'डिजिटल अफेअर्स' (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse
dr shruti panse

नुकताच नवा मोबाईल डेटासकट हातात मिळालेल्या नव्या टीनएजर्सच्या भावविश्वात बदल झाले आहेत. त्यातून वेगळीच "डिजिटल अफेअर्स' सुरू होतात. डीपी बघून आणि इन्स्टाग्रॅमवरच्या फोटोंचा पाऊस बघून प्रेम किंवा आकर्षण तयार होतं. हे एक प्रकारे "मोबाईल-फोटो आकर्षण' असतं. चॅटिंगमधून अनेक गोष्टी सुरू होतात. "डिजिटल लव्ह अफेअर'मध्ये तर जवळ येणं-ब्रेकअप होणं हे अगदी जलदपणे घडतं. हे सगळं पालकांच्या आवाक्‍याबाहेरचं असतं.

एका आकडेवारीनुसार मोबाईल वापरणाऱ्यांचं प्रमाण आपल्या देशात सर्वात जास्त आहे. घरोघरी टीव्हीच्या आक्रमणानंतर सर्व प्रकारच्या स्क्रीनचं आकर्षण सर्वसामान्य स्त्री-पुरुषांना आहे. मोबाईलवापरावरून घटस्फोटापर्यंत मजल गेली आहे. व्हॉट्‌सऍप मेसेजमुळं सामूहिक झुंडशाहीतून माणसांना मारण्याचे प्रकार घडले आहेत. हे जर मोठ्यांच्या बाबतीत घडत असेल, तर लहान मुलांच्या आणि विशेषत: ज्यांना नुकताच नवा मोबाईल डेटासकट हातात मिळाला आहे, अशा नव्या टीनएजर्सचं काय? त्यांच्या भावविश्वात कोणते बदल झाले आहेत आणि त्यावर आपण काय करायला हवं आहे?
नुकतंच दिल्लीमध्ये 19 वर्षांच्या एका मुलानं आई-बाबा मोबाईलवरून बोलतात, अभ्यास केला नाही म्हणून रागावतात, म्हणून रात्री त्यांची हत्या केली, हा प्रसंग ताजाच आहे. तो आणि त्याचे मित्र ऑनलाइन गेम्स खेळायचे. या मुलानं पूर्वीही स्वत:च्याच किडनॅपिंगचा प्रकार रचला होता, असं बातम्यांवरून समजतंय; पण मोबाईल फोन तो काय आणि त्यावरून आई-बाबा-बहिणीची हत्या? या दोन गोष्टींचा ताळमेळ बसत नाही.

घरात वाढत्या वयातली मुलंमुली असतील, तर तसेही काही ना काही प्रश्न उभे राहतातच. लहान बाळ असल्यापासून ते साधारणपणे सातवी-आठवीच्या वयापर्यंत गुणी बाळ असणारी मुलं-मुली अचानक कूस बदलतात. आठवीपासून साधारण बारावीपर्यंतचं हे वय फारच वेगळं असतं. मुलं-मुली या वयात फारच बदलतात. वेगळी वागायला लागतात. हे वयानुसार घडतंच; पण त्यात आता नवं वळण मोबाईल फोनचं आलंय. ही एक वस्तू त्यांच्या हातात यायचा अवकाश, त्यांचं वागणंच बदलून जाताना आपण बघतो.

या वयात नैसर्गिकरित्याच मुलं कधीकधी एकदमच घुमी होतात. बाहेर काय घडलंय हे घरात सांगत नाहीत. काही त्रास होतो आहे, काही समस्या आहेत, याबद्दल कोणाशीही बोलत नाहीत; पण मोबाईल हातात असला, की त्यात तासन्‌तास रंगून जातात. वेळकाळाचं, अभ्यास, परीक्षांचं कसलंच भान राहत नाही. यातला ऑनलाइन गेम्स हा प्रकार अनेकांनी मिळून खेळायचा असतो. त्यात मजा आणि टाईमपास असतो. याचं व्यसन मात्र लागतं. या खेळात कसली मजा असं आईबाबांना वाटू शकतं; पण मुलांसाठी ते फार महत्त्वाचं असतं. कारण यातसुद्धा स्पर्धा असतात. टूर्नामेंट्‌स असतात. जिंकणाऱ्याला काहीतरी भारी आमिष दाखवलेलं असतं. ते बक्षीसही ऑनलाइन मिळतं. शरीरांतर्गत आणि मेंदूत होणाऱ्या बदलांमुळं काही मुलं-मुली खूपच जास्त चिडचिडी होतात. मुलांवर निरातिशय प्रेम करणाऱ्या आई-बाबांशीच फटकून वागतात. प्रचंड चुकीचं वागूनही यांचाच आवाज घरामध्ये चढा असते. जेवण- अभ्यास, मैत्री, शिक्षक, छंद अशा कोणत्याही विषयावर कोणी काही सांगितलं, सुचवलं, म्हटलं, म्हणून बघितलं, चर्चा करण्याचा प्रयत्न केला, की यांची चिडचिड सुरू होते. आवाज सातव्या मजल्यावर पोचतो. कशामुळं एवढा राग येतोय, हे आई-बाबांना काही केल्या कळत नाही. यातला काही भाग नैसर्गिक आहे; पण त्यात मोबाईलव्यसनामुळे भरही पडली आहे, हे नाकारून चालणार नाही.
कोणतंही, कसलंही बोलणं या मुलांना उपदेशच वाटतो आणि उपदेश ऐकायची अजिबात तयारी नसते. हे वागणं खपवून घेताघेता आई-बाबांच्या आणि सगळ्या घरादाराच्या नाकी नऊ येतात. त्यात जर प्रेमप्रकरणांची भर पडली, तर काय करायचं?
आत्ताच्या काळातल्या मुलामुलींची प्रेमप्रकरणं किंवा "काफ लव्ह' म्हणू आपण- ही काही वेगळीच असतात. खास "डिजिटल लव्ह अफेअर्स' असतात. उदाहरणार्थ, काही प्रकरणांमध्ये प्रेम हा शब्द नसतोच. फक्त "चॅटिंग' असतं. डीपी बघून आणि इन्स्टावरच्या फोटोंचा पाऊस बघून हे प्रेम किंवा आकर्षण तयार झालेलं असतं. आकर्षण तरी कसं म्हणावं? ते निर्माण व्हायलासुद्धा काहीतरी बीजस्वरूपात असावं लागतं. असं यात काहीही नसतं. हे एकप्रकारे "मोबाईल-फोटो आकर्षण' किंवा असं काहीतरी म्हणावं लागेल. तरीही एकमेकांना हे दोघं काही तरी सांगत असतात. फक्त लिहून व्यक्त करत असतात. या व्यक्त करण्यात काय काय असतं? "नाइस डीपी', "थॅंक यू' अशी सुरवात होते. त्यावरून काही दिवसांतच हळूहळू गाडी "माझी आई अशी वागते, माझे बाबा असंच करतात, त्यांनी मला नवा मोबाईल फोन घेऊन दिला नाही, मला खूप कमी मार्क पडतात ना म्हणून सगळे माझ्याशी असे वागतात' इथपासून ते "तुला पार्टनरकडून काय अपेक्षा आहेत' इथपर्यंत प्रेमाच्या गप्पा सुरू होतात. अशा प्रकारचं हे "चॅटिंग!' असं चॅटिंग एका वेळी अनेकांशी किंवा अनेकींशी चालू असतं. कोणाला काय कळतंय? एका मुलाची किंवा मुलीची वेगवेगळ्या नावानं अनेक अकाऊंट्‌स असू शकतात. यात कोणी कोणाला भेटायचा प्रश्नच येत नाही. कारण भेटायचं नसतंच मुळी. सगळं कन्व्हर्सेशन्स डिलिट केली, की मनाची पाटी कोरी. "नवीन कोणीतरी बघायचं' हे वाक्‍य एकवचनी घ्या, नाहीतर अनेकवचनी.
दुसरा प्रकारसुद्धा "डिजिटल लव्ह अफेअर'चा. इथं मुलंमुली कदाचित ओळखीची असतील किंवा नसतील; पण ती कुठंतरी, कोणत्या तरी कारणानं एकत्र येतात, चार घटका एकत्र येतात. या काळात भरपूर फोटो काढतात. एकमेकांना किती प्रमाणात आवडलेत यावर एकमेकांच्या किती जवळ जायचं आहे हे ठरतं. त्यानुसार एकमेकांना चिकटून फोटो काढले जातात. हा प्रकार निव्वळ इतरांना जळवण्यासाठी, आपण किती "कूल' आहोत, फ्री आहोत हे दाखवण्यासाठी हे फोटो असतात. असे काही दिवस एका BF किंवा GF बरोबर फोटो टाकून झाले आणि दरम्यान दुसरा फोटोजनिक चेहरा मिळाला, की ब्रेक-अपचे इमोजी इन्स्टावर पोस्ट करायचे. तेही ब्रेकअप सॉंगसह! (प्रेमभंगाची दु:खी गाणी नसतात हल्ली फारशी! "ब्रेक अप' सॉंग मात्र असतात. तीसुद्धा इन्स्टावर टाकण्यापुरती; भावनांशी संबंध नसतो.) नव्या फोटोजनिक चेहऱ्यांनिशी तोच खेळ पुन्हा. यात प्रेम भावना वगैरे दूरचीच गोष्ट! चुकून घरातल्या मोठ्यांना असले फोटो दिसले, की ""क्काही क्काssय! हा काही माझा BF नाही किंवा ती काय GF नाही,'' असं सांगून मोकळे! जरा खोदायचा प्रयत्न केला तर ""जस्ट फ्रेंड हो! अमुकतमुक ठिकाणी भेटलो होतो म्हणून फोटो काढले,'' असं म्हटलं, की संपला विषय! सहज फोटो काढले?? आणि ते असे?? फार जुनी उदात्त प्रेमाची उदाहरणं नाही देत; पण "क्‍यूएसक्‍यूटी', "एमपीके'पर्यंतच्या काळातले आई-बाबासुद्धा गार पडतात हे ऐकून! म्हणजे नक्की काय? या वागण्यावर रागवायचं की नाही?? सहज घ्यायचं ते नक्‍क्‍की किती? सहज घेतलं आणि चुकीचं काही घडलं तर काय? असं मनातल्या मनात का होईना; म्हणायची वेळ पालकांवर येते. इतकं हे वय वेड्यासारखं वागतंय सध्या.

या वयाचे आणि या वयानं निर्माण केलेले प्रश्न काही वेगळेच. लहान असताना आई-बाबांच्या खोट्याखोट्या चिडण्यालासुद्धा मूल बिचकायचं आणि आई-बाबा म्हणतील तसं करून मोकळं व्हायचं. आता मात्र खरंखुरं रागावून, संतापूनही फरक पडत नाही. "नाही' असं सांगूनही हवं तेच करतात. या प्रश्नांची आणि समस्यांची जातकुळीच बदललेली आहे, हे जाणवतं. प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळंच! मुलं छोटी असताना काही प्रश्न निर्माण झाले, तर घरातच सोडवणूक करता यायची. आता मात्र शाळा- कॉलेज, त्यांचे नवे मित्र-मैत्रिणी, कधी मित्र-मैत्रिणींचे पालक आणि त्यापेक्षा जास्त आव्हान आहे ते या हवेत चालणाऱ्या डिजिटल अफेअर्सचा. किती आणि कसल्या कसल्या काळज्या करायच्या? आणि मुला-मुलींचं काय... ते तर मस्त मजेतच असणार...

"फोन बंद', "फोन द्यायचा नाही' हे पर्याय फार काळ चालत नाहीत, असं अनेक उदाहरणांवरून दिसून आलंय. यावर एक उपाय असा आहे, की त्यांचा मेंदू, हात आणि पाय सर्वांना काम मिळेल अशा त्यांना आवडतील, ज्यातून त्यांना नव्या गोष्टी शिकता येतील असे पर्याय शोधून काढायला पाहिजेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com