित, नोकरदार वगैरे सन्माननीय व्यक्ती असू; पण आपलं मोठं मूल चार महिने असेल, तर आपलं "पालकवय' चार महिने इतकंच असतं. आपण यात नवे असतो. त्यामुळं कधीकधी ताण येणार, नक्की पुढं काय करायचं हे कळत नाही. समजा दोन मुलं असली, तरी दोन्ही मुलं आपल्याला वेगवेगळा पेपर सोडवायला देऊच शकतात. अशा वेळी "आमचा मोठा मुलगा शहाणा होता. शांत ह्‌ोता; पण हा काहीतरी वेगळाच आहे.' असं पालकांना म्हणावं लागतं. एकाच्या वस्तू कदाचित दुसऱ्याला चालतील, पण एकाच्या वेळचे आपले अनुभव दुसऱ्याच्या वेळेला चालतीलच असं सांगता येत नाही. अशा वेळी आपलं पालकवय नक्की किती ठरवायचं?
इथं एक मजेदार उदाहरण आहे. एक माणूस होता. त्यानं पालकत्व या विषयाची काही पुस्तकं वाचली. त्याला हा विषय आवडला. फार सोपा वाटला. त्यानं या विषयावर कार्यशाळा घ्यायच्या ठरवल्या. "उत्तम पालकत्वासाठी करायलाच हव्यात अशा दहा गोष्टी' असं या कार्यशाळेचं नाव ठेवलं. काही वर्षांनी त्याचं लग्न झालं. त्यानं कार्यशाळेचं नाव बदललं आणि ठेवलं ः "पालकत्वाविषयी पाच सूचना'. यथावकाश त्याला एक मूल झालं. पुन्हा नाव बदललं ः "पालकत्वाविषयी तीन सल्ले.' असे बदल त्याच्या मानसिकतेत झाले. यापुढची गोष्ट म्हणजे त्याला पुढं जुळं झालं. अखेर या माणसानं हे काम पूर्णच सोडून दिलं. थोडक्‍यात काय, तर पालक म्हणून वावरायचं तर रेडिमेड उत्तरं तर नसतातच, शिवाय सोपा पेपर येईलच असं काही सांगता येत नाही; पण अवघड पेपरचा ताण घेतला तर उत्तरं वेळेवर सुचणार नाहीत.

मुलांशी असलेलं आपलं नातं उभं राहत असतं, आकार घेत असतं, तेव्हा खूप मागण्या करत असतं, हे खरं आहे. त्या पूर्ण करण्यासाठी तन, मन आणि धनानं सतत उभं राहावं लागतं. या समस्यांची कसलीही गणिती सूत्रं नसतात; मात्र या समस्या सोडवताना स्वत: त्यात हरवून जायचं नाही. मानसिकदृष्ट्या स्थिर असायला पाहिजे. आनंदी राहायचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात, एखादी गंभीर समस्या असेल तर आनंद हा ओढूनताणून आणता येत नाही; पण निदान आपलं मानसिक आरोग्य नीट राहावं यासाठी काही गोष्टी करायला हव्यात. त्यासाठी आपले विचार तपासून बघायला हवेत.

विचार 1 ः काही वेळा मुलांचं काही चुकलेलं नसतं, ती खेळत असतात; पण इतर कोणत्या कारणावरून निराश झालेल्या आई-बाबांचा एका क्षणी ताबा सुटतो आणि कोणावरचा तरी राग आपल्या लहानग्यांवर काढतात, म्हणूनच आई-बाबा एकवेळ फार आनंदी- उत्साही नसले तरी चालतील; पण नैराश्‍यात असायला नकोत. आपण आहोत का निराश?

विचार 2 ः घरातली कामं चुकत नाहीत, जबाबदाऱ्या कधीच पूर्ण होत नाहीत. बाहेरची कामं तर अत्यावश्‍यकच! स्वत:कडं लक्ष द्यायला वेळ आणणार तरी कुठून? आई-बाबाच कंटाळलेले असले, तरी मुलं खेळत- हसत- दंगा करत राहतात; पण त्यांचं लक्ष असतं आई-बाबांकडे. आपण फार कंटाळलोय का?

विचार 3 ः "मी असं करायला नकोच होतं', "मी हे लग्नच करायला नको होतं', "मी गाव सोडलं हीच माझी चूक झाली', "मला लग्नात मिळालेल्या वस्तू तू घरच्यांना का देऊन टाकल्या'... अशा भूतकाळातल्या अत्यंत निरर्थक गोष्टींत वर्षानुवर्ष गेलं तरी भांडत राहतात माणसं. भांडण स्वत:शी आणि इतरांशीही. भांडायचंच असेल तर विषय तरी आजचा हवा. जी गोष्ट कालचक्र उलटं फिरवून पुन्हा घडवून आणता येणार नाही, त्याविषयी काय भांडायचं? आजचा दिवस आणि आजचा चांगला मूड का घालवायचा? भूतकाळात जगतोय का आपण?

विचार 4 ः काही जण स्वत:ला अतिशय नावं ठेवतात. स्वत:च्या चुका मनातल्या मनात उगाळत ठेवतात. हातून चुका होतातच. त्या एकदाच स्पष्टपणे कबूल करून टाकायच्या. त्यात सुधारणा करायच्या आणि गोष्टी सोडून द्यायाच्या. आपण का स्वत:ला बघतो आरोपीच्या पिंजऱ्यात?

विचार 5 ः हल्लीच्या आई-बाबांमध्ये अपराधी भावना फार येते. "मी काही करू शकलो नाही/ शकले नाही' या भावनेचा उपयोग चुका सुधारण्यासाठी जरूर करावा; पण त्यातच राहिलं तर आपली सकारात्मक ऊर्जा, उत्साह, चांगलं काही घडेल याची आशा सगळं काही संपून जातं. कितीही कंटाळा आला, तरी नेहमीपेक्षा वेगळ्या कामात मन गुंतवून घेतल्यावर आपला मूड परत जाग्यावर येतो. काही जण मुलांना "स्ट्रेस बस्टर्स' म्हणतात. त्यांच्याबरोबर मन रमवलं, की आपले सगळे ताण हलके होऊन जातात. "स्ट्रेस बस्टर्स' कसले; हे तर "स्ट्रेस बूस्टर्स' आहेत, असंही काही जण म्हणतात. खरंय! कधीकधी नाही, तर अगदी सारखीच मुलं आपली परीक्षा घेताहेत. चिडचिड करताहेत, पसारा तर सारखाच होतोय, हट्ट, आक्रस्ताळेपणा, सातमजली आरडाओरडा, आजारपण अशा गोष्टींना रोजरोज सामोरं जावं लागतंय... असंही होऊ शकतं. होतंच! यामुळं खूप ताण येतोय का आपल्याला?

असे नकारात्मक विचार मनात आले, की आधी ते आलेत हे ओळखा. त्यांना मनात जागा देऊ नका. घालवून द्या. ती वेळ जाऊ द्या. त्यावेळी जर मुलांवर आरडाओरडा केला तर घराची रणभूमी होते. आपल्या हृदयावर, रक्तप्रवाहांवर, मानसिकतेवर, मेंदूवर विपरीत परिणाम होतात. मुलांवर कसलाही परिणाम होत नाही. ती त्यांना वागायचं तसंच वागतात. मग रागावून काय उपयोग?

लहान मुलांना आपण रागावतो, तेव्हा ते बऱ्याचदा खोटंखोटं असतं. दाखवण्यापुरतं असतं. त्या मुलाला चुकीच्या वागण्यापासून परावृत्त करण्यापुरतं असतं; पण वाढत्या वयातल्या मुलांना रागावताना लहानपणची ही युक्ती मुळीच सफल होत नाही. त्यापेक्षा अतिशय शांतपणे, वेळ हातात असताना जटिल प्रश्न सोडवायला घ्या. खूपदा असं होतं, की नकारात्मकता निघून गेली, की मानसिक स्थिती शांत होते. उपाय सुचण्याची शक्‍यता निर्माण होते. आकाशातलं मळभ निघून जातं. पुन्हा एकदा आपण आपल्या मुलांबरोबर आनंदाचे क्षण घालवायला सज्ज होतो! वयाच्या त्या त्या टप्प्यावरचे हे भारावलेले क्षण पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. ते आत्ताच अनुभवायला हवेत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com